आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'लेजर'वर प्रकाश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रियांका पाटील बीएस्सीच्या मुलांना भौतिकी शिकवताना वेगवेगळे प्रयोग करून, शिक्षण आनंददायी आणि सोपं करते. ती शिकवण्याच्या अनुभवांवर आधारित लेखन करणार आहे.


ले जर प्रकाशाची wavelength मोजायचं प्रॅक्टिकल असतं बीएससी पहिल्या वर्षाला. डार्क रूममध्ये सेटिंग केलेली असते. आधी बाकीच्या ग्रूप्सना प्रॅक्टिकल्स सांगून मी निवांत laser वाल्या ग्रूपकडे येते. एक खुर्ची घेऊन निवांत बसते आणि पहिला प्रश्न विचारते,
‘याआधी अभ्यासक्रम सोडून laser हा शब्द कुठं ऐकलात?’
त्यांना बऱ्याचदा प्रश्न कळत नाही किंवा उत्तर सुचत नाही. मग दुसरा प्रश्न असतो,
‘याआधी हा शब्द कुठं वाचलाय? ऐकलाय? पाहिलाय? अगदी कुठंही असो, सांगा. लाजू नका.’
मग एक एक विद्यार्थी बोलायला लागतो.
‘मॅडम, गड्ड्यात laser battery ने खेळायचो आम्ही.’
‘मॅडम, डोळ्याच्या दवाखान्याबाहेरच्या बोर्डवर वाचलंय.’
मग माझं ‘अजून’ ‘अजून’ सुरू होतं. दोनतीन नावं सांगून विद्यार्थी थांबतात.
‘घरात मोठी ताई आहे?’
‘हो.’
‘तिला पिंपल्स वगैरे आल्यावर दवाखान्यात गेलेली?’
‘हो.’
‘बरं, घरात कुणाचं अपेंडिक्स, हर्नियाचं अॉपरेशन झालंय?’
‘हो.’
‘कसं झालं? टाक्यांचं की, बिनाटाक्याचं?’
‘टाक्याचं.’
‘टीव्हीत कॅन्सर ट्रीटमेंटविषयी ऐकलंय?’
‘हो मॅडम, त्यात वापरतात laser.’
या सगळ्या प्रश्नोत्तरांनंतर माझी बॅटिंग सुरू होते.
‘अरे हीच तर applications of laser. चला वर्गीकरण करू. पहिलं म्हणजे वैद्यकीय क्षेत्रात. अपेंडिक्स, कॅन्सरसारख्या आजारांमध्ये हा प्रकाश वापरला जातो. डोळ्यांच्या उपचारातही. दुसरं सौंदर्य प्रसाधनांमध्ये वा त्यासाठीच्या उपचारांमध्ये. म्हणजे तुमच्या शरीरावर असणारे नको असणारे केस, तीळ, मस, काळे डाग, जन्मखुणा, टॅटू घालवण्यासाठीही याचा वापर होतो. आता उद्योगजगताचं पाहू. मोठमोठ्या जाडीच्या काचा, हिऱ्यांना पैलू पाडणे, वगैरे. नंतर येतं संरक्षण क्षेत्र. तिथं लक्ष्य निश्चित करणे, वगैरे. जुन्या चित्रपटांमध्ये बघितलं असेल ना? अगदी तेच.’
हे सगळं बोलताना मुलांच्या माना डोलत असतात. हो मॅडम, खरंय, या अर्थानं, कारण हे सगळं त्यांनी आजूबाजूला बघितलेलं असतं पण अभ्यास करताना किचकट वाटत जातं. कारण पुस्तकी भाषा अवघड वाटत असते. समोर दिसलं की मग खूश होतात.
मग त्यांना सांगते की,
‘हा जो प्रकाश आहे तो आपण सगळीकडे वापरतो पण मग त्याचं nature, त्याच्या characteristics माहीत हव्यात ना, त्यातलाच एक भाग म्हणजे तिची wavelength कशी काढायची ती बघू. एवढं झालं की, आपण properties पण बघू.’
अगदी दहा मिनिटांत प्रॅक्टिकल करून विद्यार्थी येतात. कुणीही विचारलं तरी पटकन सांगतात उत्तरं कारण आजूबाजूला बघतोय तेच अभ्यासायचं आहे आणि आजूबाजूला बघितलेल्या वस्तूंबद्दल माहिती मिळाल्यानं एक वेगळाच दृष्टिकोन तयार होतो.
(या सदरात काही प्रचारातले व रुळलेले इंग्रजी शब्द वापरण्यात येतील, मराठी शब्द असले तरी त्यांचे आकलन सोपे नाही.)


-  प्रियांका पाटील, सोलापूर
pppatilpriyanka@gmail.com

बातम्या आणखी आहेत...