अभिजात! / अभिजात!

Jun 02,2011 01:32:56 PM IST

महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक खात्याने राज्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यासाठी म्हणून गेल्या वर्षी मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर भव्य लेझर शो योजला. त्यासाठी अनेकरंगी फोल्डर छापला. त्या फोल्डरमध्ये पहिले पान उलटल्या उलटल्या ठसठशीत शीर्षक होते - 'अभिजात लोककला!' लोककला हे महाराष्ट्राचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. वासुदेव, गोंधळी, शाहीर असे काही कलावंत दोन-तीन दशकांपूर्वीपर्यंत समाजात वावरताना दिसायचे. आधुनिक काळात त्यांना स्थान राहिलेले नाही.
लोकजीवनातून निर्माण व विकसित झाली ती लोककला. लोकांचे आणि कलेचे नाते तेथे अगदी स्पष्ट आणि अभिन्नजीव आहे. लोकांच्या भावभावना व श्रद्धा त्यांमधून व्यक्त होतात. पण आज लोककलांना मन रिझवण्यापलीकडे म्हणजे करमणुकीपलीकडे स्थान राहिलेले नाही. त्यांच्या परत परत उगाळण्याने त्या घोटीव व कसबाने परिपूर्ण होत चालल्या आहेत, परंतु त्यामुळे जनांमधील निर्मितीऊर्जा चेतावली जात नाही; जनांना स्फुरण लाभत नाही, उलट जन संतुष्ट होण्याने समाधान पावत असतात. आणि जी अस्वस्थ, उदास करत नाही ती कसली कला? मला संस्कृतीच्या बरयाच जुन्या खुणा पणतीसारख्या वाटतात. पणत्या नेहमी माळयावर असतात, दिवाळीचे चार दिवस घरात ठिकठिकाणी प्रदर्शित होतात. त्यांचे आपल्या जीवनाशी नाते प्रतीकरूप राहिले आहे. ते किती वर्षे टिकेल आणि पणत्यांना माळयावरही जागा राहणार नाही हे सांगता येईल?


लोककलेमध्ये निर्मितीऊर्जेचा स्वाभाविक व अनघड आविष्कार होत असेल तर अभिजात कलेमध्ये कसणे-कमावणे अभिप्रेत आहे. अभिजाततेमध्ये शास्त्र आहे, नियमबद्धता आहे आणि त्या चौकटी भेदत पुढे जाण्याची मुभादेखील आहे. अभिजाततेमध्ये मूल्यव्यवस्था गृहीत आहे. मूल्यांचा आधार नसेल तर कलेला अभिजात रूप प्राप्त होणे जवळजवळ अशक्य होय.
अभिजात कलाविष्कार आहे कुठे?
कालिदासाच्या 'शाकुंतल'पासून 'ज्ञानेश्वरी'पर्यंतच्या कृती अभिजात संज्ञेस पात्र मानतात. तुकारामाचे अभंग हे लोकांचे धन मानतात.
माझ्यापुढे प्रश्र आहे तो, गेल्या पन्नास-साठ-शंभर वर्षांत असा अभिजात कलाविष्कार दिसून आला का? हा प्रश्र मी पाच-दहा मंडळींना विचारला तेव्हा नि:संदिग्ध उत्तर मिळाले नाही. मग माझ्याच डोळयांपुढे नाव प्रकटले ते सत्यजित राय यांचे. त्यांचे चित्रपट म्हणजे चिरंतन मानवी मूल्यांचा आविष्कार. त्यांचा 'पथेर पांचाली' भारताचे दारिद्र्य दाखवतो यांसारखे आरंभीचे आरोप बघता बघता विरून गेले आणि मागे राहिल्या त्या मन आनंदाने, विषादाने आणि उदासीनतेने भरून टाकणा:या तीन निष्कलंक कलाकृती-'अपू' ट्रिलॉजी! सत्यजित राय आणि मृणाल सेन हे बंगालमध्ये एकाच काळात मोठे झाले.
त्यांनी चित्रपटांत काही समान विषयही हाताळले. परंतु राय यांची परंपरा रवींद्रनाथ, अवनीद्रनाथ, शरदचंद्र यांच्या अभिजाततेची, तर सेन पुरोगामी, आधुनिक, डाव्या, समाजबांधिलकीच्या जाणिवांनी प्रभावित झालेले. थोडे आपल्या सभोवतालात यायचे तर वि. स. खांडेकर, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर हे ज्ञानपीठ पुरस्कार (आणि विजय तेंडुलकर व महेश एलकुंचवार-सरस्वती सन्मान) मिळाल्यामुळे मराठीच्या पलीकडे भारतीय पातळीवर पोचलेले लेखक. वि. स. खांडेकर अजूनही मराठीत व तमीळ-गुजराथीत वाचले जातात. त्यांना मानवी मन जाणून घेणे आणि ते विविध कलांमधून प्रकट होणे याबद्दल अपार आस्था होती हे कोल्हापूरच्या विद्यापीठ आवारात सुनीलकुमार लवाटे यांनी मांडलेले प्रदर्शन पाहताना जाणवते. पण कुसुमाग्रज जसे त्यांच्या कवितांमधून, नाटकांमधून आणि ललित लेखनातून वाचक-प्रेक्षकांचे मन भरून राहतात, त्यांचा संदर्भ आयुष्याला पुरतो; तसे खांडेकर-करंदीकरांचे होत नाही. मी चार-पाच नामवंतांची नावे घेऊन त्यांच्या चिरकालीन, वैश्विक असण्याच्या शक्याशक्यतेचा अंदाज बांधून राहिलो. परंतु लोककलांनाच अभिजात म्हणून मिरवून दाखवण्याचा उतावळेपणा जसा येथे होत आहे, तसा मराठी भाषेलाच 'अभिजात' दर्जा मिळावा म्हणून खटाटोप करण्याचेही सुचवले जात आहे. कारण काय, तर तो तमीळ व कन्नड भाषांना मिळाला, केंद्र सरकारने बहाल केला. मराठी भाषेला अभिजातपणा देण्याच्या मागणीला राजकीय वळण मिळाले की देशपातळीवर थिल्लरपणा सुरू होईल. त्यापूर्वी मराठीची पूर्वपुण्याई जाणलेली बरी! ही भाषा गेल्या हजार वर्षांत महानुभाव-ज्ञानेश्वरांपासून ढोबळ मानाने अस्तित्वात आली. महाराष्ट्र हा स्थलांतरितांचा प्रदेश असल्याने भाषेमध्ये संमिश्रता खूप आहे. तिला शास्त्रीय वळण व नियमबद्धता गेल्या दीडशे वर्षांत, कँडी-एलफिन्स्टन-मोल्सवर्थ अशा ब्रिटिश अधिकाऱ्याच्या पुढाकाराने लाभत गेले. ज्ञानेश्वर-शिवाजी महाराज आणि लोककला हाच मराठीचा वारसा आहे. त्यापलीकडे आहे ते सरकारच्या अधीन असलेले कळाहीन, दिशाहीन सांस्कृतिक जीवन... आपल्या बाब्याला बाबुराव म्हणायचे तसे आपल्या लोककलेच्या अवशेषांना अभिजात म्हणायचे एवढीच आपली झेप!

हे सदर दर आठवड्याला प्रसिद्ध होईल

X