आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Abhilash Khandekar About Book Review, Rasik, Divya Marathi

कालातील ग्रंथाचे मूल्यमापन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'चौकटीबाहेरच्या मतप्रदर्शनामुळे टीकेचे लक्ष्य ठरत आलेल्या नामवंत लेखिका अरुंधती रॉय यांनी नव्या दृष्टिकोनातून डॉ. आंबेडकरांच्या・अनाइलेशन ऑफ कास्टचे मूल्यमापन केले आहे.
तसे करताना आंबेडकरांवर झालेल्या अन्यायाचीही जाणीवपूर्वक वाच्यता केली आहे...'

जातीपाती संपूर्णपणे नामशेष व्हाव्यात व जातरहित एक आदर्श समाज अस्तित्वात यावा, यासाठी डॉ. बाबासाहेब ऊर्फ भीमराव रामजी आंबेडकर यांनी खूप सायास केले, हे सर्वश्रुतच आहे. त्यांनी याबद्दल केलेले लिखाण जरी इंग्रजीतून असले, तरी विविध भारतीय भाषांमधून त्याचे उत्तम भाषांतर आपणास उपलब्ध आहे. बाबासाहेब हिंदू वर्णव्यवस्थेच्या विरोधात व दलित समाजाच्या बाजूने नेहमीच उभे ठाकलेले होते. आपल्या लिखाणातून त्यांनी वर्षानुवर्षे चाललेल्या वर्णव्यवस्थेबद्दल बरेच विरोधात लिहिले आहे; परंतु त्यातले श्रेष्ठ लिखाण म्हणजे अनाइलेशन ऑफ कास्ट・हे पुस्तक. खरे तर हे एक असे लिखाण होते, जे त्यांनी 15 मे 1936रोजी लाहोर येथे होणार्‍या एका व्याख्यानासाठी केले होते. जात-पात तोडक मण्डल・या संस्थेच्या वार्षिक संमेलनाप्रसंगी बाबासाहेब बोलणार होते; परंतु या भाषणासंदर्भात आयोजकांमध्ये दुफळी निर्माण झाल्याने ते संमेलनच रद्दबातल ठरले. आंबेडकरांचे ते भाषण कागदावरच राहिले. पुढे जाऊन स्वत: आंबेडकर यांनी ते प्रकाशित केले. त्यानंतर अनेक भाषांमध्ये त्याच्या अनेक आवृत्त्या वाचकांसमोर येत राहिल्या. डॉ. आंबेडकर ज्यांनी थोडेफार तरी वाचले असतील, त्यांना हा दीर्घ लेख तसेच त्यातील डॉ. बाबासाहेबांचे विचार नवीन निश्चितच नाहीत. मी जरी यापूर्वी हे पुस्तक पूर्ण वाचले नसले, तरी मला याबद्दल कल्पना होती. अन्यत्र याबद्दल बरेच संदर्भ व बाबासाहेबांचे विचार मी वाचले होते, (तेव्हा) खूप प्रभावितही झालो होतो.
प्रस्तुत पुस्तक अनेक वर्षांपूर्वी प्रकाशित झाल्यानंतर, त्यायोगे आंबेडकरांचे विचार समाजातल्या तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर मला नेमके आज ‘जातिवाद नष्ट करा’ हे सांगणारे पुस्तक पुन्हा भारतीय समाजासमोर आणायची गरज का भासली?
त्याला दोन कारणे- एक, हे पुस्तक नव्याने व प्रसिद्ध लेखिका अरुंधती रॉय यांच्या दीर्घ प्रस्तावनेसकट, टीका व भाष्यासकट नुकतेच बाजारात आले आहे. दुसरे म्हणजे, मागील महिन्यात लोकसभेच्या निवडणुका व त्या रणधुमाळीत पुन्हा एकदा उच्च जात, खालची जात, हिंदुत्व वगैरे मुद्दे खूप चर्चेत आले. निवडणुका संपल्या, भाजपचे कट्टर हिंदू व मागासवर्गीय नेते नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत प्रचंड बहुमताने निवडून आले. पण पुन्हा जात व हिंदुत्व जगाच्या समोर
प्रकर्षाने आल्याचे जाणवले आणि म्हणूनच आंबेडकरांची मला प्रकर्षाने आठवण झाली.
प्रस्तुत पुस्तकात अरुंधती रॉय यांनी नव्याने ‘द डॉक्टर अँड द सेंट’ ही प्रदीर्घ प्रस्तावना लिहून जुन्या पुस्तकाची वाचनीयता वाढवली आहे. एकूण 140 पाने ही त्यांनी आंबेडकर व गांधी यांचा वाद, आंबेडकरांनी गांधींना कसे जगासमोर उघडे पाडले, त्यांच्या विचारांची बाबासाहेबांनी कशी चिरफाड केली, तसेच बाबासाहेबांना भारतात एकूणच किती कमी लेखलं गेलं, याबद्दल पुन्हा एकदा जुना वाद उकरून काढला, असंही म्हणता येऊ शकतं.
वर्ष 2006 मध्ये महाराष्ट्रातील खैरलांजी येथील अत्याचार प्रकरण (सुरेखा भोतमांगे) असो; किंवा पंजाबमधील बंतसिंग या दलित सरदाराचे क्रूरपणे दोन्ही हात व एक पाय कापल्याची 2005ची घटना असो; किंवा पाकिस्तानची मलाला युसूफझाईची शिक्षण घेण्यासाठी तालिबानसमोर उभे राहण्याची दुर्दम्य जिद्द असो... हे सगळं बाबासाहेबांच्या विचारांमध्ये गुंफून रॉय यांनी नव्या दृष्टिकोनातून लिहिले आहे व जगासमोर आणले आहे, जे अभ्यासू वाचकांना निश्चित भावेल.
आंबेडकर-गांधी यांचे वाद आपण वाचलेले आहेत; जुन्या पिढीतल्या मोजक्यांनी ओझरते ऐकले असतील किंवा नवीन पिढीला याबाबत काहीच माहीत नसेल; परंतु वर्णव्यवस्थेला विरोध करणारे बाबासाहेब, हिंदुत्ववादाला विरोध करणारे बाबासाहेब व गांधीजींची दुटप्पी वागणूक व लिखाण उघडकीस आणणारे बाबासाहेब, हे सगळं अत्यंत परखडपणे अरुंधती यांनी विशद केलं आहे. डॉ. आंबेडकर यांचं पुस्तक व त्याची विषयवस्तू याबद्दल मी खोलात जाऊन लिहीत नाही, कारण 1936चं ते पुस्तक अनेक भाषा व आवृत्त्यांच्या माध्यमातून वाचकांना-(प्रामुख्याने महाराष्ट्रातल्या)- माहीत असावे; परंतु पूर्णपणे नव्या दृष्टिकोनासह रॉय यांच्यासारख्या प्रतिष्ठित लेखिकेने पुन्हा एकदा आंबेडकर आम्हाला समजावून देण्याचा जो प्रयत्न केला आहे, तो वाखाणण्यासारखा आहे.
आपले मत प्रदर्शित करताना त्या म्हणतात, गांधी व त्यांचे बदलते विचार (पवित्रे) याबद्दल ते गेल्यानंतर बरेच लिखाण झाले असले, तरी बाबासाहेबांनी वैचारिक पातळीवर गांधींना जो सातत्याने विरोध केला, तो आधुनिक भारताच्या इतिहासात अनेक कारणांनी दाबला गेला आहे. द. आफ्रिकेतल्या तुरुंगात गांधी असतानाचे, त्याआधीचे, त्यानंतरचे असे दाखले देत गांधींचा बडेजाव भारतात आंधळेपणाने मिरवला जात आहे. शिवाय बाबासाहेबांना फक्त ‘घटना बनवणारे आंबेडकर’ एवढीच ओळख देऊन त्यांना विशिष्ट सीमेबाहेर येऊ दिले गेले नाही. एकूणच गांधींचा त्यांना जाणवलेला दोष रॉय यांनी व्यवस्थित मांडला आहेच; परंतु या गोष्टीचे वैषम्यदेखील जाहीर केले आहे की गांधी, नेहरूव विवेकानंद यांच्या लेखनाला भारतीयांनी जितका बहुमान दिला, तितका डॉ. आंबेडकर यांना दिला नाही.
‘जात-पात तोडक मण्डल’ ही हिंदू सुधारमतवाद्यांची एक संघटना होती. त्यासाठी बाबासाहेबांनी पहिल्यांदा प्रस्तुत विषयावरच भाषण तयार केले होते... पुढे जाऊन त्याला इतिहासात, समाजात एवढे महत्त्व मिळेल, अशी पुसटशी कल्पनासुद्धा बाबासाहेबांना तेव्हा नसावी. त्या वेळी संघटनेबरोबर उडालेला खटका व आयोजकांची नाराजी वगैरेविषयी डॉक्टरांनी स्वत: लिहिले आहे. जातपात भारतातून नष्ट होऊ शकत नाही, राजकारणी मंडळीच जातिवादाचा उपयोग करत आहेत, भारतीय समाज दिशा हरवत आहे, घटनेचे सूत्र राबवण्यात सरकार कसे कुचकामी ठरत आहे, हे बघून बाबासाहेब स्वत: मनाने किती खिन्न झाले होते, हे सगळे नव्या दृष्टिकोनासह आपणास या पुस्तकात वाचायला मिळते. 1936 ते 2014 मध्ये भारतीय समाज व जग, विचार व तंत्रज्ञान खूपच बदलून गेले आहे. तरीही हे पुस्तक आजही तितकेच नवे भासते, विचाराला नवी दिशा देते, हेच मुख्यत: ते नव्याने वाचण्याचे मुख्य कारण ठरले आहे. तुम्हालासुद्धा ते आवडेल, यात शंका नाही.

०पुस्तक : अनाइलेशन ऑफ कास्ट
०लेखक : बी. आर. आंबेडकर
०प्रकाशक : नारायणा, दिल्ली
०पृष्ठे : 415 ० किंमत : रु. 525
(abhilash@dainikbhaskargroup.com)