आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'तरीही तू हुशारच'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘बदललेल्या शिक्षण पद्धतीनुसार तू अनेक पर्याय निवडलेस, त्यात तू यशस्वी झालास, तर तू त्याला दिलेला प्रतिसाद आहे तो बरोबर आहे असे समज. तू कोठेही कमी आहोत असे समजू नकोस. प्राप्त परिस्थितीत आपण किती गोष्टीवर विचार करू शकतो त्यातून मार्ग काढू शकतोस, याची क्षमता यातून दिसते हे मी तुला सांगतो. त्यामुळे तू हुशारच आहेस व प्रॅक्टिकली विचार करणारा आहेस हे लक्षात घे.’


आज अमोघचा रिझल्ट होता. बारावी म्हणजे मुख्य वर्ष, महत्त्वाचे वर्ष, आयुष्याला आकार देण्याचे वर्ष. खूप अभ्यास, सगळ्यांचे सल्ले, आणि क्लास यासाठीच वेळ देणे आणि पालकांनी पण खूप वेळ देणे. अगदी एवढे सगळे शेड्यूल आखून केलेला अभ्यास, यातून ठरवलेल्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळणे, हे सगळे सुरळीत व्हावे असे प्रत्येकालाच वाटते. पण असे होईल का, अशी शंकेची पाल प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात चुकचुकत असते, तशीच अमोघच्या मनातही होती. खरे तर खूपच हुशार, सगळ्या गोष्टीत रस घेऊन ते करणारा असा चांगला विद्यार्थी, पण आजूबाजूच्या मित्रांचे, आधीच्या वर्षीच्या विद्यार्थ्यांचे झालेले हाल, मार्क छान मिळूनही झालेली गळचेपी, जणू खूप गर्दीत अडकलोय आणि मार्गच सापडत नाहीये आणि घुसमटतच गर्दीत अडकलोय, असे सर्व प्रकार त्याला आठवत होते. 


त्या दिवशी तो असाच विचार करत आपल्या मित्राबरोबर फिरायला गेला होता. चालता चालता त्याला त्याचे आवडते काका भेटले. त्यांनी स्मित करत रिझल्टविषयी विचारले, आणि मग अमोघ त्यांच्याशी मोकळेपणाने बोलू लागला, ‘हो ना काका, त्याचीच चिंता लागली आहे, खूप काळजी वाटते. खूप अभ्यास करून, मार्क मिळवूनही राजेशला त्याच्या आवडीची गोष्ट मिळालीच नाही. अजून यतीन, गुरू अशा खूप कुणाचेही तसेच झाले, मला तर खूप वाईट वाटतं.’
काका म्हणाले, ‘चल आत घरात. आपण आत बसून बोलू या. तुला नक्की कशाचे दुःख होते, त्यांना आवडता कोर्स मिळाला नाही की, अभ्यास कमी केला, तू त्याच्याइतका हुशार नाही, त्याला बघ कसे छान मार्क्स मिळाले, तू अजून थोडा अभ्यास करायला पाहिजे होता, या सगळ्याचे?’ त्यावर अमोघ शांत राहिला. काकांनी आपल्या मनातील काहूर बरोबर ओळखले हे त्याच्या लक्षात आले. 


मग तेच म्हणाले, ‘अरे अजून रिझल्ट  तर लागायचा आहे, हे एक. आणि  तो वाईटच लागेल असे का समजतोस, चांगलाच असेल तो. कारण सातत्याने केलेल्या कष्टाची परिणीती यशातच होते. पण जर समज तसे झालेच तर एक लक्षात घे, तू या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालास, उत्तम मार्क्स मिळाले पण काही टक्क्यांनी थोडक्याकरता अॅडमिशन गेली तरी ते त्या वेळच्या परिस्थितीमुळेच असेल. म्हणून आपण कमी आहोत असे समजू नाही. तसेच आपण कमी हुशार आहोत, अभ्यासात खूप मागे आहोत, आपण अयशस्वी आहोत असे समजून नकोस. आणि स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. आता तर किती छान संधी आहेत. प्रवेश परीक्षांमुळे असणाऱ्या उपलब्ध जागांमुळे तू त्या ध्येयासाठी पुन्हा प्रयत्न करू शकतोस. आणि तू तुला गोडी असणाऱ्या दुसऱ्या विषयातील एखादा कोर्स निवडू शकतोस. लगेच आपल्याला कमी लेखून स्वतःचा आत्मविश्वास शून्य बनवू नकोस, आणि जी परिस्थिती अजून आलीच नाही त्याने अस्थिर होऊ नकोस.’


‘उद्याच्या रिझल्टची प्रसन्न चित्ताने वाट बघ. उत्तम मार्क्स मिळाले तर, आधी त्याचा आनंद घे, आणि मग पुढच्या प्रवेश परीक्षेच्या रिझल्टनुसार तू त्याच्यावर विचार कर. एवढे पर्याय खुले ठेवून तू तर अष्टपैलू आहेस हेच तू दाखवशील अशी मला खात्री आहे. पण न जाणो असे आवडीचे क्षेत्र नाही मिळाले, तर दुसरा पर्याय म्हणून जे  क्षेत्र तू निवडले आहेस त्यात प्रावीण्य दाखव. त्यात सफल हो, हाच माझा आशीर्वाद आहे. “बदललेल्या शिक्षण पद्धतीनुसार तू अनेक पर्याय निवडलेस, त्यात तू यशस्वी झालास, तर तू त्याला दिलेला प्रतिसाद आहे तो, तो बरोबर आहे असे समज आणि तू कोठेही कमी आहोत असे समजू नकोस. प्राप्त परिस्थितीत आपण किती गोष्टीवर विचार करू शकतो आणि त्यातून मार्ग काढू शकतोस, याची क्षमता यातून दिसते हे मी तुला सांगतो. त्यामुळे तू हुशारच आहेस व प्रॅक्टिकली विचार करणारा आहेस हे लक्षात घे.’


त्यांच्या या शब्दांनी अमोघ खरंच भारावला आणि त्याच्या विचारांना योग्य दिशा मिळाली, त्याला खूप आनंद झाला. आनंदाने तो रिझल्टची वाट बघू लागला. एक प्रकारे आपण रिझल्टचा कसा सकारात्मकतेने विचार करावा हे त्याला कळले. आणि मनातील काहूर शांत झाले व तो शांत मनाने पुढच्या तयारीला लागला.


- सरोज शेवडे, नाशिक
saroj.shevade@gmail.com

बातम्या आणखी आहेत...