आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Abhijit Kulkarni Article About Side Effects Of Educational Punishment

शिक्षणाच्या शिक्षेचे ‘साइड इफेक्ट्स’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

झपाट्याने होत असलेल्या भौतिक प्रगतीमुळे उपलब्ध झालेल्या नानाविध सुविधांच्या परिणामी खरे तर आपली जीवनशैली सुकर व्हायला हवी. पण त्याऐवजी दैनंदिन जीवनातल्या समस्या वाढतच चालल्याचे पाहायला मिळते. विज्ञान-तंत्रज्ञानाचा जेवढा विकास होत आहे तेवढ्या अर्थकारणाच्या संधी व्यापक होत असल्या तरी त्यातून नवनवे प्रश्नसुद्धा निर्माण होत आहेत. सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक, व्यावसायिक आदी सर्वच पातळ्यांवर हा गुंता वाढत चालला असताना आपल्या ‘लाइफ स्टाइल’वर त्याचे परिणाम होणे ओघानेच येते.

अशा स्थितीत त्यावरचे उपाय शोधताना शिक्षण हाच एकमेव अक्सिर इलाज म्हणून पुढे येत असल्याने आज जवळपास प्रत्येक कुटुंबाची भिस्त त्यावर दिसते. साहजिकच शिक्षण व्यवस्थेचा आपल्या जगण्यावर एकुणात अधिकाधिक प्रभाव पडत चालला आहे. तंत्रज्ञानाचा विकास आणि विस्तार यामुळे करिअरच्या वेगवेगळ्या संधी उपलब्ध होत आहेत. त्या साधण्यासाठी नवी पिढी पुढे सरसावते आहे व मागची पिढीसुद्धा किमान कौटुंबिक पातळीवर त्याला प्रोत्साहन देते आहे. दृश्य स्वरूपात दिसणारा त्यातला सगळ्यात ठळक घटक म्हणजे, शिक्षणाचे माध्यम. विज्ञान-तंत्रज्ञानाची भाषा इंग्रजी असल्याने व या क्षेत्रामध्ये चांगल्या दर्जाच्या सर्वाधिक संधी उपलब्ध असल्याने त्या भाषेतून आपल्या पाल्यांना शिक्षण देण्याकडे आज बहुसंख्य पालकांचा ओढा दिसतो. त्यासाठी मग मुलांच्या शाळांच्या वेळा सांभाळण्याची कसरत असो, की अनिवार्यतेमुळे शाळांच्या ‘ओपन हाऊस’ अथवा ‘पेरेंट्स डे’ला लावावी लागणारी हजेरी असो; या सगळ्यासाठी पालकांना आपल्या व्यग्रतेतून वेळ काढावा लागतो. तीच बाब पैशाची. मराठी माध्यमातून शिक्षण जवळपास मोफत असतानासुद्धा त्याकडे सपशेल पाठ फिरवून पाल्याला उच्चभ्रू इंग्रजी माध्यमाच्या शाळांत घालताना व स्वत:च्या खिशाला दरमहा तोशीस लावून घेताना पालकांची जी ओढाताण होते, त्याचा परिणाम कितीही नाही म्हटले तरी जीवनशैलीवर होतच असतो.

पूर्वी पाल्याला एकदा शाळेत घातले म्हणजे पालकांना आपल्यावरील शैक्षणिक जबाबदारीची वा कर्तव्याची इतिश्री झाल्यासारखे वाटत असे. शैक्षणिक प्रगतीची मोजपट्टीदेखील निकालाच्या दिवशी उत्तीर्ण-अनुत्तीर्णतेपुरतीच मर्यादित असे. आता मात्र तसे राहिलेले नाही. शाळांकडून पालकांना वेळोवेळी हे अपडेट्स मिळत असतात आणि पालकदेखील त्याबाबत खूप संवेदनशील असतात. या सगळ्यातून शिक्षण क्षेत्रातली स्पर्धा प्रचंड वाढत चालली आहे.

शाळेचा हा टप्पा पार केल्यानंतर तर विचारूच नका. ‘करिअर’च्या मागे धावताना रात्र-पहाट एक करण्याशिवाय पर्याय राहत नाही. सुरुवातीची शिक्षण पद्धती तशी मर्यादित स्वरूपाची होती. चार बुकं शिकून कुठेतरी कारकून म्हणून चिकटणे, हे त्या वेळच्या शिक्षितांचे मोठ्या प्रमाणावरचे ध्येय असायचे. सकाळी 11 ते सायंकाळी 5 हा नोकरीचा पॅटर्न ठरलेला होता. आवक मर्यादित असली तरी आयुष्य मनाप्रमाणे जगायला वेळ होता. आता मात्र विकास या संकल्पनेवर आधारित असलेले मुबलक पर्याय करिअरच्या दृष्टीने उपलब्ध होत आहेत. तंत्रज्ञानामुळे नवनवीन प्रकारच्या ‘व्हाइट कॉलर’ नोकर्‍यांची निर्मिती होत आहे. साहजिकच अभ्यासक्रमापासून एकुणात शिक्षणव्यवस्थेचा सगळा बाजच बदललाय अन् जीवनशैलीवरील त्याचे ‘साइड इफेक्ट्स’ अगदी कमी वयापासून जाणवायला लागलेत. धावपळीबरोबरच चिंता, काळजी, ताणतणाव यामुळे ऐन तारुण्यातच शुगर, बीपीला सामोरे जावे लागते. हे परिणाम केवळ शारीरिक पातळीवरच दिसतात असे नव्हे; मानसिक, भावनिक, कौटुंबिक अशा सगळ्याच ठिकाणी आता ते हमखास बघायला मिळतात. खरे तर प्रगती किंवा विकासाचा मार्ग ज्या वाटेवरून जातो ते शिक्षण जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावरचा एक अविभाज्य भाग बनून जायला हवे. पण शिक्षणाच्या उपयुक्ततेपेक्षा किंवा उपयुक्त शिक्षण घेण्यापेक्षा ज्याची मुळातून आवड नाही किंवा ज्यात रस नाही, असा अभ्यास करिअरच्या मागे धावताना माथी मारला जातो. परिणामी शिक्षण व्यवस्था ही जीवनाचा भाग वगैरे बनणे व त्यामुुळे जीवनशैली समृद्ध होणे तर दूरच; उलट त्याच्या अतिरेकामुळे जीवनाचा शैलीदारपणाच हरवत चालला आहे...
(abhijit.k@dainikbhaskargroup.com)