आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरे संस्कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मी गाडीत असतानाच बराच वेळ मोबाइल वाजत होता. उतरल्यावर घाईघाईत बघितलं. एकाच नंबरवरून 4-5 मिस्ड कॉल्स होते, म्हणून फोन लावला. ‘अरी म्रिदुला, कितना टाइम से फोन लगा रही थी,’ पलीकडून मधुमिताचा घोगरट आवाज कानावर पडला. ब-याच महिन्यांनी! ‘अरी मेरा बहोत प्राब्लेम हो गया री, शिवा की तबियत बहोत खराब है!’ ती उद्गारली. ‘बहोत कमजोर हो गया है, खांसी रुकती नाही, चलने की तक जान नही उस मे.’ इतक्या वर्षांची स्मोकिंगची सवय! टीबी? मी विचारात पडले. ‘तू कैसा भी कर के कल मिलना मुझे शाम को,’ मला गृहीत धरत तिने सांगून टाकलं आणि फोन ठेवला.


ती 15 वर्षांपूर्वी आमच्या व्यसनमुक्ती केंद्रात आली होती. ज्या माणसाकडे राहून ती माल विकत होती त्याच्या मुलीचं लग्न झालं की ती उपचारासाठी राहायला येणार होती! अनेक गर्दुल्ले देतात तसंच हे पण एक कारण असावं असा वाटून मी तिला लवकर दाखल होण्याचा आग्रह करत होते. त्यावर हिचं म्हणणं असं की ‘जो अपना इतना साथ दिया उस के काम के वक़्त निकल जाना मतलब नीच काम!’ ‘नीच काम’ची तिची व्याख्या अगदी सोपी होती. जी गोष्ट तिच्या सद्सद्विवेक बुद्धीला पटत नाही ते नीच काम! त्यामुळे वेश्याव्यवसाय करणं हे तिच्या दृष्टीने नीच काम नव्हतं; पण गि-हाइकाचे पैसे चोरणं एकदम नीच काम! लग्नाशिवाय आदमी ठेवणं नीच काम नाही; पण त्याच्याशी गद्दारी करून दुस-याकडे जाणं नीच काम! मधुमिता जणू माझ्या मूल्यसंस्थेला हादरे देण्यासाठीच आलेली होती. पण ती अगदी खरी होती, जशी आत तशीच बाहेर! अगदी मोकळाढाकळा स्वभाव. आपल्याला काय करायचं हे नेमकं माहीत असायचं तिला आणि एकदा त्यानुसार ती वागली की होणा-या परिणामांना विनातक्रार भोगायचं ही तिची खासियत!
कोलकात्याला एका गरीब कुटुंबात ती जन्मली. लहानपणापासून छानछोकीची आवड! यामुळेच तिच्या एका दूरच्या बहिणीने तिला शहरात श्रीमंत मुलांना कंपनी देण्याचे काम दिले. मौजमजा करायची त्यांच्या पैशाने! काही सहेतुक स्पर्श, चुंबने याच्यापुढे हा मामला जात नसे! नंतर जेव्हा घरची परिस्थिती अगदीच वाईट झाली तेव्हा तिने त्या बहिणीच्याच मदतीने मुंबई गाठली. येथील उच्चभ्रू वस्तीत वेश्याव्यवसायात ती स्थिरावली. पैसा आला. ओमी तिचा दलाल! तो तिचा आदमी झाला. तिला हक्काचं माणूस मिळालं! अर्थात तिचा व्यवसाय चालूच होता. ओमी नशा करत असे. तो नशा सोडेना म्हणून तिने नशा सुरू केली आणि मग दोघं घसरतच गेले. मधुमिताच्या व्यवहारी बुद्धीमुळे तिला लवकर जाणीव झाली. उद्या माझं वय झालं की मग काय? हे असं आयुष्य किती दिवस चालणार? म्हणून ती केंद्रात दाखल झाली. एकदा दाखल झाल्यावर तिने अगदी मनापासून उपचार घेतले. नंतर तिने ओमीला सुधारण्याचा बराच प्रयत्न केला, पण व्यर्थ! एक दिवस बराच वेळ माझ्याशी बोलल्यावर तिने मला तिचा निर्णय ऐकवला- ‘मैं ओमी को छोड दूँगी, नहीं तो मैं फिर नशे में जाऊंगी! मैं वो नहीं चाहती!’ प्रत्येक सत्र मला तिच्या स्वभावाचा निश्चयीपणा, सच्चेपणा दाखवत असे. ती एक मुलगी मी अशी पाहिली की जिला आपल्या व्यवसायाबद्दल जराही अपराधीपणाची भावना नव्हती! संधी मिळाल्यावर मात्र तिने चांगलं आयुष्य विचारपूर्वक स्वीकारलं!


पुढील आयुष्यात तुम्हाला काय करायचंय या विषयवार आमची गटचर्चा चालू असताना तिने ताडकन सांगितलं, ‘शादी कर के घर बसाना है!’ सगळे हसायला लागले, पण तिने मात्र तो विषय सोडला नाही. मला संसार करायचाय! तिने स्पष्ट सांगितलं, इतकंच नव्हे तर तिच्या मनात भरलेला मुलगाही सांगितला! मी उडालेच! तो आमच्या केंद्रात काम करणारा एक नशा सोडलेला समुपदेशक, शिवा, होता. उच्च कुळातला! दोघांमध्ये बरीच तफावत! पण तिचा अंदाज चुकला नाही. आम्ही केंद्रातर्फे तिचं कन्यादान केलं. त्याच्या कुटुंबीयांच्या नजरेत तिच्याबद्दल काहीशी घृणाच होती. मात्र, नंतर दोघांनी छान जमवून घेतले. वर्षभरात एक मुलगी झाली. छानछोकीची आवड असणा-या तिने त्याच्या तुटपुंज्या पगारात भागवायची सवय केली.


आज मुलगी 12 वर्षांची होती आणि मधुमिता मला सांगत होती की शिवा एचआयव्ही+ आहे. मला धक्काच बसला. कारण त्यांच्या लग्नाच्या आधी शिवाचीही वैद्यकीय तपासणी केली होती. त्या वेळी त्याला हा संसर्ग नव्हता. माझ्या मनात पाल चुकचुकली. तिच्या मनात मात्र कोणताही संदेह नव्हता. ‘तभी वो जरूर विंडो पिरिअड में होगा न! मेराही नसीब खोटा,’ तिला वाटत होते! मी तिला काही बोलले नाही, पण तडक शिवाला फोन लावला. त्याने टाळाटाळ न करता माझ्याकडे कबूल केलं की मधुमिता गरोदर असताना तो स्वत:वर नियंत्रण ठेवू शकला नव्हता! फक्त एकदाच चूक झाली, ती इतकी महागात पडली. त्याच्या आवाजात दु:ख, अपराधीपणा होता. मला मधुमिताची कमाल वाटली. इतकी वर्षं जगाची इतकी वाईट बाजू बघूनही, आपला नवरा आपली फसवणूक करत असेल अशी शंकाही तिच्या मनात आली नव्हती! की तिला सत्य जाणून घ्यायचंच नव्हतं कोण जाणे! स्वत:च्या कुलाच्या अभिमानापायी मधुमिताला कमी समजणारे शिवाचे कुटुंबीय आठवले! कोण मोठं? स्वत:च्या संस्कारांना क्षणिक मोहापायी मूठमाती देणारे तथाकथित पांढरपेशे की स्वत:च्या मनाशी, भावनांशी प्रामाणिक राहून जीवनाशी संघर्ष करणारे मधुमितासारखे पददलित? जसजसा विचार करायला लागले तेव्हा मला तिचीच बाजू पटायला लागली. रोग कसा झाला यापेक्षा तो झाला हे स्वीकारणं जास्त महत्त्वाचं होतं! जे ब-याच जणांना पटवून घ्यायला जड जातं ते तिने सहजगत्या स्वीकारलं होतं. अखेरपर्यंत त्याची सेवा करायची हे तिच्या मनात ठाम होतं, फक्त ते कसं करावं ह्यासाठी तिला मार्गदर्शन हवं होतं. तिला समुपदेशकाबरोबरच एका मैत्रिणीची गरज होती. तिला फक्त मदतीचीच नाही तर काही मोकळ्या क्षणांचीसुद्धा गरज होती. जबाबदारीचं ओझं थोडा वेळ बाजूला ठेवून खळखळून हसायची, थोडी मजा करायची गरज होती, ज्यामुळे ती पुन्हा ताजीतवानी होऊन ओझं खांद्यावर घ्यायला सज्ज होईल आणि हे फक्त एक मैत्रीणच करू शकणार होती- अशी मैत्रीण जी तिच्या आयुष्यातल्या खूपशा महत्त्वाच्या क्षणांची साक्षीदार होती! मी माझी दुहेरी भूमिका पेलायला सज्ज झाले होते, मनातल्या मनात तिच्या हिमतीला दाद देत!