आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सैलावणारे समाजभान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माणूस हा समाजशील प्राणी आहे, हे सर्वमान्य झाले असले तरी बदलत्या जीवनशैलीत मात्र व्यक्ती आणि समष्टीत अर्थात माणूस आणि समाज यामध्ये अधिकाधिक अंतर पडत चालल्याचे दिसते. आता तंत्रज्ञानाच्या अफाट प्रगतीमुळे संपर्काची अनेकविध साधने सहज उपलब्ध होत असल्याने क्षणाचाही विलंब न लावता म्हणजे अगदी ‘रिअल टाइम’मध्ये कुठूनही कुणाशीही संवाद साधणे आवाक्यात आले आहे. मात्र, त्याच वेळी माणूस आसपासच्या मंडळींपासून अधिकाधिक दूर लोटला जात आहे. तांत्रिक संपर्क साधनांच्या विळख्यात तो एवढा गुरफटून जात आहे, की त्यामध्ये जणू त्याचे समाजभानच हरपून चालले आहे. एकेकाळी अनेकांच्या जीवनाचेच एक अंग बनून गेलेल्या सामाजिक चळवळींना सध्या लागलेली घरघर, हे त्याचेच निदर्शक म्हणावे लागेल.

परंपरानिष्ठता आणि रूढिप्रियतेच्या परिणामी आपल्या समाजरचनेत अनेक दोषांचा संचय होऊन जगण्याची एकूण रीतच कालबाह्य होत चालली होती. त्यामुळे एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात समाजसुधारणेची गरज भासू लागली. त्यानुसार अनेक सुधारक पुढे आले आणि एकेक विषयाला प्राधान्य देत, त्यांनी आपापल्या परीने चळवळी सुरू केल्या. लोकांच्या अर्थात समाजाच्या सक्रिय सहभागाविना त्यामागचा उद्देश प्रत्यक्षात येणार नाही, हे ओळखून समविचारी मंडळींचे संघटन होऊ लागले. त्यातून सामाजिक अभिसरण सुरू झाले. कार्यकर्त्यांच्या पिढ्या घडू लागल्या. अनेकांनी तर पूर्ण वेळ एखाद्या विषयाला वाहून घेत कार्य सुरू केले. ज्यांना हे शक्य नव्हते, अशांनी मग त्यासाठी आपल्या परीने जेवढे होईल तेवढे करून कामाला हातभार लावण्यास प्राधान्य दिले. या सगळ्यासाठी दिवसाकाठी किंवा आठवड्याकाठी ठरावीक वेळ दिला जात असे.

मग ती चळवळ वाचनाची असो की एखाद्या अनिष्ट रूढी-परंपरेविरुद्धची. महादेव गोविंद रानडे व त्यांच्या समकालीन अनेक सुधारकांनी सुरू केलेले ग्रंथोत्तेजक मंडळी, वक्तृत्वोत्तेजक मंडळी वा तत्सम उपक्रम अशा चळवळींचे ऊर्जास्रोतच म्हणावे लागतील. त्यानिमित्त एकत्र येणे, चर्चा-वादविवाद करणे, हा तर बहुतेकांच्या जीवनशैलीचाच भाग बनून गेला होता.

सामाजिक चळवळींच्या जोडीने सुरू झालेल्या राजकीय चळवळीने दरम्यानच्या काळात खूपच जोर धरला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर राजकीय चळवळीची तशी गरज उरली नाही, मात्र सामाजिक चळवळींचे अस्तित्व कायम होते. किंबहुना, त्याचे महत्त्वही वाढले होते. पण गेल्या दोन दशकांत आर्थिक क्षेत्रातील संधी वाढत गेल्या. नेमका त्याच सुमारास सामाजिक चळवळींचा भर ओसरत गेला, यातील संगती लक्षात घ्यायला हवी. त्यामागे केवळ आर्थिक भरभराट किंवा नोकरी-व्यवसायाच्या उपलब्ध झालेल्या मुबलक संधी एवढीच मर्यादित कारणे नसून, तांत्रिक प्रगती व त्यामुळे हाती आलेली नवनवी संपर्क माध्यमे, याचाही तो अप्रत्यक्ष परिणाम आहे.

सध्याच्या ‘व्हर्च्युअल’ जगतात युवावर्गाच्या हाती आलेल्या संगणक, मोबाइल व सोशल मीडियामुळे एकुणातच जीवनशैलीचा वा त्याच्या परिणामी चळवळींचाही बाज बदलला आहे. पूर्वीच्या प्रत्यक्षातल्या चळवळींची जागा आता आभासी चळवळींनी घेतली आहे. खरे तर सध्याच्या ‘व्हर्च्युअल’ समाजात समविचारी मंडळींच्या कम्युनिटीज, व्हॉट्सअ‍ॅपचे ग्रुप्स वगैरे या सगळ्यामुळे विचारांचे आदानप्रदान कितीतरी जलद आणि प्रभावी बनले आहे. पण प्रत्यक्षात तिथे अशा प्रकारचे चर्चामंथन फारच कमी होत असते. परिणामी ही साधने म्हणजे सध्या जीवनशैलीतला अपरिहार्य घटक बनली असली तरी त्याचा मुख्य उपयोग वेळ घालवणे, हाच असल्याचे दिसते. या नवनवीन तंत्रांमध्ये गुरफटलेला माणूस त्या माध्यमातून सध्या दूरदूरच्या मंडळींना जवळ करत असला तरी सभोवतीच्या लोकांपासून, समाजजीवनापासून मात्र तो दुरावत चालला आहे, हे या जीवनशैलीचे म्हटले तर वेगळेपण म्हणावे लागेल.