आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेडीज बारची सुगंधी हवा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जे आपल्याकडे नाही, जो केवळ एक कल्पनाविलास आहे, ते प्रत्यक्षात घडून येतंय म्हटल्यावर माणूस हरखून जातो. तसाच लेडीज बार हा असा विषय होता, ज्याने हॉटेलची झोप उडवली होती...  
 
हळूहळू उत्तररात्र वाढत गेली, एकमेकांना भिडणाऱ्या ग्लासांनी गतवर्षाला निरोप दिला. थकलेले, भागलेले वेटर दिवसभराचा शीण घालवत होते. लाडीगोडी लावून सगळ्यांनी मला प्यायला भाग पाडलं होतं. अनिल लहानेशेठ सर्वांना सोबत घेऊन बसले होते. सुनील वस्ताद आणि अनिल लहानेशेठमध्ये टिपचा विषय चालला होता. टिपचा विषय वाढत चालला असतानाच अंबादासने सगळ्यांना शांत बसवलं आणि सस्पेन्स उघड करावा तसं म्हणाला, ‘औरंगाबादमध्ये लेडीज बार सुरू झालाय.’ लेडीज बार म्हणताच सर्वांनी आपापले ग्लास खाली ठेवले आणि अंबादासकडं टकामका बघू लागले. हे पाहून ‘असं बघता काय माझ्याकडं? मी खरंच सांगतोय. विश्वास नाही बसत, तर चला मोंढा नाक्यावर. तिथं फक्त एक थम्सअप जरी घेतला तरी एकशे वीस रुपये मोजावे लागतात.’ अंबादासनं लेडीज बारबद्दल सांगून सगळ्यांची नशा उतरवून टाकली, त्यामुळे अनिल लहानेशेठनं सुनील वस्तादला पुन्हा पेग बनायला सांगितलं... 
 
‘रात्री अंबादास काय सांगत होता, ऐकलं होतं का तू?’ कैलास जोर बैठका मारताना बोलला. मी म्हटलं, ‘कशाबद्दल?’ तर कैलासने बैठका मारणं थांबवलं. म्हणाला, ‘मला लेडीज बार कसा असतो, ते सांग ना.’ त्याचा प्रश्न ऐकून ‘तुला काय करायचं?’ असा उलट प्रश्न केला. यावर त्यानं तुला सांगायचं नसेल, तर सांगू नको. यापुढे विचारणार नाही,’ असे बोलून तो गप्प बसला.  
 
औरंगाबादमध्ये लेडीज बार सुरू झाला, हा विषय कैलासच्या डोक्यातून जाता जात नव्हता. आजपर्यंत मुलं हॉटेलमध्ये नोकरी करतात, इथपर्यंत आम्ही दोघांनी एेकलं होतं. परंतु, बारमध्ये तरुण मुली कस्टमरला पेग आणि क्वॉर्टर सर्व्हिस देतात, हा विषय आम्हा दोघांसाठीही नवीन होता. तमाशा, ऑर्केस्ट्रा मी ऐकलेला आणि बघितला; पण मुलींनी लोकांना दारू पाजणं, यावर माझा विश्वास बसत नव्हता. एक वेळेस चित्रपटात मान्य करता येईल, मात्र, रिअल लाइफमध्ये कसं शक्य आहे हे? असे विचार मनात धुमाकूळ घालायचे. ‘नाही रे! अंबादास नशेत बोलला असेल बहुधा. पुडी सोडली त्यानं, दुसरं काय? लेडीज सर्व्हिस सुरू झाल्यावर कस्टमर खरंच शांत बसतील काय?’ मी कैलासच्या डोक्यातला भुंगा थांबवण्याचा प्रयत्न केला. कैलासच्या  डोक्यात वेगळाच विचार सुरु होता. ‘औरंगाबादला लेडीज बार सुरू झाला ना, मी नक्की ‘अभिरुची’ सोडणार आणि लेडीज बारमध्ये वेटरकी करणार, मग बघ कशी टिप कमावतो मी.’ कैलास मनातलं बोलून मोकळा झाला. ‘त्या पोरींच्या नादी लागून मग स्वतःचाही सत्यनाश करून घ्या.’ मी त्याला टोमणा मारायला विसरलो नाही...
 
नव्या वर्षाची ताजी-तवानी संध्याकाळ  हॉटेलमध्ये शिरली. बार रेस्टॉरंटच्या चिंचोळ्या  बोळीतून तिनं किचनमध्ये प्रवेश केला. ती आल्याची चाहूल लागताच सुनील वस्तादनं लाइटचं बटण ऑन केलं. दिव्याच्या उजेडानं अख्खं किचन उजळून निघालं. पिवळा धमक उजेड किचनच्या कोपऱ्याकोपऱ्यातून थेट मोरीच्या नळापर्यंत जाऊन पोहोचला. वस्तादनं अगरबत्तीच्या पुड्यातून पाच उदबत्त्या काढल्या. गॅसवर पेटवल्या. कैलासनं टेबलखाली ‘कासव छाप’ लावली. वस्तादनं काही उदबत्त्या रेस्टाॅरंटमध्येही पाठवल्या. सुगंधित झालेल्या हॉटेलमध्ये लक्ष्मीनं पाऊल ठेवावं, तसं एक-एक टेबल लागलं. तेवढ्यात दोन कस्टमर बारमध्ये शिरले. दिलीपची आणि माझी नजरानजर झाली. कोणाच्या टेबलवर कस्टमर बसतात, यावरून मनाचा खेळ नेहमीच चालायचा. कस्टमरनं सगळ्या बारमध्ये एक नजर टाकली. टी.व्ही., बेसिन, काउंटरसमोरची जागा पसंत न  करता त्यांनी कोपऱ्यातला टेबल निवडला. हेल्परनं ग्लासपाणी देताच मी फॅन ऑन केला. खिशातला केव्हटी बुक काढत टेबलवर मेनू कार्ड ठेवलं आणि काउंटरवर फोनची घंटा वाजली. कस्टमरसोबत बोलत असताना अनिल लहानेशेठनं मला ‘तुझा गावावरून फोन आला.’ म्हणून आवाज दिला. कस्टमरशी बोलणं मध्येच थांबवून मी फोन घ्यायला गेलो. 
 
‘हॅलो, कोण बोलतंय?’ मी रिसीव्हर कानाला लावला. ‘कोण? रमेश बोलतोय ना? मी दत्ता बोलतोय रमेश.’ तिकडून आवाज आला. ‘हा हा! बोल दत्ता, कसा काय फोन केलास?’ मी विचारपूस करू लागलो. ‘तुला माहीत पडलं का काही?’ ‘कशाचं?’ मी असं विचारताच त्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता, तरी कसाबसा आवंढा गिळत, तो म्हणाला, ‘माई गेली! तू लवकर घरी ये’ माई म्हणजे, माझी लहानी पुष्पा मामी. साहेबराव मामाची दुसरी बायको. मामाचं पहिलं लग्न द्रौपदा मामीशी झालं. लग्न होऊन बरीच वर्षे उलटली. पण मामीला मूलबाळ झालं नाही. कित्येक दवाखाने, देवळात, मठावर खेट्या केल्या. उपास-तापास, लिंबू-पाणी, साधू- महाराजांकडून ताईतही बांधून घेतलं, पण गुण आला नाही. घराण्याला वारसदार पाहिजे म्हणून शेवटी मामीने मामाला दुसऱ्या लग्नाची परवानगी दिली. पैठणजवळच्या आपेगावला मी, मामा, बाबा, बय, मधले मामा, दत्ता, सुनीता आम्ही सगळेच पुष्पा मामीला बघायला गेलो, पाहुणचारात स्वतः मामीनं पुरणाच्या पोळ्या आणि गुळवणी केली. स्वयंपाकात सुगरण असलेली मामी सगळ्यांना पसंत पडली आणि पंधरा दिवसांत मामाच्या दुसऱ्या लग्नाचा बार उडला. आता दत्तानं फोनवर त्याच मामी गेल्याचा निरोप दिला होता...  
 
दरवाजाची कडी वाजवली. एवढ्या रात्री कोण आलं, म्हणून बाबानं दार उघडलं. मला पाहताच, ‘एवढ्या रातचं येतात कुठं? दिवसा निघायला काय झालं होतं तुला?’ बाबा काळजीनं विचारत होते. आम्ही दोघं बाजीवर बसलो. ‘असं कसं झालं मामीचं?’ बाबानं दीर्घ श्वास सोडला. उठून चुलीत मक्काची लेंढरं टाकली, फुंकणीने फुंकून शेकायला जाळ केला आणि बाप एकेक गाठ सोडू लागला. ‘बहिणीमुळं केलं तिनं असं, सहनच झालं नाही तिला. माडीवर गेली अन् घेतलं थायमीट, खाली आल्यावर पाह्यलं, तर तोंडावाटे फेस सगळा! किती उरक होता तिला कामाचा! अख्ख्या वाड्यात तशी बाई नव्हती.’ बाबा सांगत होते, मी शेकत होतो...
 
‘मामा जागी असतील का आता?’ मी चुलीतल्या जाळाचा शेक लागल्यामुळं पुढं होत विचारलं. ‘कोण? साहेबराव!’ मी होकार भरला. थोडा वेळ बाबा काहीच बोलले नाही. मग हळूच सांगू लागले. ‘पोलिस केस झालीय गड्या. मामा, दादा सगळेच हर्सूलच्या जेलात बंद केलेत.’ हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच घसरली. मी आजी, दत्ता, दोन्ही मोठे मामा या सगळ्यांची भेट घेतली.  साऱ्या वाड्यात दुःख सांडल्यानं गावातली माणसं, पाहुणे रावळे यांची रीघ लागली होती. रडणं-पडणं, तो आक्रोश न बघवल्यानं मी औरंगाबादची एसटी धरली... 
 
कैलास शटरमध्ये प्रोजेक्ट वही पूर्ण करत होता. वार्षिक परीक्षा जवळ आली होती.  दुसऱ्याच दिवशी मी औरंगाबादला परतल्यानं  त्याला अचंबा वाटला. पण घरचं सगळं त्याला कसं सांगावं? त्याच्याशी मी तात्पुरतं बोलण्याचं नाटक केलं. जीव दमला होता. भूकही लागली होती. मी काहीच बोलत नाही म्हटल्यावर तो खाली जाऊन दोन-चार रोट्या आणि भाजी घेऊन आला, पण जेवणावरची माझी वासनाच उडाली होती. 
 
...मी आणि कैलास रेस्टाॅरंटच्या रिकाम्या काउंटरजवळ खुर्ची टाकून बसलो होतो. तेवढ्यात शेळकेसाहेब आले, बेसिनवर तोंडावर पाणी मारून ते पाच नंबरवर बसले. शेळकेसाहेब चांगलेच परिचयाचे होते. कोणत्याही विषयावर आमच्या मस्त गप्पा रंगायच्या. त्यांना डीएसपीची एक क्वॉर्टर, सोडा अन् दोन पापड आणून दिले. बोलता बोलता ते सहज म्हणाले, ‘लेडीज बारमध्ये काम करतो का तू? तिथं खूप टिप मिळेल तुला, त्या हॉटेलचा मॅनेजर माझ्या ओळखीचा आहे.’ शेळकेसाहेबांचं मी ऐकून घेतलं आणि कैलासला आवाज दिला.  
 
मी किचनमधून पुदिना चटणी घेऊन आलो, तेव्हा कैलास त्यांना लेडीज बार कसा असतो, असा प्रश्न विचारत होता. त्याचा प्रश्न ऐकून साहेबालाही हसू आलं. मी पेग आणण्यासाठी काउंटरकडं निघून गेलो. परत आल्यावरही त्या दोघांचं बोलणं सुरू होतं. शेळकेसाहेब सांगत होते, ‘धंदा वाढवण्यासाठी व कस्टमरला आकर्षित करण्यासाठी हॉटेलवाल्यांनी एक शक्कल लढवलीय. हॉटेलमध्ये वेटरचं काम करण्यासाठी मुंबईहून तरण्याबांड पोरी आणल्यात.  टेबलवर सर्व्हिस देणं, पेग बनवून देणं, त्यांच्यासमोर नाचणं, एवढंच कशाला कस्टमरच्या मांडीवरसुद्धा बसतात त्या.’ शेळकेसाहेबांचा एकेक बोल कैलास मन लावून ऐकत होता. हे सगळं ऐकल्यावर बहुधा त्यानं लेडीज बारमध्ये काम करायचं मनात पक्कं केलं. तो पळतच किचनमध्ये गेला, उत्साहाच्या भरात वस्तादला सांगू लागला आणि काही क्षणांतच सगळ्या हॉटेलमध्ये औरंगाबादेत लेडीज बार आल्याची सुगंधित हवा पसरत गेली... 
 
- रमेश रावळकर
लेखकाचा संपर्क : ९४०३०६७८२४
बातम्या आणखी आहेत...