आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तो अन् ‘ती’ चा संघर्ष

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोलीस कर्मचारी ललित साळवे नुकतेच लिंगबदल शस्त्रक्रिया करून नोकरीवर रुजू झाले अाहेत, त्यामुळे या विषयावर चर्चा होऊ लागली आहे. अशीच लिंगबदल शस्त्रक्रिया केलेल्या कोलकात्यातील एक शिक्षिकेचे हे अनुभव. या व्यक्तींचा प्रवास किती खडतर होतो, तोही निव्वळ समाजातील चुकीच्या मानसिकतेमुळे, हे सांगणारे.


दुपारची वेळ. तिशीतील सुचित्रा प्राचार्यांच्या केबिनमध्ये गेल्या. इंग्रजी आणि भूगोल विषयात एमए, बीडएडची पदवी आणि जोडीला १० वर्षांचा शिकवण्याचा अनुभव असल्याने नोकरी आपल्यालाच मिळेल हा आत्मविश्वास त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट झळकत होता. फाइल चाळल्यानंतर प्राचार्यांनी जे काही विचारले ते ऐकून सुचित्रांच्या पायाखालची वाळूच सरकली. शैक्षणिक योग्यतेवर प्रश्न विचारले जातील हा त्यांचा समज पूर्णपणे फोल ठरला. प्रश्न विचारले गेले ते त्यांच्या लैंगिकतेवर. एक ना अनेक, घाणेरड्या प्रश्नांची सरबत्ती पुढील काही दिवस पाचसहा शाळांमध्ये सुरूच होती. हा अनपेक्षित आघात केवळ सुचित्रांनी केलेल्या लिंगबदल शस्त्रक्रियेमुळेच होत होता. वयाच्या २८व्या वर्षांपर्यंत पुरुष म्हणून जगताना प्रचंड घुसमट झाली. सर्व असह्य झाल्यानंतर लिंगबदल शस्त्रक्रिया करून त्यांनी स्वत:मधील घुसमट तर थांबवली. पण समाजातील विचित्र मानसिकता त्यांना मुक्तपणे जगू देत नाही. सुचित्रा काल काय होत्या आणि आज त्यांचे रूप काय, यापेक्षा प्रचंड संघर्षातून मिळवलेल्या ज्ञानाचा समाजाला आणि पुढच्या पिढीला याचा फायदा होऊ शकतो हा विचार इथं होत नव्हता. सुचित्रांनी पुरुष असताना उच्च शिक्षण घेतले. पण स्वत:मधील शारीरिक आणि मानसिक बदल ओळखून शस्त्रक्रिया करून त्या महिला झाल्या. परंतु जणू या बदलामुळे इतकी वर्षं घेतलेलं शिक्षण आणि १० वर्षांचा अनुभव शून्य होऊन गेला.


उच्च शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नाही म्हणून अनेकजण निराशेच्या गर्तेत सापडतात. त्यातली काही तर त्यातून बाहेर न येता आत्महत्येचा टोकाचा मार्ग स्वीकारतात. या सर्वांसाठी कोलकाता शहरातील सुचित्रा डे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणावं लागेल. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस संघर्षाचा होता. वयाच्या १४व्या वर्षी वडिलांचे निधन झाले. कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. मग त्यांनी शालेय शिक्षण घेतानाच खासगी शिकवण्या देऊन कुटुंबाला हातभार लावला. त्यातच १५ ते १६व्या वर्षी शारीरिक आणि मानसिक बदल दिसायला लागले. वरकरणी पुरुष वाटत असताना मानसिक आणि बऱ्याच अंशी शारीरिक दृष्टीने अंतर्गत मात्र त्या महिलाच होत्या. पदोपदी घुसमट व्हायची. संघर्ष करत पदवी पूर्ण केल्यानंतर नोकरीसाठी अनेक संस्थांचे उबरठे झिजवले. पण मुलाखत घेणारे लोकही नोकरी देण्यास खूप विचार करायचे. असेच एका महिला प्राचार्यांनी मुलाखतीत काही प्रश्न विचारले नाहीत. पण नंतर फोनवर ‘तू मुलगा की मुलगी,’ असा प्रश्न उपस्थित केला. सत्य सांगितल्यानंतर त्यांनी त्यांच्या दिल्ली मुरादाबाद येथील डॉक्टर नातेवाइकाचा संदर्भ दिला. पै न् पै जोडून जमवलेले ८० हजार रुपये घेऊन सुचित्रा दिल्लीत गेल्या. शस्त्रक्रियेनंतर त्या पुन्हा कोलकाता येथे आल्या. पण शस्त्रक्रिया अर्धवट झाली होती. ते त्यांच्या जिवावर बेतले असते. पण कोलकाता येथील प्रसिद्ध गायिका पीया आचार्य यांनी आधार दिला. त्यानंतर कोलकाता येथीलच डॉ. मनोज खन्ना यांनी २०१७मध्ये यशस्वी शस्त्रक्रिया केली. यानंतर तरी उच्च शिक्षणाचा फायदा घेऊन चांगले जगण्याचा प्रयत्न करू असा विचार त्यांनी केला. पण आता खऱ्या अर्थाने संघर्षाला सुुरुवात झाल्याचा अनुभव त्यांना येतो आहे.


किमान चांगली वागणूक तर द्या
सर्वोच्च न्यायालयाने २०१४मध्ये तृतीयपंथीयांच्या बाजूने ऐतिहासिक निकाल दिला होता. घटनेच्या कलम १४, १६ आणि २१चा हवाला देत महिला, पुरुषांप्रमाणे त्यांनाही मान्यता देण्यात आली होती. तृतीयपंथीयही देशातील नागरिक असून शिक्षण, रोजगारात समान संधी मिळणे हा त्यांचा अधिकार असल्याचे निकालात म्हटले होते. निकाल देऊन चार वर्षांहून अधिक काळ लोटला. तरीही शिक्षण, रोजगारातील समान संधी तर सोडा तृतीयपंथीय आणि लिंगबदल केलेल्या महिला, पुरुषांना चांगली वागणूकही मिळत नाही. परग्रहावरील लोकांप्रमाणे लोक पाहतात, अशी खंत सुचित्रा यांनी व्यक्त केली. खासगी क्षेत्रात तृतीयपंथीय आणि लिंगबदल शस्त्रक्रिया केलेल्यांसाठी दोन टक्के आरक्षण देण्याची मागणी त्यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना केली.


मुलाखतीदरम्यान खूप वाईट अनुभव आले. लिंगबदल शस्त्रक्रियेनंतर तुमची गर्भधारणा शक्य आहे का? स्तन कृत्रिम आहेत की नैसर्गिक? यात दूध निर्माण करण्याची क्षमता आहे की नाही? वगैरे प्रश्न विचाण्यात आले. कागदपत्रांवर पूर्वीचे हिरण्यमय डे असे पुरुषाचे नाव आहे. त्यामुळे पुरुषांच्या पेहरावामध्ये कामावर यावे लागेल, अशी अट घालण्यात आली. एका प्राचार्यांनी तर चक्क आम्ही तृतीयपंथीयांना नोकरी देत नाही, असे म्हटले. तृतीयपंथीय आणि लिंगबदल शस्त्रक्रिया केलेल्यांमधील फरक समजून सांगितले तरी त्याने नोकरी दिली नाही.


कोलकाता येथील नामांकित आयसीएसई शाळांमध्ये मुलाखतीत लैंगिकतेवर प्रश्न विचारले गेले. यावर पश्चिम बंगाल मानव अधिकार आयोगाकडे तक्रार केली. पण दोन आठवड्याहून अधिक कालावधी लोटला असताना अद्याप कोणावरही कारवाई झालेली नाही. पोलिस आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांमध्येही याविषयी जागरुकता नसल्याचे स्पष्ट जाणवले. आता न्यायालयाचा दरवाजा ठोठावल्याशिवाय पर्याय नसल्याचे सुचित्रा म्हणाल्या.


शस्त्रक्रियेच्या प्रक्रियेबद्दल बोलताना डॉ. हंबर्डे पाटील म्हणाले की, कुठल्याही व्यक्तीचा लिंगभाव/जेंडर तीन प्रकारे ठरतो. यात अनुवांशिक, फिनोटायपिक आणि मानसिक किंवा भावनिक. अनुवांशिक प्रकारात स्त्री-पुरुषातील एक्स-एक्स गुणसूत्र जुळाल्यानंतर मुलगी, एक्स-वाय गुणसूत्र जुळल्यानंतर मुलगा होत असतो. फिनोटायपिकमध्ये व्यक्ती पुरुष आहे की स्त्री, हे त्यांच्याकडे पाहून किंवा विविध तपासण्यांतून कळत असतं. मानसिक प्रकारात मात्र व्यक्ती स्वत:बद्दल काय विचार करतो हे महत्त्वाचं असतं. या तिन्ही प्रकारापैकी कुठल्याही एका प्रकारात आढणारी समस्या किंवा संयाेजनातून निर्माण होणारे दोष दूर करण्याची प्रक्रिया म्हणजेच लिंगबदल होय. 


यात प्रामुख्याने अनुवंशिक व फिनोटायपिक प्रकारातील दोष शस्त्रक्रियेच्या माध्यमातून दूर केले जातात. पण मानसिक प्रकारातील व्यक्तीची लिंगबदल शस्त्रक्रिया खूप किचकट असते. उदा. एखादी व्यक्ती शारीरिक आणि मानसिक दृष्टीने पुरुष असताना तिला स्त्री बनण्याची इच्छा होते आणि ती व्यक्ती लिंगबदलासाठी आग्रही असते. अशा व्यक्तीला लिंगबदलाचे ठोस कारण द्यावे लागते. शिवाय लिंगबदलासाठी न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते. तर अनुवंशिक आणि फिनोटायपिक प्रकारात डॉक्टर शस्त्रक्रिया करून लिंग बदलतात. 


तिन्ही प्रकारातील दोषांना ‘इंटर सेक्स डिसऑर्डर’ म्हणतात. शस्त्रक्रिया करून योग्य विकसित झालेले अवयव आणि रुग्णाची मानसिक दृष्टी लक्षात घेऊन त्यांना हवी असलेली ओळख प्राप्त करून दिली जाते. शस्त्रक्रियेनंतर रुग्णांना स्त्री किंवा पुरुषांची संप्रेरके (हार्मोन्स) औषधांच्या माध्यमातून दिली जातात. लिंगबदल शस्त्रक्रियेसाठी किमान दोन ते अडीच वर्षांचा कालावधी लागतो. वारंवार विविध तपासण्या आणि समुपदेशनानंतर तीन ते चार शस्त्रक्रियांनंतर व्यक्तीला ओळख प्राप्त होते. दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नईत साधारणत: १५ लाखांपर्यंत याचा खर्च जातो. मराठवाड्यात याबद्दल जनजागृती नसल्याने रुग्ण शस्त्रक्रियेला खुलेपणाने समोर येत नाहीत. आतापर्यंत लिंगदोषाचे ४५०वर रुग्ण सल्ला घेण्यासाठी आले. मात्र प्रत्यक्षात ६२ रुग्णांनीच शस्त्रक्रिया करून घेतल्याचे वास्तव डॉ. हंबर्डे यांनी मांडले. रुग्णांची मानसिकता पाहता त्यांच्याकडून ८० हजार ते १ लाखांपर्यंत केवळ औषधांचा खर्च घेतला जात असल्याचे त्यांनी म्हटले.


कमी वयात व्हावी शस्त्रक्रिया
औरंगाबादमध्ये साठहून अधिक व्यक्तींची लिंगबदल शस्त्रक्रिया केलेले डॉ. संदीप हंबर्डे पाटील म्हणाले, एखाद्या व्यक्तीला तिची खरी ओळख प्राप्त करून देण्यासाठी लिंगबदल शस्त्रक्रिया मोठा आधार आहे. पण दुर्दैवाने याविषयी जनजागृती झालेली नाही. शारीरिक आणि मानसिक विकास होण्याआधीच दोष असलेल्या मुलांची लिंगबदल शस्त्रक्रिया व्हायला हवी. शस्त्रक्रियेला उशीर झाल्यास अशा लोकांना स्वीकारण्याची समाजाची मानसिकता होत नाही. घुसमट होऊन अशी मुले गुन्हेगारीकडे वळतात किंवा आत्महत्या करतात.


- नितीन पोटलाशेरू, औरंगाबाद
nitin_balajirao@dbcorp.in

बातम्या आणखी आहेत...