आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेमाक्षरांचा श्रम!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अक्षरांचा श्रम केला । फळा आला तेणे तो।। अवघियाचा तळ धरी । जीवा उरी निरऊनी।।...तुकारामाला अपेक्षित अक्षरांचाच नव्हे तर प्रेम नामक अडीच अक्षरांचा श्रम केल्यानंतर फळाला आलेली डॉ. प्रदीप आवटे लिखित पुस्तकरूपातली ही गोष्ट आहे.  या गोष्टीतला अवकाश लेखकाने स्वत: निर्माण केलेला आहे. तो अवकाश नवनिर्मितीने, लोभसवाण्या प्रेमछटांनी भारलेला आहे...  
 
उत्सव आणि उथळपणा. एक घटना, दुसरी आहे, ती स्वभावजन्य कृती. वर्तमानाच्या संदर्भात, उत्सव आणि उथळपणात परस्परसंबंध आहे का? विशेषत: ‘प्रेम’ या शाश्वत भावनेला मूर्त रूप देताना? म्हणजे उत्सवातून उथळपणा जन्माला येतो किंवा उथळपणातून उत्सव आकारास येत जातात, आणि विनाकारण प्रेम बदनाम होत राहतं, असं काही? खरं म्हणजे, ते उत्सवी उथळपणामुळे बदनामही होत राहातं आणि एकपदरीही होत जातं. त्यामुळे प्रेम म्हणजे, दोन तरुण वयातल्या मुला-मुलींना असलेलं निव्वळ शरीरी आकर्षण, एकमेकांना दिल्या- घेतलेल्या आणाभाका, चंद्रतारे तोडून आणण्याची दिलेली आश्वासन एवढाच त्याचा अर्थ घेतला जातो, रूढही होतो. मग समाजाचे ठेकेदार त्या एकपदरी प्रेमाचा पराभव करण्यासाठी आपली सारी शक्ती पणाला लावत राहातात, प्रेमाचा संकुचित अर्थ लावणारे नाठाळ मोकाट सुटतात. म्हणूनच ‘पोथी पढ पढ जग मुआ, पंडित भया न कोय, ढाई आखर प्रेम का, पढे सो पंडित होय’ अशा कानपिचक्या संत कबीराला  द्याव्या लागतात. ‘और भी दुख है जमाने में मुहब्बत के सिवा, राहते और भी है वस्ल (वासना) की राहत के सिवा’ असं शायर फैज अहमद फैज यांना प्रेमाची उथळ व्याख्या करणाऱ्यांना ध्यानात आणून द्यावं लागतं.  डॉ. प्रदीप आवटे यांनी हाच प्रयत्न अत्यंत तरलपणे ‘अडीच अक्षरांची गोष्ट’ नावाच्या नव्याकोऱ्या पुस्तकामधून केला आहे. दिव्य मराठी ‘रसिक’ पुरवणीत २०१६ मध्ये गाजलेल्या त्यांच्या सदराचे हे पुस्तक आहे. पुण्याच्या ‘वॉटरमार्क पब्लिकेशन्स’ने   फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात हे पुस्तक बाजारात आणण्याचे ठरवले आहे. समर्पणभाव, पश्चात्ताप, धैर्य, करुणा, निष्ठा, क्षमाशीलता या  लोभस छटांचं ललितरम्य लेखनशैलीत  दर्शन घडवत लेखक डॉ. आवटे यांनी‘प्रेम’ या भावनेला असलेली व्याप्ती आणि खोली यांची वाचकांना पुस्तकाद्वारे नव्याने जाणीव करून दिली आहे.  तर नावाजलेले लेखक-गीतकार आणि ‘चला हवा येऊ द्या’मधून जणू प्रत्येकाच्या भावना आणि विचारांना शब्दरुप देऊन हृदयस्पर्शी क्षण निर्माण करणारे  ‘पत्र’कार अरविंद जगताप यांची आशय-विषयाला समृद्ध करणारी प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे. गेल्या सात वर्षांच्या कालावधीत ‘दिव्य मराठी-रसिक’ पुरवणीत प्रकाशित सदरांचे विविध प्रकाशनसंस्थांच्या वतीने पुस्तक होण्याच्या मालिकेतले हे सहावे पुस्तक. यापूर्वी ३१ ऑगस्ट १९५२-साकेत प्रकाशन (प्रशांत पवार), खलनायक-परममित्र प्रकाशन (रघुवीर कुल), वात्स्यानाचे जग-विराम प्रकाशन (वैद्य विजय कुलकर्णी),भारतीय भाषा व साहित्य-साधना प्रकाशन (डॉ. सुनीलकुमार लवटे) बुकशेल्फ-साकेत प्रकाशन (अभिलाष खांडेकर) ही सदरलेखनावरील पुस्तके प्रकाशित झाली आहेत. 
 
पुस्तकाचे नाव : अडीच अक्षरांची गोष्ट 
लेखक : डॉ. प्रदीप आवटे 
प्रकाशक : वॉटरमार्क पब्लिकेशन्स, पुणे 
मूल्य : २०० रुपये.
 
- टीम रसिक 
divyamarathirasik@gmail.com
बातम्या आणखी आहेत...