आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Abhijeet Kulkarni About Hotel Nature, Rasik, Divya Marathi

हॉटेल संस्कृतीची भरभराट...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'एकेकाळी हॉटेलमध्ये जाऊन नाष्टा वगैरे तर सोडाच, साधा चहा घ्यायचीदेखील सोय नव्हती. पण आता सदासर्वकाळ सर्व काही उपलब्ध असलेल्या हॉटेलांची चलती दिसते. किंबहुना असेही म्हणता येईल की, हॉटेल संस्कृती बदलत्या जीवनशैलीची ही एक गरज बनून गेली आहे.'

आठवड्याकाठी किमान एकदा तरी सहकुटुंब ‘हॉटेलिंग’ करायचं, ही आता अगदी सामान्य बाब बनली आहे. विशेषत: मोठ्या शहरांतील मध्यमवर्गीय व उच्चमध्यमवर्गीयांच्या दृष्टीने तर ते जणू ‘रुटीन’ झाले आहे. एकेकाळी हॉटेलमध्ये जाऊन नाष्टा वगैरे तर सोडाच, साधा चहा घ्यायचीदेखील सोय नव्हती. पण आता अगदी खेड्यापाड्यांत आणि आडमार्गालासुद्धा सदासर्वकाळ सर्व काही उपलब्ध असलेल्या हॉटेलांची चलती दिसते. किंबहुना असेही म्हणता येईल की, हॉटेल संस्कृती ही बदलत्या जीवनशैलीची एक गरज बनून गेली आहे.
कुठेही गेले तरी हल्ली कोपर्‍यावरच्या चहा किंवा वडा-भज्यांच्या टपर्‍यांपासून अगदी पंचतारांकित हॉटेलांपर्यंत आपापल्या आवडीनुसार, निवडीनुसार आणि इच्छेनुसार पोटापाण्याची सोय उपलब्ध आहे. आपल्याकडे पूर्वापार असलेल्या वैविध्यपूर्ण आणि प्रचंड मोठ्या खाद्यसंस्कृतीला परदेशी आणि काँटिनेंटल खाद्यपदार्थांची जोड मिळाल्याने, ती अधिकच समृद्ध झाली आहे. विशेष म्हणजे, हे सारे घडून आले ते अवघ्या चार-पाच दशकांत. तत्पूर्वी हॉटेल हा व्यवसाय अगदीच मर्यादित प्रमाणात होता. त्यातही त्याचे स्वरूप घरगुती खानावळी किंवा इराणी बेकरी कम हॉटेल असे होते. त्यांचे ग्राहकसुद्धा ठरावीक असत. बरकतीचा व्यवसाय म्हणून त्याकडे पाहण्याची गरजही पूर्वी कुणाला वाटत नव्हती. आलेल्या पाहुण्याच्या पोटापाण्याच्या व्यवस्थेला प्राधान्यक्रम असायचा. अगदी एखादा अनोळखी पाहुणा वा वाटसरू असला, तरी त्याला मेजवानी नाही, पण पोटभर जेवूघालायची आपली एकेकाळची रीत होती. साहजिकच त्या काळी हॉटेल वगैरेची कधी गरज भासली नसावी आणि म्हणून तसे प्रयत्नही झाले नसावेत. कारण ठरावीक चौकटीतली गावांची रचना, ऐसपैस घरे, मुख्यत: शेती व असलेच तर त्याचे जोडधंदे अशी एकूणात समाजरचना आणि त्यावर आधारित जीवनशैली असल्याने ऑर्डरप्रमाणे खाद्यपदार्थ सर्व्ह・करणे वा आपल्याजवळचे खाद्यपदार्थ विकणे वगैरेचा विचारही कुणी केला नव्हता.

कालांतराने संपूर्णपणे शेतीआधारित उपजीविका कमी झाली, तरी ती मुख्यत: व्यवसायाभिमुख होती. बारा बलुतेदारीत घरातलीच माणसे व्यवसायाला जमेल त्या पद्धतीने हातभार लावत असत. त्यामुळे एकत्र व मोठे कुटुंब तसेच राहिले. व्यवसायाची व्याप्ती मर्यादित असल्यामुळे अगोदरची परंपरा फार काही बदलली नव्हती. नोकरीपेशाची वाढ होऊ लागली, तशा नवनव्या संधी उपलब्ध व्हायला लागल्या. निव्वळ दरबारी नोकर्‍यांपेक्षा ब्रिटिशांच्या अ‍ॅडमिनिस्ट्रेशनचे स्वरूप भिन्न होते. त्या गरजेनुसार शिक्षण व नंतर नेमणूक होईल, तेथे नोकरीनिमित्त जाणे-येणे वाढू लागले. नवनव्या व्यवसायांना चालना मिळाली. त्यातूनच आपल्याकडे हॉटेल व्यवसायाची मुहूर्तमेढ घातली गेली. हा क्रम पाहिला तर हॉटेल आणि जीवनशैली यांची सांगड कशी आहे, ते सहज स्पष्ट होईल. अर्थात, त्याला काही लगेच स्वीकारार्हता मिळाली नाही. कारण, सुरुवातीला अनेक ठिकाणी वार लावून जेवायचीदेखील पद्धत होती. अगदीच नाइलाज झाला, तर लोक हॉटेलचा पर्याय स्वीकारत.
(abhijit.k@dainikbhaskargroup.com)