आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Vandana Khare Writes About Rural urban Divide With Reference To Sanitary Napkins

मासिक पाळीचं अर्थकारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगात डिस्पोझेबल सॅनिटरी नॅपकिनचे १४.५ अब्ज डॉलर्सचे मार्केट आहे. सगळीकडून तयार सॅनिटरी नॅपकिनच्या महत्त्वाबद्दल आपल्यावर होणाऱ्या माऱ्याचे कारण या एवढ्या मोठ्या उलाढालीच्या आकड्यात तर दडलेले नसेल ना?


गेल्या काही महिन्यांपासून सॅनिटरी नॅपकिन्सबद्दल खूपच चर्चा होताना दिसते आहे. सुरुवात झाली होती, या तयार सॅनिटरी नॅपकिन्सवर लावलेल्या जीएसटीचा निषेध करण्यापासून. नंतर महाराष्ट्र सरकारने खेड्यातल्या महिला आणि मुलींसाठी स्वस्त दरात हे नॅपकिन देण्यासाठी तीन कोटी रुपये खर्चाची ‘अस्मिता’ योजना जाहीर केली. त्या पाठोपाठ मुंबई महापालिकेनेसुद्धा आपल्या ताज्या अर्थसंकल्पात १० कोटी रुपये खर्च करून शाळांमध्ये व्हेंडिंग मशीन्स आणि वापरलेले नॅपकिन नष्ट करण्याचे इन्सिनरेटरदेखील बसवण्याची घोषणा केली आहे. दिल्लीमध्येदेखील शाळेतल्या मुलींना सॅनिटरी नॅपकिन्सची पाकिटे मोफत देण्याची ‘किशोरी योजना’ येऊ घातलेली आहे. स्वस्त नॅपकिन्स तयार करण्यासाठी झटणाऱ्या माणसाच्या संघर्षावर आधारित पॅडमॅन हा चित्रपटसुद्धा गाजतो आहे. कित्येक दिवसांपासून या चित्रपटाच्या जाहिरातीसाठी विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. कधी नव्हे इतकं महत्त्व या विषयाला मिळत आहे! अनेक वृत्तपत्रे या विषयावर पाने भरभरून लेख आणि मुलाखती छापताहेत. त्या निमित्ताने खासगीतसुद्धा हलक्या आवाजात कुजबुजण्याचा विषय आता काही लोक तरी खुलेपणाने बोलायला लागले आहेत. या सगळ्या चर्चांचा फोकस तयार सॅनिटरी पॅडच्या वापरावरच केंद्रित झालेला दिसतो. पण  ही चर्चा आता मासिक पाळी दरम्यानचे आरोग्य या विषयापर्यंत कधी पोहोचेल ते मात्र माहीत नाही!   


तयार सॅनिटरी नॅपकिन हा ‘मासिक पाळीविषयीचे आरोग्य’ या संपूर्ण विषयातला फक्त एक मुद्दा आहे. सर्व महिलांना तयार सॅनिटरी नॅपकिन मिळाले की, मासिक पाळीसंबंधातील आरोग्य आपोआप सुधारेल, अशी जी गैरसमजूत सध्या पसरली आहे, ती फार घातक आहे. भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीशरीराबद्दल असलेली घृणा, त्यातून निर्माण झालेल्या गैरसमजुती, स्वत:च्या शरीराचे अवयव आणि त्यांचे काम याविषयीचे महिलांचे अज्ञान, भारतीय महिलांना असलेला अॅनिमिया, त्यांना स्वच्छतागृहे उपलब्ध नसणे, अशा अनेक गोष्टींशी मासिक पाळीदरम्यानच्या अनारोग्याचे प्रश्न जोडलेले असतात. नुसता तयार सॅनिटरी पॅड्सचा पुरवठा करून मासिक पाळीदरम्यानचे आरोग्य कसे सुधारेल?  


अनेकदा असे सांगितले जाते की, मासिक पाळीचे रक्त शोषले जावे यासाठी जर कापडाच्या घड्या वापरल्या तर जंतुसंसर्ग होतो. कारण ते कापड नीट वाळवलेले नसते, त्यात दमटपणा राहतो आणि बुरशीची वाढ होऊ शकते. यावर उपाय म्हणून तयार फेकून देण्याजोगी पॅड््स वापरायला पाहिजेत असे बहुतेक लोकांना वाटते. म्हणजे एकदा वापरले की फेकून देता येईल, धुणे आणि वाळवणे याची कटकट नको आणि संसर्गापासून मुक्ती! समजा अगदी सगळ्या महिलांना तयार सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध झाले तरी ते बदलण्यासाठी स्वच्छतागृहच नसतील तर बायका कित्येक तास ते तसेच अंगावर वागवत राहणार, त्यातून वेगेवेगळ्या प्रकारचे संसर्ग तर होतच राहणार! आपल्या देशात सध्या फक्त १७% महिला तयार सॅनिटरी नॅपकिन वापरतात, असे एका सरकारी आकडेवारीत म्हटलेले आहे. शिवाय खेड्यात तर हे प्रमाण अगदीच कमी आहे. म्हणून कदाचित खेड्यातल्या महिलांना स्वस्तात नॅपकिन उपलब्ध करून देण्याची योजना पुढे आणण्याचे सरकारने ठरवले असावे. ‘अस्मिता’ योजनेमध्ये खेड्यातल्या महिलांना २४ ते २९ रुपयांना आठ डिस्पोझेबल पॅड्सचे एक पाकीट मिळणार आहे आणि जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या मुलींना हेच पाकीट पाच रुपयांना मिळेल असे सांगितले जाते. मी सध्या मुंबई महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या मुलींना भेटत असते, त्या  शहरातल्या कष्टकरी वर्गातल्या मुली आहेत. त्यांना वाटते की, त्यांनासुद्धा अशा स्वस्त दरात पॅड्स मिळायला हवीत. पण आपल्या महिला आणि बालविकासमंत्री म्हणतात की, सर्वांना सबसिडी देण्याइतके पैसे राज्य सरकारकडे नाहीयेत! कदाचित याची भरपाई म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात सर्व शाळांमध्ये व्हेंडिंग मशीन बसवण्याची योजना जाहीर झाली असावी. कदाचित इतर शहरांमध्येही अशा योजना आणल्या जातील. या मशीनमध्ये ठरावीक पैसे टाकले की, त्यातून एक किंवा दोन पॅड्स मिळू शकतात. अनेक मुलींना शाळा सुरू असताना अचानक पाळी येते, अशा वेळी त्यांची गैरसोय होऊ नये, अशी यामागची कल्पना असावी. सध्या अनेक महापालिका शाळांत अशी मशीन्स बसवलेली आहेतच. पण बहुतेक ठिकाणी ती वापरली जात नाहीत, कारण एक तर ते मशीन कसे वापरायचे हे माहीत नसते, त्यात टाकायची विशिष्ट प्रकारची नाणी उपलब्ध नसतात किंवा एकदा त्यात भरलेले नॅपकिन वापरून झाले की त्यात पुन्हा भरलेच  गेलेले नसतात. यावर उपाय म्हणून या शाळांमध्ये असा आणीबाणीचा प्रसंग आला तर मुली शिक्षिकांना सांगतात आणि त्या शाळेत साठवलेली पॅड्स मुलींना देतात. म्हणजे महागड्या व्हेंडिंग मशीन्सला पर्याय आहे.  मुंबई महापालिकेने वापरलेले नॅपकिन नष्ट करण्याचे इन्सिनरेटरदेखील बसवण्याची घोषणा केली आहे. विजेवर चालणाऱ्या या इन्सिनरेटरमध्ये वापरलेले पॅड टाकले की, ते जाळून टाकले जाते. असे इन्सिनरेटर महाराष्ट्रातल्या कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयसारख्या निवासी शाळांमध्ये काही वर्षांपूर्वी लावले गेलेले होते. पण ही यंत्रे बंद पडलेल्या अवस्थेतच जास्त पाहायला मिळाली आहेत. मुंबईतल्या या नव्या ‘सुविधां’ची देखभाल कशी केली जाईल, हा माझ्यासाठी काळजीचा विषय आहे. शहरातल्या बायका अनेक वर्षांपासून असे तयार नॅपकिन वापरत आहेत, पण अजूनही त्यांची विल्हेवाट कशी लावायची त्याचा प्रश्न शहरातदेखील सुटलेला नाही. खेडोपाडी जेव्हा हे स्वस्त दरात मिळालेले नॅपकिन बहुसंख्य महिला वापरायला लागतील तेव्हा त्यांची विल्हेवाट कशी लावली जाणार आहे? की खेड्यातही असेच इन्सिनरेटर बसवले जाणार आहेत?  


तयार डिस्पोझेबल पॅड्स सर्वांना उपलब्ध करून देणे हा मासिक पाळीशी संबंधित समस्यांवरचा एकमेव उपाय नाही. या पॅड्सच्या वापरामुळे अॅलर्जीसारख्या समस्या उद््भवू शकतात. पॅड्स बनवण्यासाठी वापरले जाणारे घटक कर्करोगाला आमंत्रण देऊ शकतात. तसेच पर्यावरणालादेखील ती घातक असू शकतात. मग अशा एकदा वापरून फेकून देण्याच्या नॅपकिनऐवजी आपण धुऊन पुन्हा वापरण्याजोगे  नॅपकिन वापरण्याच्या पर्यायांचा विचार का करत नाही? मी कष्टकरी वर्गातल्या जितक्या मुलींना रीयूझेबल पॅडची माहिती दिली आणि त्यांचे मत विचारले तेव्हा सगळ्या मुलींनी अशी पॅड्स वापरायची इच्छा व्यक्त केली. धुऊन पुन्हा वापरण्याच्या पॅडचे फायदे असू शकतात पण ती पॅड उघडपणे वाळत घालण्याच्या प्रश्नाला मात्र आपल्याला हात घालायचा नाहीये! डिस्पोझेबल पॅडव्यतिरिक्त कपसारखे पर्यायसुद्धा असू शकतात. आपल्याला विविध पर्यायांमधून स्वत:साठी योग्य पर्याय निवडायची संधी असायला हवी. जगात डिस्पोझेबल नॅपकिनचे १४.५ अब्ज डॉलर्सचे मार्केट आहे. सगळीकडून तयार सॅनिटरी नॅपकिनच्या महत्त्वाबद्द्ल आपल्यावर होणाऱ्या माऱ्याचे कारण या एवढ्या मोठ्या उलाढालीच्या आकड्यात तर दडलेले नसेल ना? बायांनो, आपल्या मासिक पाळीच्या मागे बरंच मोठं अर्थकारण असू शकतं, लक्षात येतंय ना?


-  वंदना खरे, मुंबई 
vandanakhare2014@gmail.com 

बातम्या आणखी आहेत...