आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भिडस्त ते खंबीर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भिडस्त व्यक्ती दयाळू, प्रेमळ असतात. खरं तर सद्गुणी माणूस म्हणून आवश्यक असणारं सारं काही त्यांच्यात असतं. नसते ती स्वअस्तित्वाची जाणीव. म्हणूनच त्यांना अशा जीवनशैलीमधून बाहेर काढून स्वत:करिता जगण्यासाठी तयार करायला हवं. आपल्या दोषांवर अधिक जोर न देता आपल्यातली गुणैवशिष्ट्ये अगदी सहजपणे सांगायला त्यांना प्रवृत्त करायला हवं. 


अप्पासाहेबांना कोणी फोन केला किंवा फोन त्यांनी उचलला तर ते फक्त कोण बोलतंय एवढं बोलून लगेच तो फोन त्यांच्या बायकोकडे म्हणजे सुधाकडे देत. समोरच्याला जे काही बोलायचंय, विचारायचं असेल ते सारं सुधा वहिनीच सांगतात. घरातली एखादी वस्तू कितीला घेतली, दवाखान्याचा किती खर्च आला, याबद्दल विचारलं तर ते ‘अगं सुधा... सगळ्या प्रश्नांची उत्तरं हिला माहीत,’ असं म्हणतात. अगदी हॉटेलचं बिल, क्रेडिट कार्डाचा वापर, असं सारं काही त्यांनी सुधा वहिनींवर सोपवून टाकलंय. त्यांच्या अशा वागण्याचं आश्चर्य वाटतं. असंही ऐकायला मिळतं की, अप्पासाहेबांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सुधा वहिनी आहेत. जणू काही अप्पांचं वकीलपत्रच त्यांनी घेतलंय. विविध व्यक्तिमत्त्वांमधला आणखी नमुना म्हणजे भिडस्त व्यक्तिमत्त्व किंवा सबमिसिव्ह पर्सनॅलिटी.


ऑफिसात अधिकाऱ्यांमध्ये बोलणं सुरू होतं की, हे वेळखाऊ आणि कंटाळवाणं काम कुणाकडे द्यावं? कारण हे काम ज्याला दिलं जाईल तो शंभर टक्के प्रश्न विचारेल, मलाच का, म्हणून कटकट करेल. तेवढ्यात सुपरवायझर निकम म्हणाले, "अगदी सोप्पं आहे. गिरासे मॅडमना द्या हे काम. त्या काही विचारणार नाहीत, काही बोलणार नाहीत. रायते साहेबांनी काम दिलंय म्हणजे कोणतीही शंका न घेता ते करायचं एवढंच त्यांना माहीत आहे.’ आणि ते सगळे हसायला लागले. पण पाठक साहेब मात्र म्हणाले, "अहो, त्या भिडस्त आहेत म्हणून त्यांचा  गैरफायदा घेणं, त्यांची चेष्टा करणं योग्य नाही.’


अप्पासाहेब, गिरासे मॅडम यांच्यासारखी संकोची, भिडस्त आणि सोशिक व्यक्तिमत्त्वं आपल्याला अधूनमधून भेटत असतात. त्यांच्या वागण्याची आपल्याला कधी दयाही येते. ही मंडळी सहन करतात. कुणाला त्रास देणं यांना पटत नाही. जमत नाही. घरात अशा भिडस्त व्यक्तींवर कामं ढकलली वा लादली जातात. आणि अशा व्यक्ती ती कामं निमूटपणे करतात. त्यामुळे अशा व्यक्तींसमोर लबाड, ढोंगी लोक मुद्दाम आपण अडचणीत असल्याचं नाटक करतात. मग भिडस्त माणसाला लगेच दया येते. अतिसंवेदनशील असल्यानं दुसऱ्याला मदत करण्यासाठी ते स्वत:च्या गरजा बाजूला ठेवून कामाचा डोंगर उपसत राहतात. काही वेळेला ज्या गोष्टी त्यांच्या मनाला पटत नाहीत त्याही भिडस्तपणे करत राहतात. सहानुभूती वाटल्यानं आणि मदत करण्यानं त्या स्वत:चा विचार क्वचित करतात. 


भिडस्त व्यक्ती स्वत:हून आपल्या आयुष्याचे सारे अधिकार दुसऱ्यावर सोपवून देते. अनेकदा त्यांची वृत्ती नोकरीच्या दृष्टीने अनुरूप असते.  वरिष्ठांकडून आदेश घेणं, त्यांनी ठरवून दिलेल्या पद्धतीप्रमाणे काम करत राहिलं की, त्यांचं डोकं शांत राहतं. भिडस्त स्वभाव निरोगी वातावरणासाठी उपयोगात येत असेल तर चांगलेच, परंतु हा स्वभाव  स्वार्थासाठी, ताकदीच्या प्रदर्शनासाठी उपयोगात आणला जात असेल तर वातावरण गढूळ होतं. 


अशा नमतं घेणाऱ्या व्यक्तीही असतात ज्या दुसऱ्यावर आंधळा विश्वास टाकतात. या विश्वासामुळे दुसऱ्यांचं म्हणणं ऐकून त्यांच्या आज्ञांचं पालन करणं ते सहज करतात. प्रेम किंवा लग्नाच्या नात्यातसुद्धा एक जण दुसऱ्याच्या ताब्यात राहणं पसंत करतात. भांडणं नकोत, वाद नकोत, डोक्याला ताण नको म्हणून दुसऱ्यांचं ऐकणं असा प्रकार भिडस्त व्यक्तींबाबत दिसतो. समाजानं ठरवून दिल्याप्रमाणे वागणं त्यांना योग्य वाटतं. वर्तन आदर्श असलं पाहिजे याची काळजी घेतात. आपल्याला काय करायचंय, आपलं ध्येय काय याकडे दुर्लक्ष करतात.


त्याग करणं, सोसत राहणं यामुळे लोक आपल्याला चांगलं म्हणतील म्हणूनही त्यांचं मन असं भिडस्तपणे वागायला तयार असतं. कोणी त्यांच्याबद्दल वाईट बोललं, टीका केली, ते अपेक्षित दर्जाचं काम करू शकले नाहीत असं म्हटलं, तर ते सहन करू शकत नाहीत. असं काही ऐकण्यापेक्षा दुसऱ्याला जे आवडतं जे पटतं तसेच ते वागतात. 
ते स्वत:ला दुसऱ्यावर सोपवतात, कारण मग त्यांना कसलीही भीती राहत नाही. आपण स्वत:ची अशी काही बाजू मांडायची असते, स्वत:साठीही काही विचार करायचा असतो हे त्यांना कळत नाही. नियमांचं पालन करायचं, दुसऱ्यांचा आदर करायचा हे त्यांना पटतं. शाळेत अशी मुलं गुणी मुलं म्हणून नावाजली जातात, मात्र त्यांचं स्वत्व दाबून टाकलं जातं याकडे मोठ्यांचं दुर्लक्ष होतं. दुसऱ्याच्या हाताखाली काम करत राहिल्यानं त्यांची विचारप्रक्रिया सुरू होत नाही. ती सुरू करण्यासाठी आपण त्यांची मदत करणं अपेक्षित आहे. मात्र, लोकांमध्ये बहुधा शोषण करण्याची वृत्तीच दिसून येते. अशा भिडस्त व्यक्तींचा कॉलेजमध्ये छळ केला जातो, तसंच कामाच्या ठिकाणीही होतं. म्हणूनच त्यांना त्यांच्यातील दोष सांगण्यापेक्षा यांच्यामध्ये कोणती गुणवैशिष्ट्यं आहेत याच्याशी परिचय करून देता येईल. काय करू नये याऐवजी काय करता येईल, याची जाणीव करून देता येईल. 


भिडस्त व्यक्ती दयाळू, प्रेमळ असतात. खरं तर सद्गुणी माणूस म्हणून आवश्यक असणारं सारं काही त्यांच्यात असतं. नसते ती स्वअस्तित्वाची जाणीव. म्हणूनच त्यांना अशा जीवनशैलीमधून बाहेर काढून स्वत:करता जगण्यासाठी तयार करायला हवं. तुम्हाला जी भीती वाटतेय ती तुम्ही स्वत:च स्वत:मध्ये तयार केली आहे. अशा व्यक्तींना सांगायला हवं की, चांगलं वागणं म्हणजे लोकांचा विश्वास संपादन करणं असतं. म्हणून त्यांच्या मनात स्वत:विषयी आदर निर्माण करणं आवश्यक आहे. तुमचा शब्दही महत्त्वाचा आहे. त्यासाठी कठोर होण्यापेक्षा समजून घेणं या पद्धतीनं काम करता येईल, हे पटवून द्यायला हवं. उच्च दर्जाची स्वप्रतिष्ठा, स्वजाणीव, विश्वास, अपार कष्ट, स्वत:च्या मर्यादा सांभाळणे, मनाची शांतता अशा गुणांनी युक्त असणाऱ्या या भिडस्त व्यक्तींच्या मनातील चीड नाहीशी करून त्यांना स्वत:साठी जगायला शिकवलं, तशी संधी दिली तर त्यांच्याइतकं यशस्वी कुणी होऊ शकत नाही. 


चांगलं काम कुणी करू शकत नाही. त्यांना भिडस्तपणा सोडून खंबीर व्यक्ती म्हणून होण्याकरिता सकारात्मक विचार देऊन स्वत:ची आणि दुसऱ्याची मते मांडणे, ऐकणे खूप मदत करते. आपल्या दोषांवर अधिक जोर न देता आपल्यातली गुणवैशिष्ट्ये अगदी सहजपणे सांगायला त्यांना प्रवृत्त करायला हवं. आपल्या विचार आणि मतांना महत्त्व देणं हे स्वत:चं व्यक्तिमत्त्व फुलवण्यासाठी आवश्यक आहे. शेवटी भिडस्त का तर लोकांना आवडावं, लोकांना आपण का आवडावं कारण त्यांनी आपल्याला नापसंत करणं आपल्याला आवडत नाही म्हणून. म्हणजेच आपण लोकांचा अतिविचार करतो. असं का, कारण आपली स्वत:विषयीची प्रतिष्ठा कमी पडतेय. आपल्याला स्वत:चा अभिमान वाटेल असं वागण्यासाठी हे दुष्टचक्र भेदलं तर भिडस्त व्यक्तिमत्त्वाकडून खंबीर व्यक्तिमत्त्वाकडे निश्चित वाटचाल करता येईल. 

 

- डॉ. स्वाती गानू, पुणे
ganooswati@gmail.com