आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुभवांनी समृध्‍द होतेय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुलगी शिकली प्रगती झाली, हे सरकारी घोषवाक्य. मुलगी शिकली की, घराची नि समाजाचीही प्रगती घडवण्यात तिचा मोठा वाटा असतो, असा याचा अर्थ. हा अर्थ वास्तवात आणणाऱ्या, शिक्षणाला स्वत:पुरत्या रोजगाराचं साधन न मानणाऱ्या, दिशा इंटरनॅशनल फाउंडेशनच्या माध्यमातून बचत गटातल्या महिलांसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची कवाडं उघडू पाहणाऱ्या नगमाशी मारलेल्या या गप्पा


कला शाखेतल्या शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अजूनही फारसा बदललेला नाही. करिअर करायचं ते वैद्यकीय, अभियांत्रिकी, कायदा, वाणिज्य अशा विद्याशाखांमध्ये ही धारणा कायम आहे. मुलींच्या बाबतीत तर शिक्षण-नोकरी-लग्न या जीवनक्रमासाठी कला शाखा सर्वोत्तम असंच बहुतांश समाज मानतो. जिथं सर्वसामान्य मुलींची ही कथा तिथं मुस्लिम समाजातली परिस्थिती आणखीनच कठीण. मुलींच्या शिक्षणाचा कमी टक्का आणि त्याला कट्टर धार्मिक, पारंपरिक विचारसरणीची जोड. परिणामी या समाजातल्या महिलांची परिस्थिती कासवगतीने बदलते आहे. नगमा झाकिर हुसेन शेख हिनं या पारंपरिक गृहितकांवर मात केलीय. कला शाखेत शिक्षण घेऊन करिअर, व्यक्तिमत्त्व विकास आणि आपल्या समाजातल्या मुलींसमोर एक वेगळं उदाहरण असा तिहेरी मिलाफ तिने साधलाय. अर्थार्जनाची अनोखी संधी तिने निर्माण केलीय, स्वत:साठी आणि बचत गटातल्या महिलांसाठीही.


नगमा मूळ औरंगाबादची. आईवडील वैद्यकीय व्यवसायात. शिक्षणाचा असा भक्कम वारसा घरातूनच लाभलेल्या नगमानं पदव्युत्तर शिक्षणासाठी कला शाखा निवडली. पुणे विद्यापीठातून एमए (आंतरराष्ट्रीय संबंध) पूर्ण केलं. त्यानंतर औरंगाबादलाच परत येऊन काही तरी करायचं तिच्या मनात होतं. त्याच दरम्यान, दिशा इंटरनॅशनल फाउंडेशनच्या किरण वैष्णव यांच्याशी नगमाची ओळख झाली. तिचं शिक्षण, विविध भाषांवरचं प्रभुत्व पाहून किरण यांनी ‘दिशा’ या निमशासकीय संस्थेत काम करण्याबद्दल नगमाला विचारणा केली. आईवडिलांच्या होकारानंतर नगमानं ‘दिशा’मध्ये काम स्वीकारलं. ‘दिशा’चं श्रीलंका, रशिया, फिलिपाइन्स, ग्रीस, स्पेन व युरोपातील काही देशांशी टायअप आहे. सांस्कृतिक देवाणघेवाण, युवा उद्योजकता, महिला स्वयंसहायता बचत गट, अभ्यासगट, कौशल्य प्रशिक्षण आणि विकास यांसारख्या विविध क्षेत्रात त्यांचं काम सुरू आहे. गेल्या दोन वर्षात नगमानं ‘दिशा’चे तीन मोठे प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण केले. सहकारी देशांसमवेत युवक रोजगारासंदर्भातला कौशल्य विकास, नोकरी व्यवसायासाठी देशाबाहेर जाणाऱ्यांकरिता, सोल्युशन्स ऑन इंटर कल्चरल डिफरन्सेस अॅट वर्क प्लेस हे त्यातले काही प्रमुख.


संस्थेच्या एका बैठकीदरम्यान बचत गटांना प्रोत्साहन देण्याबाबत चर्चा सुरू होती. त्या वेळी किरण यांनी बचत गटांच्या वस्तूंचं आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रदर्शन भरवावं असा मुद्दा मांडला. त्याला सहभागी देशांनी संमती दर्शवली. आणि भारतासंदर्भात हा प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी नगमानं स्वीकारली. त्यानंतर तिने औरंगाबादेतल्या विविध महिलांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यांच्या उत्पादनांबद्दल जाणून घेतलं. नगमाच्या या प्रयत्नांमुळेच आज औरंगाबादेतील बचत गटांच्या चार महिलांना आंतरराष्ट्रीय स्तरावरची संधी मिळते आहे. ग्रीसमध्ये होणाऱ्या सेल्फ हेल्प ग्रुपच्या प्रदर्शनात या महिला स्वत:ची उत्पादनं मांडणार आहेत. बिकट परिस्थितीतून उभं राहत इतर महिलांनाही रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या या महिलांसाठी ही स्वप्नातीतच गोष्ट आहे.


अवघ्या दोन वर्षांच्या काळात नगमानं केवळ प्रकल्प हाताळले असे नाही, या अनुभवामधून “मी समृद्ध होत गेले’ असं ती म्हणते. कला शाखेच्या शिक्षणानंतर नगमा इतरांसारखा सरधोपट मार्ग स्वीकारू शकली असती. पण प्रवासाची, वेगवेगळ्या भाषा शिकण्याची, विविध संस्कृतीच्या लोकांना भेटण्याची, समजून घेण्याची आवड तिला आहे. अर्थार्जनाचं साधन शोधताना या आवडीची सांगड तिने घातली. काही भारतीय भाषांसह, जर्मन, स्पॅनिश, स्वीडिश या भाषा ती जाणते. 


व्यावहारिक जगाचा अनुभव घेत घेत नगमानं स्वत:मध्ये अनेक सकारात्मक बदल अनुभवले. कामाच्या निमित्तानं परदेशवारी करणाऱ्या नगमाला, भारतीय स्त्रिया आणि परदेशस्थ स्त्रियांमध्ये काय महत्त्वाचा फरक जाणवतो हे जाणून घ्यायची उत्सुकता होती. नगमा म्हणते, भारतीय स्त्रिया खूप चाकोरीबद्ध विचार करतात. त्या खूप कष्टाळू, मेहनती, प्रामाणिक आहेत पण धोका पत्करायला तयार नसतात. आपण जोपर्यंत आव्हानं स्वीकारत नाही तोपर्यंत आपली झेप कुठपर्यंत आहे हे कळणार कसं, असा प्रतिप्रश्नच ती आपल्याला करते. ‘दिशा’च्या आंतरराष्ट्रीय बैठकांमध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय असतो. भारतातल्या मुलींनीही असं नजरेत भरण्यासारखं काम करावं, करिअर निवडताना व्यापक दृष्टी ठेवावी असं नगमाला वाटतं.


- वंदना धनेश्वर, औरंगाबाद
vandana.d@dbcorp.in

बातम्या आणखी आहेत...