आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तू तलम अग्‍नीची पात!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अस्मा जहांगीर. ‘सिर्फ नाम ही काफी है’ प्रकारची एकांडी शिलेदार! या महिन्याच्या ११ तारखेला वयाच्या ६६व्या वर्षी तिने जगाचा निरोप घेतला. वयाच्या १८व्या वर्षापासून तिचा जलवा याह्या खान यांच्यापासून ते नवाझ शरीफपर्यंतच्या पाकिस्तानच्या विविध राजवटींनी पाहिला. एकाही राष्ट्राध्यक्षाला तिने सोडलं नव्हतं. एवढंच नव्हे तर इम्रान खान, अल्ताफ हुसेन आणि लष्करातल्या असंख्य धेंडांना तिने आव्हान दिलं. 


विद्यमान भारतात सत्ताधीशांच्या विरोधात अथवा सत्ताधारी मांडत असलेल्या विचारांच्या विरोधात लढणाऱ्या स्त्रियांच्या वाट्याला तुरुंगवास, आत्महत्या आणि हत्या येतात, हे आपण याच सदरात मागे पाहिलं होतं. या वेळेला कहाणी थोडी निराळी आहे आणि त्याचं नेपथ्यही निराळं आहे. 


स्थळ भारताबाहेरचं आहे, एवढंच नव्हे तर, आपल्या शेजारच्या परमप्रिय शत्रू देशातलं आहे. ऐंशीचं दशक असावं. पाकिस्तानातल्या अनेक स्त्रिया जनरल झिया जो इस्लामी कायदा आणू पाहत होते, त्याविरोधात रस्त्यावर उतरल्या होत्या. निदर्शने करणाऱ्या त्या स्त्रियांना पोलिसांनी पकडून नेलं. हे तसं नेहमीप्रमाणेच घडलं. पण दुसऱ्या दिवशी मात्र एक विशेष गोष्ट घडली. काही शासनधार्जिण्या मौलवींनी एक फतवा काढला. ते म्हणाले, ‘निदर्शनांत भाग घेतलेल्या सर्व स्त्रियांचा आज तलाक झाला असल्याचं, आम्ही घोषित करीत आहोत’. त्या स्त्रियांचं नेतृत्व करणारी एक लढाऊ आणि प्रतिष्ठित वकील होती. त्यामुळे तिला शासन झालंच पाहिजे या विचाराने एक मौलवी महाशय थेट तिच्या सासऱ्यांना जाऊन भेटले आणि त्यांना जे जे घडलं ते सांगू लागले. सासरे पडले बिचारे व्यावसायिक. राजकारणापासून अलिप्त असणारे. अर्थातच ते घाबरले. मग ते त्या मौलवींना घेऊन तिच्या वडलांकडे गेले. वडील मुरलेले राजकीय नेते. मौलवीनी वडलांना सांगितलं, ‘तुमच्या मुलीचा विवाह संपुष्टात आलेला आहे, कारण तसा फतवाच आम्ही काढलेला आहे’. वडील डोळे मिचकावत मौलवींना म्हणाले, ‘असा फतवा काढण्यासाठी तुम्हाला नक्कीच माझ्या जावयाने लाच दिली असणार! मला तर तुमची ही कामगिरी फारच आवडली.’ हे ऐकून मौलवी गोंधळात पडले. त्यांचा गोंधळ अजून वाढवत वडील पुढे म्हटले, ‘तुम्ही असं करा, आम्हा दोघांकडून पण पैसे घ्या आणि आमच्या बायकांकडून आम्हाला सुटका मिळवून द्या!’ आपला अपमान होतो आहे हे जाणवून अखेर मौलवी उठले आणि तिरमिरीत घराबाहेर पडले. दोघे व्याही एकमेकांना टाळ्या देत जोरजोरात हसू लागले. 


वकिली करणाऱ्या त्या लढाऊ स्त्रीचं नाव होतं, अस्मा जहांगीर आणि तिचे वडील होते, मलिक गुलाम जिलानी. जिलानी यांनी पाकिस्तानात १९५८ मध्ये यशस्वी ठरलेल्या पहिल्याच लष्करी उठावाला प्राणपणाने विरोध केला होता. तेव्हा केवळ सहा वर्षंाच्या असलेल्या अस्माने पुढे वडिलांच्या पावलावर पाउल टाकून आपल्या जीवनातला प्रदीर्घ काळ पाकिस्तानातल्या विविध लष्करी राजवटींना विरोध करण्यात घालवला, हे तसं नैसर्गिकच म्हणायला हवं. 


अस्मा जहांगीर. ‘सिर्फ नाम ही काफी है’ प्रकारची एकांडी शिलेदार! या महिन्याच्या ११ तारखेला वयाच्या ६६व्या वर्षी तिने जगाचा निरोप घेतला. वयाच्या १८व्या वर्षापासून तिचा जलवा याह्या खान यांच्यापासून ते नवाझ शरीफपर्यंतच्या पाकिस्तानच्या विविध राजवटींनी पाहिला. याह्या खान, झुल्फिकार अली भुत्तो, झिया उल हक, परवेझ मुशर्रफ, नवाझ शरीफ यातल्या एकाही राष्ट्राध्यक्षाला तिने सोडलं नव्हतं. एवढंच नव्हे तर इम्रान खान, अल्ताफ हुसेन आणि लष्करातल्या असंख्य धेंडांना तिने आव्हान दिलं. वयाची साठी तिने कशी गाठली याचंच आश्चर्य वाटावं, अशी तिची कहाणी आहे. रोचक बाब अशी, की काही अपवाद वगळता आज जवळजवळ सगळा पाकिस्तान तिच्या जाण्यामुळे दु:ख व्यक्त करतो आहे. शासकीय इतमामात तिचे अंत्यसंस्कार करण्यात आले. पंतप्रधान, राष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, महत्त्वाच्या राजकीय पक्षांचे प्रमुख अशा सर्व जणांनी तिच्या जाण्याने पाकिस्तानातील मानवी हक्क चळवळीमध्ये एक पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली. आणि तरीही ती गेल्यावर यातल्याच अनेकांनी सुटकेचा श्वास सोडला असेल हेही खरंच! अस्मासारखी माणसं इतकी अवघड जगतात की, त्यांचं कितीही कौतुक करावसं वाटलं, तरी करता येत नाही, कारण असं कौतुक केल्यामुळे आपली अंडीपिल्ली बाहेर निघणारच नाहीत, याची अजिबात खात्री नसते! अशा वेळी त्या व्यक्तींच्या मृत्यूनंतरच त्यांच्याविषयी आवाजी भाषेत चांगलं बोलणं शक्य होतं. आज अस्माच्या बाबतीत पाकिस्तानमध्ये हेच घडतं आहे. नेमकं काय करत होती, अस्मा? 


मानवाधिकार, लोकशाही आणि समता ही मूल्ये म्हणजे, तिच्या संपूर्ण आयुष्याला व्यापणारे लखलखीत दीपस्तंभ होते. प्रखर तत्त्वनिष्ठा आणि धाडसीपणा शिवाय वाईटाला भिडण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती, समाजातल्या प्रत्येक असहाय घटकाला संरक्षण मिळवून देण्याची भावना आणि लोकशाही, घटनात्मक चौकट आणि धर्मनिरपेक्षता या तीन पायाभूत आधारांपासून पाकिस्तान कधीही ढळणार नाही, यासाठी कायम सजग राहणं, हे सर्व तिच्यात मौजूद होतं. महत्त्वाचं म्हणजे, पाकिस्तानात राहून हे तिने जपलं होतं. आज भारतात हिंदुत्ववादी सरकारच्या चार वर्षांच्या कार्यकाळातच शरण आलेल्यांसाठी अस्माचं उदाहरण डोळे खाडकन उघडणारं ठरावं. 


एका श्रीमंत घरात जन्म घेतलेली, अस्मा वयाच्या ऐन १८व्या वर्षी सार्वजनिक जीवनात उतरली, ती थेट लष्करशाहीच्या विरोधात. २२ डिसेंबर १९७१ रोजी मध्यरात्री तिच्या वडिलांना लष्करशहा याह्या खान यांच्या पोलिसांनी अटक केली. अस्माने लष्करी हुकूमशाहीला आव्हान देत वडिलांच्या मुक्ततेसाठी थेट लाहोर उच्च न्यायालयात धाव घेतली. तिथं तिला यश मिळालं नाही. पण ती खचली नाही, सर्वोच्च न्यायालयात गेली आणि अखेर तिला यश मिळालं. तोवर याह्या खान यांची सत्ता संपुष्टात आली होती. झुल्फिकार अली भुत्तो राष्ट्राध्यक्ष झाले होते. सर्वोच्च न्यायालयाने लष्करी कायदाच रद्दबातल ठरवला.  


पुढे भुत्तोंना दूर करून लष्करशहा झियांची राजवट सुरू झाली. अस्माने आतापर्यंत कायद्याची पदवी प्राप्त केलेली होती. देशाचे इस्लामीकरण करण्याच्या हेतूने झियांनी आणलेल्या हुदूद अध्यादेशावर अस्मा तुटून पडली. स्त्रीविरोधी असणाऱ्या या कायद्यांना तिने न्यायालयात तसंच रस्त्यावरही कडवं आव्हान दिलं. साहजिकच झियांनी तिला अनेकदा तुरुंगवास घडवला. पण ती लढतच राहिली. प्रौढ स्त्रियांना लग्नासाठी जोडीदार निवडताना पालकांच्या संमतीची गरज नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय तिने न्यायालयाकडून मिळवला.  


अस्माचं जिणं म्हणजे, अशा अनेक विजयांची आणि संघर्षांची कहाणी आहे. ज्या देशात स्त्रीचं जगणं अत्यंत अवघड असतं, त्या देशातल्या सर्वसामान्य स्त्रियांसाठी अस्मा एक आदर्श होती, एक आधारस्थान होती. आपल्या एका उदाहरणाने तिने लढाऊ स्त्रियांच्या अनेक पिढ्या घडवल्या. अनेक गोष्टींचा ओनामा करणारी ती पाकिस्तानमधली पहिली स्त्री होती. पाकिस्तान मानवाधिकार आयोगाची ती संस्थापक सदस्य. फक्त स्त्री-सदस्य असलेली कायदेविषयक संस्था तिने सुरू केली. झियांच्या हुकूमशाहीला आव्हान देण्यासाठी तिने ‘विमेन्स अॅक्शन फोरम’ची स्थापना केली. याच काळात तिने बलात्कार, वेठबिगार आणि ईश्वरनिंदेचे खटले चालवले. मानवाधिकार आणि धार्मिक स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी काम करणाऱ्या संयुक्त राष्ट्रसंघाची दूत या नात्याने अस्मा दीर्घकाळ कार्यप्रवण राहिली. त्याचाच भाग म्हणून भारतातल्या मुस्लिमविरोधी आणि पाकिस्तानातल्या हिंदू व ख्रिश्चनविरोधी हिंसाचाराचा तिने सखोल अभ्यास केला. भारतभेटीवर आलेली असताना शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांच्यासोबत झालेली तिची भेट पाकिस्तानात विवादास्पद ठरली होती.  


आज जरी पाकिस्तानमध्ये तिच्यावर प्रचंड कौतुकाचा वर्षाव होत असला, तरी तिच्या जीवनकाळात तिला सातत्याने बदनामी, टीका, निर्भर्त्सना, छळ, हल्ले यांना सामोरं जावं लागलं आहे. गमतीची बाब म्हणजे, यातही अंतर्विरोध आहेत. पाकिस्तानमध्ये तिच्यावर भारताची, विशेषतः भारतीय गुप्तचर संस्था असलेल्या रॉची हस्तक असल्याचे आरोप झाले. कधी तिला देशांतर्गत अहमदियांचं, तर कधी देशापलीकडील यहुदी म्हणजे ज्यूंचं हस्तक ठरवलं गेलं. जेव्हा अस्माने भारतातील मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात आणि विशेषतः काश्मीरमधील आंदोलकांवर छऱ्यांच्या बंदुकींच्या वापराच्या विरोधात वक्तव्य केलं, तेव्हा ती पाकिस्तानी हस्तक असल्याचा भारतातून आरोप झाला. याच अस्माने कुलभूषण जाधवला वकील मिळायलाच हवा, अशी ठाम भूमिका घेतली होती. होय, अस्मा हस्तक होती, ही गोष्ट तंतोतंत खरीच आहे. ती गरिबांची हस्तक होती, ती वंचितांची हस्तक होती. ती स्त्रियांची व लहान मुलांची हस्तक होती. सर्व प्रकारच्या अल्पसंख्याकांची ती हस्तक होती.  


आज जेव्हा संपूर्ण दक्षिण आशिया पाकिस्तानचाच नव्हे तर थेट तालिबानी कित्ता छाती फुगवून गिरवण्यात मग्न आहे, अशा वेळी अस्मा तुझं जाणं परवडत नाही. फीनिक्ससारख्या अनेक अस्मा तुझ्या राखेतून निर्माण व्हाव्यात अशी तीव्र इच्छा मी व्यक्त करते, आणि तुला अखेरचा सलाम, अखेरचा अलविदा करते!


- प्रज्ञा दया पवार 
pradnyadpawar@yahoo.com  

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटो...

बातम्या आणखी आहेत...