आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधींना भान आले आहे का?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नरेंद्र मोदींमुळे काँग्रेसवर ओढवलेल्या आपत्तीची भीषणता किती मोठी आहे, हे राहुल गांधींना आता तरी उमगले असेल का? तशी चिन्हं ‘यंग प्रिन्स’च्या कृतीत तरी दिसत नाहीत. सध्या पक्षांतर्गत असुरक्षितता, संताप आणि बंडाळी या व्याधींनी पक्ष ग्रासलेला असताना (याच वेळी मोदींची त्यांच्या पक्षावर घट्ट होत असलेली पकड विरोधाभास अधिक गडद करते आहे) त्यांचा नेता कुठे गायब झाला आहे? नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार राहुल, प्रियांका आणि त्यांचे कुटुंबीय युरोपला फिरायला गेले होते.
अनेकांना यामुळे आश्चर्य वाटू शकते की, विरोधक असताना आणि प्रकाशझोतापासून दूर असताना काँग्रेसबाबत नकारात्मक बातम्याच अधिक प्रसिद्ध होत आहेत. पण काँग्रेस पक्षाच्या आजवरच्या इतिहासात लोकसभा निवडणुकीत सर्वात निराशाजनक कामगिरी केल्यानंतर बाली बेटावर आराम फर्मावणार्‍यांकडून आपण अजून काय अपेक्षा करणार? आणि त्यांच्या वाट्याला यापेक्षा वेगळे काय येणार? लोकसभा निवडणुकीतल्या दारुण पराभवाने अगतिक झालेल्या काँग्रेसजनांसाठी परिस्थिती दिवसेंदिवस अधिक बिकट होत जाणार आहे. पक्षाला उतरती कळा लागून बदलताच येणार नाही इतकी स्थिती हाताबाहेर गेली आहे. या अवस्थेवर महाराष्ट्रात होऊ घातलेल्या निवडणुकीत शिक्कामोर्तब होईल. केवळ नशीब साथ देत नाही म्हणून पक्षनेतृत्व परिस्थिती बदलू शकत नाही, असे नाही; तर पक्षाची घसरण सावरण्याचा प्रयत्नच होताना दिसत नाही.
पश्चिम आणि उत्तर भारतात काँग्रेस पक्षाला यापुढे कायम विरोधी बाकावर बसावे लागेल, अशीच स्थिती आहे. गेल्या 30 वर्षांत काँग्रेसला एकदाही गुजरात निवडणुकीत यश लाभलेले नाही. (याआधी 1984-85 मध्ये राजीव गांधींच्या लाटेमुळे गुजरातमध्ये त्यांना विजय मिळाला होता.) मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्येही अशीच परिस्थिती आहे. सध्याच्या सरकारची मुदत गृहीत धरता काँग्रेस मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये पुढील किमान 15 वर्षे सत्तेपासून वंचित असेल. बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचा धुव्वा उडाला, तिथे भाजपने या वेळी नेत्रदीपक कामगिरी करत या राज्यांमध्ये पक्षाचे पुनरुज्जीवन केले आहे. तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्येसुद्धा काँग्रेस भाजपपेक्षा मागे पडली. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात काँग्रेस एकदाच पराभूत झाली आहे. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीतसुद्धा महाराष्ट्रात आणि दिल्लीत त्यांना मोठा दणका बसणार आहे. एकंदरीत काँग्रेससाठी हे देशव्यापी संकट आहे आणि या संकटाच्या निवारणासाठी लक्ष केंद्रित करून दशकभर तरी अथक परिश्रम घेऊन काम करण्याची गरज आहे. पण मी याआधी म्हटल्याप्रमाणे राहुल गांधी त्यांना नेमून दिलेल्या कामावर हजर आहेत का?
राहुल गांधी अनेक आठवडे लोकसभेत विरोधी पक्षनेतेपदाची मागणी करत होते. त्यांना हे पद का हवे होते? अगदी प्रामाणिकपणे सांगायचं, तर मलाही या प्रश्नाचं उत्तर माहीत नाही. हे पद घेऊन काँग्रेस काय करणार आहे? राहुलना पक्ष आणि राजकारणात फार रस नाही (त्यांची संसदेतील उपस्थिती त्यांच्या या नावडीचे द्योतक आहे) त्यामुळे फक्त प्रक्रियात्मक बाबीत रस असलेल्या राहुलनी अशी मागणी का केली, हे समजणे अवघड आहे. अगदी असे धरून चाललो की, मोदींनी थोडे नमते घेऊन (जे त्यांच्या स्वभावात नाही) काँग्रेसला शोभेचे पद नजराणा म्हणून दिले, तरीही गांधी कुटुंबाच्या वागण्यात काडीमात्र फरक दिसणार नाही. काँग्रेसच्या हजारो लोकांनी कोट्यवधी रुपये खर्च केले, आणि ते हरले. काहींची अनामत रक्कमही जप्त झाली. हे लोक राजकारणात केवळ छंद म्हणून आलेले नाहीत, तर खर्‍या अर्थाने आपल्या सर्वस्वाची गुंतवणूक त्यांनी केली आहे. असे लोक आपल्या पक्षाच्या नेतृत्वावर आता इतके संतप्त झालेले असतील, की पराभूत ध्येयासाठी अजून किती लढायचे, याचा गांभीर्याने विचार ते करत असतील. मुळात काँग्रेसचे पुनरुज्जीवन होऊ शकते आणि त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी खात्री त्यांना वाटली पाहिजे. असा संदेश त्यांना फक्त राहुल गांधींकडून मिळू शकतो, पण तरीही असं काही घडत असल्याचं दिसत नाही.
भारतीय राजकारणातील नेतृत्वाला कुशाग्र बुद्धिमत्तेची नाही, तर काही तत्त्वांची गरज असते. उत्साह आणि अथक परिश्रम या दोनच गोष्टी आवश्यक असतात. राहुल गांधींच्या वागण्यातून, देहबोलीतून काम करण्याची ईर्षा किंवा उत्साह दिसत नाही. मी हे विधान या आठवड्यात टीव्ही चॅनलवरही केले. काँग्रेस प्रवक्त्याने चिडत माझे म्हणणे नाकारले. तो म्हणाला की त्यांनी प्रचार करताना अनेक निवडणूक रॅलींमध्ये सहभाग घेतला. (जणू काही पक्षावर कृपाच केली.) प्रचारात त्यांनी सहभाग नक्कीच घेतला, पण ते कष्ट मोदींच्या तुलनेत पन्नास टक्केही नव्हते. मोदींनी लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवण्यासाठी एखादी ग्रेट आयडिया किंवा जादूची छडी वापरली नाही. किंबहुना निवडणुकीच्या काळात तटस्थ आणि विश्वसनीय संस्थांकडून मोदींनी प्रचारासाठी वापरलेल्या ‘गुजरात मॉडेल’वर जोरदार हल्ला करण्यात आला. तरीही मोदींची आग्रही वृत्ती, निर्धार, अविरत कष्ट यामुळे ते यशस्वी झाले. मोदींनी खूप काही पणाला लागल्यागत निवडणुकीच्या राजकारणात उडी घेतली. गांधींनी मात्र असे काहीही केले नाही. ते त्यांच्या पराजयानंतरही समाधानी आहेत. त्यांचे वागणे पाहून मला मुघलांच्या उत्तरकालीन पिढीची आठवण होत आहे. भले हत्ती विकावे लागोत किंवा चांदीची भांडी विकावी लागोत, पडक्या का होईना राजवाड्यात राहायला मिळतंय ना, आणि किताब कायम आहे ना, यावरचं ते समाधानी होते.
aakar.patel@gmail.com