आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलगी हवी हो?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या चौथ्या अहवालानुसार देशातल्या  ७९% महिला आणि ७८% पुरुषांनी त्यांच्या कुटुंबात एखादी मुलगी असली तरी चालेल, असे मत व्यक्त केले आहे. अनेक वृत्तपत्रांतून, वाहिन्यांवरून, सोशल मीडियावरून याचं कौतुक केलं गेलं. पण खरंच असं आहे...?


‘हि ला मुलगी होऊ देत, तिला मुलगी होऊ देत आणि तिलासुद्धा मुलगीच होऊ देत... मला मात्र मुलगाच हवा! कारण मुलगा म्हणजे वंशाचा दिवा...’एकेकाळी देशभर गाजलेल्या ‘मुलगी झाली हो’ या नाटकातला हा संवाद! 


दुर्दैवाने हा संवाद केवळ त्या नाटकापुरता मर्यादित नव्हता, तर तो अतिशयच वास्तववादी होता. घराघरात बोलले जाणारे हे शब्द निदान काही घरांमध्ये तरी बदलायला लागले असावेत, असे वाटायला लागले आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या चौथ्या अहवालानुसार आता आपल्या देशातल्या  ७९% महिला आणि ७८% पुरुषांनी त्यांच्या कुटुंबात एखादी मुलगी तरी हवीच असे मत व्यक्त केले आहे. अनेक वृत्तपत्रांतून आणि वाहिन्यांवर ही बातमी सांगितली जाते आहे. सोशल मीडियावरूनसुद्धा खूप कौतुकाने ही बातमी शेअर केली जाते आहे. म्हणजे आता आपल्या देशातला ‘मुलगाच हवा’चा हट्ट कमी झालाय असा अर्थ लावता येईल का? जर या अहवालाचा आपण तपशीलवार अभ्यास केला तर कदाचित आपण असा निष्कर्ष काढणार नाही!


सध्या ज्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या अहवालाची चर्चा सुरू आहे, तो अहवाल २०१५ -१६ मध्ये देशभरातून जी माहिती एकत्र करण्यात आली, त्यावर आधारित आहे. देशभरातील स्त्रिया आणि पुरुषांचे शारीरिक व मानसिक आरोग्य, तसेच वेगवेगळ्या आर्थिक गटातली कुटुंबांना असलेल्या सुविधा याविषयी इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन सायन्सेसकडून वेळोवेळी असे सर्वेक्षण केले जाते. याच संस्थेने २००६मध्ये राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाचा तिसरा अहवाल प्रकाशित केला होता. या दोन्ही अहवालांची तुलना करून पाहिली तर  कुटुंबात एखादी मुलगी चालेल असे म्हणणाऱ्या महिलांचे प्रमाण जवळजवळ ५ टक्क्यांनी वाढलेले दिसते आणि पुरुषांच्या प्रमाणात तर १३ टक्क्यांची घसघशीत वाढ झाली आहे. पण त्याच बरोबरीने ‘एक तरी मुलगा हवा’ म्हणणाऱ्या महिलांची आणि पुरुषांची टक्केवारीसुद्धा अगदी तेवढ्याच प्रमाणात वाढलेली आहे. शिवाय मुलग्यापेक्षा मुलीला पसंती देणाऱ्या महिला फक्त ३.५ टक्के आहेत आणि याच मुद्द्यावर ३.७ टक्के पुरुषांनीसुद्धा पसंती दाखवलेली आहे. पण मुलीपेक्षा मुलग्याला जास्त पसंती देणाऱ्या महिला मात्र १८.८ % आहेत आणि १९.२% पुरुषदेखील मुलग्यांनाच जास्त पसंती दाखवत आहेत. हे सगळे याच सर्वेक्षणात दिसलेले आहे. थोडक्यात, अजूनही मुलीपेक्षा मुलांना पसंती देणाऱ्या लोकांची संख्याच आपल्या देशात जास्त प्रमाणात आहे हेच या सर्वेक्षणात तरी दिसते आहे.  ‘मुलगा हवाच’चा हट्ट आणि मुली नकोशा असणे या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आपल्या देशातल्या स्त्रियांच्या दुय्यम अवस्थेसाठी हाच हट्ट मुख्यत: हानिकारक ठरलेला आहे. देशातले स्त्री-पुरुषांचे गुणोत्तर आणि लिंग निवडीसाठी केले जाणारे गर्भपात या सर्वांच्या मागेदेखील हीच विचारसरणी कारणीभूत आहे, असे अनेक अभ्यासांतून दिसून आलेले आहे. गर्भलिंग निवड करून केले जाणारे गर्भपात कमी व्हावेत यासाठी अनेक वर्षांपासून धोरणात्मक पातळीवर मोठ्या प्रमाणात भर दिला जातो आहे. पण हा ‘मुलगाच हवा’ चा हट्ट कोणत्या कारणांमुळे जनमानसात घट्ट रुजलेला आहे आणि जगल्या वाचलेल्या मुलींच्या आयुष्यावर त्याचे काय परिणाम होतात, याविषयी मात्र त्या मानाने कमी संशोधन झालेले आहे. 


इंटरनॅशनल सेंटर फोर रिसर्च आॅन विमेन या संस्थेसाठी रोहिणी पांडे यांनी केलेले संशोधन या संदर्भात महत्त्वाचे मानले जाते. २००६मध्ये केलेल्या संशोधनातून असे दिसून आले आहे की, बहुसंख्य लोकांना एक मुलगा आणि एक मुलगी असे संतुलित कुटुंब असावे, असे वाटते. सर्व प्रकारच्या आर्थिक परिस्थितीमधल्या कुटुंबांत अशीच मानसिकता असते, असे त्यांना आढळले. आपल्याला एक तरी मुलगा असायला हवा असे सर्वांनाच वाटते, पण एकही मुलगी नकोच असेही सरसकट सर्वांना वाटत नाही. जरी मुलीपेक्षा मुलांनाच जास्त पसंती दिली जात असली तरी जिथे एक किंवा दोन मुलगे असतील त्या कुटुंबात एखादी मुलगी चालते. जर पहिली मुलगी झालेली असेल तर दुसऱ्या गर्भधारणेच्या वेळी गर्भलिंग निवड करण्याकडे जास्त कल असतो, असे लॅन्सेटचा २०११ सालचा अभ्यास सांगतो. ज्या मुलींना दोन किंवा जास्त संख्येने मोठ्या बहिणी असतील त्या मुलींचे आरोग्य आणि पोषण यांच्याकडे दुर्लक्ष होते. दोन मुलींच्या पाठीवर जन्माला आलेल्या तिसऱ्या मुलीचे नावच ‘नकोशी’ ठेवले जाते. अशा मुलींचे नाव बदलण्याची मोहीम मध्यंतरी काही संस्थांनी सुरू केलेली होती. पण ‘नकोश्या’ मुलींचे नाव बदलून किंवा लिंग निवडीसाठी गर्भपात करण्यावर बंदी घालण्यामुळे समाजाची मुलींविषयी असलेली मानसिकता बदलेल का?


रोहिणी पांडे यांनी आपल्या संशोधनात असे सुचवले होते की, स्त्रियांच्या शिक्षणाची पातळी उंचावली तर मुलाला प्राधान्य देणे कमी होऊ शकते. २०१३ मध्ये संयुक्त राष्ट्र संस्थेने प्रकाशित केलेल्या अहवालातसुद्धा स्त्री-पुरुष समतेसाठी शिक्षण हा महत्त्वाचा उपाय सुचवला आहे. पण भारताच्या बाबतीत हे समीकरण लागू पडत नाही. गेल्या काही वर्षांत देशात स्त्रियांच्या शिक्षणाची पातळी वाढली असली तरी स्त्रीपुरुष गुणोत्तर सुधारलेले नाही. इंडियास्पेंड या संस्थेच्या २०१६च्या अहवालात म्हटले आहे की, स्त्रियांना अधिक शिक्षण मिळाल्याचा फायदा जरी कुटुंबाचा आकार मर्यादित ठेवण्यासाठी होत असला तरी मुलगा हवा असण्याच्या मानसिकतेवर त्याचा फारसा परिणाम होत नाही. नागरीकरण आणि स्त्रियांच्या शिक्षणाची वाढलेली पातळी या दोन्हींचा एकत्रित परिणाम म्हणून उलट स्त्रीपुरुष गुणोत्तरात स्त्रियांची संख्या घसरणीला लागलेली दिसते. सरकारने २०१४मध्ये प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या पासष्ट वर्षांत भारताचं दरडोई उत्पन्न दहापटीनं वाढलं.  तरी मुलींचा जन्मदर १००० मुलांच्या तुलनेत  ९४६वरून ८८७ इतका घसरलेला आहे. गेल्या काही वर्षांतली ही घसरगुंडी पाहिल्यावर सुरुवातीला उल्लेख केलेल्या आकडेवारीबद्दल किती आनंद मानायचा, हे तुमचं तुम्हालाच ठरवता येईल!


- वंदना खरे, मुंबई
vandanakhare2014@gmail.com

बातम्या आणखी आहेत...