आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारबाला नावाचं वृंदावन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सगळं जग शरीरावर येऊन थांबतं. विशेषत: ती स्त्री असेल, त्यातही बारबाला असेल तर तिच्या शरीरातच जगाला रस असतो, पण त्या दिवशी रेश्माने  शरीरापलीकडच्या घायाळ स्त्रीमनाची ओळख करून दिली. त्या ओळखीने नवी दृष्टी दिली....


टेल बोडकं झालं होतं. काउंटरवर शेठचा हिशेब चालला होता. रेश्मा  मात्र आज अर्धवट जेवण सोडून हॉलमध्ये बसली होती. तिला आतल्या आत सारखं उन्मळून येत होतं.  ‘अच्छी खासी जिंदगी जी रही थी मैं, पता नहीं, कैसे इस गटर में आकर गिरी. अब चारों तरफ अंधेरा ही नजर आता है...’ सुमन उदास-विमनस्क झालेल्या रेश्माजवळ गेली. तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली, ‘निचे चल जल्दी. गाडी निकल रही है.’ रेश्मा हलली नाही. उठली नाही. उलट तिनं सुमनला जबरदस्ती खाली बसवलं. ‘तू चिंता मत कर, हम लोग चलते जायेंगे.’ दोघी एकमेकींशिवाय कधीच कुठं जात नव्हत्या. वाट बघून शेवटी ड्रायव्हर गाडी घेऊन निघून गेला. रेश्माला एक नाइंटीचा पेग प्यायचा होता. सुमन तिला नाही म्हणत होती. रेश्मा जिद्दीला पेटली होती. हॉलमध्ये किंवा काउंटरजवळ कोणीच हेल्पर, वेटर दिसत नव्हता. एवढ्यात रेश्मानं मला बघितलं. इकडं ये म्हणाली. पुढे काय वाढून ठेवलंय, हे माहीत नव्हतं. तिनं माझ्या हातात एक रिकामा ग्लास आणि पैसे दिले. नंबर वन व्हिस्कीची नाइंटी आणून दे म्हणाली. मी फक्त तिच्याकडे पाहत होतो. ‘थोबडा कायकू देखता है? नाइंटी लेना पहिले तू. बाद में कितना देखना है, तो देख तू. मैं तेरे सामनेच बैठती.’ ती अशी बोलल्यानं माझ्या पायाखालची वाळूच घसरली...


जेवणाअगोदर रेश्मा एक नाइंटी प्यायली होती. आता आणखी एक पेग घेऊन रेश्माला डोक्यातली वळवळ थांबवायची होती. वेटर, हेल्पर, ऐश्वर्या, टिना यांनी सांगूनसुद्धा तिनं कुणाचंही ऐकलं नव्हतं. आता कोणताही टेबल चालू नव्हता. शेठला कोणाचा पेग सांगावा, मला पेच पडला. मी ग्लास घेऊन सुमनकडे गेलो. ती रेश्माचं नाव सांग म्हणाली. मी पेग मागताच शेठनं सगळ्या टेबलकडे बघितलं. कोणताच टेबल लागलेला नव्हता. त्याला कळून चुकलं होतं की, पेग रेश्माला पाहिजे होता म्हणून. ‘तुला रेश्मानं पाठवलं ना?’ शेठनं विचारलं, पण मी एक नाही, दोन नाही. सुईनं तोंड शिवून घ्यावं, तसा मी गप्प राहिलो.’ चुपचाप रेश्माच्या टेबलवर पेग ठेवून दिला. तिने सुमन व माझ्यासमोर एका दमात तो पेग संपवला. हे पाहून आम्ही दोघं अवाक् झालो. या अगोदर रेश्मानं दारू प्यायली नाही, असे नव्हते. आज मात्र तिनं आपला सगळा राग त्या पेगवर काढला होता.


मी आणि सुमननं रेश्माला खाली आणलं. तेवढ्यात मॅनेजरनं मला आवाज दिला. ‘त्या दोघींना एकटं रिक्षात बसवू नकोस. तू त्यांना घरी सोडून दे आणि तसाच पुढे निघून जा.’ मॅनेरजनं सांगितलेलं काम टाळता येत नव्हतं. पण त्या दोघींना फ्लॅटवर सोडणं म्हणजे त्यांच्या मनाप्रमाणे ऐकणं होतं. रेश्माची निष्फळ बडबड चालली होती. मी सुमनला म्हणालो, ‘हिचं काय करायचं आता?’ सुमननं माझा हात हातात घेतला. म्हणाली, ‘तू फक्त मला सोडून जाऊ नकोस. तिला आपण फ्लॅटवर नेऊच.’ खरे तर रेश्माला चढली नव्हतीच किंवा ती अंगही सोडत नव्हती. तिला तीव्रतेने घरची आठवण येत होती. एक-दोन पेग प्यायल्याने सगळ्या आठवणी विस्मरणात जातील असं तिला वाटत होतं; पण झालं ते उलटंच! रेश्माला आणखी दाटून येत होतं...


गार वारं सुटलं होतं. शहरावर दुधाळ चांदणं पसरलं होतं. दिवसभराच्या कोलाहलाने दमलेला जालना रोड आता निपचित पडला होता. कोणीच कोणाशी बोलत नाही, म्हटल्यावर मीच म्हणालो, ‘दीदी, इतने रात में आपको डर नही लगता क्या?’ दीदी म्हणताच दोघीही अंगावर खेकसल्या. मग रेश्मा म्हणाली, ‘दीदी बोलने से ना मैं तेरी बहेन बनुंगी. और रेश्मा कहने से ना तेरी बीवी. तुझे सच्ची बताऊ, ऐसे शब्दों से बहुत डर लगता है. अब हम लोग फिर से किसी उलझन में फसना नहीं चाहते.’ सुमनने माझ्या खांद्यावर हात ठेवला. तिचे बोलके डोळे मला रेश्माला समजून घे, म्हणून सांगत होते.


आम्ही फ्लॅटवर पोहोचलो तेव्हा सगळ्या बारबाला झोपलेल्या होत्या. दोघींना फ्लॅटजवळ सोडून मी माघारी फिरलो; तेव्हा रेश्मानं आवाज दिला. ‘पहली बार घर पर आया है तू. अंदर तो चल. पानी पिकर निकल जाना.’ ती असे म्हणताच मी तिच्याकडे पाहत राहिलो. एक बारबाला अशी बोलू शकते, यावर मला विश्वास बसत नव्हता. तिनं मला निःशब्द केलं. थोडा वेळ तसाच उभा राहिलो. सुमनला बाजूला घेऊन मनातलं सांगितलं. ‘एवढ्या रात्री मी तुमच्या घरात येणं योग्य वाटत नाही.’ ती माझ्याकडे पाहून हसत म्हणाली, ‘आमच्या इज्जतीची गोष्ट करतोस? तशीही आम्हा बारबालांना कोण इज्जत देतंय? या लाइनमध्ये आल्यापासून तू पहिला आहेस, जो आमच्या इज्जतीची पर्वा करतोय. तुला तर माहीत आहेच, कस्टमरला दारू पाजणं, मनोरंजन करणं, हातात हात घेणं, प्रसंगी त्यांच्याजवळ बसणं, कस्टमरचं आमच्याशी लगट करणं, हे सगळं बघूनही आम्हाला इज्जत आहे, असे वाटतं तुला? तिचं बोलणं ऐकून मी निरुत्तर झालो. सुमनकडे मान वर करून बघण्याची माझी हिंमतसुद्धा झाली नाही. डसायला एखादा भिंगोटा मागे लागावा तशी अवस्था झाली माझी. तिथून पळून जावं वाटलं. मग काही तरी बोलले पाहिजे म्हणून पायाच्या अंगठ्यानं माती उकरत म्हणालो, ‘तिथं तुम्ही नोकरी करता. हॉटेलमधल्या नोकरीचा तो एक भाग आहे; पण इथं तुम्ही राहता. हे तुमचं घर आहे. आजूबाजूचे लोक तुमच्याकडे स्त्री म्हणून पाहतात. तेव्हा स्त्रियांशी वागताना, बोलताना भान ठेवलं पाहिजे, तुमच्या या घरात मी केव्हा यावं आणि केव्हा येऊ नये, याचं तारतम्य मी पाळायला हवं.’ माझं बोलणं ऐकून ती पुन्हा हसली आणि मध्येच हसणं थांबवून, दोन्ही डोळ्यांच्या कडा पुसल्या. माझे केस विस्कटून म्हणाली, ‘या फक्त बोलायच्या गोष्टी असतात. इथून तिथून सगळे पुरुष सारखेच. बाई दिसली की लागले लाळ घोटायला. बाईला गोड बोलून मिळवणं, हाच त्यांचा हेतू असतो.’ तेवढ्यात रेश्मानं आवाज दिला. मी घरात येत नाही, हे कळताच ती मला हात ओढत आत घेऊन गेली.


रेश्मानं पाण्याची बाटली दिली. मी तीदेखील घेतली नाही. खरे तर मला तहान नव्हती. जेवण करूनच मी त्यांच्यासोबत निघालो होतो. मी पाण्याची बाटली बाजूला ठेवली. ते रेश्मानं पाहिलं. ‘कुच्छ डाला नहीं उसके अंदर.’ तिच्या आवाजानं सगळ्या बारबाला जाग्या झाल्या. पटापट उठून, त्या आमच्याजवळ आल्या. कोणी काहीच बोलत नव्हतं. त्यांच्यासमोर मी धरून आणल्यासारखा बसलो होतो. रेश्मा त्यांना झोपायला सांगत होती. मी मात्र त्यांच्या अवताराकडे बघू शकत नव्हतो. आणि त्या रेश्माचं ऐकत नव्हत्या. मी मोठ्या हिमतीने म्हणालो, ‘सुमन, शेठला कळलं तर मला नोकरीवरून काढून टाकतील गं.’ माझं केविलवाणं बोलणं ऐकल्यावर शेठला न सांगण्याची प्रत्येकीने हमी दिली. आता माझ्या जिवात जीव आला होता. ऐश्वर्या पुढे येत म्हणाली, ‘कितना साधा, भोला है बेचारा.’ त्या मला चिडवत होत्या. बबली तर म्हणाली, ‘तू कायकू आया रे इस लाइन में?’ मला तिथून निसटायचं होतं, म्हणून मी काहीच बोललो नाही. तिनं माझ्या केसात हात घातला... तिचा हात बाजूला करत म्हणालो, ‘मैं यहाँ पर पढने आया हंू.’ असे म्हणताच त्या सगळ्या जणी एकमेकींकडे बघू लागल्या. टिंगळटवाळी करणाऱ्या या बारबाला माझ्याकडे आता सहानुभूतीने पाहू लागल्या. बहुधा प्रत्येकीला आपलं घर आठवलं. त्यांच्या डोळ्यात पाणी डबडबलं. डोळ्यात साचलेलं पाणी वाहू लागलं.


रेश्मा उठून माझ्याकडे आली. तिनं मागचा-पुढचा विचार न करता मला कडकडून मिठी मारली. थोडा वेळ मी बावरून गेलो. हे सगळं काय घडतंय, कळण्यापलीकडचं होतं. ती म्हणाली, ‘जी लगाकर पढना. हम सब तेरे साथ है.’ सगळ्या बारबालांनी मला गराडा घातला होता. त्या वेळी माझ्याभोवती उभी असलेली हरेक बारबाला मला तुळशीइतकी पवित्र वाटत होती. आता त्याच वृंदावनातून माझा पाय निघत नव्हता. असं कोणतं नातं तिथं उगवलं होतं की त्या प्रत्येक झाडाला निःसंशयाची पानं-फुलं लगडली होती?


- रमेश रावळकर
rameshrawalkar@gmail.com
लेखकाचा संपर्क : ९४०३०६७८२४

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, आणखी फोटो... 

 

बातम्या आणखी आहेत...