आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Abhilash Khandekar Article About Beyond NJ 9842 The Siachen Saga Book

आव्हानात्मक सियाचीनची लष्करी गाथा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली, तीच मुळी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या साक्षीने. तसे पाहता भारत-पाकिस्तान संबंध फाळणीपासूनच ताणलेले. दोन-तीन युद्धे, मग संसदेवर हल्ला (2001), मुंबई हल्ला (2008) आणि सीमारेषेवर सतत होणार्‍या चकमकी. भारताच्या अनेक नागरिकांचा, जवानांचा व सैन्य अधिकार्‍यांचा हकनाक बळी घेणार्‍या या सर्व कारवाया.
भारत-पाकच्या या तणावग्रस्त संबंधांना खतपाणी पुरवतात, ते आयएसआयने प्रशिक्षण दिलेले उलट्या काळजाचे अतिरेकी व पाक सैन्य. याच पाक सैन्याने सियाचीन हा अत्यंत दुर्गम व उंच असलेला बर्फाच्छादित प्रदेश बळकावण्यासाठी अनेक प्रयत्न केले. त्याला थोडीफार अप्रत्यक्ष साथ अमेरिकेनेसुद्धा दिली. हा इतिहास खूप वर्षांचा आहे आणि सियाचीन बळकावण्याचे प्रयत्न आजही सुरू आहेत.

सामान्य वाचकाला सैन्य व त्यातील बारीकसारीक, पण देशाच्या सुरक्षेबद्दलच्या महत्त्वाच्या बाबींबद्दल कमीच माहिती असते; परंतु मोदी-शरीफ यांच्या नुकत्याच पार पडलेल्या सदिच्छा भेटीमुळे पुन्हा एकदा भारत-पाक संबंधांवर प्रकाशझोत आला आहे. याच सुमारास दिल्लीतील नावाजलेले पत्रकार व संरक्षण विषयाचे जाणकार नितीन गोखले यांचे सियाचीनवर लिहिलेले अभ्यासपूर्ण पुस्तक बाजारात आले आहे. गोखले आधी गुवाहाटीला (आसाम) राहायचे व विविध माध्यमांसाठी पूर्वोत्तर राज्यांचे वार्तांकन करायचे. मिलिटरी अकॅडमीज व भारतीय सैन्याच्या अधिकार्‍यांसमोर सुरक्षा या विषयावर व्याख्याने देण्याचा अनुभवही त्यांच्या गाठी जमा आहे.

सियाचीन ही जगातील अत्यंत उंचावरची युद्धभूमी आहे, जेथे उणे 60 पर्यंत तापमान घसरते. हा भाग काराकोरम रेंज (लडाखच्याही पुढे) आणि 23,000 फूट उंचीवर आहे. बरीच वर्षे पाकिस्तान आणि चीनचीसुद्धा यावर नजर आहे आणि तिथली सुरक्षा सांभाळणे भारतीय सैन्यासाठी अत्यंत जिकिरीचे काम आहे; परंतु ते हे काम चोखपणे करत आहेत याची पुसटशी कल्पनासुद्धा आम्हास नसते. गोखले यांनी त्या भागाला केवळ अनेकदा भेटच दिली नाही, तर 1984च्या ‘ऑपरेशन मेघदूत’ या मिशनला 2014 मध्ये 30 वर्षे पूर्ण होत असताना, सियाचीनमध्ये तैनात जवानांशी व अधिकार्‍यांशी बोलून गेल्या तीन दशकांचा बोलका इतिहास या पुस्तकाद्वारे वाचकांसमोर आणला आहे. हे काम निश्चितच जिकिरीचे व त्यापेक्षाही अधिक जोखमीचे आहे. ज्या भूभागाबद्दल गोखले यांनी लिहिले आहे तो भाग ऑक्टोबर 1947 मध्ये भारताकडे जम्मू-काश्मीरबरोबर आला. तेव्हापासूनच हा कठीण प्रदेश एक आव्हान म्हणूनच बघितला जातो. ‘एनजे 9842’ हा या ग्लेशियर भूमीवरील भारताचा सर्वात शेवटचा पोस्ट. त्यापुढे सालटोरो पर्वतरांगा व पाकव्याप्त काश्मीरचा (पीओके) भाग आहे. ‘ऑपरेशन मेघदूत’ हे भारतीय सैन्याचे सर्वात अधिक काळ चाललेले ऑपरेशन आहे. तब्बल 30 वर्षे. फक्त 30 वर्षे चालले म्हणूनच हे विशेष ऑपरेशन नाही; परंतु हा भूभाग इतका कठीण, दुर्गम की तिथे माणूस जगणं केवळ अशक्य.

भारतीय हवाई दलाची हेलिकॉप्टर्ससुद्धा त्या ग्लेशियर्सकडे फिरकायची नाहीत. सासोमाच्या पुढे जाण्याचा तर प्रश्नच नव्हता. ‘खार्दुंगला’ (18,300 फूट उंची) व त्यापुढे थोईज, टुर्टूक त्यागशीपर्यंत भारतीय हेलिकॉप्टर्स उडायची; परंतु ग्लेशियरकडे अगदी क्वचितच. हाच भूभाग (सासोमा) पुढे जाऊन सियाचीन म्हणून ओळखला गेला व सप्टेंबर 1978 मध्ये पहिले हेलिकॉप्टर या प्रदेशावरून उडाले. जे ऑफिसर्स पहिल्यांदाच त्या उंचच उंच बर्फाच्छादित प्रदेशाचे दर्शन घेत होते, त्यांना इतका विस्तीर्ण भूभाग भारताच्या ताब्यात होता याची कल्पनाच नव्हती. लेखक लिहितात की, पाकिस्तानी नकाशांमध्ये तसेच पश्चिमेकडील राष्ट्रांच्या नकाशांमध्येही हा ग्लेशियर्सचा भूभाग पाकिस्तानचा म्हणून दाखवला गेला होता. ‘ऑपरेशन मेघदूत’ हा भूभाग अर्थात सियाचीन आपल्याजवळच राहावा आणि पाकिस्तानच्या कब्जात जाऊ नये म्हणूनच सुरू केले होते. अनेक जिगरबाज व चिवट देशभक्त अधिकार्‍यांनी, अनेक वर्षे विषम परिस्थितीत टिकाव धरत हा लढा दिलेला आहे. हे महाकठीण ऑपरेशन 1984 मध्ये (तीस वर्षांपूर्वी) ले. जनरल संजय कुलकर्णी यांनी सुरू केले, तेव्हा ते कॅप्टन होते. आता ते लेहमध्ये बडे अधिकारी आहेत. असेच एक अधिकारी सागर पटवर्धनही तिकडे होते.

अनेक संबंधित लोकांशी बोलून, सियाचीनचे महत्त्व अधोरेखित करून व तिथल्या परिस्थितीची साधारण वाचकाला वेगळ्या पद्धतीने ओळख करून देत गोखले लिहितात की, 22,000 फूट उंचीवर तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ एका अधिकार्‍याची किंवा शिपायाची नेमणूक भारतीय सैन्य करत नाही, कारण यापेक्षा अधिक काळ कुणी त्या ठिकाणी तग धरू शकत नाही.

मला आठवते की, 2008-09 मध्ये सियाचीनमधून भारतीय सैन्य माघारी घेण्यासाठी मनमोहनसिंग यांच्यावर आंतरराष्ट्रीय दबाव होता (त्यामुळे मोठे वादंग निर्माण झाले होते व सैन्यात अस्वस्थता पसरली होती); परंतु अर्जुनसिंह यांनी संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांना देशहितासाठी हे पटवून सांगितले की, सियाचीनमधून सैन्य माघारी घेणे ही मोठी चूक ठरेल. त्यानंतर अँटनी सोनिया गांधींकडे गेले व त्यांच्या सांगण्यावरून पंतप्रधानांनी निर्णय फिरवला. आजही भारतीय सैनिक त्या हिमाच्छादित प्रदेशाची राखण करत आहेत.
इतिहासाची चित्तवेधक कहाणी गोखले यांनी या पुस्तकाद्वारे वाचकांपुढे आणली आहे.
पुस्तकाचे नाव : बियाँड एनजे 9842 द सियाचीन सागा
लेखक : नितीन गोखले
प्रकाशक : ब्लुम्सबरी इंडिया
पृष्ठे : 274
किंमत : 699