आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Abhijit Kulkarni Article About Lifestyle, Divya Marathi

नव्या जगाचे बिंब-प्रतिबिंब

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मध्ययुगीन काळापासून गाव किंवा खेडे हे भारतीय समाजजीवनाचे व्यवच्छेदक लक्षण बनून गेले आहे. शेकडो वर्षांच्या काळात भारतामध्ये स्वकियांद्वारे वेळोवेळी सत्तापालट झाले, अनेक परकीय आक्रमणे आली, राजघराणी-शाह्या बदलल्या; पण ग्रामीण जनजीवन त्यामुळे फार प्रभावित झाल्याचे दिसले नाही. सत्ताबदल कितीही झपाट्याने झाले, तरी इथल्या ग्रामीण भागाने सामाजिक, आर्थिक पातळ्यांवर आपले स्वत्व टिकवून धरण्यातच धन्यता मानली. मात्र, साठच्या दशकात नॉर्मन बोरलॉग यांच्या प्रयत्नांतून घडून आलेली हरितक्रांती, सत्तर-ऐशींच्या दशकांत बहरत गेलेले दूरदर्शनपर्व, सॅम पित्रोदाप्रणीत संपर्क क्रांती या टप्प्यांनंतर ग्रामीण जीवनशैली उत्तरोत्तर बदलत गेली. गेल्या दीड-दोन दशकांतील तंत्रज्ञानाच्या मायाजालाने तर हे चित्र बहुतांशाने बदलल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे, हा बदल आचाराबरोबरच विचारांमध्येही झाल्याचे जाणवते. जीन्स आणि टी शर्ट घालून ट्रॅक्टर चालवणारा शेतकरी, नवीन मेकच्या दुचाकी-चारचाकींवर लीलया राइड करणारा अथवा अँड्रॉइडवर सफाईदार बोटे फिरवणारा ग्रामीण तरुण आज लौकिकार्थाने ‘गावठी’ अजिबातच राहिलेला नाही.

हा बदल केवळ भौतिक पातळीवर दिसतो, असे नव्हे; तर त्याच्या विचारातही तो डोकावल्याशिवाय राहत नाही. त्यामुळेच केवळ पारंपरिक पद्धतीने शेती करण्यात समाधान मानण्यापेक्षा शेती अर्थकारणाचा वेध घेण्याचा त्याचा प्रयत्न दिसतो. तरुणांमध्ये बदल स्वीकारण्याची व अंगिकारण्याची मानसिकता अधिक असल्याने प्रातिनिधिक स्तरावर त्याचा उल्लेख केला असला, तरी एकूणात खेड्यापाड्यांतली संपूर्ण लाइफ स्टाइल कशी झपाट्याने बदलत चालली आहे, याची चुणूक त्यावरून पाहायला मिळते.

तसे पाहता, कोणतेही नवे बदल आपल्याकडे चटकन स्वीकारले जात नाहीत. त्यामुळे कोणतेही नवे तंत्रज्ञान आले की, त्याकडे प्रथम जरा साशंक नजरेतूनच पाहिले जाते. या बदलांमुळे जणू आता आपल्या थोर व प्राचीन संस्कृतीवर आघात होणार असल्याचे आवडते तुणतुणे वाजवायला तथाकथित संस्कृतीरक्षक सरसावतात. काही आगळेवेगळे करायचे म्हटले, की हे काही तरी भलतेच फॅड असल्याचा आक्षेप ही मंडळी प्रथम घेतात.

त्यावर उच्चरवाने चर्चा सुरू होते. परिणामी, कोणत्याही वेगळेपणाला नाकं मुरडण्याचा स्वभाव बनत जातो आणि एक प्रकारची बंदिस्त म्हणावी, अशी सामूहिक मानसिकता रुजत जाते. त्यातूनच बदलाला विरोध करण्याची वृत्ती फोफावते. प्राचीन काळापासून आपली समाजरचना ग्रामकेंद्री असल्यामुळे तिथे पिढ्यान्पिढ्या बहुतांशाने ही वृत्ती रुजत आणि दृढही होत गेली. आपल्याकडे ग्रामीण भागाला बदलाचे वारे फारसे मानवत नसल्याचे जे वर म्हटले आहे, त्यालादेखील हीच पार्श्वभूमी कारणीभूत असल्याचे म्हणावे लागेल. तथापि, अलीकडे मात्र ही मानसिकता बर्‍याच अंशी बदलताना दिसत आहे आणि त्यामागे आहे तंत्रज्ञानाची किमया.

गेल्या दीड-दोन दशकांमध्ये ज्या झपाट्याने तंत्रज्ञानाचा विकास झाला आणि ते सर्वसामान्यांच्या हाती आले; त्यामुळे जग कुठे चालले आहे, त्याची जाणीव प्रकर्षाने होऊ लागली. त्यातूनच आता आपणसुद्धा बदलायला हवे, या दिशेने विचार सुरू झाला. त्याचाच परिणाम आता दृश्य स्वरूपात म्हणजे वागण्या-बोलण्यातून दिसू लागला आहे. जसे, पूर्वी गावागावांत अन्य काही नाही तरी पानपट्टी जरूर असायची. आज अगदी लहानशा खेड्यात गेले, तरी सायबर कॅफे किंवा त्यापेक्षाही मोबाइल विक्री-दुरुस्तीचे दुकान दिसतेच दिसते. अगदी मळ्या-खळ्यातल्या घरांवरचा डिश अँटिनासुद्धा नजरेत भरल्याशिवाय राहत नाही. या सगळ्याचा परिणाम ग्रामीण जीवनशैलीवर झाला आहे. इंटरनेट वगैरेमुळे केवळ माहितीच मिळतेय, असे नाही; तर त्यामुळे ग्रामीण भागातले जीवन समृद्ध होत आहे. आपला शेतमाल बाजारात आणण्यापूर्वी शेतकरी आसपासच्या वा मुंबईच्या घाऊक बाजारात त्याचे काय दर आहेत, हे या माध्यमातून जोखून घेऊ लागला आहे. त्याचप्रमाणे हवामानाचा अंदाज असो, की शेतीविषयक एखादे संशोधन असो; ते त्याच्यासाठी अगदी सहजतेने उपलब्ध आहे. जे उपयुक्त आहे ते वापरात रुळतेच, या सिद्धांतानुसार आज या सगळ्या बाबी आपल्याकडे रुजत आहेत. परिणामी, ग्रामीण भागातल्या माणसालादेखील तुलनेने अधिक ‘एक्स्पोजर’ मिळू लागले आहे. माध्यमांच्या वाढत्या प्रभावामुळे त्याचे व्यक्तिमत्त्व अधिक ‘बोल्ड’ होऊ लागले आहे. भाषा, उच्चार यामध्येही बदल घडून येत आहेत. परीघ विस्तारल्याने आता फक्त गावापुरता विचार न करता उद्योग-व्यवसाय, करियर याच्या नवनव्या संधी तो शोधू लागला आहे. केवळ गावगुंडीत अडकून न पडता नवनव्या फॅशन किंवा हेअरकट बरोबरच स्पर्धा परीक्षा, त्याची तंत्रे अशा गप्पा आता पारावर रंगू लागल्या आहेत. हे सारे बदलत्या जीवनशैलीचेच प्रतिबिंब आहे...