आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खेळ माझ्या मनाला भिडतात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू-काश्मीरच्या क्रिकेट संघासोबत लेखिका. - Divya Marathi
जम्मू-काश्मीरच्या क्रिकेट संघासोबत लेखिका.

क्रीडा पत्रकारिता हे अगदी काही वर्षांपर्यंत पुरुषांचं क्षेत्र होतं. हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या महिला क्रीडा पत्रकार भारतभरात होत्या. १९८०च्या दशकात मुंबईत क्रीडा पत्रकार म्हणून कामास सुरुवात केलेल्या शारदा उग्रा यांपैकी एक. त्या सध्या ईएसपीएन क्रिकइन्फो संस्थेत आहेत. दोन जुलै हा दिवस जगभरात क्रीडा पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने हे मनोगत. 


झाॅल फुटबाॅल क्लबच्या स्पर्धा पाहायला मागच्या वर्षी गेले होते. म्हटलं तर ही स्पर्धा लहान, राज्य पातळीवरची. पण तिथली गर्दी, प्रचंड पावसातही सुरू असलेले सामने अाणि रंगतदार खेळ यांमुळे मी पुन्हा माझ्या पंचविशीतली वार्ताहर होऊन गेले. तिथल्या रोमांचक वातावरणात मी माझा एरवीचा तटस्थपणा विसरून खेळात पूर्णपणे सामील झाले. अशा क्षणांना जाणवतं की, यासाठीच मी हे करिअर निवडलं. अशा अद्भुत क्षणांसाठीच मी क्रीडा पत्रकार झाले; अशा काळात जेव्हा मुंबईत सोडा, देशातही फार कोणी महिला क्रीडा पत्रकार नव्हत्या.


मी १९८९मध्ये मिडडे या सायंदैनिकात शिकाऊ क्रीडा पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. तेव्हा तिथे या विभागात मी एकटीच होते. कार्यालय छोटंसं होतं, सगळे सहकारी चांगले होते. सगळ्यांना कामाशी मतलब होता. मी मुलगी आहे की मुलगा, यापेक्षा मी काम वेळेत आणि नीट करते की नाही, हे महत्त्वाचं होतं. त्यामुळे मी लिहीत गेले. अर्थात, बाहेर, पत्रकार परिषदांमध्ये मात्र मी अगदी गप्प असायचे, शक्यताे मी तिथे असल्याचं कोणाला कळू नये, अशी राहायचे कारण मी एकटीच मुलगी असायचे. आजूबाजूला जुनेनवे क्रीडा पत्रकार असत. मला पत्रकार परिषदेत पहिला प्रश्न विचारायला चार वर्षं जावी लागली. मी हा प्रश्न विचारला तेव्हा समोरून उत्तर येण्याआधीच एका ज्येष्ठ पत्रकाराने त्याचा प्रश्न विचारायला सुरुवात केली. आणि कोण जाणे कशी, मी त्यांना म्हणाले, "माझ्या प्रश्नाचं उत्तर तर देऊ द्या!' चारपाच वर्षं बरंच काही सहन केल्यानंतर माझ्यात इतका धीटपणा आला नव्हता. 


मग मात्र मी वळून मागे पाहिलं नाही. आणि आता वाटतं, आपल्याशी असं वागणाऱ्यांना एक थप्पड कशी नाही लगावली तेव्हा!

मी एकटी होते, आणि बहुधा पहिलीही. त्यामुळे स्टेडियमच्या ड्रेसिंग रूममध्ये, पत्रकार परिषदांमध्ये महिला असण्याची कोणालाच सवय नव्हती. ना पत्रकारांना, ना खेळाडूंना. अनेक ज्येष्ठ पत्रकार माझ्याकडे सरळ दुर्लक्ष करत. बहुतेकांना माझ्या क्षमतेबद्दलच शंका वाटत असे. हळुहळू मला याची सवय होत गेली, आणि त्यांना माझी. एकमेव मुलगी असल्याने गंमतीदार प्रसंग ओढवत. इंदूरला एका क्रिकेट सामन्याचं वार्तांकन करायला मी गेले होते. स्टेडियममध्ये महिलांसाठी स्वच्छतागृहच नव्हतं! दिवसभराचा सामना म्हटल्यावर मला त्याची गरज पडलीच. अखेर एका संघाने त्यांची ड्रेसिंग रूम माझ्यासाठी रिकामी केली, आणि मी स्वच्छतागृहात जाऊ शकले. ही माझी आवडती "टाॅयलेट स्टोरी' आहे, अशा अनेक आहेत अर्थात, भारतातल्या अनेक शहरांतल्या.


मला या तीसेक वर्षांच्या प्रवासात चांगले अनुभवच जास्त आले. माझा पहिला परदेश प्रवास होता शारजाचा. मिडडेत असतानाचा. तिथनं मी रोज बातम्या पाठवत होते. दौऱ्याच्या शेवटी आमच्या प्रकाशक/मालकांचा टेलेक्स संदेश आला, "तू उत्तम काम केलंयस, आम्हाला तुझा अभिमान वाटतो.' मी खूष झाले होते. माझ्यासारख्या नवख्या वार्ताहरासाठी ही खूप मोठी कौतुकाची थाप होती. मिडडेतर्फे मी विंबल्डनलाही जाऊन आले. २००४चा पाकिस्तान दौराही अविस्मरणीय होता. एकतर भारत जिंकत होता. दुसरं, आपल्यासारखंच वातावरण, भाषा, यांमुळेही मी तिथे खूप मजा केली. सुरुवातील ऐझाॅलचा उल्लेख केला, तसंच लाॅर्डसवर झालं एकदा. अजिंक्य राहणेने षटकार मारला तेव्हा मी चक्क ओरडले होते आनंदात. एरवी मी अतिशय शांतपणे खेळ पाहात असते, प्रत्यक्ष वा टीव्हीवर.


मी जास्त लिखाण/वार्तांकन क्रिकेटचं केलं असलं तरी मला सर्व स्पर्धात्मक खेळ पाहायला आवडतात. अगदी रणजी सामने किंवा लहान स्पर्धांमधले फुटबाॅल सामनेसुद्धा. आता या टप्प्यावर मोठ्या स्टार खेळाडूंबद्दल लिहायला नाही आवडत फार. ते तरुण असताना केलंय. आता मला मुख्य सामन्यापेक्षा आजूबाजूला काय होत असतं ते टिपायला आवडतं. जे चाकोरीबाहेरचं आहे, ते पाहण्यात, त्याबद्दल लिहिण्यात रमते मी जास्त.


मी सर्वात मजा घेतलीय ते नौकानयनाच्या स्पर्धांचं वार्तांकन करायची. वार्ताहरांनाही बोटीवरनं समुद्रात जायला मिळायचं, तिथनं स्पर्धा पाहायची. मग परत येऊन बातमी लिहायची. खूपच आवडायचं मला ते.


मी करिअरला सुरुवात केली तेव्हापासून आतापर्यंत परिस्थिती खूपच बदललीय. खेळ बदलले आहेत. खेळाडू व्यावसायिक झाले आहेत. पूर्वी मी इमरान खानसारख्या खेळाडूशी फोनवर बोलले आहे, आता ते निव्वळ अशक्य आहे. कारण खेळाडूंचे व्यवस्थापक आहेत, पत्रकारांना ते खेळाडूंच्या फार जवळ येऊ देत नाहीत. तसंच, आता खेळाडू पत्रकार परिषदांमध्ये बोलतात त्यातही तोचतोचपणा आहे कारण ते मीडिया मॅनेजरने शिकवलेलं बोलतात. पूर्वीची उत्स्फूर्तता राहिली नाहीय. मला आठवतं, २००३च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धांपूर्वी खेळाडूंशी फक्त गप्पा मारायला आम्हाला बोलावलं होतं. कागदपेन नाही, रेकाॅर्डर नाहीत. फक्त गप्पा अाणि खाणंपिणं. आता असं काही होऊ शकेल, याचा विचारही करवत नाही.


१९९०नंतरचा भारतीय क्रिकेट संघ मला माझ्या जवळचा वाटतो, आम्ही सोबत मोठे झालो. त्या खेळाडूंशी मला जवळीक वाटते. नंतर नवा, तरुण संघ आला, नवीन तरुण पत्रकारांचं त्यांच्याशी नातं तयार झालं. दुसरा बदल झालाय तो म्हणजे भारतात अनेक मुली क्रीडा पत्रकारितेत आहेत. दिल्ली, कोलकाता, बंगळुरू, या ठिकाणी त्या उत्तम काम करतायत. बंगालमध्ये अनेक मुली फुटबाॅलच्या मैदानावर दिसतात, कदाचित बंगाली लोकांमध्ये असलेलं फुटबाॅलचं वेड याला कारणीभूत असेल. वार्ताहर सुश्मिता चॅटर्जी आणि संपूर्णा चक्रवर्ती यांच्याशी माझी छान मैत्री आहे. इंग्रजी वर्तमानपत्रांमध्ये हे प्रमाण बरंच आहे. ब्लाॅगरही अनेक आहेत मुली, ज्या खेळांबद्दल लिहितात. मला या तरुणांचं लिखाण फार आवडतं वाचायला. ते फक्त सामन्याचा वृत्तांत लिहीत नाहीत, त्यात आणखी काही असतं. त्यांचा दृष्टिकोन त्यातनं स्पष्ट दिसतो. दीप्ती पटवर्धन, स्नेहल प्रधान, या ब्लाॅगर्सचं लेखन आवडतं मला. 


सध्या मोठ्या शहरांपेक्षा खूप काही घडतंय ते लहान शहरांमध्ये. क्रीडा क्षेत्र त्याला अपवाद नाही. तिथे अनेक "स्टोरीज' आहेत, ज्या जगासमोर यायची वाट पाहात आहेत. त्यामुळे तिथल्या मुलामुलींना ही खूप चांगली संधी आहे. आणि समजा कोणी म्हटलंच, हे काय काम आहे का मुलींचं, तर विचारा त्यांना, "मला हेच करायचंय, काय कराल?'


अविस्मरणीय क्षण
भारताचे विविध खेळांचे अनेक सामने पाहिले, बातम्या लिहिल्या. त्यातला सर्वात अविस्मरणीय क्षण आहे, बीजिंग आॅलिंपिकमध्ये अभिनव बिंद्राने सुवर्णपदक मिळवलं तो. भरगच्च स्टेडियममध्ये झालेला पदक वितरणाचा सोहळा, प्रेक्षकांमध्ये लहरणारा तिरंगा आणि पार्श्वभूमीवर वाजणारं आपलं राष्ट्रगीत. तो माहोलच वेगळा होता. एकाही भारतीयाचे, पत्रकारांसह, डोळे कोरडे नव्हते तेव्हा.

 

- शारदा उग्रा, बंगळुरू
sharda.ugra@espn.com

बातम्या आणखी आहेत...