आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडापाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेकदा आपण काय खातो आणि कसं खातो यामागे समाजाच्या उत्क्रांतीचा संक्षिप्त इतिहास दिसतो .

 

बटाटेवड्यांचा सोनेरी काळ.
गरम कढईतून जोडीजोडीने प्लेटीत,
सोबत हिरवीगार फटाकडी चटणी;
वाफेच्या धूसर वातावरणात खाल्लेला पहिला घास,
कौतुकाने डोळ्यात पाणी.
कधी कधी
रेल्वे स्टेशनवर एका खांबाशी टोपलीत बसलेले वडे,
आगगाडी थांबताच प्रवासशांची गर्दी,
आणि सह्याद्रीच्या हिरव्या पानांमध्ये बसून
लाल चटणीशी गुजगोष्टी करत
खाणाऱ्यांचे कौतुकाचे शब्द ऐकत
वड्यांनी घाटातून केलेला प्रवास.
समाजात सर्व लहान मोठ्या प्रकारांना
स्वतःचे असे अस्तित्व आणि महत्त्व होते,
आणि आदर तर होताच.
आजकाल समाजात,
जो मोठा तो नेता;
बरेचसे पोकळ विचार
घनतेचा अभाव,
नियम त्यांच्यासाठी नसतातच,
आणि ते म्हणतील ते होणार, हि परिस्थिती.
तरीच सुंदर, स्वादिष्ट खमंग बटाटेवड्यांच्या
आयुष्यात आता बॉस पावाचा शिरकाव;
केवळ आपल्या आकार आणि शक्तीच्या जोरावर
बटाटेवड्यांना कवटाळून ठेवणे,
स्वतःलाच चटणीने माखणे
आणि स्वतःच्या घासावर नाचवणे;
अगदी उपरोक्त स्टेशनवरचे वडेसुद्धा
या पाव आक्रमणाने ग्रासलेत.
आणि म्हणूनच,
फोटोला उभे राहताना
सगळे पाव आधी भाव मारत
लीडरगिरी करत पुढे,
आणि हे चविष्ट, खमंग,
पण परिस्थितीपुढे नमतं घेतलेले
प्रामाणिक वडे नागरिक मागे.
हो,
आजकाल वड्यांना आपला आधार दाखवत
काही धैर्यवान धीट मिरच्या,
आपले बेसन दाखवत
त्यांच्याही मागे उभ्या असतात.
काय करायचं? 
लोकशाही आहे.
समाजात आणि वड्यांच्या आयुष्यात
हे सर्व चालणारच.

 

- सुरंगा दाते, मुंबई
suranga.date@gmail.com

बातम्या आणखी आहेत...