आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टाइल बदल गई है,माँजी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गांधी जयंती असो वा स्वातंत्र्यदिन; दसरा असो वा दिवाळी... हे सण-वारांपेक्षा ‘हॉलिडे’ अधिक असतात आणि बाजारपेठांसाठी धंद्याची गोल्डन अपॉर्च्युनिटीसुद्धा... ही सारी किमया जागतिकीकरणाची आणि जागतिकीकरणामुळे झपाट्याने बदलत गेलेल्या लाइफस्टाइलची... याच चक्रावून सोडणाऱ्या बदलांचा हा वेध...

शुक्रवार, 2 ऑक्टोबरला माझ्या फोनच्या इनबॉक्समध्ये एक संदेश आला. हल्ली कुणीही ‘एसएमएस’ फारसं पाहात नसलं तरीही, हा संदेश माझ्या नजरेतून सुटला नाही. एका साइटवर कपड्यांची विक्री करणाऱ्या कंपनीचा तो संदेश होता. ‘गांधी-जयंती स्पेशल ऑफर्स’ असा त्याचा मजकूर होता, आणि या रचिलेल्या पायावर चढवलेला कळस म्हणजे, ‘प्रोमो कोड- BAAPU’ वापरून १०% सवलतदेखील कंपनीने देऊ केली होती. सुरुवातीला मजेदार आणि काही क्षणांनी असंवेदनशील वाटणाऱ्या या संदेशाने नंतर मात्र मला विचार करायला भाग पाडले.

कंपनीला असं करण्यामागे ‘एक्स्टेंडेड विकेंड’ हे कारण तर होतेच; पण ग्राहकांची मानसिकता तशी तयार झाल्याचा विश्वास जोपर्यंत कंपनीला येत नाही, तोपर्यंत अशी पावले उचलली जात नाहीत. गांधी जयंती ही एक जयंती नसून ती एक सुट्टी आहे आणि शुक्रवार असल्यामुळे ‘लाँग विकेंड’ आहे आणि त्या निमित्ताने आपण खरेदी करू, अशी ग्राहकांची मानसिकता निर्माण झालेली आहे, असे स्पष्ट संकेत इथे सापडतात. साधारण आठ ते दहा वर्षांपूर्वी हे शक्य झालं असतं का? मग एक-दोन वर्षांतच असं काय झालं, की गांधी जयंती असो वा स्वातंत्र्य दिन, आपल्यावर ऑफर्सचा भडिमार होतो? आणि तोदेखील बहुधा सर्व क्षेत्रातील कंपन्यांकडून?
याचा अर्थ असा की, या सर्व कंपन्यांना असा एक विश्वास आहे की, या देशात असा एक ग्राहक-वर्ग तयार झाला आहे, जो या प्रकारच्या मार्केटिंगला प्रतिसाद देतो, अथवा देऊ शकतो. गेल्या साधारण दशकभरात तर हा वर्ग संख्येने बराच वाढला आहे, वेगाने वाढतो आहे. अर्थातच, आपला देश हा एक प्रचंड मोठी बाजारपेठ झाला आहे आणि त्यातील ग्राहक आर्थिकदृष्ट्या मजबूत होतो आहे.

कसं साध्य झालं हे?
ही सारी किमया ‘जागतिकीकरण’ या प्रक्रियेमुळे झाली आहे. या प्रक्रियेमुळे देशात मोठ्या प्रमाणात परकीय भांडवल आले. नवीन उद्योग आल्यामुळे नवीन नोकरीच्या संधी निर्माण झाल्या. साऱ्याचा फायदा घेत देशात एक नव-मध्यमवर्ग तयार होऊ लागला. हा वर्ग प्रामुख्याने आय. टी. क्षेत्रात कार्यरत होऊ लागला होता. परकीय भांडवल असल्यामुळे जो पगाराचा आकडा गाठायला नऊ ते दहा वर्षं (किमान) लागायची, तो आकडा या वर्गाला पहिल्या दिवसापासून मिळू लागला. आणि याचा परिणाम म्हणजे, आठवड्यातील पाच दिवस प्रचंड काम आणि विकेंडला मजा, या संकल्पनेचा आरंभ झाला.
जागतिकीकरणपूर्व काळात हॉटेलमध्ये जेवायला जाणे, हा एक ‘पारिवारिक कार्यक्रम’ असायचा. तोसुद्धा सात-आठ महिने किंवा अगदी वर्षातून एकदा होत असे. मात्र नव-मध्यमवर्गामुळे विकेंडला बाहेर जेवणे, हे एका ‘ट्रेंड’च्या स्वरूपात सुरू झाले. जी गोष्ट हॉटेलची, तीच गोष्ट सिनेमा पाहायची. प्रत्येक विकेंडची आखणी होऊ लागली. हातात पैसा आल्यामुळे बाहेर जेवायला जाणे, सिनेमा पाहणे या यादीत पर्यटन, लाँग ड्राईव्ह या गोष्टीदेखील समाविष्ट होऊ लागल्या. या साऱ्या क्षेत्रांना नवीन ग्राहक मिळाल्यामुळे तीदेखील अधिक विकसित होऊ लागली. या वर्गाबरोबर त्या क्षेत्रात उद्योग करणाऱ्यांनीदेखील पैसा कमावून स्वतःचे राहणीमान उंचावायला सुरुवात केली.

२००३-२००६च्या दरम्यान इतर क्षेत्रातील परदेशी कंपन्यादेखील भारतात येऊ लागल्या आणि हीच प्रक्रिया अधिक विस्तारित होऊ लागली. नव-मध्यमवर्गात त्यामुळे अधिक लोक समाविष्ट होत गेले. देशात अधिक गुंतवणूक झाली. या वेळेस मात्र अजून एक महत्त्वाची गोष्ट घडली, ती म्हणजे, मोबाइल फोनचा मध्यमवर्गात आणि नव-मध्यमवर्गात झालेला प्रवेश. अगदीच काही वर्षांपूर्वी कॉर्डलेस-फोन आणि पेजर असणं हे ‘स्टेटस सिम्बल’ म्हणून मिरवलं जात होतं. मोबाइलने मात्र त्याला छेद दिला. त्यानंतर देशात अजून एक माध्यम विकसित होत गेले, आणि ते म्हणजे इंटरनेट! शिवाय देशात प्रत्येक प्रकारच्या तंत्रज्ञानाला आपले पाय पसरायची संधी दिली गेली आणि त्यांच्यातील स्पर्धेमुळे तीदेखील स्वस्त दरात उपलब्ध होऊ लागली. परिणामी आज देशात जी मोठी बाजारपेठ निर्माण झाली आहे, ती देशातल्या या ग्राहकवर्गाची ‘लाइफ स्टाइल’ ठरवते आहे आणि पुढेदेखील ठरवणार आहे. १९९१ पासून सुरू झालेला हा प्रवास इथपर्यंत येऊन पोहोचला आहे.

गेल्या दोन वर्षांत जानेवारी महिन्यात व्हॉट्स अॅपवर या वर्षीचे ‘लाँग विकेंड’ कोणते, असे संदेश फिरताना दिसले. यावरून आपल्यात आता कामाबरोबर मनोरंजनाचे नियोजनदेखील होताना दिसते आहे. हेच दिवस हेरून पर्यटन क्षेत्रातील कंपन्या विशेष ऑफर्स घेऊन येतात. विक्री-खरेदीसाठीदेखील अशाच ऑफर्स ग्राहकांसमोर ठेवल्या जातात. अशा वेळेस दोन्ही बाजूला मानसिकता ही व्यावहारिक असते. प्रजासत्ताक दिन किंवा स्वातंत्र्य दिन हे केवळ एक निमित्त असते. हीच बदललेली मानसिकता १९९१च्या आर्थिक उदारीकरणापासून आणि गेल्या तीन-चार वर्षांपासून जरा अधिक प्रकर्षाने अधोरेखित होत आहे.

या बदलाचे प्रातिनिधिक उदाहरण म्हणून दिवाळीची सुट्टी घेता येईल. आज जो आर्थिकरीत्या समृद्ध मध्यमवर्ग आहे, त्याची दहा ते पंधरा वर्षांपूर्वीची दिवाळी या सणाकडे पाहण्याची दृष्टी काय होती? तर घरी फराळ, मुलांसाठी फटाके आणि सगळे विधी चोखपणे पार पाडणे. परंतु या दहा वर्षांत आर्थिक समृद्धीमुळे हा वर्ग दिवाळीत ‘कुठे फिरायला जायचे’, हे वर्षाच्या सुरुवातीलाच ठरवतो! शिवाय फराळाचे पदार्थ हे बदलत्या बाजारपेठेत वर्षभर उपलब्ध होऊ लागले आणि त्याला तसे ग्राहकदेखील मिळू लागले. एवढेच काय, तर बऱ्याच घरांमध्ये भाऊबीज ‘दिवाळीला आम्ही नव्हतो’ या कारणाने महिना-दोन महिन्यांनंतर साजरी होते. या वेळेस दिवाळी हा सण म्हणून साजरा झालेला नसतो, तर तो सुट्टी म्हणून साजरा झालेला असतो, हे आपल्या लक्षात येत नाही. पण हेदेखील लक्षात घेतले पाहिजे की, दहा-बारा वर्षांपूर्वी किंवा त्याच्या आधी समाजातील जो वर्ग फटाके उडवले जात असताना बघायची भूमिका घ्यायचा, तो आता दिवाळीत फटाके उडवायला प्राधान्य देतो. याचे कारण की, समाजात उत्पन्न झालेल्या या आर्थिक बदलांमुळे आणि पैसा हा समाजाच्या थरांमध्ये आपली वाट धरत जाऊ लागल्यामुळे या वर्गाच्या प्राधान्य देण्यात बदल होत गेले आहेत. या वर्गासाठी कपडे खरेदी, नवीन वस्तू विकत घेणे शक्य झाले आहे.

जी गोष्ट दिवाळीची तीच गोष्ट गणेशोत्सवाची. पंधरा वर्षांपूर्वी जो सामाजिक वर्ग सार्वजनिक गणेशोत्सव आयोजित करण्यात आघाडीवर होता, त्याचे प्रतिनिधी आता मंडळांमध्ये क्वचितच दिसतात. ज्या वेळेस समाजावर आर्थिक प्रभाव फारसा नव्हता, तेव्हा लोक त्यांच्या काही ठरावीक दैनंदिन गोष्टींमध्ये मग्न असायचे. परंतु आर्थिक स्वातंत्र्याने प्रत्येक घटकाची त्याच्या ऐपतीप्रमाणे ऐहिक सुखाची झेप वाढवली. अनेक परिवारांमध्ये प्रत्येक सदस्याची एक वेगळी आकांक्षा निर्माण झाली. आर्थिक स्वातंत्र्यामुळे ती प्राप्त करणे शक्यदेखील होऊ लागले. एकत्र कुटुंबपद्धती हद्दपार होताना, आता बऱ्याच वेळेस एकाच कुटुंबात प्रत्येक व्यक्ती आपली स्वतंत्र वाट धरताना दिसते. असे होताना गेल्या काही वर्षांत ‘स्मार्टफोन’ने आपली हजेरी लावून नवीन सामाजिक गणिते निर्माण केली आहेत. यात इंटरनेटची सोय आणि एकूणच झपाट्याने विकसित होणारे त्याचे तंत्रज्ञान, याच्यामुळे ही सारी बाजारपेठ लोकांच्या ‘हातात’ आली आहे. त्यामुळे समाजात आतापर्यंत झालेला बदल (गेल्या वीस वर्षांचा) यापेक्षा पुढील ‘लाइफ स्टाइल’ बदल हा अधिक तीव्र आणि शीघ्र होणार आहे.

सप्टेंबर महिन्यात मुंबईच्या एनसीपीएला एका अनोख्या मैफलीला जाण्याचा योग आला. ती मैफल होती, ‘पेशकार’ या नावाने. ज्यात उस्ताद झाकीर हुसेन याच्या तबल्याचा मिलाफ तिथल्या ‘सिम्फनी ऑर्केस्ट्रा’ (पाश्चात्त्य संगीतातील वाद्यवृंद) बरोबर झाला होता. भारतीय संगीत पद्धती आणि पाश्चात्त्य संगीत पद्धती यांची साम्यस्थळं शोधून हा उपक्रम साध्य झाला, असं उस्तादजी आणि ऑर्केस्ट्रा कंडक्टर झेन दलाल यांनी त्या निमित्ताने भरविलेल्या एका छोट्याशा परिसंवादात सांगितले. आपले म्हणणे विस्तारित स्वरूपात मांडताना दोघे म्हणाले की, संगीत हे भोवती घडणाऱ्या घडामोडींमुळे सतत नवीन स्वरूपात समोर येत असतं. देश स्वतंत्र झाला, तेव्हा पंजाब प्रांतातील व्यक्तीला मध्य-पूर्वेकडील कजरी, झुला हे गीतप्रकार तितके नीटसे माहीत नव्हते. किंवा उत्तरेकडील व्यक्तीला महाराष्ट्रातील संगीतप्रकार नीटसे माहीत नव्हते. देशाची निर्मिती होत असताना अनेक राज्यांतल्या लोकांचे एकमेकांशी संवाद झाले, कलाकार अनेक ठिकाणी जाऊन कला सादर करू लागले. परिणामी, आपली कला देशातील अन्य भागात पोहोचवू लागले. ‘भारतीय’ संगीत हे अशा प्रकारे समृद्ध होत गेले. आता आपण जागतिक पातळीवर उभे आहोत आणि देशांमध्ये वैचारिक देवाणघेवाण होत आहे. पूर्वेचे लोक पश्चिमेकडे जात आहेत, आणि तिथले इथे येत आहेत. अशा वेळेस आपण बदलायचं नाही, असं कितीही ठरवलं तरी आपल्या विचारात अनेक प्रभाव आपसूक येतात. अशा या जागतिक प्रभावांमुळे आमच्याकडून अशा रचना घडतात.
(gune.aashay@gmail.com)
(लेखक मार्केटिंग क्षेत्रात कार्यरत असून समाज आणि संगीत हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.)