Home | Magazine | Madhurima | aatmonnati-yogshastra-madhu

आत्मोन्नतीकडे नेणारे योगशास्त्र

मधुमती निमकर | Update - Jun 04, 2011, 11:25 AM IST

योगसाधनेमुळे अनेक मनोकायिक आजारांचे उच्चाटन होऊन रोगनिवारण होते. म्हणूनच योग ही जीवनशैली बनवली पाहिजे.

  • aatmonnati-yogshastra-madhu

    योग या शब्दाची निर्मिती संस्कृत भाषेतील युज् या धातूपासून झाली असून त्याचा अर्थ जोडणे वा एकत्र आणणे असा आहे. पातंजल योगदर्शन या ग्रंथाची निर्मिती सुमारे 200 वर्षांपूर्वी महामुनी पतंजली यांनी केली. मानवी जीवनाचे अंतिम उद्दिष्ट कैवल्यावस्था आणि त्या अवस्थेप्रत जाण्याचे मुद्देसूद विवेचन या ग्रंथात केले आहे. माणसाचा जीव, त्याचा आत्मा यांचे परमात्म्याशी संयोग पावणे म्हणजेच कैवल्यावस्था किंवा मोक्ष होय. म्हणजेच योगशास्त्र मानवाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी मार्गदर्शन करणारे शास्त्र आहे. मानवी अस्तित्वाच्या सर्व स्तरांमध्ये म्हणजेच शरीर, मन, बुद्धी यांच्या कार्यामध्ये एकसूत्रीपणा आणून त्यांची व्यवस्थित जोडणी करून आत्मोन्नतीकडे नेणारे संतुलित जीवन जगायला शिकवणारे शास्त्र म्हणजे योगशास्त्र होय.
    चित्तात उठणा-या वृत्तींचा निरोध करण्यासाठी योगाची आठ अंगे किंवा आठ टप्पे सांगितलेले आहेत. ते म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. म्हणूनच पातंजल योगदर्शनात नमूद केलेल्या योगाला अष्टांग योग म्हणतात. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपला स्वत:बरोबर आणि इतरांबरोबर सतत काही ना काही व्यवहार सुरू असतो. त्याचा परिणाम म्हणून वेगवेगळ्या प्रतिक्रिया निर्माण होतात, त्या क्लेशकारक असतील तर त्रास होतो. अशा त्रासदायक प्रतिक्रिया अभ्यासाने बदलता येतात. तो अभ्यास म्हणजेच निरोध. निरोध म्हणजे अडवणे किंवा बांध घालणे. त्रासदायक वृत्ती बदलून त्याएेवजी आनंददायी, समाधानकारक वृत्ती निर्माण करण्याचा अभ्यास म्हणजेच निरोध. आपल्या मनात योग्य, आनंददायी भावना रुजवायच्या आणि त्यांच्या मदतीने आपले शरीर व मन यांत संतुलन राखायचे असा या योग शब्दाचा सोपा अर्थ आहे. हे साध्य कसे करायचे हे शिकण्यासाठी आपण पुढील काही लेखांमधून पाहणार आहोत. योगसाधनेमुळे अनेक मनोकायिक आजारांचे उच्चाटन होऊन रोगनिवारण होते. म्हणूनच योग ही जीवनशैली बनवली पाहिजे.

Trending