आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुखी माणसाचा ‘भूतानी’ सदरा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केवळ आर्थिक वा भौतिक प्रगतीपेक्षा मानवता, समता, शांतता व दयाळूपणा या मूल्यांवर आधारित असणाऱ्या ग्रॉस नॅशनल हॅपिनेसची (जीएनएच) पायाभरणी खरे तर चार दशकांपूर्वीच भूतानमध्ये सुरू झाली. लोककल्याणकारी राजेशाही व्यवस्थेने हे तत्त्व आपलेसे करत ते सर्वसामान्यांमध्ये रुजवण्यावर भर द्यायला सुरूवात केली आणि त्याची गोमटी फळे आजची पिढी चाखत आहे.

प्रशस्त रस्ते, उंचच उंच इमारती, मोठमोठे कारखाने, भव्य मॉल्स, ब्रँडेड शॉप्स, थीम पार्क्स, अॅडव्हेंचर स्पोर्ट‌्स, चकाचक हॉटेल्स्… असे काहीही नसताना भूतान आपल्याला भुरळ घालतो, त्यामागचे कारण म्हणजे जाणीवपूर्वक जपलेली निसर्गसंपदा आणि साधेपणाने वावरणारी माणसे. रूढार्थाने प्रगतीच्या किंवा विकासाच्या बाबतीत जगाच्या कित्येक योजने मागे असलेला भूतान शांतता आणि समाधानाच्या पातळीवर मात्र अव्वल आहे. हे शक्य झाले आहे ते लोककल्याणकारी राजेशाही आणि ‘चित्ती असू द्यावे समाधान’ हा जीवनमंत्र प्रत्यक्ष जगण्यात सहजपणे अंगीकारणाऱ्या सर्वसामान्यांमुळे. परिणामी, शांतता आणि समाधानाच्या शोधात असलेली जगभरची मंडळी हे चिमुकले पण अनोखे विश्व अनुभवण्यासाठी वेळात वेळ काढून भूतानला येतात व रम्यतेत रममाण होऊन जातात.

हिमालयाच्या पर्वतरांगांत लपलेला भूतान पाहताक्षणीच प्रेमात पडावा असा. नैसर्गिक साधनसंपदा जशी भरगच्च आहे, तसेच तेथील लोकजीवनही अत्यंत टवटवीत आहे. सभोवतीच्या डोंगररांगांवरील झाडाझुडपांच्या दाटीमुळे नजर जाईल तिकडे सुखद हिरवाई अनुभवास येते. प्रदूषणाचे नामोनिशाण नसल्याने अगदी स्वच्छ मोकळ्या आसमंतातून आकाशाची निळाई आपल्यापेक्षा कितीतरी अधिक उठावदार दिसते. संपूर्ण वातावरणात एक प्रकारची प्रसन्नता भरून राहिलेली असते. पण या नितांत सुंदर आणि मनमोहक निसर्ग सौंदर्याएवढीच किंबहुना त्याहूनही काहीशी अधिक छाप मनावर पडते ती भूतानच्या लोकजीवनाची. भूतानींचे अत्यंत साधे, सहज पण कमीत कमी कटकटीचे जीवन पाहिल्यानंतर समाधान कशाला म्हणतात, याची प्रचिती आल्याशिवाय राहात नाही.

कुठल्याही ठिकाणची प्रगती किंवा विकासाचे मापन करताना जीडीपी (ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट) हा मुख्य निकष धरला जात असला तरी भूतानने मात्र अशा भौतिक वा दिखाऊ विकासाऐवजी मूल्यात्मक व सर्वसमावेशक विकासावर आधारित असणारी जीएनएच (ग्रॉस नॅशनल हॅपिनेस) संकल्पना अंगीकारली आहे. त्यामुळे विकासाचे ठोकळेबाज निकष येथे लावता येत नाहीत. केवळ आर्थिक वा भौतिक प्रगतीपेक्षा मानवता, समता, शांतता व दयाळूपणा या मूल्यांवर आधारित असणाऱ्या ‘जीएनएच’ची पायाभरणी खरे तर चार दशकांपूर्वीच भूतानमध्ये सुरू झाली. लोककल्याणकारी राजेशाही व्यवस्थेने हे तत्त्व आपलेसे करत ते सर्वसामान्यांमध्ये रुजवण्यावर भर द्यायला सुरुवात केली आणि त्याची गोमटी फळे आजची पिढी चाखत आहे. आपल्याकडे काहीतरी कमी आहे किंवा दुसऱ्याकडे आपल्यापेक्षा काही अधिक चांगले आहे, ही भावना असमाधानाला खतपाणी घालत असते. अवतीभवती वावरणाऱ्यांचे राहणीमान हे मनावर त्या दृष्टीने प्रभाव टाकणारे एक प्रमुख कारण. उंची कपडे, नवनव्या फॅशन्स, निरनिराळी स्टाईल स्टेटमेंट‌्स यामुळे अजाणत्या वयापासूनच एक प्रकारचा अापपरभाव निर्माण व्हायला लागतो. त्यावर उतारा म्हणून भूतानमध्ये ‘एक देश एक वेष’ हे तत्त्व अवलंबण्यात आले आहे.

राजापासून शाळकरी मुलांपर्यंत सर्व जण एक विशिष्ट प्रकारचा वेषच परिधान करतात. स्थानिक भाषेत ज्याला ‘घो’ म्हणतात असा गुडघ्यापर्यंत लांब असलेला झगा पुरुष परिधान करतात, तर महिला घोट्यापर्यंत लांब असलेला गाऊन (किरा) परिधान करतात. हा तेथील राष्ट्रीय वेष आहे. पोशाखाची ठेवण अगदी एकसारखी असल्याने फरक असलाच तर रंगाचाच काय तो. तसाच प्रकार भाषेच्या बाबतीतही. झोंखा या राष्ट्रीय भाषेतच सर्व व्यवहार चालतो. शिक्षण सर्वांना मोफत आहे. पहिलीपासून झोंखा आणि इंग्रजी या दोन्ही भाषा शिकवल्या जातात. त्यामुळे इंग्रजी जवळपास सगळ्यांनाच समजते. शिक्षणाप्रमाणे आरोग्य सुविधा सर्वांना सारख्याच आहेत. अर्भकापासून वृद्धापर्यंत सर्वांच्या औषधोपचाराचा खर्च सरकारतर्फे केला जातो. अगदी एखाद्याला गंभीर आजारामुळे पुढील उपचारांसाठी भारतात पाठवावे लागले तरी त्याची जबाबदारी तेथील सरकार घेते. घरे प्रामुख्याने डोंगर, टेकड्यांच्या पायथ्याशी विखुरलेली असतात. लोकसंख्या अाटोक्यात असल्याने जमीन वा घराला अव्वाच्या सव्वा किंमत मोजण्याची वेळ येत नाही. बहुतांश घरांची ठेवणही अगदी एकसारखी. मग ते बंगलीवजा छोटेसे घर असो, की थिंपूसारख्या राजधानीच्या शहरातील आधुनिक अपार्टमेंट. प्रथमदर्शनी त्याच्या ठेवणीत फारसा फरक दिसत नाही. शेतीच्या बाबतीत काहीसे असेच. तांदूळ आणि मिरची ही मुख्य पिके. त्यासह इतर धान्य सर्वसामान्यांना माफक दरात उपलब्ध व्हावे, म्हणून त्याच्या निर्यातीवर निर्बंध असल्याने खाद्यपदार्थांच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात नाहीत. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांसह आरोग्य आणि शिक्षण अशा निकडीच्या बाबींची फारशी चिंता सर्वसामान्य भूतानींना नसल्याने एकूणातच रोजच्या जीवनातील त्यांच्या चिंता बहुतांशाने कमी होतात.

सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असलेल्या भूतानमध्ये संस्कृती, परंपरा, चालीरीती यांची जपणूक जाणीवपूर्वक होत असली तरी त्याचा दुराभिमान अथवा गवगवा मात्र नसतो. शिवाय, कालानुरूप आवश्यक ते बदल आपलेसे करण्याची मानसिकता सर्वसामान्यांमध्ये रुजल्याचे स्थानिकांशी बोलताना सहज जाणवते. वानगीदाखल शिक्षण अथवा विवाहपद्धतीचे उदाहरण घेता येईल. जगभर इंग्रजीचा वाढत असलेला प्रभाव पाहता अलीकडे विज्ञान, सामाजिक शास्त्रे अशा विषयांचे शिक्षण झोंखाऐवजी इंग्रजीत देण्याकडे कटाक्ष राखला जात आहे. पण, त्याबाबत तक्रारीचा फारसा सूर नाही. उलट या निर्णयाचे सकारात्मक परिणामच जास्त असल्याची भावना आहे. त्यातून इंग्रजीशी अधिक जवळीक होत असल्याने व्यवसायाला त्याचा फायदाच होत असल्याचे युवा गाईड शिंगझो याने सांगितले. विवाहपद्धतीच्या बाबतीतसुद्धा असाच काहीसा खुला दृष्टिकोन आहे. आजकाल ‘अॅरेंज मॅरेज’ची संकल्पना जवळपास बाद होत चालली आहे. तरुण मंडळी आपापल्या पसंतीने विवाह ठरवतात. शिवाय, विवाहानंतर नवदांपत्ये स्वतंत्र घरोबा थाटत असल्याने कुणी कुणाकडे नांदायला वगैरे जायचाही मुद्दा निकाली निघतो. विशेष म्हणजे, महिला जशा पुरुषांच्या बरोबरीने नोकरी व्यवसायात आहेत तसे घरकामात पुरुषही महिलांच्या बरोबरीने हातभार लावतात. अर्थात, भारतीय गीत-संगीत, चित्रपट आणि दैनंदिन टीव्ही मालिकांचा प्रभाव महिलावर्गावर जास्त दिसून येतो.
एकंदर अशा समंजस जीवनपद्धतीमुळे दैनंदिन जीवनातले आपसांतील बरेचसे संघर्ष निकाली निघाले आहेत. आपल्या देशात मोठमोठाले कारखाने, उद्योगधंदे किंवा कॉर्पोरेट जायंट‌्स नसल्याची खंत कुणाला फारशी वाटत नाही.

अवघ्या साडेसात लाख लोकसंख्येला पुरतील एवढी उत्पन्नाची साधने स्थानिक पातळीवर भरपूर उपलब्ध आहेत. त्यामुळे बेरोजगारी वगैरेचा प्रश्नसुद्धा फारसा तीव्र नाही. भारतासारखा शेजारी सगळे काही विनासायास पुरवत असल्याने कारखाने वगैरे नसल्याने भूतानचे फारसे काही अडत नाही. उलटपक्षी तब्बल सत्तर टक्क्यांहून अधिक ग्रीन कव्हर असलेला आणि त्यामुळेच ‘कार्बन क्रेडीट’मध्ये ‘प्लस’ असलेला हा देश प्रदूषणमुक्तीत अव्वल आहे. स्वच्छ हवीहवीशी हवा हा तेथील युएसपी बनला आहे तो त्यामुळेच. पर्यटनातून अर्थप्राप्ती चांगली होत असली तरी पर्यटकांची संख्या मर्यादेबाहेर जाऊन अन्य समस्या निर्माण होऊ नयेत, यावरसुद्धा कटाक्ष ठेवला जातो. एकूणात समाधानाची व्याप्ती अधिक असल्याने भांडण-तंटे किंवा गुन्हेगारी कारवायांचे प्रमाणदेखील भूतानमध्ये अत्यल्प आहे. जगातल्या अत्यंत ‘लो क्राईम रेट’ असलेल्या ठिकाणांत भूतानची गणना होते, हे विशेषत्वाने लक्षात घ्यायला हवे. ही जी काही व्यवस्था सध्या निर्माण झाली आहे त्याला कुठे तडा जाऊ नये, असाही त्यामागचा दृष्टिकोन असावा. कारण, त्यातच त्यांचे समाधान सामावलेले आहे.

विकासाच्या पठडीबाज व्याख्येनुसार, भूतान तसा ‘मागास’ ठरत असला आणि लहानातल्या लहान अर्थव्यवस्थेत गणला जात असला तरी या आधुनिक जगात ज्या ज्या म्हणून गोष्टी दुर्लभ होत चालल्या आहेत, त्या त्या भूतानमध्ये ठळकपणे दिसून येतात. जसे, निसर्गाची जपणूक, प्रदूषणमुक्त वातावरण, दैनंदिन जीवनाची संथ गती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आत्मसमाधान! अगदी सामान्यातल्या सामान्य भूतानी माणसाशी बोलतानाही त्याची जाणीव सहजपणे होते. भौतिकदृष्ट्या बहुसंपन्न असूनही सुख आणि समाधान नसेल तर त्यासाठीचा साराच आटापिटा फोल ठरतो. त्यामुळेच अत्याधुनिक सुविधांसाठी धाव धाव धावणाऱ्या आणि अक्षरश: रक्ताचे पाणी करणाऱ्यांपेक्षा कमी गरजांमध्ये, कमी धावपळीत पण शांत-समाधानी जीवन जगणाऱ्या भूतानींच्या जीवनमानाचा दर्जा नक्कीच उजवा ठरतो. साहजिकच सुखी माणसाचा सदरा म्हणजे काय, त्याचा उलगडा येथे आल्यावर होतो आणि ‘जीवन त्यांना कळले हो’ हीच भावना या चिमुकल्या देशाचा निरोप घेताना मनात दाटून येते…

अभिजीत कुलकर्णी
abhikul10@gmail.com
बातम्या आणखी आहेत...