आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • A.R. Rehman Music Conservative Offere Music Syllabus

ए. आर. रेहमान म्युझिक कन्झर्व्हेटरीतर्फे संगीत अभ्यासक्रम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

12 वी इयत्ता उत्तीर्ण झालेल्या आणि संगीत क्षेत्रात करिअर करण्यासाठी उत्सुक असलेल्यांसाठी विख्यात संगीतकार ए. आर. रेहमान यांच्या केएम म्युझिक कन्झर्व्हेटरिया या संस्थेतर्फे पदवी अभ्यासक्रम शिकवले जातात.
या संगीत अकादमीमध्ये फाउंडेशन सर्टिफिकेट प्रोग्राम (1 वर्ष) आणि डिप्लोमा प्रोग्राम (2 वर्षे) हे दोन पूर्ण वेळ अभ्यासक्रम उपलब्ध असून त्यासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. या अभ्यासक्रमांच्या मदतीने विद्यार्थ्यांना अध्यापन,पार्श्वगायन,ध्वनी तंत्रज्ञ,स्टुडिओ इंजिनिअर, जिंगल आणि फिल्म कंपोझर इत्यादी क्षेत्रांमधील करिअरची निवड करता येणार आहे.


निवड प्रक्रिया
विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडीनुसार संबंधित अभ्यासक्रमासाठी प्रवेश अर्ज दाखल केल्यानंतर केवळ ऑडिशनच्या माध्यमातूनच त्यांची निवड केली जाईल. यासाठी प्रवेश अर्ज ऑनलाइन उपलब्ध असतील किंवा विद्यार्थ्यांच्या पत्त्यावर कुरियरनेही (शुल्क रु. 1100/-) पाठवले जातील.ज्या विद्यार्थ्यांना मुद्रित माहितीपत्रक हवे असेल ते आपल्या संपर्काच्या पत्त्यासह केएम म्युझिक कन्झर्व्हेटरीच्या नावे काढलेला एक डिमांड ड्राफ्ट काढून माहितीपत्रक मागवून घेऊ शकतील. या अभ्यासक्रमास प्रवेश घेण्याची अंतिम तारीख 30 जून आहे.
पात्रता - या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांचे वय 18 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असणे आवश्यक आहे. त्यांनी 12 वीच्या परीक्षेत किमान ‘ब’ श्रेणी किंवा 55 टक्के गुण प्राप्त केलेले असावेत. प्रवेश प्रक्रियेचा एक भाग म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याची मुलाखत घेतली जाईल. या मुलाखतीतून विद्यार्थ्याची सांगीतिक पार्श्वभूमी, या क्षेत्रात येण्याचा उद्देश आणि समीक्षक पद्धतीने विचार करण्याचे कौशल्य पडताळून पाहिले जाणार आहे. याविषयी अधिक माहितीसाठी www.kmmc.in हे संकेतस्थळास भेट द्या. 29 जुलै रोजी मुख्य अभ्यासक्रमाची सुरुवात होणार आहे.
अभ्यासक्रमांविषयी


फाउंडेशन प्रोग्राम : या अभ्यासक्रमामध्ये फाउंडेशन सर्टिफिकेट इन म्युझिक हे संगीतातील प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना दिले जाणार असून या प्रमाणपत्रास इंग्लंडच्या लंडन येथील मिडलसेक्स विद्यापीठाची मान्यता प्राप्त झालेली आहे. एक वर्षाच्या या अभ्यासक्रमामध्ये संगीताचे सर्वसमावेशक शिक्षण दिले जाणार असून त्याद्वारे विद्यार्थ्यांना आंतरराष्‍ट्रीय दर्जाची पात्रताही प्राप्त होणार आहे. यामध्ये पाश्चिमात्य अभिव्यक्ती (वेस्टर्न परफॉर्मन्स), संगीतरचना (कंपोझिशन), तंत्रज्ञान, संगीतशास्त्र (म्युझिक थिअरी), श्रवण कौशल्ये (ऑरल स्किल्स),संगीताचा इतिहास, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आणि व्यावसायिक संगीतकारांची कौशल्ये अशा विविध विषयांचा समावेश असेल. फाउंडेशन अभ्यासक्रमासाठी संगीताचे थोडेसेच पूर्वप्रशिक्षण घेणे जरुरीचे आहे. या अभ्यासक्रमासाठी डॉ. अडॅम ग्रेग, ब्रायन क्लार्क, गिल्स डेनिझॉट यासारख्या संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गजांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभणार आहे.
डिप्लोमा प्रोग्राम : डिप्लोमा प्रोग्राम हा दोन वर्षांचा अभ्यासक्रम असून या अभ्यासक्रमालाही इंग्लंडच्या लंडन येथील मिडलसेक्स विद्यापीठाची मान्यता प्राप्त झालेली आहे. युनायटेड किंगडम बॅचलर्स इन आर्ट या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम दोन वर्षांच्या समकक्ष योग्यतेचे शिक्षण या अभ्यासक्रमामध्ये दिले जाणार असून संगीताविषयीच्या परिपूर्ण ज्ञानासह कुशल संगीतकार तयार करण्याचे प्रयत्नही यामध्ये केले जाणार आहेत. परफॉर्मन्स, कम्पोझिशन, म्युझिक हिस्ट्री, म्युझिक थिअरी, ऑडिओ टेक्नॉलॉजीज आणि इंडियन क्लासिकल ट्रेडिशन्स अशा विविध विषयांसाठी आंतरराष्‍ट्रीय स्तरावरील अनुभवी अध्यापकांचे मार्गदर्शन प्राप्त करण्याची संधी या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना मिळेल.


डिप्लोमा अभ्यासक्रम (मिडलसेक्स ट्रॅक) यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर लंडनमध्ये मिडलसेक्स विद्यापीठातील बीए म्युझिक या पदवी अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षासाठी प्रवेश देण्याची हमीदेखील विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. या एक वर्षाच्या वाढीव शिक्षणानंतर त्यांची डिप्लोमा ही शैक्षणिक पात्रता पदवीमध्ये रूपांतरित होईल.
पत्ता : केएम म्युझिक कन्झर्व्हेटरी, क्र.5, पाचवा रस्ता, डॉ. सुब्बरायण नगर,कोडम्बक्कम,चेन्नई. दूरध्वनी संपर्क : 044 43444786 किंवा 09003032789, वेबसाइट - www.kmmc.in,
ई-मेल - info@kmmc.in.