आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माध्‍यम माध्‍यम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुलांच्या शिक्षणाचं माध्यम कोणतं असावं या विषयावर आजपर्यंत खूप चर्चा, वादविवाद झालेले आहेत. मातृभाषेतून शिक्षणच योग्य अशी एक बाजू आहे तर जगाची भाषा असणाऱ्या इंग्रजीमधून शिक्षण असावं अशी दुसरी बाजू आहे. काय असू शकेल यातला मध्यम मार्ग?


वाघू अत्यंत जिंदादिल माणूस. बोलघेवडा. एकतर तो समोरच्याकडून काहीतरी समजून तरी घेत असतो नाहीतर समजावून तरी देत असतो. तो जे समजावून देत असतो ते त्याच्या अनुभवविश्वातलं असतं, त्याला नीट कळलेलं आणि त्याला नीट ठाऊक असलेलं. जे समजून घेतो ते त्याला नेहमीच नीट समजतं असं नाही, त्याच्या भाषेच्या मर्यादा मध्ये येतात हे त्याला लक्षात येतं. नवीन तंत्रज्ञानासारख्या गोष्टींनाही थोडी का होईना अडचण जाणवतेच. मग दोन पोरींचा बाप झाल्यावर त्यानं ठरवून टाकलं, ‘मुली असल्या म्हणून काय झालं, इंग्रजी माध्यमाच्या शाळेतच जातील त्या.’ त्याला दिसत होतं, इंग्रजी बोलणाऱ्या, जास्त शिकलेल्या लोकांना जास्त पगार असतो. भौतिक सुखं अशा लोकांकडे जास्त असतात. मुख्य म्हणजे पावसावर अवलंबून असलेल्या शेतीतली अनिश्चितता या लोकांच्या आयुष्यात नसते. ही भौतिक शाश्वती नक्कीच अधिक आशादायी आणि खुणावणारी होती. त्याच्या दृष्टीनं त्यानं घेतलेला निर्णय विचारपूर्वक होता आणि अतिशय योग्य होता. 


शिक्षणतज्ज्ञांनी मात्र अशा अनेक वाघूंना वेड्यात काढलं तर नवल नाही! मला वाघूची बाजू लढवायची नाही आणि शिक्षणतज्ज्ञांना काय कळतं, असंही म्हणायचं नाही. पण ही आजची वस्तुस्थिती आहे आणि त्यातून बाहेर कसं पडायचं याचा विचार नक्कीच करायला हवा आहे. शहरी-ग्रामीण, सुखवस्तू-कष्टकरी सगळ्यांनाच! 


मुळात सध्याच्या शिक्षणव्यवस्थेबद्दलच शंका उपस्थित होत असताना फक्त शिकण्याच्या माध्यमाचा विचार करून चालेल का? जमेल तेवढा, जमेल तसा सगळ्याचा एकत्र विचार करण्याचा प्रयत्न करू या. 


खगोलशास्त्रामध्ये काम करणाऱ्या ‘नासा’ या जागतिक पातळीवरच्या संस्थेने केलेल्या संशोधनाने परत एकदा आजच्या शिक्षणप्रणालीबद्दल प्रश्न उभा केला आहे. नासामध्ये काही खास कामं करण्यासाठी माणसं निवडताना वापरली जाणारी कल्पकता चाचणी जेव्हा ४-५ वर्षांच्या १६०० लहान मुलांना देण्यात आली तेव्हा ९८% मुलं त्यात यशस्वी झाली. प्रश्न सोडवण्यासाठी प्रश्नांकडे वेगळ्या, कल्पक नजरेने बघू शकण्याची ताकद या लहानग्यांमध्ये दिसून आली. याच मुलांना हीच चाचणी परत एकदा ५ वर्षांनंतर देण्यात आली तर त्यातली फक्त ३०% मुलंच ‘जीनियस’ कॅटेगरीमध्ये मोडत होती. याच मुलांना वयाच्या १५व्या वर्षी परत एकदा ही चाचणी दिली असता, फक्त १२% मुलं कल्पक ठरली आणि प्रौढांमध्ये तर फक्त २%च! हा अभ्यास मुळातून वाचायचा असेल तर तुम्ही इथे वाचू शकाल. 
https://ideapod.com/born-creative-geniuses-education-system-dumbs-us-according-nasa-scientists/ 
सगळं शिक्षण हे जर मोठं होऊन, चांगली नोकरी मिळवण्याच्या उद्देशानेच चाललं असेल तर प्रश्न सोडवता येण्याचं कौशल्य हे पायाभूत कौशल्य नाही का? आणि ते जर शाबूत ठेवायचं असेल तर आधी आपल्या शाळांना तरी बदलावं लागेल नाहीतर शक्य असेल त्या सुशिक्षित, मध्यमवर्गीय लोकांनी तरी होमस्कूलिंग, अनस्कूलिंगच्या वाटेनं जायला लागेल. अगदीच काही नाही तर शाळांचं आपल्या आयुष्यातलं प्रस्थ कमी करून आपली आयुष्यं आपल्या हातात घ्यावी लागतील. जसं टीव्हीसारख्या वस्तूला आपल्या दिवाणखान्यात मध्यवर्ती स्थान देऊन आपण मोठ्ठी चूक केली तसंच ‘आपल्या मुलांच्या आयुष्याचं भलं फक्त शाळाच करू शकतील आणि त्यांनीच ते करावं, आपला त्यात काहीच सहभाग असण्याची गरज नाही,’ हा विचारही आपल्याला चुकीच्या वाटेनं नेतो आहे. शाळांपर्यंत न पोहोचणारी वाड्या-वस्त्यांमधली मुलं तिथपर्यंत पोहोचायला हवी आहेत कारण ‘होमस्कूलिंग’ म्हणजे फक्त घरी राहाणं नव्हे. प्रत्येक मुलाच्या वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्त्वानुसार, आवडीनुसार शिकण्याच्या गोष्टी आणि पद्धती बदलतात. प्रत्येक मूल विशेष असतं, एकमेवाद्वितीय असतं. प्रचंड संख्या असलेले वर्ग आणि प्रचंड वर्ग असलेल्या शाळा त्याचं वेगळेपण जपू शकत नाहीत. तेव्हा शाळा निवडताना आधी हे पाहिलं पाहिजे की, ही शाळा आपल्या मुलाचं वेगळेपण जपण्यासाठी काय करते? अशा शाळा मुलांना मध्यवर्ती ठेवून काम करणाऱ्या असतील. प्रत्येकाला एकाच साचामध्ये बसवणाऱ्या नसतील. प्रत्येकाच्या प्रगतीचं पुस्तकही वेगळं असेल. अशा शाळा काही आता पूर्णपणे स्वप्नातल्या राहिल्या नाहीत. त्या प्रत्यक्षात आल्या आहेत. अगदी प्रत्येक डोंगरावर नसल्या तरी अनेक शहरांमध्ये आहेत. 
मग राहिला माध्यमाचा प्रश्न. नवीन भाषा आणि त्या नवीन भाषेतून नवीन विषय शिकणं हे मुलांसाठी दुहेरी ओझं असतं. तेव्हा जी भाषा मुलाला बोलता येतेय आणि समजते आहे, त्याच भाषेतून इतर विषय शिकावे म्हणजे ते अधिक चांगले कळतील. त्यात रस निर्माण होईल. हे तत्त्व खास करून प्राथमिक शिक्षणासाठी नक्की लागू करावं. मुलाची मातृभाषा नेमकी कुठली असे प्रश्न आता पडू लागलेत कारण शहरातली अनेक कुटुंबं आता बहुभाषक होत आहेत. अनेक घरांमध्ये आईची आणि बाबाची भाषा भिन्न असते आणि दोघेही आपापल्या भाषेतून आपल्या मुलाशी बोलत असतात. अशा प्रकारे लहानपणापासून अनेक भाषांना सहज सामोऱ्या गेलेल्या मुलांना या वाढीव कौशल्यांचा फायदाच होतो. अनेक भाषा शिकण्याचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे भाषा नैसर्गिक क्रमाने शिकली जाते. पहिली भाषा (मातृभाषा) शिकताना लहान मुलं सतत ती भाषा ऐकत असतात. हळूहळू शब्द, छोटी वाक्यं अशा क्रमानं ती बोलायला लागतात. या दरम्यान कधीतरी वाचन सुरू होतं (त्या भाषेतलं साहित्य असलं तर! फक्त बोली भाषा असेल तर साहित्यच नसतं.) आणि लेखन सवडीनं येतं. दुसरी भाषा शिकताना मात्र ही पद्धत क्वचितच वापरली जाते. तुम्ही इंग्लिश विंग्लिश चित्रपट पाहिला असेल तर तुमच्या लक्षात येईल मी काय म्हणते आहे ते. 


आता ज्यांची मातृभाषा शाळांमध्ये उपलब्धच नसेल त्यांनी काय करायचं? त्यांनी कुठल्या माध्यमात जायचं? की त्यांनी आपली मातृभाषा उपलब्ध असलेल्या गावी निघून जायचं? यातही दोन प्रकार दिसतात : अनेक वर्षं एखाद्या ठिकाणी राहात असल्यामुळे त्या भागातल्या व्यवहाराची भाषा या कुटुंबांना येत असते किंवा येत असावी अशी अपेक्षा तरी आहे. उदाहरणार्थ महाराष्ट्रात राहणारे मारवाडी! त्यांची मातृभाषा ही मुळात बोली भाषा आहे. त्याला वेगळी अशी लिपी नाही. तेव्हा राजस्थानातल्या शाळांमध्येही मुलं शिकतात हिंदीमधून आणि शाळेत बोलायची भाषा मात्र मारवाडी! पण अनेक वर्षं इथे राहणाऱ्या मारवाड्यांना व्यवहाराची भाषा म्हणून मराठी बऱ्यापैकी येत असतं. राजस्थानहून इथे आलेला माणूस लवकरच मराठी शिकण्याचा प्रयत्न करायला लागतो. तुम्ही हा अनुभव किराणा मालाच्या दुकानात घेतला असेल कदाचित! तेव्हा महाराष्ट्रात जन्माला येणाऱ्या या कुटुंबांतल्या बाळांना मराठी माध्यमाचा पर्याय हा अधिक जवळचा, त्यांचं लहानपण जपणारा असू शकतो. खास करून अशा कुटुंबामध्ये इंग्रजी येणारं कोणी नसेल तर! म्हणजे प्रत्येक पिढी ही कुठली ना कुठली तरी गोष्ट पहिल्यांदाच करत असणार आहे. त्यामुळे प्रत्येक पिढीत शिकण्याची नवी आव्हाने समोर असणारंच. पण ही नवी गोष्ट आधीच्या गोष्टीपासून किती दूरची आहे त्यावर ती शिकताना किती त्रास होईल हे ठरेल. 
शिक्षणाविषयी बोलू तितकं कमी आहे. हा लेख म्हणजे शिक्षणविषयक लेखांसाठीचे फक्त नमनही ठरू शकते इतके कमी आपण बोललो आहोत. तेव्हा वाचकांनो, तुम्हाला पालकत्व आणि शिक्षण या संदर्भात काही खास विषयांबद्दल बोलावं असं वाटत असेल तर जरूर कळवा.


- प्रीती ओ., पुणे 
jonathan.preet@gmail.com 

बातम्या आणखी आहेत...