आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अ क्रायसिस मॅन युसूफ रझा गिलानी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानी पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात व्यक्तिश: हजेरी लावून लष्कराचे वर्चस्व असलेल्या देशातील राजकारणाला कलाटणी दिली आहे.लष्करप्रमुख जनरल अश्फाक परवेझ कयानी गिलानींचे सरकार उलथवण्यासाठी नेट लावून बसले असताना गिलानी यांनी त्यांना बॅकफूटवर पाठवले आहे. मेमोगेट आणि भ्रष्टाचार, पैशांच्या अफरातफरीत राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी पुरते अडकले आहेत. केवळ राष्ट्राध्यक्षपदाचे सुरक्षा कवच असल्यामुळे ते गादीवर आहेत. त्यांना टार्गेट करून लोकनियुक्त सरकार उलथवण्याच्या हालचाली कयानी यांनी पडद्यामागे सुरू केल्या होत्या. लादेनप्रकरणी सर्व खापर गिलानी सरकारवर आल्यामुळे अडचणीत आले होते. एकीकडे तालिबानला फूस,चीनशी चुंबाचुंबी आणि अमेरिकेशी उघड विरोध. कयानींना गिलानी सरकार उलथवण्यासाठी झरदारींनी आयते कोलीत दिले. लष्कराच्या हालचालींचा सुगावा लागल्यामुळे झरदारींनी अमेरिके कडे मदतीसाठी खलिता पाठवला. हाच तो मेमो.झरदारींविरुद्धचे खटले पुन्हा सुरू करावेत व मेमोगेट प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा भुंगा लावण्यामागेही लष्कराचाच हात असल्याचे सांगितले जाते. झरदारींविरोधात कारवाई करीत नाही म्हणून सुप्रीम कोर्टाने सोमवारी,16 तारखेला अवमान झाल्याची नोटीस पाठवून पहिला झटका दिला.कयानींचा असा अंदाज असावा की अवमान नोटिसीच्या दडपणामुळे गिलानी राजीनामा देऊन सुटका करून घेतील. पण गिलानींनी व्यक्तिश: हजर राहून कयानींवर व पर्यायाने लष्करावरच एकप्रकारे कुरघोडी केली आहे.
गिलानी घराणे हे पाकिस्तानातील एक बडे प्रस्थ. जमीनदारी आणि सुफी परंपरेचे पालन करणारे धार्मिक नेत्यांचे हे घराणे मूळचे पंजाबप्रातांतील मुलतानचे. गिलानींचे आजोबा, काका पणजोबा हे आॅल इंडिया मुस्लिम लीगचे सदस्य होते. 1940 मध्ये पाकिस्तानचा जो ठराव झाला त्यावर त्यांनी स्वाक्षºया केल्या आहेत. युसूफ रझा यांचा जन्म 9 जून 1952 सालचा. उच्चविद्याविभूषीत गिलानी यांनी पंजाब विद्यापीठातून त्यांनी पत्रकारितेत एम.ए.केले आहे. गिलानींना चार मुले,एक मुलगी आणि एक नातूही आहे. त्यांचा थोरला मुलगा सय्यद मखदूम अब्दुल कादीर गिलानी अणि अली मुसा गिलानी हेसुद्धा राजकारणात आहेत. लष्करशहा झिया उल हक यांच्या काळात युसूफ रझा पाकिस्तानी मुस्लिम लीग पक्षात होते. नवाज शरीफ यांच्याशी खटके उडाल्यानंतर त्यांनी पीपीपीत प्रवेश केला. त्यांच्या पीपीपीतील प्रवेशावेळचा किस्साही मजेदार आहे. झिया उल हक यांच्या काळात पीपीपीचे अस्तित्व नाममात्रच होते. गिलानी बेनझीर यांना भेटले. त्यावेळी दोघांमध्ये झालेला संवाद असा. गिलानी : मला तुमच्या पक्षात यायचे आहे.बेनझीर : तुम्हाला देण्यासारखे माझ्यापाशी काहीही नाही. मग तुम्हाला पक्षात येऊन काय करायचे. गिलानी : जगात तीन प्रकारचे लोक असतात.मान-सन्मान,चातुर्य आणि संपत्तीची आवड असणारे.मी पहिल्या प्रकारात मोडतो.
इस्लामाबाद, रावळपिंडीत महागाई विरोधात उग्र निदर्शने झाली होती. अवमान याचिकेच्या मुद्यावरून राजकारण ढवळून निघाले असताना या गोष्टीची फिकीर कुणालाही नाही.कयानींचा एक डाव उलटवला असला तरीही मेमोगेटचे हत्यार त्यांच्या हाती आहे. मेमोगेट प्रकरण चव्हाट्यावर आणणारे पाकिस्तानी वंशाचे उद्योगपती मन्सूर इजाज पाकिस्तानी चौकशी आयोगासमोर येऊच नये याची खबरदारी घेण्यात येत आहे.त्यांच्या व्हिसाच्या मुद्यावरून दररोज उलटसुलट वृत्त येत असतात.पण मेमोगेटचा व्यवहाराला कागदोपत्री पुरावा नाही. तो इ-मेल द्वारे झाला. त्याचा तपशील उघड करण्यास ब्लॅकबेरीची पॅरेंट कंपनी रिमने नकार दिला आहे. म्हणजे मेमोगेट बासनात बांधावे लागणार हे निश्चित. पुरावाच नसल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशी आयोगासमोर केवल मन्सूर इजाज यांची साक्षच अतिमहत्त्वपूर्ण ठरणार आहे. अशा परिस्थितीत नव्याने निवडणूक घेऊन मुशर्रफ-माजी क्रिकेटपटू इम्रानखानचा तेहरिक ए इन्साफ व लष्कर या त्रिकूटाला डोकेवर काढू देण्याची संधी गिलानी मिळू देणार नाहीत. यात ते कितपत यशस्वी होतात हे काळच ठरवेल.