आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Abhijit Kulkarni Article About Celebration, , Divyamarathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आस 'सेलिब्रेशन'ची

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


आपण मुळातच उत्सवी संस्कृतीचे पाईक. त्यामुळे एखादी गोष्ट साजरी करण्याची परंपरा इथे फार अगोदरपासून रुजली आहे. एवढेच नव्हे, तर त्याची सांगड पूर्वापार आपल्या जीवनव्यवहाराशी घातली गेल्याने निमित्त कोणतेही असो; ते साजरे कसे करायचे, याविषयी आपल्याला खरे तर कुणी सांगायची गरज नाही. पण वर्षानुवर्षे अव्याहतपणे सुरू असलेल्या ‘साजरं’ करण्याच्या या पद्धतीत मात्र आता काळानुरूप झपाट्याने बदल होत आहेत. साहजिकच साजरं होण्याला ‘सेलिब्रेशन’चा तोंडवळा मिळू लागला आहे. परिणामी अलीकडे सेलिब्रेशनचे प्रमाण जसे वाढत आहे, तसेच त्याचे स्वरूपसुद्धा बरेचसे लवचिक बनल्याचे पाहायला मिळते.

प्राचीन काळापासून धार्मिक सण-उत्सवांची आपल्याकडे अगदी रेलचेल असल्याने त्यानिमित्त विविध प्रकारे आनंदोत्सव साजरा केला जायचा. त्याद्वारे व्यक्त होणं किंवा साजरं होणं ओघाने येत असलं तरी या सगळ्याचा केंद्रबिंदू देवादिकांवर असायचा. त्यामुळे आपसूकच त्याला एक चौकट लाभायची. ठरावीक दिवशी, ठरावीक वारी, ठरावीक कालावधीत हे उत्सव वगैरे साजरे होत असल्याने आणि विशिष्ट पद्धतीने त्याची आखणी केली जात असल्याने त्याचा आराखडा निश्चित झालेला असायचा. थोरामोठ्यांच्या मतानुसार व शिकवणीनुसार वर्षानुवर्षे हा परिपाठ चालत आल्याने त्याची जणू एक परंपरा बनून जायची. तशाच प्रकारे मग ठरावीक साच्यात ते ते पर्व साजरे व्हायचे. कालांतराने सामाजिक रचना राजेशाही केंद्रित बनली. त्यामुळे धार्मिक सण-उत्सवांव्यतिरिक्त ‘सेलिब्रेशन’ला इतरही निमित्तांची जोड मिळाली. जसे, राजे-रजवाडे वा आमीर-उमरावांनी मैदान मारले अथवा त्यांच्या घरी एखादे कार्य वगैरे असले तर संपूर्ण टापूमध्ये जोरदार सेलिब्रेशन व्हायचे. पण राजेशाही व्यवस्था रुळल्यानंतरच्या काळात बहुतांश राजे-सरदारांची जीवनशैली सुखासीन किंबहुना ‘खाओ-पिओ ऐश करो’ अशी बनत गेली. त्यामुळे त्यांच्या पातळीवर दररोजच ‘सेलिब्रेशन्स’ चालत. पण मुळात संख्येने अशी मंडळी अगदीच अल्प म्हणजे जेमतेम हाताच्या बोटावर मोजण्याएवढी असल्याने केवळ विशिष्ट वर्तुळापुरती ही संकल्पना मर्यादित होती. तरीदेखील दररोजच्या कष्टप्रद जीवनात चार घडीचा का होईना; माणूस विरंगुळा शोधत आला आहेच. त्यानुसार मग सेलिब्रेशन्सची सांगड व्यवसायांशी घातली जाऊ लागली. शेतीनिष्ठ प्रदेशातील सुगी हे त्याचे ठळक उदाहरण म्हणता येईल. अशा रीतीने साजरे होण्यासाठी निमित्तांचा सुकाळ झाला असला तरी तोपर्यंतचे साजरे होणे आणि आजचे साजरे होणे यात अनेकार्थाने फरक आहे. पूर्वी साजरे होणे अथवा करणे म्हटले की साधारणपणे त्याचे स्वरूप असायचे सार्वजनिक वा सामूहिक. त्यामुळे जे काही साजरे करायचे ते एकत्रितपणे किंवा असेही म्हणता येईल की, त्यासाठी सगळे एकत्रित जमत. पण आता हे साजरे करणे अधिकाधिक प्रमाणात वैयक्तिक किंवा व्यक्तिकेंद्री होत आहे. मग वाढदिवस असो, नवीन नोकरी असो, प्रमोशन असो, वा एखादी खरेदी असो; कुठलेही निमित्त सेलिब्रेशनला पुरते. त्याहीपुढे जाऊन आपला संघ मॅच जिंको की थंडी-पावसात वाढ होवो, हल्ली पहिला विचार मनात डोकावतो ते सेलिब्रेशनचा. जणू ते आपल्या जीवनशैलीचा एक भाग होऊन गेले आहे. अर्थात, साजरे होण्याच्या पद्धतीतसुद्धा कालौघात अनेक बदल झालेले पाहायला मिळतात. अगोदर सेलिब्रेशन्स मुख्यत: होत असत दिवसाच्या वेळी. त्यामुळे खाण्यापिण्याचा बेतदेखील त्याला साजेसा असे. सुग्रास भोजन आणि सोबत पंचपक्वान्नांची पंगत हा खाशा बेत असायचा. पण आता खाण्यापिण्याच्या बाबतीत खूपच वैविध्य आले आहे. साध्या स्नॅक्सपासून ते काँटिनेंटल फूडपर्यंत सगळ्याचा समावेश त्यामध्ये असतो. किंबहुना खाण्यापेक्षाही पिण्याच्या विषयावर अधिक जिव्हाळ्याने विचार होताना दिसतो. निमित्त जास्त जोरकस असेल किंवा कंपनी बहारदार असेल तर त्याला डीजे वगैरेंची जोड मिळून माहोल अधिक रंगतदार बनवण्याकडे कल असतो. एकुणातच प्रत्येक क्षण जगून घेण्याची आणि मिळेल तो मोका साजरा करण्याची मानसिकता वाढीस लागलेली दिसते. दैनंदिन जीवनातीलधकाधकी जेवढी जास्त, तेवढीच सेलिब्रेशनची ही आसदेखील या बदललेल्या जीवनशैलीत वाढत चालल्याचे जाणवल्याशिवाय राहत नाही.
(abhijit.k@dainikbhaskargroup.com)