आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माणसाचा 'भला थोरला' मित्र

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संस्कृतीच्या इतिहासात, टॉलस्टॉयसारख्या व्यक्तिमत्त्वांचे, त्यांच्या आत्मकथनांचे फार महत्त्व असते. अनेक विरोधांना सामावून घेणारे समतोल-तत्त्व टॉलस्टॉयच्या व्यक्तिमत्त्वात होते. हे तत्त्व एकीकडे त्यातले सच्चेपण, त्याचे भलेपण-थोरवी  आपल्या मनात रुजवते, तर दुसरीकडे मानवी अस्तित्वाचा विचार करणाऱ्या प्रत्येकाच्या मनात मैत्रभाव जागवते...


चनप्रवासात काही माणसं- लेखक-कलावंत-विचारवंत-तत्त्वज्ञ इतके जीवाभावाचे होऊन जातात, की त्यांची पहिली भेट कधी झाली हेही आठवत नाही. आयुष्यात मुळातून हादरवून टाकणारे क्षण आले की, ही माणसं अनोख्या दालनातून अचानक प्रगटतात. रशियन लेखक लिओ टॉलस्टॉय मला पहिल्यांदा बी.ए.ला असताना भेटला, ‘हाऊ मच लँड डझ् अ मॅन नीड’ या त्याच्या कथेतून. 


माणसाच्या वाढत्या लोभीपणाचं दर्शन घडवणारी ही गोष्ट मला तेव्हा एखाद्या नीतीकथेसारखी वाटली होती. पुढे त्याच्या कादंबऱ्या-कथा वाचल्या. काही इंग्रजीतून काही मराठीतून. पण अजून त्यानं मनात ठाण मांडावं, इतका जवळ आला नव्हता. अचानक सुमती देवस्थळेंचं पुस्तक हाती लागलं-"टॉलस्टॉय : एक माणूस'. लेखक-कलावंत-विचारवंत-तत्त्वज्ञ असलेला एक महामानव आपला मित्र होऊ शकतो, अशी किमया या पुस्तकानं माझ्या आयुष्यात घडवली. मला असा ‘भलाथोरला’ मित्र सापडला. जो माझ्यासाठी ‘प्रोटियन्’ होता-बहुरूप-धारी होता. माझ्या मन:स्थितीनुसार, तो आपलं रूप बदलत असे. त्यानं आयुष्यात केलेल्या चुकांची जी कबुली दिली आहे, ती माहीत झाल्यावर आपल्या हातून उद्या काहीही घडले, तरी याच्याकडे सारं काही सांगता येईल, असा विश्वास वाटू लागला. 


याच काळात पुढे कधी तरी मी कथा लिहायला लागलो.बाबूराव चित्रेंच्या ‘अभिरुची’त. ‘प्रारंभ’नावाची पहिलीच कथा- त्यांनी छापली. मग स्वरूप प्रकाशनानं  ‘प्रारंभ’ नावानंच माझा कथासंग्रह छापला.आता अलिकडे पुन्हा तो वाचत होतो, तर अनेक ठिकाणी आपल्या नकळत टॉलस्टॉय किती मानगुटीवर बसला, ते समजलं.  ‘प्रारंभ’चा नायक कथेत सांगत होता, ‘मी मोठा झालो. माझ्या स्वप्नाळू हातांमध्ये नव्या धर्माची मुहूर्तमेढ होत होती. आपण सगळ्या माणसांना समजून घ्यायचं. त्यांच्या मनात खोल बुडी मारायची, तिथे दिसणाऱ्या जखमा भरून येण्यासाठी प्रयत्न करायचे, हे माझ्या धर्माचं सर्वसाधारण तत्व होतं. धर्माची कलमं निश्चित करत असतानाच परीक्षा जवळ आली. दिवसभर अभ्यास आणि रात्री धर्माचा विचार. दिवस मजेत चालले होते...’


मी माझ्या नायकाला टॉलस्टॉयच्या गुणांचा अंश देत होतो...
‘टॉलस्टॉय ः एक माणूस’ या पुस्तकातून सुमती देवस्थळे यांनी, मला टॉलस्टॉयच्या ‘हिरव्या डहाळी’चा परिचय करून दिला होता. लहानग्या लिओला ही ‘डहाळी’ त्याचा मोठा भाऊ निकोलसनं दिली होती. एकदा तो आपल्या भावांना म्हणाला, ‘माझ्याजवळ असे एक गुपित आहे की, ते सांगितले की तर जगातले सर्व लोक सुखी होतील. सर्व रोगराई नाहिशी होईल. कोणतीही दुःखे उरणार नाहीत. कोणी कोणावर रागवणार नाही...’ भावंडांना यातली गोडी समजली, तरी सुखाच्या गुरुकिल्लीचे रहस्य समजेना, असं सूचित करून निकोलसचे गूढ-चिंतकासारखे  उद््गार पुढे येतात, ‘ते रहस्य मी हिरव्या डहाळीवर कोरून ठेवले आहे.’ 


पुढे सुमतीबाईंचे भाष्य येते. ‘सबंध जगाच्या सुखाचे रहस्य कोरलेल्या डहाळीचे’ लिओला इतके विलक्षण आकर्षण होते की,मोठेपणी डहाळीच्या संभाव्य स्थळी आपला देह मरणोत्तर ठेवावा, असे त्याने आपल्या मृत्युपत्रात लिहून ठेवले आहे. विश्वबंधुत्वाची कल्पना प्रत्यक्षात आणणे शक्य आहे, अशी  त्याची प्रगाढ श्रद्धा होती आणि या श्रद्धेचे मूळ निकोलसने शिकवलेल्या काल्पनिक खेळात आणि गोष्टीत होते. पुढे ‘द ट्रबल विथ टॉलस्टॉय’ हा चरित्रपट पाहताना पुन्हा ही ‘हिरवी डहाळी’ अवतरली. त्या प्रसंगात खुद्द लिओ त्याबद्धल सांगतो आहे, आणि मागे कृष्णधवल चित्रात निकोलस, ही डहाळी घेऊन उभा आहे. दक्षिण अफ्रिकेत  गांधीजींनी स्थापन केलेला टॉलस्टॉय-फार्म या ‘हिरव्या डहाळी’चाच उन्नत उपयोजित आविष्कार होता!


 टॉलस्टॉयच्या मृत्युप्रसंगानंतर, सुमतीबाईं पुन्हा या डहाळीकडे परत येतात. लिहितात, ‘त्या विशिष्ट जागेच्या अवतीभवती प्रचंड वृक्ष ...टॉलस्टॉयनेच स्वतःच्या तरूणपणीच लावलेले होते. त्या काल्पनिक डहाळीवरचे रहस्य सर्वांना समजले, तर सबंध जगात पुनश्च सुवर्णयुग होईल... एवढ्या प्रचंड गर्दीत धर्मगुरू मात्र नव्हते. कोणत्याही धार्मिक संस्काराशिवाय झालेले, रशियातील ते पहिले दफन होय.’ लिओचं बालपण आणि तरुणपण याच्याशी आपलं मित्रत्वाचं नातं सहज जुळतं. धार्मिक कट्टरपण, अवडंबर या साऱ्यांना तीव्र विरोध हेही त्याच्याविषयी वाटणाऱ्या आकर्षणाचा एक महत्त्वाचा पैलू होताच. त्याच्या व्यक्तिमत्वात बंडखोरी आणि निर्मितीशीलता एकमेकांना   बिलगून वसत  होती. ऑर्थोडॉक्स चर्चनं त्याला पाखंडी ठरवून धर्मबहिष्कृत केलं होतं.पण त्यानंतर त्याचं ‘महात्मा’पण अधिकच झळाळत गेलं. पण त्याचं तात्विक लेखन वाचताना त्याच्यातल्या  ‘विचारवंत-तत्वज्ञा’मुळे जरा आपल्यातलं अंतर वाढतंय, असं वाटायचं. त्याच्या कथा-कादंबऱ्यांंमधली पात्रं, प्रत्यक्षातल्या माणसांसारखी धरून ठेवायची, पण ती त्याच्या खूप नजीक न्यायची, असं म्हणता येत नाही. त्याच्याकडे पुन्हा जुन्या मित्रासारखं खेचून नेलं, ते त्याच्या ‘कन्फेशन्स’(कबुलीजबाब) या  लहानशा आत्मकथनानं.
 
 
मानवी संस्कृतीमध्ये प्रगती, विकास या संकल्पनांना फार महत्व आहे. पॅरिसमध्ये एका माणसाच्या शिरच्छेदाचा प्रसंग सांगून टॉलस्टॉय मानवी संस्कृतीबद्दल, त्याच्या प्रगतीबद्दल मूलभूत प्रश्न उपस्थित करतो. तो सांगतो, ‘पॅरिसमध्ये असताना मी एका माणसाचा शिरच्छेद पाहिला आणि प्रगतीवर माझा जो आंधळा विश्वास होता, तो डळमळीत झाला, मी शिर धडावेगळं होताना पाहिलं. एका खोक्यात ते शिर आणि धड फेकून देऊन भरताना पाहिलं, तेव्हा मला केवळ माझ्या मनानेच नव्हे, तर अवघ्या अस्तित्वाने भान आलं की आताची आपली प्रगती योग्य मार्गाने चालली आहे असं सांगणारी कोणतीही तत्त्वप्रणाली या कृत्याचं समर्थन करू शकणार नाही... एखादं कृत्य चांगलं कृत्य आहे की दुष्ट कृत्य आहे, याचा निवाडा लोकांच्या मतानुसार किंवा कृतीनुसार होऊ शकणार नाही. तो निवाडा करणार माझं हृदय आणि मी  या साऱ्याचं लख्ख भान तो शिरच्छेद पाहताना मला आलं.’. 


आपल्या आत्मकथनात, टॉलस्टॉय मानवी श्रद्धेबाबत फार खोलवर विचार करतो. तो म्हणतो-"श्रद्धेनं दिलेल्या उत्तरांमध्ये माणसाचा खोल असा शहाणपणा साठवलेला आहे. मला तर्कबुद्धीचा आधार घेऊन त्याला नाकारण्याचा हक्क नाही, कारण आयुष्याच्या प्रश्नाला केवळ श्रद्धाच उत्तर देऊ शकते, अशी त्याची धारणा आहे.' 


इथे अनेकांना त्याच्याशी वाद घालण्याची ऊर्मी येऊ शकते, मलाही ती आलीच आहे. पण त्याहीपेक्षा जास्त विलोभनीय वाटते. ते साऱ्या मानवजातीशी, त्याने श्रद्धा-रूपात जोडलेले मित्रत्वाचं नातं. मराठीतले एक श्रेष्ठ लेखक-विचारवंत-भाष्यकार प्रा. ग.प्र.प्रधान यांनी ‘टॉलस्टॉय यांच्याशी पत्रसंवाद’ या शीर्षकाचं छोटेखानी पुस्तक लिहिलं आहे. त्यात ते टॉलस्टॉय यांना, आपल्या गुरूंचे(महात्मा गांधींचे) गुरू असे संबोधतात, पण संवादासाठी पत्रमाध्यम स्वीकारतात. याचंही संभाव्य कारण मला - टॉलस्टॉयबद्दल, त्याच्या लेखनातून जाणवणारा मैत्रभाव असावा हेच वाटतं. या पुस्तकात प्रधानसरांचा ‘गांधी-टॉलस्टॉय यांचे परलोकातील संवाद’ असा एक लेख परिशिष्ट म्हणून जोडला आहे, यात गांधी-टॉलस्टॉय गुरू-शिष्यरूपात नाहीत, तर साऱ्या मानवजातीचा-सृष्टीचा विचार करणारे मित्र आहेत, असं वाटतं. या लेखातला हा अंश पहा. एक दिवस टॉलस्टॉय, गांधीजी बोलत बसले, असताना गांधीजी म्हणाले, ‘आपण आपल्या पूर्वायुष्यातील चुकांची कबुली देणारे ‘कन्फेशन्स’ हे पुस्तक लिहिलेत,जीवनात अनेक समस्यांना सामोरे जाताना काय केले पाहिजे,हे सडेतोडपणे सांगितले, आणि परमेश्वर शेवटी माणसाच्या अंतःकरणात आहे, ते सांगितले.यामुळे माझ्यासारख्या असंख्य लोकांना प्रकाश मिळाला...’ टॉलस्टॉय म्हणाले, ‘माझ्या अखेरच्या प्रवासात आगगाडीतून जात असताना, मी तिसऱ्या वर्गाच्या डब्यात जाऊन बसलो, त्यावेळी एका विद्यार्थ्याने मला असेच(ईश्वराबद्दल) विचारले, तेव्हा मी म्हणालो’ ही सृष्टी निर्माण करणाऱ्या ईश्वरावर माझा विश्वास नाही,पण प्रत्येकाच्या हृदयातील सदसद्विवेक बुद्धीत जागे असणाऱ्या ईश्वराच्या अंशावर माझी दृढ श्रद्धा आहे.थोडे थांबून  टॉलस्टॉय म्हणाले, गांधी, मृत्युपूर्वी मी जे शेवटचे वाक्य बोललो, ते काय होते ते सांगू? ते होते ‘सत्य! त्याचेच मला सर्वात जास्त महत्व वाटते’ आणि गांधी, तू तर आयुष्यभरचा सत्याग्रही, म्हणून तर आपली मनं जुळली...’ 


गांधीजींनी आपले ‘सत्याचे प्रयोग’ हे आत्मकथन  टॉलस्टॉयना वाचायला दिले होते, असा सूचक उल्लेख या परलोकातील संवादात आधी येऊन जातो. संस्कृतीच्या इतिहासात, टॉलस्टॉयसारख्या व्यक्तिमत्वांचे, त्यांच्या आत्मकथनांचे फार महत्व असते. कारण, अनेक विरोधांना सामावून घेणारे समतोल-तत्व त्यांच्या व्यक्तिमत्वात होते. हे तत्व एकीकडे त्यातले सच्चेपण, त्याचे भलेपण-थोरवी  आपल्या मनात रुजवते तर दुसरीकडे मानवी अस्तित्वाचा विचार करणाऱ्या प्रत्येकाच्या मनात मैत्रभाव जागवते. म्हणूनच लिओ टॉलस्टॉय  माणसाचा ‘भला-थोरला’ मित्र भासतो.          
आपल्या ‘फ्रेंडशिप’ या कवितेत खलिल जिब्रान म्हणतो, व्हेन यू पार्ट फ्रॉम युवर फ्रेंड यू ग्रिव्ह नॉट; फॉर दॅट व्हिच यू लव्ह मोस्ट इन हिम, मे बी क्लिअरर इन हिज अबसेन्स, अ‍ॅज द माउंटन टू द क्लांइंबर, इज क्लिअरर फ्रॉम द प्लेन  खरोखर आपल्यासारख्या पठारावरून चालणाऱ्यांसाठी टालस्टॉय भक्कम धीर देणारा पर्वत होता! 


- संजय आर्वीकर
arvikarsanjay@gmail.com
लेखकाचा संपर्क : ८२७५८२००४४

बातम्या आणखी आहेत...