आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विश्व पांथस्थ : अनिवासी मराठी मंडळींचे नवे व्यासपीठ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगाच्या पाठीवर आज अनिवासी मराठी (एनआरएम) माणसांची संख्या झपाट्याने वाढत असली तरी बहुतेकदा त्यांची चर्चा केवळ उद्योग-व्यवसायाच्या निमित्ताने होते. परंतु, आपल्या संस्कृतीचे, साहित्याचे रोपणदेखील ही मंडळी ठिकठिकाणी करत असतात. विविध देशांमध्ये महाराष्ट्र मंडळासारख्या संस्था निर्माण झाल्या असल्या तरी त्यांचे उद्दिष्ट तसे मर्यादित आहे. त्यापुढचे एक पाऊल म्हणून अनिवासी भारतीयांमध्ये निर्मळ संवाद प्रस्थापित व्हावा, या दृष्टिकोनातून ‘विश्व पांथस्थ’ मासिकाचा उपक्रम सुरू करण्यात आला असून, त्याच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन नुकतेच शारजा येथे आयोजित आंतरराष्ट्रीय वाचक मेळाव्यात करण्यात आले. दुबईस्थित उद्योजक संदीप कडवे हे या मासिकाचे संपादक आहेत.

आजकाल डिजिटल स्वरूपातील ऑनलाइन नियतकालिकांची चलती असली, तरी कडवे यांनी हेतुपुरस्सर हे मासिक पारंपरिक मुद्रित स्वरूपात प्रकाशित करण्यावर कटाक्ष ठेवला आहे. ऑनलाइन स्वरूपातील वा सोशल मीडियावरील मजकूर अनेकदा दुर्लक्षिला जातो. मात्र, मुद्रित माध्यमाद्वारे लोकांपर्यंत पोहाेचल्यास त्याची निश्चितपणे अधिक गांभीर्याने दखल घेतली जाते, असे कडवे यांचे म्हणणे आहे. त्यानुसार हा प्रथम अंक प्रकाशित करण्यात आला असून, त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या युएई भेटीचा साद्यंत वृत्तांत आहे. ज्ञानपीठ विजेते भालचंद्र नेमाडे यांच्याशी संवाद साधताना त्यामध्ये अनिवासी मराठी हा विषय केंद्रस्थानी ठेवण्यात आला आहे. आजवर शंभरहून अधिक होतकरू मराठी तरुणांना युएईमध्ये आणणारे अभय पाटणे यांच्यावरचा प्रकाशझोतदेखील आगळावेगळा आहे. याशिवाय सिंगापूर, युरोप यांची शब्दसफर, दुबईतील खाद्यभ्रमंती, परदेशात राबविला जाणारा ‘ग्रंथ तुमच्या दारी’ उपक्रम अशा विविधांगी मजकुराने अंक समृद्ध आहे. जगभरात विखुरलेल्या मराठीजनांसाठी ‘विश्व पांथस्थ’चा हा प्रयोग नक्कीच सुखावणारा ठरेल, असा विश्वासही कडवे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केला.

भूतान येथे पुनर्प्रकाशन
‘विश्व पांथस्थ’च्या प्रथम अंकाचे पुनर्प्रकाशन भूतान येथे गेल्या आठवड्यात पार पडलेल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाप्रसंगी करण्यात आले. पांथस्थ याचा अर्थ फिरस्ता. परंतु फिरताना केवळ स्वत:साठी गोळा करत जायची त्याची प्रवृत्ती नसते. देशाटन केल्याने, फिरल्याने येणारा सूज्ञपणा मात्र अत्यंत महत्त्वाचा असतो. याच तत्त्वावर ‘विश्व पांथस्थ’ची रचना करण्यात आली आहे.

बहुआयामी व्यक्तिमत्त्व
‘विश्व पांथस्थ’चे संपादक असलेल्या संदीप कडवे यांचा आजवरचा प्रवास अनेक वळणावळणांनी झाला आहे. मूळ नाशिककर असलेल्या कडवे यांची कौटुंबिक पार्श्वभूमी तशी सर्वसामान्य. नाशिकमध्ये माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर एम.बी.ए. केले आणि नोकरी करताना अर्थशास्त्रात डॉक्टरेट प्राप्त केली. दरम्यान, कॅपिटल मार्केटमध्ये रस असल्याने त्यांनी त्याविषयी लिखाण सुरू केले. त्या वेळी इंटरनेटचे पर्व नुकतेच कुठे सुरू झाले होते. हे तंत्रज्ञान आपलेसे करत कडवे यांनी ‘ई-स्ट्रॅटेजिस्ट’ म्हणून काम सुरू केले आणि काही कंपन्यांना ‘ई-सपोर्ट’ द्यायला सुरुवात केली. त्यातूनच साधारणपणे दीड दशकापूर्वी त्यांना दुबईला येण्याची संधी मिळाली. अवघ्या दोनच वर्षांत त्यांनी स्वत:ची कंपनी सुरू केली. आज मॅनेजमेंट इन्व्हेस्टमेंट टेक्नॉलॉजी कन्सल्टंट या त्यांच्या कंपनीचा गुंतवणूक क्षेत्रात दबदबा आहे. २०११ मध्ये नॉलेज पार्टनर्स पब्लिकेशन ट्रेडिंगच्या निमित्ताने त्यांचा प्रकाशन व्यवसायाशी निकटचा संबंध आला आणि गेल्या वर्षभरापासून त्यांनी प्रारंभ केलेल्या ‘विश्व पांथस्थ’ने आता मूर्त स्वरूप घेतले आहे. जगभरातील मराठीजनांच्या अभिव्यक्तीसाठी यानिमित्ताने एक समर्थ व्यासपीठ उभारण्याचा कडवे यांचा मानस आहे.

अभिजित कुलकर्णी
बातम्या आणखी आहेत...