आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Abhijit Kulkarni Article About Politics, Divya Marathi

पहिले ते राजकारण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकसभा निवडणुकांमुळे सध्या सगळे वातावरण राजकारणमय झालेले आहे. मात्र, त्याच वेळी राजकारणातले आपल्याला काही कळत नाही किंवा राजकारणात आपल्याला अजिबात रस नाही, असे म्हणणारा एक मोठा वर्गदेखील आहे. विशेषत: शिक्षित वा सुस्थित मंडळींमध्ये हा सूर अधिक लावला जातो. तथापि, प्रत्यक्षात आपल्याशी संबंधित जवळपास प्रत्येक बाब राजकारणाशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष निगडित असते. कारण, अगदी साध्या मिठाच्या दरापासून थेट कुटुंब नियोजनासारख्या धोरणापर्यंत सारे काही अवलंबून असते, ते ‘सरकार’ नामक घटकावर आणि हे सरकार उभे असते, राजकारणाच्या पायावर. त्यामुळे राजकारणापासून आपण अलिप्त आहोत, असे वरकरणी वाटत असले तरी प्रत्यक्षात तसे नसते. हे पाहता, राजकारणाशी फटकून राहण्याऐवजी उलट त्याला आपल्या जीवनशैलीतलाच एक घटक बनवून टाकावे, अशा टप्प्यावर आपण येऊन पोहोचलो आहोत.

राजकारण ही संकल्पना मुळात खूप व्यापक आहे. परंतु आपल्याकडे ती फारच संकुचित अर्थाने वापरली जाते. किंबहुना, राजकारण या शब्दाला आपण नाना तºहेच्या भानगडी जोडून टाकल्या आहेत. त्यामुळे राजकीय क्षेत्रात एकमेकांवर चालणार्‍या कुरघोड्या, शह-काटशह, फंदफितुरी, पक्षबदल, सोयीसोयीने बदलल्या जाणार्‍या भूमिका, तसेच पक्षा-पक्षांच्या व्यवहारांत वा अंतर्गत घडामोडींमध्ये ज्या पद्धतीच्या लांड्यालबाड्या चालतात ते म्हणजेच राजकारण, असा एक सार्वत्रिक समज पसरला आहे. निवडणुकीच्या वगैरे काळात तर या सगळ्याला जोर चढत असल्याने राजकारण ही जणू काही दलदल आहे, असा बहुतेक पांढरपेशा मंडळींचा दृष्टिकोन दिसून येतो. राजकारणी मंडळी सत्ताप्राप्तीसाठी सध्या ज्या कोलांटउड्या मारत आहेत, अथवा अत्यंत खालच्या स्तराला जाऊन प्रचारादरम्यान एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत, ते पाहता त्यापासून चार हात दूर राहणेच बरे, असा वरवर सोपा भासणारा मार्ग अवलंबला जातो. पण नेमकी तेथेच मोठी गफलत होते. कारण, त्यामुळे राजकारणाला आपण आपल्या व्यक्तिगत जीवनातून जणू हद्दपार करण्याचा चंग बांधत असतो. साहजिकच नको त्या लोकांच्या हाती राजकारणाच्या किल्ल्या आपसूकपणे जातात. हे सगळे टाळायचे असेल तर राजकारणाला आपल्या जीवनाचे एक अंग बनवायला हवे. तसे करणे म्हणजे अगदी सक्रिय राजकारणात उतरणे किंवा प्रचारफेर्‍या, सभा वगैरे स्वरूपाच्या उपक्रमांत सहभागी होणे, असे नव्हे. तर केवळ आपल्या राजकीय जाणिवा जागृत ठेवल्या आणि त्यानुसार आपल्या लोकप्रतिनिधींकडे वेळोवेळी त्यांच्याशी निगडित बाबींची उत्तरे जरी मागितली, तरी पुरेसे आहे. तसे केले तर त्यांना त्याचे उत्तरदायित्व स्वीकारावेच लागेल.

पूर्वीचे नेते किंवा राजकारणी या बाबतीत तुलनेने खूपच संवेदनशील होते. लालबहादूर शास्त्रींचे प्रसिद्ध उदाहरण या बाबतीत खूपच बोलके आहे. शास्त्रीजींनी रेल्वेमंत्री असताना झालेल्या एका रेल्वे अपघाताची नैतिक जबाबदारी घेऊन आपल्या पदाचा राजीनामा सादर केला होता. अगदी एवढे नाही तरी किमान ज्या घटना-घडामोडींशी आपला थेट संबंध आहे, त्याची तरी जबाबदारी या मंडळींनी घ्यायलाच हवी. साधी राहणी हा एकेकाळच्या राजकारण्यांचा आणखी एक गुणविशेष होता. पण आज एकेका नेत्याचा पेहराव हीच त्यांची ओळख बनत आहे. मग तो खादीचा वा लिननचा डिझायनर कुडता असो, विविधरंगी जॅकेट्स असोत, डोक्यावरची टोपी असो की गळ्यातला मफलर असो... पेहराव म्हणजे त्यांचे ‘स्टाइल स्टेटमेंट’ बनले आहे. त्यासोबतच लक्झरी कार्स, महागडी गॅजेट्स, दौर्‍यांदरम्यान उंची हॉटेल्समधले वास्तव्य हा आजकालच्या अगदी गावपातळीवरच्या नेत्याच्याही लाइफस्टाइलचा अविभाज्य भाग झाल्याचे दिसते. असाच दिखाऊपणा कामकाजाच्या पद्धतीतसुद्धा आपसूकच शिरला आहे.

अभ्यासपूर्ण भाषणांऐवजी एकमेकांवर उच्चरवाने प्रच्छन्न टीकेचा भडिमार वा सभागृहातला गडबड-गोंधळ यात धन्यता मानली जात आहे. अर्थात, हा सगळा कोलाहल या मंडळींना सोयीचा असाच असतो. कारण त्यामध्ये मग मुळातल्या अनेक प्रश्नांची उत्तरे देण्याची गरज पडत नाही. माध्यमेसुद्धा अशा ‘गोंधळी’ मंडळींनाच जास्त भाव देत असल्याने मनमानी राजकारणाची, किंबहुना सत्ताकारणाची सर्वत्र चलती आहे. हा सगळा परिपाक आहे तो आपण आपल्या जीवनशैलीतून राजकारणाला हद्दपार करत असल्याचा. ‘यथा राजा तथा प्रजा’ ही उक्ती आजच्या लोकशाहीत नेमकी उलट अर्थाची झाली आहे. कारण, शेवटी राजकारणी मंडळींचा व पर्यायाने राजकारणाचा अंकुश सर्वसामान्यांच्या म्हणजे तुमच्या-आमच्याच हाती आहे. आपण सजग राहिलो, राजकारण्यांना वेळोवेळी जाब विचारला, तर त्यांना लोकांच्या म्हणण्याची चाड ठेवावीच लागेल. पण त्यासाठी प्रथम आपल्याला राजकारणाची संवेदना जागृत ठेवावी लागेल. किंबहुना, सकारात्मक राजकारणाला दैनंदिन जीवनाचा भाग बनवावा लागेल.