आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लय खास, भाऊराव!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सावध-संशयी नि हिशेबी माणसांचाच या जगात अधिक भरणा असला तरीही चौकटींची मोडतोड करण्याचं, व्यवस्थेविरोधात बंड करण्याचं, परिस्थितीला जिंकण्याचं धाडस अंगी वेड असलेली माणसंच करू शकतात. आधी "ख्वाडा'आणि आता ‘बबन’चा  दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे  तळागाळातून आलेला असाच सृजनाचं वेड जपणारा तरुण आहे...  

 

आईला घेऊन दिल्लीला निघालो विमानाने. आई कधी एसटीने पुण्यालाही आलेली नव्हती. तिच्या आयुष्यात तिनं सगळ्यात जास्त प्रवास वीस किलोमीटर केला असेल, तोही एसटीनेच. त्यामुळे ती खूपच घाबरली होती. विमानानं आकाशात झेप घेतली आणि आई मला म्हणाली, "आता मला घरात असल्यासारखं वाटतंय’ आईला दिल्लीचे आकर्षण म्हणजे, दिल्लीवरून कधीकाळी इंदिराबाई राज्य चालवत होत्या. त्यांची सूनबाई दिल्लीत असते. मला तिनं विचारलं ‘सोनियाबाई भेटंल का आपल्याला?' असा गप्पा मारत आम्हा मायलेकरांचा आयुष्यातील पहिला प्रवास झाला. या प्रवासात मला माझं सगळं आयुष्य, आईचे, माझ्या थोरल्या भावाचे कष्ट आठवत होते. "ख्वाडा’ला राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारायला जातानाची रोमहर्षक गोष्ट दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे सांगत होते. ‘ख्वाडा’नंतर त्यांचा ‘बबन’ चित्रपट आलाय, तोही गाजतो आहे. भाऊरावांच्या या दोन्ही चित्रपटांनी मराठी चित्रपटात एक नवीन फॉर्म आणला आहे. भाऊराव आणि त्याचा जिवलग दोस्त ‘बबन’मधील नायक भाऊसाहेब शिंदे या दोन भाऊंची सध्या महाराष्ट्रात क्रेझ तयार झाली आहे.


भाऊराव हा अहमदनगर जिल्ह्यातील  शिरूर गव्हाणवाडी खेड्यातून आलेला तरुण. त्याचा ‘ख्वाडा’ हा सिनेमा आला आणि भाऊचं नाव सर्वतोमुखी झालं. ‘ख्वाडा’ गावोगावी गेलाच, पण त्यातील ‘तुझ्या रूपाचं चांदणं' हे गाणं न ऐकलेला माणूस आज रोजी  सापडणं कठीणच. एवढी लोकप्रियता ‘ख्वाडा’ला आणि सोबत भाऊरावला मिळाली. त्यानंतर भाऊराव कोठेही दिसला तर त्याला पाहायला, त्याच्यासोबत फोटो काढायला तोबा गर्दी होऊ लागली. पण भाऊरावला ही कीर्ती सहजासहजी मिळालेली नव्हती. तो एका रात्रीत हीरो झाला नव्हता. एका शेतकऱ्याचा पोरगा ते राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटाचा दिग्दर्शक हा प्रवास शेकडो मैलांचा होता, काट्याकुट्याचा होता. त्याचा हा प्रवास बघून आणि  ऐकून वाटावं ‘या भाऊराववरच कोणी तरी चित्रपट काढला पाहिजे.' 


भाऊराव हा सामान्य कुटुंबातील पोरगा, ज्या घरात चित्रपट काढायचं दूरच, पण चित्रपट बघण्याशीसुद्धा संबंध नव्हता, त्याच घरातील भाऊराव हा भविष्यात चित्रपट काढेल, असं भाकीत दारात फिरत येणाऱ्या एखाद्या फिरस्त्या ज्योतिषांनी केलं असतं, तर खरंच त्याला वेड्यातच काढल असतं, सगळ्यांनी.


भाऊराव  हा घरातला पहिलावहिला चौथी पास पोरगा. भाऊराव चौथी पास होऊन ज्या दिवशी पाचवीला गेला त्या दिवशी आनंदात पुरणपोळी  खावी, असंच वाटलं असेल त्याच्या मायबापाला. भाऊच्या आयुष्यात त्यानं बघितलेला पहिला चित्रपट ‘मैने प्यार किया'. त्या वेळी भाऊ सहा-सात वर्षांचा होता. त्याच्या  गावात एकाच घरात टीव्ही होता. तिथं दर रविवारी मराठी चित्रपट असायचे. ते बघायला मिळावे, म्हणून भाऊ रविवारची आतुरतेनं वाट बघायचा. त्या वेळी व्हिडिओ आणि प्रोजेक्टरवर त्याच्या गावात चित्रपट यायचे. तेही चित्रपट भाऊ न चुकता बघायचा. याच काळात  चित्रपट निर्मितीबाबतचा एक लेख त्याच्या वाचनात आला. त्यानंतर त्याला चित्रपटाचा नायक होण्यापेक्षा दिग्दर्शक व्हावं, असं वाटू लागलं. चित्रपट निर्मितीचं बीज याच वेळी त्याच्या मनात रुजलं.  


पण चित्रपट कसा बनवायचा हे त्याला उमजत नव्हतं. कॉलेज सुरू होतं, याच दरम्यान त्याला समजलं, पुण्याला, ‘एफटीआयआय’ नावाची संस्था आहे. पण त्याच्यासाठी पुणेही तेव्हा खूप दूर असण्याचे दिवस होते. पुण्याला जायचं मनात होतं, पण योग येत नव्हता. एक दिवस शेतात पिकलेल्या कांद्याची विक्री करण्याच्या निमित्ताने  गाडीसोबत पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये तो आला. तिथून चालत ‘एफटीआयआय’च्या पत्त्यावर पोहोचला.  चौकशी केली. समजलं, इथं प्रवेश घ्यायला किमान पदवीधर शिक्षण आवश्यक आहे. मग परत गेल्यावर मुक्त विद्यापीठात बीएसाठी प्रवेश घेतला. बीए पूर्ण झाल्यावर मग नगरला मास मीडियाला अॅडमिशन घेतलं.


भाऊराव सांगतो, "मी जे शिकत होतो, त्यातलं घरातील लोकांना काहीही कळत नव्हतं. पण घरातील लोकांचा विरोध नव्हता. माझा थोरला भाऊ विठ्ठल आणि आईनं मी शिकावे म्हणून मला खूप साथ दिली.’


‘ख्वाडा’ चित्रपटाची निर्मिती होत असताना भाऊरावचा कस लागला, त्याला खूप अडचणीला सामोरे जावं लागलं. त्यातील मुख्य अडचण होती, पैसा. चित्रपटासाठी लागणारा पैसा भाऊराव यांनी जमीन विकून उभा केला. जमीन विकूनही पैसे कमी पडले, मग काही मित्रांनी दिले. त्यातून ‘ख्वाडा’ झाला. या चित्रपटाला पुण्याच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्कार मिळाला. राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यानंतर या चित्रपटाची चर्चा  सर्वत्र सुरू झाली. चित्रपटासाठी प्रायोजक पुढे आले...


भाऊराव सांगतो, "ख्वाडा’ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला नसता तर हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नसता. "त्याचं कारणही तसंच होतं, भाऊरावकडे जमीन विकून जे पैसे आले होते ते खर्च झालेले. जवळ अगदी शंभर रुपयेही नव्हते. (कदाचित ही गोष्ट अनेकांना खोटी वाटेल.) ‘ख्वाडा’ पडद्यावर आल्यावर मात्र भाऊरावच्या आजवरच्या संघर्षांचं चीज झालं. अर्थात, चित्रपटासाठी वेडा झालेल्या भाऊरावची यशोगाथा आज सगळ्यांना दिसतेय, पण इथंवर यायला भाऊराव जे चालत आलाय, ती वाटही लक्षात ठेवली पाहिजे.


भाऊरावांचे भाऊ विठ्ठलराव सांगतात, "भाऊरावला जे करायचं आहे, ते करायची आम्ही मोकळीक दिली. भाऊराववर आमचा लै विश्वास. आम्हाला माहिती हुतं तो लांब पुढं जाणाराय. मग आपल्या भावाला आपुन साथ द्यायची न्हाय, तर कोण देणार.? माझ्या भावानं त्याचं आणि आमच्या गावाचं नाव लै मोठं केलं. पुण्याला सिनेमा बघायला गेलो होतो, तवा त्येज कौतुक करायला आल्याली माणसं बघून माझं हृदय भरून येत हुतं. माझा भाऊराव पडद्यावर दिसला आणि माणसं टाळ्या वाजवाय लागली. जिकलो, बघा तिथंच. अशा भावाकडं नुसतं बघितलं तरी तहानभूक हरती माझी’ थोरल्या भावाप्रमाणेच भाऊरावांच्या आईसुद्धा लेकाबद्दल विचारलं की गहिवरून जातात. पोराबद्दल बोलताना शब्दात व्यक्त होऊ शकत नाहीत. त्याच्या डोळ्यातून येणारे आनंदाचे अश्रूच आपल्याशी बोलतात. भाऊरावचे गावकरी, शेजारच्या गावातले लोक भाऊरावबद्दल भरभरून बोलतात. त्यांचं बालपण पाहिलेले लोकही आठवणी सांगतात.  नानासाहेब खराडे नावाचा पोरगा भाऊराव हा आपल्या जवळचा आहे हे सांगताना अनेकांच्या चेहऱ्यावरचा अभिमान मला बघता आला.


अलीकडे ‘बबन’चे शो हाऊसफुल्ल असताना, एक दिवस रात्री साडेआठ वाजता भाऊराव फर्ग्युसन महाविद्यालय रोडवर असलेल्या "रानडे इन्स्टिट्यूट'मध्ये आला. त्याच्यासोबत दोन मित्र होते. तिथल्या ओळखीच्या वॉचमनसोबत भाऊराव गप्पा मारत उभा राहिला. गोपाळ देवकाते नावाच्या वृत्तपत्रविद्या विभागाच्या विद्यार्थ्यांने त्याला ओळखले. तो त्याच्या मित्रांना म्हणाला,"ते पहा ‘बबन’चे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे’
बाकीची पोरं गोपाळला म्हणाली, "भाऊराव कऱ्हाडे हिकडं कशाला येतील?"


"अरे बाबांनो, पैज लावता का? ते भाऊरावच आहेत.चला मी विचारतो."
मग ती पोरं वॉचमनसोबत निवांत गप्पा मारत उभ्या भाऊरावजवळ गेली, "तुम्ही भाऊराव ना?’
"हो.’ हसत भाऊराव म्हणाला.
ते ऐकून पोरं हरखून गेली. मग ‘बबन’ची चर्चा सुरू झाली. भाऊराव सगळ्या पोरांशी मोकळेपणाने बोलत होता.पोरं त्याच्यासोबत फोटो काढत होती. आजवर या पोरांनी एवढा मोठा कलाकार  एवढ्या सहजपणे भेटताना पाहिला नव्हता. भाऊरावच्या साधेपणाने पोर भारावली.भाऊराव बराच वेळ "रानडे'च्या कट्ट्यावर बसून होता.त्याच क्षणाला महाराष्ट्रातील हजारो लोक बबन पहात थिएटरमध्ये शिट्या मारत होते, ‘बबन’ आणि ‘बैजू पाटील’ यांचा अभिनय पाहून टाळ्या वाजवून दाद देत होते.


‘ख्वाडा’ आणि ‘बबन’मध्ये नायकाची भूमिका केलेला भाऊसाहेब शिंदे हासुद्धा शेतकरी कुटुंबातील पोरगा आहे. दोन्ही चित्रपटात त्यानं ताकदीनं आपली व्यक्तिरेखा रंगवली आहे. ‘बबन’ची भूमिका साकारताना भाऊसाहेबाचा सहजपणा जाणवतो. म्हशीची धार काढण्यापासून ते बैलगाडी चालवण्यापासूनच्या अभिनयात सहजता जाणवते. भाऊसाहेब शिंदे ग्रामीण भागातील गावगाड्यातील वाईट प्रवृत्तीच्या विरोधात लढणाऱ्या तरुणाचे प्रतिनिधित्व करतो. आणि या भाऊसाहेबचे वैशिष्ट्य म्हणजे, तो चित्रपटात जी भाषा बोलतो ती भाषा त्याचा दैनंदिन वापरात असते.जो  भाऊसाहेबला भेटेल त्याच्या मनात असलेला"कलाकार व्हायचं असेल तर शुद्धच भाषा हवी"हा न्यूनगंड नक्कीच मोडेल.
भाऊराव कऱ्हाडे आणि भाऊसाहेब शिंदे या दोघांनी "ख्वाडा' ते "बबन' हा प्रवास करून एक ठसठशीत संदेश दिलाय, "गुणवत्ता तळागाळात असतेच’ त्याबरोबर केवळ चित्रपटाचा रसिक असलेला ग्रामीण माणूस आता चित्रपटाचा आणि तोही लोकप्रिय चित्रपटाचा दिग्दर्शक होऊ शकतो...


- संपत मोरे
sampatmore21@gmail. com
लेखकाचा संपर्क : ९४२२७४२९२५

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, आणखी फोटो... 

 

बातम्या आणखी आहेत...