आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक पाऊल भुमी व्‍यापणारे...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संस्कृतीच्या इतिहासात काही अशा कलाकृती निर्माण होतात, अशा व्यक्ती निर्माण होतात, ज्यामुळे समाजाचा एका बाजूला झुकलेला कल  पुन्हा वस्तुनिष्ठतेकडे परततो. जनमानस हळूहळू पुनर्विचार करू लागते. काळाच्या पुरोगतीबरोबर ती कलाकृती वा व्यक्ती  यांचे समाज-व्यहारातील   स्थान ठळक होत जाते. अशाच सामाजिक-सांस्कृतिक समतोल साधणाऱ्या  कलाकृतींचा वेध  घेणारे हे पाक्षिक सदर... 
 
बर्टोल्ड ब्रेख्त यांच्या ‘गॅलिलिओ’ नाटकात प्रस्थापित समाजव्यवस्था आणि धर्मसत्ता विरोधात असतानाही, विवेकनिष्ठेस प्रमाण मानणारा गॅलिलिओ मानवी दुर्बलता - वैगुण्यांसह, प्रेरकशक्तीसारखं काम करतो. नाटकाच्या शेवटी, गॅलिलिओनं आपले पृथ्वीच्या भ्रमणाबद्दलचे सिद्धांत मागे घेतलेत, असा तपशील येतो. पण तोपर्यंत त्याने आपल्या फेदेरझोनी - आंद्रिया या शिष्यांमध्ये विज्ञाननिष्ठा-विवेकनिष्ठा रुजवलेली असते. तडजोड करून गॅलिलिओनं आपली ‘कातडी बचावली’ असं समजणाऱ्या आंद्रियानं - ‘भेकड कुत्तरडे! तुमची कातडी बचावलीत? अशा शब्दांत त्याचा धिक्कार केला आहे. परंतु पुढे नाटकात गॅलिलिओ आणि आंद्रिया एकमेकांशी, बाजू बदलून युक्तिवाद करत असल्यासारखे बोलतात. 
 
आंद्रिया म्हणतोः १६३३मध्ये जेव्हा तुम्ही आपले सिद्धांत मागे घेतले तेव्हा माझ्या हे लक्षात यायला हवं होतं, की एका अनाठायी राजकीय गुंतागुंतीत अडकून न पडता, तुम्हाला आपले शास्त्रीय प्रयोग चालू ठेवायचे होते. 
गॅलिलिओ म्हणतोः  मी शब्द मागे घेतले कारण, मला शारीरिक यातनांची भीती वाटली. 
आपल्या मनात संभ्रम निर्माण होतो की, आंद्रियाचं म्हणणं खरं की  गॅलिलिओचं? की दोघाचंही खरं असू शकतं? 
नंतरच्या दीर्घ स्वगताच्या शेवटी गॅलिलिओ म्हणतोः  मी माझ्या पेशाला बट्टा लावला आहे. मी जे केलं तसं करण्याऱ्या माणसाला या विज्ञानाच्या क्षेत्रात जागा नाही. गॅलिलिओची शरणागती त्याला - सत्यासाठी विषाचा प्याला पिणाऱ्या सॉक्रेटिसच्या तुलनेत खुजा बनवते. पण आंद्रियानं त्याचं पुस्तक इटलीच्या सीमेबाहेर नेण्याच्या कृतीमध्ये - वास्तवदर्शी - तसाच सखोल प्रतिकात्मक अर्थ दडलेला आहे. व्यक्ती म्हणून गॅलिलिओ पराभूत झाला असला, तरी त्याचे जीवनतत्व-चैतन्य (स्पिरीट) मात्र देशांच्या सीमा ओलांडून जगभर पसरणार आहे.  ब्रेख्तनं या नाटकात एक ‘हीरॉइक’ नायक निर्माण करण्याऐवजी, मानवी पात्रांचा, त्यांच्या मर्यादांसह वापर करूनही मानवी संस्कृतीचा संक्रमणकाळ साकारला आहे. तोही नव्या जगाच्या सकारात्मकतेसह. इथेच, या नाटकाचे संस्कृतीच्या इतिहासातील समतोल-तत्व दिसते. 
 
मॅक्झिम गॉर्कीचे ‘द लोअर डेप्थ्स’ हे नाटक जागतिक रंगभूमीवर महत्वाचं मानलं जातं, ते त्यातील वाङमयीन गुणवत्तेबरोबरच सार्वत्रिक आवाहकतेसाठीसुद्धा. अत्यंत हलाखीच्या-वेदनादायी परिस्थितीत राहणारी ही माणसं कशासाठी  जगतात, असा प्रश्न पडला असतानाच, आपले जीवन नव्या जीवन-जाणिवेने समृद्ध होईल, असे उत्तर ही माणसं आपल्या ओंजळीत टाकतात. स्वतः भटकेपण अनुभवणाऱ्या गॉर्कीने या नाटकात जणू पाताळात राहण्याऱ्या माणसाच्या साथीनं एक स्वर्गीय सूर लावला आहे. ‘नरकाच्या रसातळाशी जे गातात, त्यांचा स्वर स्वर्गीय असतो, असे काफ्काचे विधान मी प्रथम दिलीप चित्रेंच्या लेखात वाचले होते. त्याचा अगदी सच्चा वाटावा, असा अनुभव या नाटकात येतो. जणू गॉर्कीचाच ‘आवाज’ वाटावा (रायटर्स व्हॉइस) असं लुका नावाचं पात्रं या नाटकात  आहे. ‘तुरुंग माणसाला चांगुलपणा शिकवत नाही. माणूसच शिकवतो त्याला. होय! माणूसच माणसाला भलेपणा शिकवेल. अगदी साधं आहे हे!’ असं म्हणणारा लुका त्याच्यातला हा विश्वास-एका अर्थी त्याचं ‘जीवनसार’ साचिनकडे संक्रमित करतो. हा साचिन म्हातारा लुका निघून गेल्यानंतर  पुढे इतरांना ते जीवनसार सांगतो.  संस्कृतीच्या या तळघरात माणसाला जगण्यासाठी कधी असत्याचा आधार का घ्यावा लागतो, याचं निखळ  सत्य लुका त्याला सांगतो.’ ...सत्य! सत्य म्हणतोस तू ते काही नेहमीच उपयोगी नसतं, आजारी माणसाला. सत्य समजलं की, माणसाच्या आत्म्याचा आजार बरा होतोच, असं नाही.’ हाच नरकाच्या तळाशी असलेला ‘स्वर्गीय स्वर’ आहे. हे संपूर्ण नाटक एक ‘सोशिओ-कल्चरल करेक्शन’ आहे असं वाटतं.  
 
काही मराठी नाटकांच्या संदर्भातही असाच विचार करता येईल. प्रा. अजित दळवी यांच्या ‘गांधी विरुद्ध गांधी’ या  नाटकात, मोहनदास करमचंद गांधी आणि त्यांचा सर्वात ज्येष्ठ मुलगा हरिलाल यांच्यातील संघर्ष चितारला आहे. पूर्वी  संपूर्णपणे ‘महात्म्या’च्या बाजूने असणारा जनमानस अल्पांशानं का होईना, हरिलालच्या बाजूने सहानुभूतिपूर्वक विचार केला पाहिजे, असं म्हणण्याइतपत बदलला आहे. मूलतः आध्यात्मिक जीवनशैली स्वीकारलेल्या गांधींच्या विरोधात्म वाटणाऱ्या भौतिकताप्रधान जीवनशैलीचा हरिलाल वाहक आहे. सर्व पातळ्यांवरील अपयशानं त्याचं हे वाहकत्व झाकोळून टाकलं आहे, अशीही भावना हे नाटक निर्माण करते. या नाटकाच्या शेवटी दोघांच्याही मृत्युनंतरचे एक दृश्य आहे. दोघांचाही इहलोकीचा प्रवास संपल्यानंतरचा, त्याच्या चैतन्यरूपातला संवाद आता सुरू झाला आहे. म्हणून नाटककार रंगसूचना देतो - दोघेही चर्चेच्या नव्या फेरीसाठी निघतात. या ठिकाणीच नाटकाची संहिता संपते, पण नाटक आणि महात्मा - हरिलाल हा संघर्ष आपल्या मनात सुरू राहतो. यात गांधी आणि हरिलाल यांची तुलना नाही, तुल्यबळतेचा विचार तर नाहीच नाही. पण अन्य दृष्टिकोनाची तितकीच यथार्थता (व्हॅलिडिटी) असणं-मानणं, हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि यातच या कलाकृतीचे समतोल-तत्त्व आहे. 
 
विलास सारंग यांनीही ‘महात्म्याचा मुलगा’ हे नाटक लिहिले आहे. अजित दळवी यांचं र.धों.कर्व्यांच्या जीवनावर आधारित अलीकडेच सादर झालेलं ‘समाजस्वास्थ्य’ हे नाटक प्लेज ऑफ सोशिओ-कल्चरल-हिस्टॉरिकल करेक्शन’चं अधिक प्रखर उदाहरण आहे. ‘किरवंत’ या प्रेमानंद गज्वी या नाटकानं उच्चवर्णीयांमध्येही, ज्यांच्या वाट्याला परंपरेनं सामाजिक अवहेलना, अपरंपार दुःख आलेलं आहे, अशा दोन्ही बाजूंनी दुर्लक्षित समाजघटकाकडे नव्या दृष्टीने पाहण्यासाठी जनमानसाला उद्युक्त केलं आहे. ‘वाटा-पळवाटा’ हे प्रा. दत्ता भगत यांचं नाटक विविध समाजघटकांच्या मनामध्ये कित्येक वर्षांपासून रूतून बसलेले गैरसमज दूर करून, एका स्वच्छ निर्भेळ दृष्टिकोनातून अवती-भवतीच्या  परिस्थितीकडे बघायचं शहाणपण आपल्याला देतं. आंबेडकरी प्रबोधनानं भारलेल्या या तीन पिढ्यांमधला संवाद - सामाजिक चिकित्सेच्या पातळीवर तर जाणारा आहेच, पण त्या भूमिकांच्या पल्याड असलेला सहृदय विश्लेषकाचा दृष्टिकोन, महाराष्ट्रातील विचार-मंथनासाठी एक भूमी तयार करतो. काही लेखकांचे संपूर्ण लेखनच समाजाचा ढासळलेला मध्याबिंदू जागेवर आणणारे असते. साचलेला अभिव्यक्ती प्रवाह मोकळा करणारे असते. उदा. मंटो. इस्मत चुगताई.  काही व्यक्तींचे जणू सारे आयुष्यच असा ‘सोशल इक्विलिब्रिअम्’ साधण्यासाठीच असते. उदा. आंबेडकर, गांधी,  नेल्सन मंडेला, दामोदर कोसंबी, आर्तो (रंगकर्मी),  सिमॉन द बोव्हा (फ्रेंच लेखिका, तत्वचिंतक) काही पुस्तकांनाही असे  व्यापक अर्थाने सामाजिक  संतुलन साधण्याचे  ‘अवतार-कार्य’असते. उदा. श्रीविठ्ठलः एक महासमन्वय (रा.चिं.ढेरे), हिंदू संस्कृती आणि स्त्री. (आ.ह.साळुंखे) सलोख्याचे प्रदेश(इन गुड फेथ-सबा  नक्वी)  डि-स्कूलिंग सोसायटी (इव्हान एलिच), द सेकंड सेक्स (सिमॉन द बोव्हा) सिसिफस आणि बेलाक्वा (विलास सारंग) बॉब डिलनला साहित्याचं नोबेल पारितोषिक मिळणं, ओम पुरीनं ‘चॉकलेट हिरों’ च्या  भारतीय चित्रपटसृष्टीत स्थिरावणं-आपलं खास स्थान निर्माण करणं, ‘वन फ्लू ओव्हर द कुक्कूज नेस्ट’ या मनोरूग्णांच्या जीवनावर आधारित चित्रपटानं, जगमान्यता मिळवतानाच, मनोरूग्णांबाबत संवेदनशील समाजघटकांना  थोडं अधिक शहाणं करणं , यात सामाजिक –सांस्कृतिक सुधारणा (करेक्शन) असं काही आहे का, याचाही शोध घेणं गरजेचं आहे. 
 
या  लेखमालिकेतून मी  असा प्रकारच्या व्यापक ‘समतोल-‘ वेधाचे उद्दिष्ट ठेवले आहे.परीघाकडून केंद्राकडे जाणाऱ्या, जाऊ शकणाऱ्या प्रतिभावंतांच्या कलाकृतींवर –अभ्यासप्रकल्पांवर झोत असेही काही या मालिकेतून साधता येईल. खूप दूरवर पसरू शकतील अशांची ही पावलं आहेत.  
 
पंजाबी कवी ‘पाश’ यांची एक कविता आहे - 
हे एक पाऊल माझ्या आयुष्याइतकं नसून 
माझ्या अनेक जन्मांहूनही मोठं आहे. 
हे  पाऊल सतत पसरत जाऊन 
माझी संपूर्ण भूमी व्यापून टाकील... 
 
या प्रतिभावंतांच्या कालजयी कलाकृती म्हणजे, अशी पसरणारी पावलं आहेत आणि मी इथं उमटवतो आहे फक्त शक्यतेचा - संभाव्यतेचा अंगठा! 
लेखक भारत सरकारच्या पत्र सूचना कार्यालयाचे स्वेच्छानिवृत्त उपसंचालक तसेच पुरस्कारप्राप्त समीक्षक, कथालेखक आहेत.
 
- संजय आर्वीकर 
arvikarsanjay@gmail.com
लेखकाचा संपर्क : ८२७५८२००४४
बातम्या आणखी आहेत...