आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वसुधैव कुटूंब'कम'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हल्ली काय सगळं बदलत चाललंय... असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा ‘सगळं’ यामध्ये बहुतेकदा आपल्याला भोवताल/भवताल अपेक्षित असतो. त्यातही आपली जीवनशैली मुख्यत: निगडित असते, ती जीवन पद्धतीशी. कुटुंबव्यवस्था हा जीवन पद्धतीवर प्रभाव पाडणारा तसेच परिणामही करणारा पहिला घटक. एकत्रित कुटुंब हा अनेक शतके आपल्या भारतीय जीवन पद्धतीचा पाया राहिला आहे. पण, गेल्या काही वर्षांत विविध कारणांमुळे एकत्र कुटुंब व्यवस्थेला तडे जात असून त्याच्या परिणामी आपली जीवनशैली बदलत चालली आहे किंवा असेही म्हणता येईल की, बदलत्या ‘लाइफ स्टाइल’मुळे एकत्र कुटुंब व्यवस्था सैलावत आहे.
भारतीय परंपरेचा अभिमान बाळगणा-या सगळ्यांनाच असे वाटत असते की, एकत्रित कुटुंब पद्धती ही अत्यंत आदर्श होती आणि सध्या मूल्यांचा वगैरे झपाट्याने -हास (जो मागच्या पिढीच्या मते, पुढच्या पिढीकडूनच होत असतो!) होत असल्याने ती मोडीत निघत आहे. संस्कारांची कमतरता, नव्या पिढीची आत्मकेंद्री वृत्ती, ज्येष्ठांबद्दलचा अनादर, पाश्चात्त्य संस्कृतीचा पगडा, स्वैराचारी वर्तणूक वगैरे कारणे त्यासाठी दिली जातात. पण, ही कारणे तशी तात्कालिक किंवा वरवरची म्हणावी लागतील. फक्त मतभेद, पिढीतील अंतर अथवा विचारसरणी अशी कारणे एकत्रित कुटुंब पद्धती मागे पडण्यामागे आहेत, असे नव्हे. जरा आणखी खोल जाऊन विचार केला तर लक्षात येते, की त्यामागे मुख्यत्वेकरून आहे ते बदलते अर्थकारण आणि तंत्रज्ञानाचा अविरत विकास.
विशेषत: शहरी भागाचा विचार करता घरांचे वा जागांचे प्रचंड प्रमाणात वाढलेले दर आणि त्यामुळे घर खरेदी किंवा ते भाड्याने घेतेवेळी कराव्या लागणा-या आर्थिक तडजोडींचा मुद्दा सर्वप्रथम उपस्थित होतो. एकत्रित कुटुंबातील सदस्यसंख्येचा विचार करता ‘वन किंवा टू बीएचके’ची मर्यादा तशी सगळ्यांसाठीच त्रासदायक ठरते. एवढ्या कमी जागेत मोठ्या कुटुंबाने नांदण्याची अपेक्षा करणेच गैरलागू आहे. त्यातही पुन्हा घरात जेवढी माणसे अधिक तेवढ्या त्यांच्या आवडी-निवडी वेगवेगळ्या. तंत्रज्ञानामुळे हाती आलेल्या निरनिराळ्या बाबी पाहता त्यातून आणखीनच नव्या समस्या उभ्या राहण्याचा संभव. जसे, टीव्हीवर एकाच वेळी मुलांना कार्टून, तरुणांना म्युझिक किंवा स्पोर्ट्स, मध्यमवयीनांना बातम्या, महिलांना कौटुंबिक मालिका, वृद्ध मंडळींना आस्था वा तत्सम धार्मिक चॅनेल्स पाहायची असल्यास, यातला ‘ट्विस्ट’ आणखीनच वाढणार. परिणामी, लहानसहान कारणांवरून हेवेदावे, कुरबुरींना निमंत्रण मिळणार, हे वास्तव नाकारून चालणार नाही.
याशिवाय, उद्योग-व्यवसायाचे बदललेले स्वरूप, त्यानुसार लवचिक झालेल्या कामाच्या वेळा, आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्णतेकडे महिलांचा वाढत असलेला कल, दररोजच्या गतिमान जीवनात निर्माण झालेली स्वत:च्या ‘स्पेस’ची निकड, त्यातून ‘प्रायव्हसी’ची वाढलेली जाणीव अशा अनेक बाबी बदलत्या लाइफ स्टाइलमध्ये दिसतात; ज्या एकत्र कुटुंब व्यवस्थेशी बिलकूल मेळ खात नाहीत. आता या सगळ्या बाबी संबंधित आहेत त्या आर्थिक, सामाजिक वा वैयक्तिक स्वरूपाच्या मुद्द्यांशी. बरे त्यामध्ये फार काही वावगे आहे, असेदेखील नाही. उलट सध्याच्या काळात त्या ‘प्रॅक्टिकल’च म्हणाव्या लागतील. एका अर्थाने याच ‘प्रॅक्टिकल अ‍ॅप्रोच’वर एकेकाळची एकत्रित कुटुंब पद्धतीदेखील बेतलेली होती. कारण एकत्रित कुटुंब पद्धती रुजण्यामागेही तसे पाहिले तर आर्थिक-सामाजिक कारणेच अधिक होती. शेती हे उपजीविकेचे साधन आणि बारा बलुतेदारी हे प्रमुख व्यवसाय होते. त्यातील सर्व उत्पादनांसाठी मनुष्यबळावरच मुख्य भिस्त होती. साहजिकच व्यवसायाला हातभार लावण्यासाठी घरातली मंडळी जेवढी अधिक तेवढे बरे, असा हिशेब असे.
आज मात्र ती स्थिती नाही. तंत्रज्ञानामुळे मोठमोठी यंत्रसामग्री हाती आल्याच्या परिणामी शेतीसह सगळ्याच व्यवसायांचे स्वरूप आमूलाग्र म्हणावे, असे पालटले आहे. औद्योगिक क्रांतीनंतर उद्योग-व्यवसायाच्या ज्या अफाट संधी निर्माण झाल्या, त्यामुळे परंपरागत व्यवसायातून माणूस अन्यत्र शिरकाव करू लागला. संपूर्ण समाजव्यवस्था एकप्रकारे ढवळून निघाली. स्वयंपूर्ण ग्राम अशा स्वरूपाची गावकेंद्रित रचना अस्तंगत होऊन शहरांची भरभराट होऊ लागली. स्वत:च्या उत्कर्षासाठी अनेक जण गावाबाहेर पडू लागले. त्यातून अर्थकारण व समाजकारण बदलत गेले आणि मोठ्या कुटुंबाऐवजी ‘हम दो हमारे दो’ अशी कालसुसंगत नवी कुटुंबव्यवस्था रुजली. आता तर त्याच्याही किती तरी पुढे जमाना गेला आहे. आयटीच्या उदयामुळे तर शेकडो प्रकारच्या नवनव्या संधी समोर आहेत. पण, त्याच वेळी कामाचे स्वरूप, त्याच्या वेळा यासुद्धा अनेकदा परदेशातील ग्राहक अथवा पुरवठादार यांच्या सोयीनुसार ठेवणे भाग पडते आहे. इतर क्षेत्रांमध्येसुद्धा कमी-अधिक फरकाने कामाची व्याप्ती सातत्याने वाढत असल्याने प्रत्येक जण अत्यंत ‘बिझी’ झाला आहे. त्यानुसार त्याचे प्राधान्यक्रम बदलत चालले आहेत. या ओघात आजी-आजोबा, काका-काकू, आत्या वगैरे मिळून किमान 10-12 जणांच्या एकत्रित कुटुंबात समायोजन कसे साधणार? या सगळ्या धबडग्यात स्वत:ला जो वेळ मिळतो तो स्वत:साठी, स्वत:च्या मर्जीप्रमाणे का नाही व्यतीत करायचा, असा सरळ साधा हिशेब नवी लाइफ स्टाइल अंगीकारताना केला जातो. त्यातूनच अत्याधुनिक तंत्रज्ञान, इंटरनेट वगैरेमुळे एकीकडे ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरल्याचा भास होत असताना दुसरीकडे लिव्ह इन, सिंगल पॅरेंट अशा नव्या काळाच्या नव्या संकल्पनांमुळे सध्याची त्रिकोणी-चौकोनी कुटुंबे येथून पुढे दुहेरी अथवा एकल जरी झाली, तरी आश्चर्य वाटायला नको.