आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समानतेचा पुरस्कर्ता आहे म्हणून...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वडिलांचं छत्र हरपल्यानंतर मोडका संसार आईनं सावरला. परिस्थितीनं शहाणपण दिलं. त्यातून वाचनाची, विचारांची बैठक जमली. चिंतनातून सामाजिक भान जागं झालं अन् त्या भानानं पुरुषप्रधान संस्कृती आणि विषमतेवर आधारित व्यवस्थेला आव्हान दिलं. या अनुषंगानं आलेल्या परिणामांनाही तितक्याच खमकेपणानं सामोऱ्या जाणाऱ्या नामदेवचा हा अनुभव.
माझ्या कुटुंबाला तशी सामाजिक चळवळ वगैरेची पार्श्वभूमी नाही किंवा मी कुठल्या पुरोगामी विचारवंताच्या घरात जन्मलो नाही. आता अनेकांना प्रश्न पडू शकतो की, सुरुवातीलाच हा असे का नमूद करतोय? तर ज्यांनी वडील किंवा आडनावाऐवजी आईचं नाव लावायला सुरुवात केल्यापासून अगदी अपरिहार्य असल्यागत सर्वप्रथम हाच प्रश्न विचारला की, “काय नामा, डावा वाटतं?” अशा लोकांसाठी हे स्पष्टीकरण. किंबहुना, म्हणूनच सुरुवातीला हा सारा खटाटोप. डिस्क्लेमर म्हणून वगैरे समजा.

प्रसारमाध्यमांमध्ये काम करणाऱ्यांपैकी मी एक आहे. सुरुवातीला जबरदस्तीने आणि आता आवडीने काही वैचारिक वाचायला-ऐकायला लागलो आहे. आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर विवेकाने विचार करण्याइतपत नक्कीच परिपक्व झालो आहे. काही गोष्टींवर स्पष्ट बेधडक मतं आहेत, काही स्वानुभव आहेत, तर काही व्यक्ती, पुस्तकं आणि आजूबाजूचे प्रसंग या साऱ्यांमुळे मी आईचं नाव लावायला लागलो, असं म्हटलं तर चूक ठरणार नाही. त्यातीलच काही प्रसंग आणि त्यांवरील मतं मांडण्याचा प्रयत्न करतो. मला माहीत नाही, ते प्रेरणादायी किंवा तुमच्यासाठी वाचनीय वगैरे आहेत की नाही. पण मी आईचं नाव लावण्यामागची जी काही कारणं आहेत, त्यांपैकी ही काही महत्त्वाची कारणं म्हणता येऊ शकतील.

तर आता मूळ विषयाकडे वळतो. ते म्हणजे मी नक्की आईचं नाव कधीपासून लावायला सुरुवात केली आणि का? कोणत्या व्यक्ती या परिवर्तनाला कारणीभूत ठरल्या, कोणत्या पुस्तकांनी हा बदल स्वीकारण्यास भाग पाडलं, कोणत्या व्यक्तींच्या सहवासामुळे मी हे पाऊल उचलण्याचं धाडस केलं, यांचा उल्लेख

करणं मला महत्त्वाचं वाटतं.
खरं तर कुठल्याही क्रांतिकारी घटनेला एखादी व्यक्ती, एखादाच प्रसंग कारणीभूत नसतो. अनेक गोष्टींचा हातभार तिच्यामागे असतो. कोणतंही परिवर्तन अनेक गोष्टींचा परिपाक असतं, हे आपण सर्वात आधी लक्षात घेतलं पाहिजे, असं मला कायम वाटत आलं आहे. मी आईचं नाव लावण्यामागे अशीच कारणं आहेत. आईवरचं प्रेम हे पहिलं कारण. मात्र, यापुढेही जाऊन एक स्त्री म्हणून तिला हक्क-अधिकार आहेत, त्यामुळे समानतेचा पुरस्कार करणारा एक तरुण म्हणून मला माझ्या नावापुढं तिचं नाव लावणं योग्य वाटलं.

अनेकांप्रमाणे मीही जुनाट आणि रूढी-परंपरावादी कुटुंबात जन्मलो. अनेकांप्रमाणे हा शब्द मुद्दामहून वापरला. कारण दुर्दैवाने आजही अनेक जण जुनाट रूढींना चिकटून आहेत. माझ्या घरात लहानपणापासूनच परंपरांचे काटेकोर पालन करण्याचे धडे नकळत मिळत गेले. ते मी माझे आद्य कर्तव्य असल्यागत शिकत गेलो आणि त्यानुसार वागत गेलो. या दरम्यान मीही परंपरेच्या जोखडाला बांधला गेलो. थोरामोठ्यांनी सांगितलेली परंपरा सुरू ठेवायची, हे मनात पक्कं झालं होतं. या दरम्यान आपण पुरुषसत्ताक संस्कृतीचा पुरस्कार करत आहोत, याचं भान राहिलं नाही. तसं मुद्दामहून लक्षात आणून देण्याचा प्रयत्नही कुणी केला नाही. कारण आजूबाजूचा प्रत्येकालाच या पुरुषप्रधान संस्कृतीचा विळखा पडलेला होता. मग हा बदल माझ्यात आला कधी, मी परिवर्तनाच्या वाटेवर कधीपासून चालू लागलो... तर त्याची बीजं आहेत गावाकडून मुंबईत आल्यावरच्या आयुष्यात.

मुंबईत आल्यावर ज्या व्यक्तींशी मैत्रीचे सूर जुळले, वैचारिक बंध निर्माण झाले, ज्या पुस्तकांनी मला तटस्थपणे वैचारिक खाद्य पुरवलं, त्यांनी मला या वाटेवर चालण्यास भाग पाडलं.
एकविसाव्या शतकात प्रवेश करून दीड दशक उलटलंय. पण तरीही बहुतांश मंडळी प्रथा-परंपरा आणि रूढींना गंज लागेपर्यंत चिकटून बसलेली आहेत. आजही नव्या विचारांना कडाडून विरोध होताना दिसतो. विशेषत: स्त्रियांच्या संदर्भातल्या क्रांतिकारक विचारांना तर हमखास विरोध होताना दिसतो. म्हणूनच जेव्हा मी आईचं नाव लावण्याचा निर्णय घेतला, त्या वेळी अनेकांनी आक्षेप घेतला.

मी काय आणि तुम्ही काय, जगण्याच्या धडपडीत अनेक जण भेटत असतात, ज्यांचा आपल्या विचारांवर परिणाम होत असतो. अगदीच विचार पटले की, मग आपण त्यानुसार आपल्यातही बदल करत असतो. मलाही माझ्या आतापर्यंतच्या प्रवासात अशी काही माणसं भेटली, ज्यांनी मनात खोलवर परिणाम केला, त्यांच्या विचारांनी भारावलो, त्यांचे विचार पहिल्या शब्दापासून ते अगदी पूर्णविरामापर्यंत पटले. याच माणसांनी मला सजग आणि डोळस केलं. विवेकाने विचार करायला शिकवलं. अर्थात हे सर्व जण मला काही प्रत्यक्षात भेटले, अशातला भाग नाही, तर काही जण अप्रत्यक्षपणे म्हणजेच लेख-व्याख्यानं-पुस्तकातून भेटले. गावाकडं वाचनाच्या वगैरे तेवढ्या सोयीसुविधा नसल्याने फारसं वाचन होत नसे. त्यामुळे आजी-आजोबांपासून ज्या प्रथा होत्या, त्यांवर आक्षेप घेण्याचा प्रश्नच नव्हता. तेवढं ज्ञान आणि हिंमतही नव्हती. मात्र, महाविद्यालयीन शिक्षणासाठी मुंबईत आल्यानंतर वाचायला सुरुवात केली. विशेषत: पत्रकारितेचं शिक्षण घेताना वाचन अधिक वाढलं. त्यात सुदैवाने ज्येष्ठ साहित्यिक सतीश काळसेकर, स्त्रीवादी कार्यकर्त्या डॉ. कुंदा प्र. नि., सामाजिक कार्यकर्त्या प्रा. गिरिजा गुप्ते, सामाजिक कार्यकर्ते सुबोध मोरे, छाया मित्तल यांसारख्यांशी चर्चा करताना मी ‘मला’ शोधलं. आपण कुठे आहोत, किती मागासलेला विचार करतो आहोत, हे लक्षात आलं आणि त्यानंतरच मी माझ्यातील बदलाला सुरुवात केली. यात सर्वात महत्त्वाच्या व्यक्ती ठरल्या त्या म्हणजे माझ्या प्राध्यापिका डॉ. कुंदा प्र. नि. आणि गिरिजा गुप्ते. या दोघींनीही स्त्री आणि समाज यांच्याबद्दल माझ्या मनात असलेलं चित्र पार पुसून वास्तवाची जाणीव करून दिली आणि माझा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणखी पुरोगामी झाला. वाचनामुळे थोडीफार ‘जगात काय चाललंय आणि आपण कुठे आहोत’ याची जाणीव झाली. त्यामुळे तेव्हाच ठरवलं की, अहंकाराच्या घनदाट जंगलात हरवून न जाता, ज्या व्यक्तीला, गोष्टीला मान द्यायला हवा, तिला द्यायचाच. अगदी परंपरांनी जखडून ठेवलेल्या स्त्रीलाही. उगाच इतरांना उपदेश देण्यापेक्षा ती सुरुवात स्वत:पासूनच करावी, असं मनात आलं. मग तथाकथित समाज आपल्या विरोधात जाऊन नावं ठेवू लागला तरी चालेल किंवा आपल्याला बंडखोर वगैरे म्हटलं गेलं तरी चालेल; पण खोट्या प्रतिष्ठेत जगून आपण विषमतेला अप्रत्यक्ष का होईना, खतपाणी घालायचं नाही. आधी सांगितल्याप्रमाणे, वाचनाच्या सवयीमुळे अनेक पुस्तकं नजरेखालून गेली. मिळून साऱ्याजणी, साधना, अनुभव यांसारखी नियतकालिकं वाचू लागलो, स्त्रीवादी लेखन वाचून काढलं, यातून स्त्रीकडे स्त्री म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन तयार होत गेला. या दरम्यान, एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे, स्त्रियांच्या बाबतीत मला एक मूलभूत संकट दिसून आलं. स्त्रिया तथाकथित शोषकांच्या गुलाम तर होत्याच. तसा इतिहासही सांगतो आणि वर्तमानातली परिस्थिती फार सुधारलीय, अशातलीही गोष्ट नाही. आजही या ना त्या मार्गाने स्त्री गुलामच आहे. फक्त प्रत्यक्ष गुलाम या शब्दाऐवजी वस्तू म्हणून तिचा वापर आणि उल्लेख होताना दिसतो. तर शोषकांची गुलाम असण्यासोबत दुर्दैवाने तथाकथित शोषकांनी ज्या पुरुषांना गुलाम बनवलं, त्या गुलाम पुरुषांनीही स्त्रीला गुलाम केलं. म्हणजे काय तर, शोषकांकडूनही गुलाम आणि शोषित पुरुषांकडूनही गुलाम. अशी एकंदरीत भयानक अवस्था स्त्रीची झालेली आहे.

अशा एक ना अनेक गोष्टी वाचनातून, भेटलेल्या व्यक्तींकडून, काही स्वानुभवातून कळत गेल्या आणि माझ्या स्त्रीकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात अामूलाग्र बदल झाला. हे सारं वाचताना खूप साहित्यिक वगैरे वाटलं असेल, पण जे आहे ते असं आहे. आज ठरवलं आणि उद्यापासून आईचं नाव लावायला सुरुवात केली, असं झालं नाही. खरं तर तसं होतही नाही. कारण हा एक क्रांतिकारी निर्णय असतो. हल्ली माझे समवयस्क अनेक तरुण-तरुणी माझ्याप्रमाणेच सोशल मीडियावर नाव ठेवताना वडिलांच्या नावासोबत आईचं नाव लावतात, हे आपण पाहतो तेवढं हलकं-फुलकं नाहीय. वर्षानुवर्षे जो मुद्दा चर्चा करून आणि त्यावर व्याख्यानं देऊन गुळगुळीत झाला आहे, त्या स्त्री-पुरुष समानतेच्या क्रांतिकारी विचारांची हीच खरी नांदी आहे आणि मला अभिमान वाटतो की, या क्रांतिकारी नांदीत माझा सहभाग आहे.
(लेखक ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीत कार्यरत आहेत.)
(namdev.anjana@gmail.com)