आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईचा ‘तिरंगी’ पराठा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेत राहणा-या भारतीय ब्लॉगर मुलीने हा ब्लॉग आपल्या आईला अर्पण केला आहे म्हणून ब्लॉगचे नाव ‘आईज रेसिपीज’. ब्लॉगर कोकणी असल्यामुळे आपल्याला अनेक शाकाहारी आणि मांसाहारी तसेच आंतरराष्ट्रीय पदार्थांच्या रेसिपीज http://www.aayisrecipes.com/2008/12/15/vegetable-pongal/ येथे वाचायला मिळतात. खासकरून कोकणी रेसिपीज हव्या असतील तर या ब्लॉगला भेट द्यायलाच हवी. ब्लॉगवरचाMy Lunchbox हा विभाग आपले लक्ष वेधून घेतो. यामध्ये ब्लॉगरने ती आॅफिसमध्ये रोज नेत असलेल्या विविध सोप्या आणि चविष्ट पदार्थांच्या पाककृती दिलेल्या आहेत. तसेच भारतात आल्यावर दक्षिणेकडच्या आपल्या आईच्या परसबागेमधल्या भाज्यांच्या पाककृतीही आपल्याला वाचायला मिळतात. वैशिष्ट्ये म्हणजे त्या झाडांची, फळांची आणि भाज्यांची शास्त्रीय माहिती तर ब्लॉगर आपल्याला सांगतेच, पण लहानपणची एखादी आठवणही शेअर करते त्यामुळे ब्लॉग वाचणे अधिक रंजक होते. परसात असलेल्या कोकमाखाली तिचे आणि तिच्या भावाचे बालपण गेले आहे. ती आणि तिचे सवंगडी कोकमाचे फळ झाडावर तोडायचे. त्याचे वरचे देठ किंवा फूल तोडायचे. तयार झालेल्या भोकातून मीठ आत सोडायचे आणि काडीच्या साहाय्याने गोलाकार फिरवायचे. त्यामुळे मीठ कोकमात सगळीकडे छानसे पसरते. आता छिद्राला तोंड लावून रस चोखायचा. आहाहा! वाचकांना हे छायाचित्रांसह वर्णन वाचताना तोंडाला पाणी नाही सुटले तरच नवल. कोकमाचे साल वाळल्यावर त्याचा आमसूल म्हणून उपयोग होतो. तर वाळलेल्या बियांपासून तेल काढतात. पायांच्या भेगांवर त्याचा उपयोग करतात, अशी माहितीही ब्लॉगर आपल्याला द्यायला विसरत नाही. ‘आई’ ब्लॉगवर अनेक रेसिपीज आहेत ज्या तुम्हाला करून बघायला हरकत नाही. मांसाहारी लोकांसाठी तर या ब्लॉगवर अनेक रेसिपीज नव्याने आहेत. ब्लॉगरचा 11 महिन्यांचा मुलगा ‘डे केअर’मध्ये जातो तेव्हा ब्लॉगर त्याला आवर्जून घरचाच डबा देते. त्यामध्ये पटकन उचलून खाण्यासारखे अनेक पदार्थ असतात. लहान असल्यामुळे रंगीत पदार्थ खाण्यात त्याला मजा वाटते. म्हणून तिने त्याच्यासाठी केलेला खास तिरंगी पराठा ब्लॉगवर पोस्ट केला आहे.
तिरंगी पराठा
साहित्य- 1 कप गव्हाचे पीठ, 1/4 गाजराची पेस्ट, 1/4 पालकाची पेस्ट, 1/4 बिटाची पेस्ट, तिखट, मीठ, गरम मसाला, जिरे पूड, तेल
कृती- गाजर, बीट, पालक वेगवेगळे वाफवून त्याची पेस्ट तयार करा. फार वाफवू नका कारण त्याचा रंग कमी होण्याची शक्यता आहे. गाजराच्या पेस्टमध्ये मावेल इतके पीठ चवीनुसार मीठ, तिखट, गरम मसाला टाकून कणीक भिजवा. त्याचप्रमाणे पालक आणि बिटाची कणीक भिजवून घ्या. आता तिन्ही कणकेची लांब ओळ करून एकमेकांमध्ये अडकवा (वेणी घालतो त्याप्रमाणे). मग छोटे उंडे करून, फार न मिसळता, पराठा लाटून घ्या. तेलावर खमंग भाजून, तिरंगी पराठा, चटणी, सॉस, रायत्याबरोबर खायला द्या.
  shree@marathiworld.com