आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्‍वर्गभूमीचा स्‍मशानदाह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनिष्ट प्रवृत्तींशी लढताना ‘गळून पडलेल्या कोरड्या पानांचे’ अस्वस्थ आत्मवृत्त निघत साहिबा तिची कविता सांगते आहे. हा पानांचा ढिगारा तिच्या कवितेतून आपल्या वर्तमानाचे उत्खनन करीत एका स्वर्गीय भूभागाचा राक्षसी चेहरा आपल्यासमोर उभा करतो आहे. या कवितेत पुरुषी मनोवृत्तीने घरात आणि घराबाहेर कुस्करलेल्या कैक नाजूक कळ्यांचे आत्मनिवेदन आहे.


तिला कविता लिहायच्या आहेत. एकेकाळच्या पृथ्वीवरील नंदनवनाविषयी. त्याला उद्ध्वस्त करू पाहणाऱ्या हिंसक आणि विद्वेषी प्रवृत्तींविषयी. तिला बोलायचंय… बंदूक आणि बॉम्बगोळ्यांविषयी. त्यातून धुरकट झालेल्या हिंसाप्रवण भागातील ‘इन्सानियत’ विषयी. तिला मुक्तपणे बोलायचंय. तिच्याकडे सांगण्यासारखं खूप काही आहे. स्वतःविषयी, समाजाविषयी आणि तिच्या समकालाविषयीही. पण ती जिथे राहते, त्या समाजाला हे मुळीच मान्य नाही. तिच्यासाठीची कामे त्यांनी आधीच ठरवलेली आहेत. घर, मुलं, चूल आणि अजूनही... अशीच कितीतरी. पण तिचे सांगणे किंवा लिहिणे मात्र नेमकेपणाने वगळून. तिची कविता समाज आनंदाने स्वीकारायला तयार नाही. पण तरीही कवी म्हणून तिला तिचा अवकाश समजतोय. या व्यवस्थेने लिहिण्यासाठीचा निर्माण केलेला दुजाभाव, ती ठामपणे नाकारतेय. लिहिण्यासाठीची विशिष्ट अशा वर्गाची निर्माण झालेली मक्तेदारी ती कविता लिहूनच मोडून काढतेय. तिची मातृभाषा असलेली काश्मिरी असेल किंवा उर्दू वा इंग्रजी, जमेल त्या भाषेत तिची कविता तिचं म्हणणं मांडते आहे. इथल्या पुरुषसत्ताक व्यवस्थेला आव्हान देते आहे. तिने आत्मविश्वासाने लिहिलेली कविता तिच्यासहित तिच्या समकालाचा हळूहळू आवाज बनतेय. अभ्यासक तिची तुलना काश्मिरी भाषेतील चौदाव्या शतकातील बंडखोर संत कवियत्री लल्लनेश्वरी यांच्याशी करताहेत. कवितेला श्वास मानणारी ही काश्मीरच्या खोऱ्यातील महत्त्वाची कवयित्री, अर्थात ‘निघत साहिबा’ होय.  


इतिहासामध्ये पदव्युत्तर शिक्षण झालेली ही कवयित्री एका शासकीय शाळेत सध्या शिक्षिका आहे. ती काश्मीरच्या अनंतनाग या एकेकाळी हिंसक असलेल्या व त्याच संघर्षातून राख झालेल्या प्रदेशातून येते. समजण्याच्या काळापासूनच युद्धग्रस्त भागातील ताणतणाव तिच्या जगण्याचा भाग असल्याकारणाने या हिंसेचा सामान्य माणसाच्या जगण्यावर होणारा  परिणाम तिच्या कवितेत ठळकपणे दिसून येतो. या काळात बेपत्ता झालेल्या, मारले गेलेल्या किंवा प्रियजनांपासून दूर स्थलांतरित झालेल्या मानवी समूहाचा आक्रोश या कवितेत आहे. ही कवयित्री संवेदनशीलतेनेते हजारो अनाम जीव कोठे गेले आहेत, ‘तिम कोत गयी’ असा प्रश्न कवितेतून विचारते आहे. या हिंस्र षड््यंत्रामागे कोण आहे, हे तिची कविता तपासू पाहते आहे. यातील सत्तेच्या विखारी खेळ्या ती नोंदवते आहे. यातून फक्त सामान्य माणूसच कसा बळी जातो आहे, हे स्पष्टपणे सांगते आहे. गोळीने छिन्नविच्छिन्न झालेल्या लहानग्याचा देह आता शांतपणे आपल्या आईच्या थडग्याशेजारी पडला आहे. या रक्तरंजित युद्धभूमीवर तेव्हढीच काय ती सुरक्षा आणि सहवास असे ती कवितेतून सांगते आहे. एकंदरीत वर्तमानाच्या भेसूर कहाण्या आणि अश्रापितांचे रक्तविव्हळ हुंदके तिच्या कवितेतून उमटताहेत. 


सुरुवातीच्या काळात, लिहिलेली कविता कोणाला दाखवण्याचे धाडस तिला कधी झाले नाही. त्यात ती अशा कुटुंबातून येते की जिथे कविता लिहिण्याचे कसलेच कौतुक नव्हते. उलट कविता लिहिते म्हणून तिच्या अडचणीच वाढण्याची शक्यता अधिक होती. तिने हळूहळू फेसबुकचा वापर कवितेसाठी करायला सुरुवात केला. तिची कविता समाजमाध्यमातून लोकांपर्यंत पोहचू लागली. पण समाजात लिंगभेद पुरेपूर भरून उरला आहे. कवयित्री सांगते, की हा भेद घरापासून सुरू होतो. मग हळूहळू समाजातील प्रत्येक घटकामध्ये डोकावू लागतो. तो तुमचे कर्तृत्व नाकारतो. तुम्हाला निकालात काढतो. एकदा जाहीर कार्यक्रमातच तिला तुझ्या कविता तुला कोण लिहून देते का, असा खोडसाळ प्रश्न विचारला जातो तेव्हा ती अशा वेळी निश्चितच व्यथित होते. पण यामागील लिंगभेदाचे राजकारण  ती  आता समजून घेते आहे. थोडक्यात काय तर स्त्रीला काडीचेही महत्त्व न देणारी, किंवा तिच्या वैयक्तिक आयुष्यात तिचे काही म्हणणे आहे हेसुद्धा मान्य न करणारी  ही पुरुषसत्ताक व्यवस्था अशाच प्रकारे संभ्रम निर्माण करू शकते, एका कवयित्रीचे सामाजिक आणि राजकीय व्यवस्थेवरचे तिचे म्हणणे इथला समाज सहजतेने स्वीकारायला तयार होत नाही.  तेव्हा निघत साहिबाच्या कवितेसोबत आपणाला समकाळातील काश्मिरी समाजाच्या मनोवृत्तीचाही विचार करावा लागतो. या सामाजिक, धार्मिक वर्चस्वाला नाकारत कळीचे प्रश्न कवितेतून विचारणारी निघत साहिबा आणि तिची कविता म्हणूनच या काळात महत्त्वाची ठरते. ती सांगते की, या प्रदूषित वातावरणात कवयित्री म्हणून माझ्याकडे दोनच पर्याय उरतात. आपले म्हणणे गुंडाळून हळूहळू नष्ट होऊन जाणे किंवा या व्यवस्थेला नाकारून आपले विचार जोरकसपणे मांडत राहणे. अर्थातच तिने दुसरा पर्याय स्वीकारलेला आहे. काश्मीरसारख्या संकुचित समाजात आपल्यासाठी कोणीच लढणार नाही याची तिला जाणीव आहे. आपला लढा आपल्यालाच लढावा लागेल असे सांगताना या निर्णायक युद्धात कविता तिच्या सोबत आहे, असेही ती आत्मविश्वासाने सांगते. 


मुळातूनच काश्मिरी साहित्य हे बंडखोर साहित्य आहे. याला तशी बरीच कारणे आहेत. सीमाप्रश्न आणि धार्मिक अस्मितेच्या मुद्द्यांवर हा प्रदेश नेहमीच अस्वस्थ राहिलेला आहे. दहशतवादी, विघटनवादी आणि दोन्ही देशांकडून होणाऱ्या सैनिकी कारवाया यातून इथले जीवन बहुधा विस्कळीत असते. सामान्य माणसाच्या जगण्यावर अशा अनेक घटनांचे पडसाद उमटत असतात. त्यातूनच त्यांच्या मनोविचारांची निर्मिती होत असते. पण अशा संवेदनशील विषयांवर लेखकांना मात्र मुक्तपणे व्यक्त होऊ दिले जात नसते. अनेक बंधने लादली जातात. एखाद्या कवितेपासून ते तुम्ही समाजमाध्यमांवर लिहिलेल्या साध्या पोस्टपर्यंत कोणतेही कारण तुम्हाला तुमचा प्राण गमावण्यासाठी पुरेसा असतो. अशा वेळी अभिव्यक्तीसाठीचे सारे धोके स्वीकारून साहित्यिक आपले म्हणणे मांडत राहतात. काश्मिरी भाषेत याची मोठी परंपरा आहे. शेख उल आलम ते हब्बा खातून, समद मीर ते रसूल मिल असे कितीतरी साहित्यिक मिळतील ज्यांच्या साहित्याने सामान्य माणसाच्या व्यथा-वेदनेला आवाज दिला. प्रस्थापित व्यवस्थेला आव्हान दिले. अलीकडच्या काळात अब्दुल रशीद किंवा बंडखोर कवयित्री रुझ्म हिच्या कविता तिथल्या जगण्यातील दाह आणि दहशत धाडसाने देशासमोर मांडत आहेत.  त्यातूनच पेनसिल्व्हिया विद्यापीठात प्राध्यापक असलेले सुवीर कौर यांचे अलीकडेच प्रकाशित झालेले काश्मिरी कवितांसंबंधीचे ‘गार्डन्स अँड ग्रेव्ह’ हे पुस्तक नक्कीच वाचायला हवे. निघत साहिबाच्या कवितेचा सूर या पूर्वसुरींच्या कथनाशी मिळताजुळता आहे. तिच्या कवितेसोबतच तिने लिहिलेली आत्मचरित्रात्मक कादंबरी सुद्धा प्रकाशनाच्या वाट्यावर आहे. एका कवितेत ती सांगते की - ‘मेरे दर्द कि या खुदा वोह दवा दे / कि हमदर्द मुझको जहाँ का बना दे’.  दुःख आणि वेदनेच्या छायेत जगणाऱ्या या खोऱ्यात ती साहित्याकडे मात्र आश्वासक नजरेने पाहते आहे हे समजून येते. 


‘झर्द पनेक ढेर’ हा काश्मिरी भाषेतून प्रकाशित झालेला तिचा पहिला कवितासंग्रह. या संग्रहातील बहुतांश कविता समाजातील अनिष्ट चालीरीतींशी झगडताना दिसताहेत. शिशिर ऋतूच्या आगमनात जसे एकेक पान गळावया होते, अगदी असेच परिस्थितीच्या रेट्यातून गळालेल्या कोरड्या पानांच्या ढिगाऱ्यांचा तळ ती कवितेतून ढवळते आहे. त्या कवितांमधून येणाऱ्या प्रतिमा आणि संदर्भ काश्मिरी समाजाचे अंतरंग उलगडण्यास निश्चितच पुरेशा आहेत. त्याचे दंश तिला कवी म्हणून अधिक विव्हळ करताहेत. मग या जीवघेण्या शारीरिक आणि मानसिक दास्यातून सुटका करण्यासाठीचा एकमेव भरवशाचा उपाय म्हणून ‘बाचवेम मौत’ म्हणजे मृत्यू वाटतो यातच खूप काही सामावलेले आहे. तरीही ती कवी म्हणून लिहिण्यासाठीची जोखीम पत्करून भोंदू संस्कृतिरक्षकांचे मुखवटे धाडसाने फाडते आहे. बाई कविता लिहूच कशी शकते असं मानणाऱ्या समाजाला कवितेतूनच फैलावर घेते आहे. तिची कविता ही बंडखोर आहे. लढवय्या आहे. पूर्वापार इथल्या व्यवस्थेला आपले वर्चस्व मिरवण्यासाठी अथवा मालकी दाखवून देण्यासाठी वा दहशतीसाठी एखादा कायमस्वरूपीचा बळी हवा असतो. काश्मीरमधील अनेक छोट्या-मोठ्या भांडणांपासून पासून ते थेट सशस्त्र संघर्षांपर्यंत स्त्री कायमस्वरूपीचा बळी ठरत आलेली आहे. ते तिच्या अनेक कवितांतून समजून येते. यासाठी तिची ‘बाह छास हब्बा खातून’ ही कविता वाचायलाच हवी. जबरदस्तीने किंवा सक्तीने त्याग करण्याची जबाबदारी फक्त स्त्रियांवर लादणारी ही सामाजिक व्यवस्था तिची कविता मोडीत काढते आहे. 


एकंदरीतच अस्तित्वहीन करणाऱ्या कैक प्रवृत्तींशी लढताना ‘गळून पडलेल्या कोरड्या पानांचे’ अस्वस्थ आत्मवृत्त तिची कविता सांगते आहे. हा पानांचा ढिगारा तिच्या कवितेतून आपल्या वर्तमानाचे उत्खनन करीत एका स्वर्गीय भूभागाचा राक्षसी चेहरा आपल्यासमोर उभा करतो आहे. या कवितेत पुरुषी मनोवृत्तीने घरात आणि घराबाहेर कुस्करलेल्या कैक नाजूक कळ्यांचे आत्मनिवेदन आहे. एका स्वर्गभूमीचे स्मशानात रूपांतर होताना स्वप्नांची झालेली अपरिमित हानी ही कवयित्री दाखवून देते आहे.  ‘झर्द पनेक ढेर’  च्या माध्यमातून कवयित्रीने स्वर्गभूमीचा स्मशानदाह वाचकांसमोर मांडलेला आहे. दहशतीच्या कोंदट सावलीत मोठ्या धैर्याने निघत साहिबा या सर्जनशील कवयित्रीने दाखवलेला शापित समकाल आपणाला निश्चितच दुर्लक्षित करता येणार नाही. 


- सुशीलकुमार शिंदे 
shinde.sushilkumar10@gmail.com 
लेखकाचा संपर्क : ९६१९०५२०८३ 

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटो... 

 

बातम्या आणखी आहेत...