आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपखुशीचा दास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फायलींचे गठ्ठे, कागदांचे ढीग अन् कळकट्ट कचे-या... हा आताआतापर्यंत आपल्याकडच्या सरकारी कार्यालयांचा जणू स्थायीभाव बनला होता. बँका, विमा किंवा तत्सम कार्यालयांची स्थिती त्यापेक्षा काहीशी बरी अन् तुलनेने अधिक टापटीप. पण मोजके आणि साधेसे फर्निचर असणारी खासगी कार्यालये, असे चित्र आपल्याकडे वर्षानुवर्षे पाहायला मिळत होते. पण गेल्या दीड-दोन दशकात अत्यंत झपाट्याने रुळलेल्या आधुनिक ‘वर्क कल्चर’मुळे सरकारी आस्थापना असोत की कॉर्पोरेट हाउसेस; या सगळ्यांचाच चेहरामोहरा आमूलाग्र बदलला आहे. संगणकीकरण, कॅफेटेरिया, फन झोन, गेम झोन, वायफाय अशा हायफाय सुविधांनी युक्त चकाचक कार्यालयांचा नवा ट्रेंड अल्पावधीत चांगलाच रुळला आहे. मात्र या बदलांमुळे कामाचा ताण हलका होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत चालल्याचा विरोधाभास, नजरेत भरल्याशिवाय राहत नाही.
तंत्रज्ञानाची प्रगती आणि त्याचा झपाट्याने होत असलेला प्रसार यामुळे कार्यालयांचा केवळ ‘लूक’च बदलतोय, असे नव्हे; तर त्यातून निर्माण होणा-या आगळ्यावेगळ्या कार्यपद्धतीमुळे एकुणातच नवी जीवनशैली उदयास येत आहे.
कामाच्या ठिकाणी कर्मचा-यांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून दिल्या, त्यांच्या कामातले अडथळे हटवण्यावर लक्ष केंद्रित केले तर त्यांची कार्यक्षमता वाढेल, हा त्यामागचा हेतू आणि ‘वर्क कल्चर’ अर्थात कार्य संस्कृती रुजावी, हा मुळातला विचार. त्यानुसार विविध प्रकारच्या भौतिक सुविधा कर्मचा-यांना उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाऊ लागला. या नव्या संकल्पनेमुळे कामाच्या ठिकाणी जास्तीत जास्त सकारात्मक-पोषक वातावरण निर्माण करून देण्यावर भर दिला जाऊ लागला. केवळ ‘व्हाइट कॉलर’वाल्यांसाठी नव्हे, तर ‘ब्लू कॉलर’ म्हणजेच कामगारवर्गाचा विचारसुद्धा त्यामध्ये होऊ लागला, हे विशेष. पूर्वीच्या कार्यालयांमध्ये मुख्यत: दैनंदिन कामकाजासाठी जे गरजेचे आहे, तेवढ्यापुरताच विचार होत असे. त्यामुळे आस्थापनांचे एकूण स्वरूप अत्यंत मर्यादित होते. टेबल, खुर्ची, कागद, पेन एवढी मर्यादित सामग्री कार्यालय सुरू करण्यासाठी पुरेशी ठरायची. आता मात्र त्यामध्ये आमूलाग्र बदल झाला आहे. वर उल्लेख केलेल्या मूलभूत गरजांबरोबरच जवळपास प्रत्येक टेबलावर कॉम्प्युटर वा लॅपटॉप, इंटरनेट, एसी (किमानपक्षी पंखा), कर्मचा-यांच्या येण्या-जाण्याची स्वतंत्र व्यवस्था किंवा त्यासाठीचा भत्ता, इतर आनुषंगिक सुविधा यांचा अंतर्भाव नोकरी या संकल्पनेत असावाच लागतो. अर्थात, अशा सुविधा देताना कर्मचा-यांकडून त्या बदल्यात चांगल्या मोबदल्याची अपेक्षा असतेच. त्यामुळे पूर्वीसारखे ठरावीक वेळेत आणि चाकोरीतले काम ही बाबसुद्धा आता इतिहासजमा झाली आहे. किंबहुना, नोकरी-व्यवसायाच्या बदलत्या स्वरूपामुळे कामकाजाला काळ-वेळेचे बंधन राहिलेले नाही. प्रत्यक्ष कामाच्या वेळा तर बदलल्या आहेतच; पण बैठका, प्रवास, बिझनेस मीट्स, पॉवर डिनर्स हादेखील आता जणू कामाचाच एक अविभाज्य भाग बनून गेला आहे. त्यामुळे रूढार्थाने प्रत्यक्षात ज्याला काम म्हणतात, ते जरी या प्रक्रियेत होत नसले तरी या बाबी अप्रत्यक्षरीत्या कामाशीच निगडित असल्याने त्या टाळूनदेखील चालत नाही. ही तंत्रे सांभाळता सांभाळता, मग सकाळी उठण्यापासून रात्री झोपेपर्यंतच्या वेळा बदलत जातात आणि ‘रूटीन’ असे काहीच राहत नाही. तंत्रज्ञानामुळे हाती आलेले मोबाइल, कॉम्प्युटर, लॅपटॉप, आयपॅड, टॅब म्हणजे तर असून अडचण नसून खोळंबा, असा प्रकार झाला आहे. कारण, म्हटले तर त्यामुळे दैनंदिन कामकाजात सुलभता येत असली, तरी तुम्ही दिवसाचे चोवीस तास ‘कनेक्ट’ राहत असल्याने कार्यालयात नाही म्हणजे कामापासून पूर्णत: अलिप्त, असे होत नाही. उलट घर-दार, सण-समारंभ किंवा पार्टी-पिकनिक कुठेही असो; मोबाइल घणघणला की आपण आपसूकच कामाला लागतो. अगदी प्रत्यक्ष कामाला जुंपले जात नसलो, तरी डोक्यात त्यासंबंधी विचारांची गर्दी होते आणि मन त्या दिशेने जाऊ लागते. म्हणजे, ही आयुधे एक प्रकारे आपल्याला सदैव कामात गुंतवून ठेवतात. पण बदलत्या काळात असे तंत्रज्ञानाच्या आहारी जाणे, आपण स्वत:हून अंगवळणी पाडून घेतले आहे. कारण, असे न करणे म्हणजे तंत्रज्ञान नाकारण्यासारखे आहे. जसे 1980च्या दशकात आपल्याकडे कॉम्प्युटरला प्रखर विरोध झाला. त्यामुळे देशातली बेरोजगारी वाढेल, असा संबंधितांचा दावा होता. पण प्रत्यक्षात गेल्या दोन दशकांत सर्वाधिक नोक-या आणि त्यादेखील चांगल्या दर्जाच्या, याच क्षेत्रात निर्माण झाल्या असल्याची वस्तुस्थिती नाकारण्यात अर्थ नाही. त्यामुळे काळाबरोबर राहायचे तर बदल अंगीकारण्याशिवाय पर्याय नाही. सध्याचे ‘वर्क कल्चर’ हे अशा बदलांचा परिपाक आहे आणि आपण सर्व जण आपखुशीनेच त्याचे दास बनत आहोत.
abhijit.k@dainikbhaskargroup.com