आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकता हवी, तर समता स्‍वीकारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
समाज आणि समाजाच्या अनुषंगाने घडणाऱ्या घडामोडी, उलथापालथी यातून स्वतंत्र असे विधायक-विघातक पर्यावरण आकारास येत जाते. जात-धर्म आणि पंथाशी जोडलेल्या अस्मिता सामाजिक पर्यावरणाला नित्यनेमाने आव्हान देत राहतात. अशा वेळी घटनांकडे प्रतिक्रियावादी दृष्टिकोनातून न पाहता सम्यक दृष्टीने बघण्याच्या उद्देशाने सुरू झालेले हे पाक्षिक सदर... 
 
‘आज असे का वाटते जातीचा रंग सच्चा आहे, 
आयुष्यातल्या मैत्रीचा धागा मात्र कच्चा आहे, 
मुंजीला जेवलो, तो बर्व्या आज ब्राह्मण आहे, 
भंडारा लावून जेजुरी चढलो, तो सुर्व्या आज मराठा आहे, 
कांबळ्याने सोललेला ऊस खाल्ला तो दलित आहे, 
खरंच का हेच, आमच्या मैत्रीचे फलित आहे...’  
 
कुणा अनामिक कवीची ही काव्यरचना अनेकांनी वाचलीही असेल. गेले काही दिवस समाजमाध्यमांमध्ये ती फिरते आहे. कोरेगाव भीमा घटनेच्या पार्श्वभूमीवर ती लिहिली गेली आहे. कवितेत पुढे बर्व्याचे वडील आजारी पडले, तेव्हा तिन्ही मित्रांनी कशी धावपळ केली, सुर्व्याचे लष्करात असलेले वडील शहीद झाले, तेव्हा तिघे मित्र एकमेकांच्या गळ्यात पडून कसे रडले, या स्वरूपाच्या व्यक्तिगत मैत्रीचे वर्णन आहे. शेवटी हा अनामिक कवी सांगतो किंवा सांगते, 
 
‘अशा या मैत्रीला ग्रहण कशामुळे लागले, 
खट्याळपणा कुणाचा अन् सारे रान पेटले, 
इतिहासाच्या घटनांवरून राजकारण तापले, 
जिवाभावाच्या मित्रांचे चेहरे कावरेबावरे झाले...’ 
 
थोडक्यात, कोरेगाव भीमाच्या घटनेमुळे जिवाभावाच्या मित्रांच्या मैत्रीला जातीचं ग्रहण लागलं, असा या काव्यरचनेचा आशय आहे. मित्रांच्या मैत्रीला ग्रहण कशाचे लागले, असा प्रश्न उपस्थित करत एका अत्यंत गुंतागुंतीच्या घटनेची अतिशय सुलभ मांडणी, ही रचना करते. म्हणजे मूळ प्रश्न काय आहे त्याकडे संपूर्ण डोळेझाक करत समाजात सगळं कसं आलबेल चाललेलं असताना, केवळ तीन जातींच्याच नाही तर जातीय उतरंडीतील तीन प्रमुख जातसमुहातल्या मित्रांची जिवाभावाची मैत्री असताना कोणी तरी उठतो, इतिहासातल्या घटनांचं राजकारण करतो आणि वर्तमानातील या तीन मित्रांच्या मैत्रीला ग्रहण लागतं, अशी ही सोयीसोयीची मांडणी आहे. समाजात एकोपा नांदावा, अशा उदात्त हेतूने ही काव्यरचना लिहिली जात आहे, असा भावही त्यात आहे. याच उदात्त हेतूने ही रचना व्हाॅट्सअॅपच्या एका ग्रुपवरून दुसऱ्या ग्रुपवर पाठवली जात आहे. पण या उदात्त हेतूने प्रेरित झालेल्या कवी हृदयाच्या व्यक्तीला एका महत्त्वाच्या समाजवास्तवाचं विस्मरण झालं आहे. समाजात एकोपा हवाच. पण समाजात एकता निर्माण व्हायला मुळात, समाजात समता असायला लागते. सर्व जण व्यक्ती म्हणून समान पातळीवर उभे असावे लागतात. विषमतावादी, जातवर्णवर्चस्ववादी उतरंडीवर आधारलेल्या समाजात व्यक्तिगत मैत्रीच्या पातळीवर एकोपा असला तरी एकता निर्माण होत नाही. असा समाज वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये, घेट्टोंमध्ये विभागलेलाच राहतो. ही विभागणी नाकारून, ही विभागणी करणाऱ्या व्यवस्थेला प्रश्न न करता, जेव्हा सारे काही आलबेल आहे, असा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो, त्या वेळी समाज अधिकाधिक दुभंगतो. समाजाचं हे दुभंगलेपण या एकोपावादी काव्यरचनेतही व्यक्त झालं आहे. किंबहुना, एकोप्याचं आवाहन करणारी ही रचना प्रत्यक्षात विषमतेचंच प्रतीक आहे. काव्यरचना नीट वाचली, तर रचनाकाराला पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं काव्यरचनेतच आहेत. रचनाकाराचा एकोपावाद किती आणि कसा आभासी आहे, समाजवास्तवापासून कोसो दूर आहे, तेही या काव्यरचनेतूनच स्पष्ट होतं. 
 
काव्यरचना बर्वेचा उल्लेख करताना त्याच्या मुंजीचाच उल्लेख करते. मुंज कोणाची झाली? तर बर्वेची. सुर्वे आणि कांबळेची का नाही झाली? कारण जातव्यवस्था सुर्वे आणि कांबळेला मुंजीचा अधिकार देत नाही. ब्राह्मण म्हणून मुंजीचा अधिकार इथली जातव्यवस्था, धर्मव्यवस्था केवळ बर्वेलाच देते. कलियुगात ब्राह्मण वगळता, इतर सर्व जाती शूद्र आहेत, अशी धर्मशास्त्रांची भूमिका आहे. त्यामुळे माझी मुंज का होत नाही आणि फक्त बर्वेचीच मुंज का होते? असा प्रश्न जेव्हा सुर्वे आणि कांबळेला पडतो, त्या वेळी व्यक्तिगत मैत्री असली तरी त्यांच्या सामाजिक स्थानातील अंतर अधिक ठसठशीत होते. सामाजिक वास्तवावर व्यक्तिगत मैत्रीचा कितीही मुलामा चढवला तरी भेदाभेद कायम राहतात.  जर माझी जिवाभावाची मैत्रीण ब्राह्मण असेल आणि ती तिच्या मुलाची मुंज करत असेल, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे मला प्रश्न पडतोच की, माझ्या ब्राह्मण मैत्रिणीच्या पोटी जन्माला आलेल्या अपत्याला मुंजीचा अधिकार आहे, तर माझ्या पोटी जन्माला आलेल्या अपत्याला मुंजीचा अधिकार का नाही? अशा वेळी कितीही व्यक्तिगत जिव्हाळा असला तरी सामाजिक उतरंडीत तुमची पायरी खालची आहे, तुम्ही आणि तुमची मैत्रीण दोन टोकांना उभे आहात, हे जाणवतं. ब्राह्मण मैत्रीण जातव्यवस्थेच्या भेदभावाला प्रश्नही न विचारता, आपल्या जातीला मिळालेला आरक्षित अधिकार वापरून आपल्या मुलाची मुंज करते, तेव्हा ती तुमच्यासमोर विषमतावादी जातव्यवस्थेची समर्थक म्हणून उभी राहते. या एकोपावादी काव्यरचनेतला बर्वेही माझ्या जिवाभावाच्या मित्रांना मुंजीचा अधिकार नसेल तर माझीही मुंज करू नका, असे म्हणत नाही. मोठा, प्रौढ झाल्यावरही तो असे म्हणत नाही, उलट आपल्या मुलाची मुंज थाटामाटात करतो. थोडक्यात, या मित्रांच्या मैत्रीला, या समाजातील एकोप्याला आणखी कशाचं नाही, तर उच्चनीचतेच्या शोषणावर आधारित जातव्यवस्थेचंच ग्रहण लागलेलं आहे. 
 
काव्यरचनेत जेजुरीचाही उल्लेख आहे. जातव्यवस्था कांबळेला, जसा मुंजीचा अधिकार देत नाही, त्याप्रमाणे मंदिरप्रवेशाचा अधिकारही देत नाही. डाॅ. आंबेडकरांनी १९३० ते १९३५ अशी सलग पाच वर्षे काळाराम मंदिरातील प्रवेशासाठी आंदोलन केलं, पण उच्चजातीयांकडून झालेल्या मारहाणीखेरीज आंदोलन करणाऱ्या दलितांच्या वाट्याला काही आलं नाही. डॉ. आंबेडकरांना शेवटपर्यंत मंदिरात प्रवेश करू दिला नाही. आजही या परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही. २००२ मध्ये मच्छिंद्र सकटे यांनी कोल्हापूरातल्या हिटणी गावात (धर्मांतरित न झालेल्या) दलितांना मंदिरप्रवेश मिळावा, यासाठी आंदोलन केले होते. मी स्वतः त्या आंदोलनाचे वार्तांकन करण्यासाठी त्यात सहभागी झाले होते. त्या वेळी पोलिस बंदोबस्तात दलितांनी मंदिरप्रवेश केला, म्हणून तीन गावांतल्या लोकांनी मिळून आंदोलनकर्त्यांवर दगडफेक केली होती. आंदोलनकर्ते गावातून बाहेर जाईपर्यंत ही दगडफेक सुरू होती. पोलिस बंदोबस्त नसता तर काही आंदोलनकर्त्यांचा त्या दगडफेकीत बळी गेला असता. त्या दगड घेतलेल्या हातांच्या मागे डोक्यात भिनलेली विषमतावादी जातव्यवस्थाच होती. आजही किती गावांमध्ये दलितांना मंदिरात आतमध्ये प्रवेश करू दिला जातो, हा संशोधनाचा, अभ्यासाचा विषय आहे.  
 
या काव्यरचनेतला बर्वे कुठे राहतो आणि कांबळे कुठे राहतो, हा प्रश्नही विचारायला हवा. गावांमध्ये कांबळे शतकानुशतकं गावकुसाबाहेरच राहत आला. पण आज मुंबई-पुणे यांसारख्या महानगरांमधली वस्त्यांची जातवार तपासणी केली तर आजही बहुसंख्य कांबळे आणि त्याचे जातबांधव हे मिलिंदनगर, आंबेडकरनगर, गौतमनगर, रमाईनगर या नावांच्या झोपडपट्ट्यांमध्ये आणि चाळींमध्ये राहताना दिसतात. त्याच वेळी याच शहरांमधले काही भाग हे उच्चवर्णीयांचा भरणा असलेले असतात, आणि ते ‘सांस्कृतिक केंद्र’ म्हणून मिरवतात. या सांस्कृतिक केंद्र म्हणून मिरवणाऱ्या भागांमध्ये आंबेडकर जयंती कुठे कुठे साजरी होते, हाही एक संशोधनाचा विषय आहे. 
 
आज कोरेगाव भीमा का पेटले, याचं उत्तर म्हणून चीनच्या षडयंत्रापासून ते नक्षलवादापर्यंत वेगवेगळी उत्तरं समाजमाध्यमांवर हिरिरीने दिली जात आहेत. पण जेव्हा समाज राहत्या वस्त्यांपासून खाण्याच्या सवयींपर्यंत विभागलेला असतो, सामाजिक-धार्मिक-आर्थिक-सांस्कृतिक अशा सगळ्या विषमतांनी पोखरलेला असतो, तेव्हाच कोरेगाव भीमा पेटत असतं. समाजाच्या उच्च स्थानी बसलेल्यांनी जरा समाजाच्या तळाकडे डोकावून बघितलं, तर लक्षात येईल की उपेक्षेच्या, अवहेलनेच्या खदखदीतून आणि आत्मसन्मानाच्या निरंतर शोधातून इतिहासातलं कोरेगाव भीमा वर्तमानात अस्तित्वात आलं आणि यथावकाश पेटलंही... 
 
 
- संध्या नरे पवार 
sandhyanarepawar@gmail.com 
सदरलेखिका ज्येष्ठ पत्रकार तसेच ‘तिची भाकरी कोणी चोरली’, ‘बहुजन स्त्रीचं वर्तमान’, ‘डाकीण-एक अमानवी प्रथा’ या पुरस्कारप्राप्त पुस्तकांच्या लेखिका आहेत.
बातम्या आणखी आहेत...