आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अळूवडी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्षानुवर्षे चिखलात दाटीदाटीने
आपल्या जांभळ्या देठांवर
दिमाखाने मोठाली हिरवी पाने सांभाळत
घालवलेले दिवस,
आणि मग अचानक गठ्ठ्यात बांधून
कुणा एकीच्या घरी येऊन पडणे.
मग एखाद्या लहान बाळाला अंघोळ घातल्यासारखे
पाण्याने स्वच्छ करणे, अलगद पुसणे.
मग इतक्या कोमल त्वचेला साबू कशाला,
म्हणून डाळीचं पीठ लावणे;
फरक एवढाच की, वयात आलेल्या पानांना
जरा चटकदार डाळीचे पीठ
बनवून लावणे,
आणि मग एकावर एक ठेवून,
गुंडाळी करून,
वाफेतला अगदी अंतिम सौंदर्य उपचार.
मग वड्या कापणे आणि तळणे.
होतं काय की, माणसांसारखं वनस्पती जगतातसुद्धा
भावना असतात, अहंकार असतात,
आणि कुठेतरी डाळीचं पीठ दुखावलं जातं.
नेहमी दर्शनी भागात दिसणाऱ्या पिठाला
पानात गुंडाळून पडणं सहन होत नाही,
आणि मग कर्मधर्मसंयोगाने
कुणाला तरी
अळूची पाने बारीक कापायची कल्पना सुचते;
ती डाळीच्या पिठात घालून,
मीठ, मिरच्या व चविष्ट मसाले घालून,
त्याचा गोळा बनतो.
मागच्या सारखे वाफवण्याचे प्रकार,
पण ताटलीत थापून.
मग वड्या पाडणे आणि तशाच किंवा
तळून वाढणे.
मनुष्यजातीतसुद्धा हा
मीपणा असतो, अहंकार असतात,
मग पुरुष असो वा स्त्री.
कुणा एकाला नेहमी उच्चपदस्थ वाटणे
जरूर नसते.
प्रत्येकाचा सोनियाचा दिवस येतो
आणि त्या त्या दिवशी त्याचे कौतुक होते.
कधी अशा वड्या
कधी बेसनाला बरे वाटावे म्हणून तशा वड्या.
स्वयंपाकातून आपण किती सिद्धांत मांडू शकतो ना!


- सुरंगा दाते, मुंबई
suranga.date@gmail.com

बातम्या आणखी आहेत...