आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जिच्या कुशीत बाळ...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मूल जन्माला आले की स्तनपान करायचे असते, एवढेच बहुतांश मातांना माहीत असते. ते कधी सुरू करावे, किती महिन्यांपर्यंत करावे, का करावे आणि कसे करावे याची शास्त्रीय माहिती फार कमी मातांना असते, अगदी महिलांनासुद्धा. मग नुकतंच मातृत्व प्राप्त झालेल्या तरुणींची अवस्था तर विचारायला नको. तिला आई शिकवायची. ब-याचदा दवाखान्यात काम करणा-या सिस्टर/डॉक्टर गृहीत धरतात की तिला बाळाला पाजता येते. परंतु प्रत्यक्ष कोणी बघत नव्हते की ती हे योग्य पद्धतीने करते आहे वा नाही.
याविषयी मोठ्या प्रमाणात अज्ञान, चुकीच्या कल्पना, गैरसमज आहेत. वैद्यकीय आणि नर्सिंग शिक्षणातही याचा समावेश नाही. त्यात चीक दुधाचे महत्त्व, तसेच आईला व बाळाला होणारे फायदे यांचा समावेश आहे. परंतु आजही बाळाची स्तनावरली पकड, आईची-बाळाची स्थिती यांचा समावेश नाही. दुर्दैवाने गेल्या 20-30 वर्षांत दुधाची पावडर व दुधाच्या बाटलीचा बेसुमार वापर झाला. या सर्वांमुळे बाळाच्या आरोग्यावर मोठा गंभीर परिणाम झाला.
इतर कोणत्याही सस्तन प्राण्याचे मूल कुपोषित नसते. कारण या माता पिलांना लगेच पाजतात, चीक दूध पाजतात, त्यांच्याच कुशीत ठेवतात व बाटली/पावडरचा वापर करत नाहीत. माणूस हा एकमेव बुद्धिमान सस्तन प्राणी आहे, ज्याचे मूल याविषयीच्या गैरसमजांमुळे कुपोषणाला बळी पडते.
बाळ जन्माला आल्यानंतर त्याला रडवून तिच्यासोबत आलेल्या स्त्रीकडे बाळ दिले जाते. मग डॉक्टर/सिस्टर वार काढून किंवा टाके टाकून मातेला दोन तासांनंतर वॉर्डात आणतात. नंतर बाळ तिच्याजवळ दिले जाते. जनावराचे पिल्लू मात्र जन्माला आल्याआल्या आईचे स्तन चोखते. मादी पिल्लाचा मागील भाग चाटून सर्व घाण पोटात घेते व तिच्या बाळाकरिता रोगप्रतिकारक ताकद चीक दुधातून देते. म्हशीचा व गायीचा चीक आपण खरवस म्हणून खातो. मात्र आपल्या आईचा चीक मात्र काढून बाहेर टाकून देतो. हे दुर्दैवी आहे.
त्यामुळे मातेला डिलिव्हरी रूममध्येच स्तनपानाची यशस्वी सुरुवात केल्यास बाळाला चीक मिळू शकेल. खेरीज, इतर व्यक्तीकडे बाळ दिल्याने तिच्या शरीरावरील रोगजंतू बाळाकडे जाऊ शकतात व आईच्या रोग प्रतिकारकाचा उपयोग होत नाही. कारण आईच्या अंगावर दुसरे रोगजंतू असतात. म्हणून बाळाला आईकडे नेणे महत्त्वाचे असते, जेणेकरून बाळ आजारी पडणार नाही. ही जबाबदारी आरोग्य संस्थेत बाळंतपण करणा-यांची आहे.
आपल्या मानसिकतेवर जाहिरातींचा परिणाम लगेच होतो. बाळाला स्तनपान करताना घरातील टीव्ही सुरू असतो. आई टीव्हीवर जाहिरात पाहते. एक माता तिच्या बाळाकरिता दूध पावडरीचा डबा आणते. त्यातील थोडीशी पावडर काढून पाण्यात खलते. बाळाला एक चमचा भरविते. तेवढ्यात तिचे बाळ पालथे पडते, सरपटायला लागते, रांगायला लागते, लगेच पावले टाकायला लागते. अन् त्याची आई आश्चर्यकारक नजरेने बाळाकडे पाहते. हे पाहिल्यानंतर या आईला वाटते, माझ्या बाळाने पण असेच चालावे. मग ती बाजारातून महागडी पावडर आणते आणि बाळाची वाट लागते.
सर्व सस्तन प्राणी आपल्या बाळांना त्यांच्या कुशीत ठेवतात. यालासुद्धा आपण अपवाद आहोत. बाळासाठी आपल्याकडे पाळणा किंवा झोळी असते. आपली एक म्हण आहे ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी.’ यातूनही स्तनपानाचे महत्त्व कमी झाले व पाळण्याचे वाढले. आपली लेक बाळंतपणानंतर माहेरून सासरी येते तेव्हा आई-बाळासोबत पाळणाही दिला जातो. आदिवासी भागात सर्रास झोळीचा वापर आढळतो. पण बाळ आईच्या कुशीतच हवे. कोंबडीची पिल्ले तिच्या पंखाखाली येतात.
शेळीचे कोकरू, गाईचे वासरू इ. आपल्या आईच्या जवळ असतात. मग आईची कूस सोडून पाळणा किंवा झोळी कशाला? जगातले सर्वात चांगले फोटोथेरपी यंत्र म्हणजे आईची कूस. बाळाला पाळण्यात/झोळीत ठेवणे किंवा दुस-या बिछान्यावर (आईपासून लांब) ठेवणे चुकीचे आहे. बाळाला आईच्या कुशीत ठेवल्यामुळे पुढील फायदे होऊ शकतात.
* बाळ उबदार राहते.
* जंतुसंसर्ग होत नाही.
* पान्हा फुटतो.
* बाळाच्या गरजेनुसार पाजता येते.
* भावनिक बंध निर्माण होतो.
एक उदाहरण देतो. कोल्हापूर जिल्ह्यातील उचगाव या गावी खासगी दवाखान्यात एक मध्यम कुटुंबातील स्त्री बाळंत झाली. बाळाचे वजन 1.4 कि.ग्रॅ. होते. बालरोगतज्ज्ञांनी बाळ पेटीत ठेवा असे सांगितले. 10 दिवस बाळ पेटीत ठेवूनही फरक नव्हता. खर्च वाढत होता. शेवटी नशिबावर हवाला ठेवून या कुटुंबाने तिला घरी आणले. त्यांना एक अंगणवाडी कार्यकर्ती भेटली. तिने बाळाला कुशीत कांगारूसारखे ठेवणे व आईचे स्तनपान सुरू करण्याचा सल्ला दिला. दिवसातून कमीत कमी 18-20 तास बाळ आईजवळ राहू लागले. आईने सुरुवातीला तिचेच दूध काढून वाटीचमच्याने बाळाला भरवायला सुरुवात केली. दूध काढायचे कौशल्य आरोग्य सेविकेने शिकवले. दोन महिन्यांत बाळाचे वजन 3.2 कि.ग्रॅ. झाले. इतकी ताकद आईच्या दुधात व कुशीत आहे. त्या बाळाचा, आईचा, अंगणवाडी ताईचा तसेच आरोग्य सेविकेचा सत्कार जिल्हा परिषदेने करून एक आदर्श समाजापुढे ठेवला.
त्याच कार्यक्रमात 7 एप्रिल 2010 रोजी कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत ‘स्तनपान व शिशुपोषण चळवळीचा’ शुभारंभ करण्यात आला. चळवळीच्या अनुषंगाने पुढील म्हणी दृढ केल्या
‘नको दुधाची बाटली, नको दुधाची पावडर, नको पाळणा/झोळी’
‘जिच्या कुशीत बाळ, त्यांना काही नाही करणार काळ’
बाळंतपणाच्या वेळी रक्तस्त्राव होणे स्वाभाविक आहे. तो भरून काढावा म्हणून गरोदरपणात मातेला लोहयुक्त गोळ्या (प्रतिबंधात्मक 100 गोळ्या, दररोज 1 याप्रमाणे व उपचारात्मक 200 गोळ्या, दररोज 2 या प्रमाणे) दिल्या जातात. ब-याच वेळा माता गैरसमजुतीपोटी गोळ्या खात नाहीत. हा अतिरिक्त रक्तस्त्राव एका साध्या, सोप्या, विनाखर्चिक, नैसर्गिक पद्धतीने थांबवता येतो. त्या पद्धतीचे नाव आहे ‘ब्रेस्ट क्रॉल’
ब्रेस्ट क्रॉल - जन्माला आल्यानंतर लगेचच बाळ रडण्याची खात्री केल्यानंतर बाळाचे शरीर एका कोरड्या सुती कापडाने पुसून घ्या. त्याच्या हाताचे पंजे, पायाचे तळवे पुसू नका. कारण त्याचा व स्तनाग्रांचा वास/गंध सारखा असल्याने त्याला स्तनाकडे जाण्यासाठी मार्ग मिळतो. बाळ आईकडे घेऊन जा. दोघांनाही एकमेकांकडे पाहण्याची इच्छा असते. आईला बाळास स्पर्श करण्यास सांगा, कुरवाळायला सांगा, पापे घेण्यास सांगा, पारंपरिक प्रथेनुसार देवाचे नाव घेण्यास सांगा. हा स्पर्श वारंवार करण्यास सांगा, जेणेकरून बाळ स्तनपानास उत्सुक होईल व आईलाही पान्हा फुटण्यास मदत होईल. मग बाळ दोन स्तनांमध्ये उपडे ठेवा, बाळ पडणार नाही याची काळजी घ्या. आईच्या दोन्ही हातांनी बाळाला धरण्यास सांगा आणि निसर्गाचा चमत्कार बघा. बाळ आपोआप सरपटत आईच्या स्तनाकडे जाते आणि यशस्वी स्तनपानाची सुरुवात करते. बाळाच्या पायाचे धक्के ओटीपोटावर आल्यामुळे वार पडायला तसेच गर्भाशय आकुंचन पावण्यास मदत होते. रक्तस्त्राव थांबतो. माता मृत्यूंवर अशा प्रकारे नियंत्रण ठेवता येईल.
आतापर्यंत बहुतांश मातांनी मुलांना तिस-या दिवशी अंगावर पाजण्यास घेतले. कारण तिस-या दिवशी दूध फुटते या समजुतीमुळे. परंतु वारंवार छातीस लावल्यामुळे लवकर दूध फुटण्यास मदत होते. आपल्याला अमृतासम पिवळसर चीक दूध मिळाले नाही, जो आपला नैसर्गिक हक्क होता. म्हणून पुढच्या पिढीला तो हक्क मिळवून देण्यासाठी आपण निर्धार केला पाहिजे.
‘स्तनपान व शिशुपोषणाचा करूया नवा निर्धार
बाळाचा स्तनपानाचा नैसर्गिक हक्क मिळवून देणार’