आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'एबीसीडी'चे व‍िश्‍व

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेत वा इतर परदेशांमध्ये स्थायिक झालेल्या भारतीयांची मुले प्रचंड गोंधळलेली असतात. अमेरिका म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्गच आणि तेथे जायचे हे जवळपास सर्वांचेच स्वप्न असते. मग जे तेथे जातात, राहतात, ज्यांना ग्रीन कार्ड (नागरिकत्व, रहिवासी प्रमाणपत्र) मिळते, ते तेथील स्थायिक नागरिक होतात, त्यांच्या मुलांच्या नशिबाचा हेवाच वाटायला हवा, नाही का? पण मुळात तसे होत नाही. दुरून डोंगर साजरे, अशी आपल्याकडे म्हण आहे. तसेच दुरून अमेरिका साजरी, असे लहान मूल तिकडे वाढवताना इकडच्या पालकांना वाटते. आणि तेथे वाढणा-या त्या लहान मुलाचे काय?


मुलांना तेथे नर्सरी, प्ले ग्रुप, स्कूल, सर्व काही अत्याधुनिक सोयीने सुसज्ज आहेत. काटेकोर काळजी, स्वच्छता, उच्च दर्जाची शैक्षणिक, मैदानी व बौद्धिक खेळाची आधुनिक साधने, वैद्यकीय दक्षता, त्याचबरोबर प्रेमाने संवाद साधत शालेय आणि सामाजिक जीवनाचे शिक्षण देणारे प्रशिक्षित शिक्षकवृंद सारे काही तेथे आहे. असे असले तरी जे भारतीय तेथे नोकरीनिमित्त जातात, स्थायिक होतात त्यांची नवीन पिढी त्याच विदेशी भूमीत जन्म घेते आणि तेथेच वाढते त्या नव्या पिढीचे काही सामाजिक, भावनिक आणि मानसिक प्रश्न आज तेथील पालकांना आणि मुलांना एक आव्हान ठरत आहे. ते आव्हान पेलताना प्रत्येकापुढे वेगवेगळे पर्याय आणि मार्ग आहेत. आपल्याला सुचेल आणि झेपेल तसा मार्ग पालक निवडतात, परंतु या सर्व द्राविडी प्राणायामातून नेमके मुलांच्या भावविश्वावर काय परिणाम होतात हा एक गहन प्रश्न आहे.
या मुलांच्या पालकांची सांपत्तिक परिस्थिती विदेशी चलनामुळे आज सुधारलेली आहे; पण त्यांचे पालक मात्र भारतात आहेत. त्यांना मुलांच्या पैशाची नाही, तर आधाराची आता गरज आहे आणि मुलांना स्वत:च्या मुलांच्या भविष्याची चिंता आहे. अशा दुहेरी कात्रीत ते आहेत. बरे हे पालक जेव्हा नोकरीनिमित्त अथवा उच्च शिक्षणास्तव विदेशात जातात तेव्हा ते सज्ञान असतात. त्यांच्यावर आपल्या संस्कृती, परंपरा, धर्म यांच्या भावना रुजलेल्या असतात. त्यामुळे ते विदेशात गेले तरी धर्म, रूढी-परंपरेची त्यांची नाळ आपल्या जन्मभूमीशी जुळलेली असते. त्यांच्यावर दुस-या संस्कृती, चालीरीतींचा परिणाम होत नाही.


मात्र जेव्हा त्यांचे वैवाहिक आयुष्य तेथे सुरू होते, मुले होतात, प्रपंच वाढतो, तशा काही समस्याही त्यांना भेडसावतात. त्यातली महत्त्वाची समस्या म्हणजे मुलांवर करायचे संस्कार. येथे जे सहज होतात ते तेथे मुद्दाम करावे लागतात. म्हणून बरेच पालक आपल्या मुलांना नर्सरी, प्राथमिक शिक्षणाकरिता आपल्या जन्मगावी आपल्या पालकांकडे पाठवतात. अथवा पत्नी मुलांना घेऊन येथे येऊन राहते आणि त्यांचे शिक्षण करते. जे पालक मुलांना घेऊन तेथेच राहतात त्या मुलांवर घरी भारतीय संस्कार, सणवार, भाषा, देवधर्म, कूळ आणि कुलाचार, यांचे संस्करण होते. तर शाळेत, घराबाहेर असताना, मित्रपरिवारात तेथील चलीरीती, दिनविशेष आणि भाषा व वर्तनाचे पडसाद उमटतात. ही दोन विरुद्ध टोके आहेत. पूर्व-पश्चिमेचा हा जगण्याचा पूर्णपणे वेगळा मार्ग आहे. आणि एकाच वेळी या दोन संस्काराचे अतिक्रमण लहान मुलांवर होते. त्यांच्या भावविश्वात प्रचंड गोंधळ होतो. तो त्यांच्या वागण्याबोलण्यात दिसू लागतो.


आपल्याकडे एक म्हण आहे धोबी का कुत्ता, ना घर का, ना घाट का. तशीच केविलवाणी स्थिती या मुलांची होते. ते तेथेच वाढतात, शिकतात, तेथल्या भूमीत रुजतात, पण ‘एबीसीडी’ म्हणून. ‘एबीसीडी’ म्हणजे अमेरिकन बॉर्न कन्फ्यूज्ड देसी. पूर्णपणे तेथील कल्चर स्वीकारता येत नाही आणि आपले कल्चर तेथे निभावता येत नाही. अशा तारेवरच्या कसरतीत ही निष्पाप, भाबडी मुले आज आहेत. अर्थात हा दोष कोणाचा हा प्रश्न येथे कालबाह्य आहे. पण खरी कुचंबणा अशा मुलांची तेथे होते. मात्र, ही त्यांची मानसिक अवस्था पालक आणि शिक्षक या दोघांच्याही लक्षात येत नाही हे दुर्दैव आहे. हे सर्व लक्षात येते ते बरोबर राहणा-या मित्रमैत्रिणींना आणि म्हणूनच ते त्यांना एबीसीडी म्हणतात. आपल्याकडून पूर्ण सहकार्य करतात. त्यांना मानसिक, भावनिक आधार देतात, तेव्हा कुठे ती तेथील प्रवाहात मिसळतात, पण आपल्या जन्मभूमीपासून नकळत तुटतात.


कधी तरी वेगळा देश, आपल्या आजीआजोबांचे शहर, आईवडिलांचे जन्मगाव म्हणून ते येथे येतात पण देश, घर पाहून झाले, खूप सा-या नातेवाइकांना भेटून झाले की त्यांना परत लवकर तिकडे जाण्याचे वेध लागतात. इकडचे राहणीमान, हवामान आणि समाजजीवन त्यांना भावत नाही. म्हणूनच विदेशात जाणे म्हणजे एका स्वप्ननगरीत जाण्यासारखे आहे पण तेथून पुन्हा परत फिरायचे तर ते स्वप्न भंग होऊन विपन्न वास्तवात येण्यासारखे आहे. हे दाहक सत्य पचनी पडत नाही तेव्हा एबीसीडी मुले देशी-विदेशीच्या सीमारेषेवर अशी कसरत करत राहतात.