आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Abhilash Khandekar Article About Narendra Modi & Literature , Divya Marathi

साहित्य विश्वालाही मोदींची भुरळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार व सगळ्या देशाचे लक्ष वेधून घेतलेले नेते नरेंद्र मोदी सध्या इंग्रजी लेखकांचे व प्रकाशकांचे प्रिय पात्र झालेले दिसतात. लंडनला राहणार्‍या अँडी मारिनो या इंग्रज पत्रकाराने मोदींचं राजकीय चरित्र लिहिलंय. सध्या ते बाजारात व इंग्रजी वाचकांमध्ये चर्चेचा विषय आहे. त्याचबरोबर मधू किश्वर या ‘मानुषी’ नियतकालिकाच्या संपादिका व मोदीविरोधी प्रचंड लिखाणासाठी ओळखल्या जाणार्‍या प्रसिद्ध लेखिकेचं ‘मोदी, मुस्लिम अँड मीडिया’ हे पुस्तक खळबळ माजवतंय. पावनी सिन्हा व निकिता परमार यांचं ‘बिइंग मोदी’ हे कॉफी टेबल पुस्तक बाजारात उपलब्ध झालंय, तर त्याआधी ‘नरेंद्र मोदी : द गेम चेंजर’ हे दिल्लीचे पत्रकार सुदेश वर्मा यांचं पुस्तक प्रकाशित होऊन पहिली आवृत्ती संपून दुसरी आवृत्तीही बाजारात आली आहे. टाइम्स ऑफ इंडियाचे वरिष्ठ संपादक मनोज मित्ता यांचे ‘द फिक्शन ऑफ फॅक्ट फाइंडिंग : मोदी अँड गोध्रा’ हे पण इंग्रजीतलं नवं पुस्तक सध्या गाजतंय.

मोदी हे पंतप्रधान होतील किंवा नाही, हे मे महिन्याच्या दुसर्‍या-तिसर्‍या आठवड्यात स्पष्ट होईल; परंतु उपरोल्लिखित सगळी पुस्तके मोदी, गुजरात मॉडेल, गोध्रा हत्याकांड व मोदी यांचे व्यक्तिमत्त्व कसे आहे, याच्याच आसपास फिरतात तसेच नवे दृष्टिकोन व माहिती आपल्यासमोर आणतात.

‘बुकशेल्फ’ हा स्तंभ काही आठवड्यांच्या विश्रांतीनंतर (खरं तर ती विश्रांती नव्हतीच; एक पुस्तक लिहिण्यात मी स्वत: अडकलेला होतो.) पुन्हा सुरू करताना माझ्यासमोर जी पुस्तके होती, त्यात मोदींच्या पुस्तकांचाच भरणा अधिक होता. म्हणून दोन पुस्तके मी एकत्रपणे वाचकांसमोर आणत आहे.

भारतीय राजकारण पूर्णपणे ढवळून काढणार्‍या या राजकीय नेत्यावर पुस्तक लिहिण्याचं पेवच फुटलंय जणू, असं ही सगळी पुस्तकं बघून-वाचून वाटतं. तुम्ही कुठल्याही इंग्रजी पुस्तकांच्या दुकानात जा, मोदींवर लिहिलेली पुस्तकंच तुमचं स्वागत करताना दिसतील. मी त्यांच्यावरची काही पुस्तकं वाचली व अजूनही वाचत आहे. आणि मला वाटतं, निवडणुकांचे निकाल देशासमोर येत नाहीत तोपर्यंत याच एका झंझावाती राजकारणी व्यक्तिमत्त्वाबद्दल पुस्तकरूपी लिखाण सुरूच राहील.

गतवर्षी याच सुमारास मी नीलांजन मुखोपाध्याय यांच्या ‘नरेंद्र मोदी : द मॅन, द टाइम्स’ या पुस्तकाची ओळख वाचकांना करून दिली होती. मोदी मालिकेतील बहुधा ते पहिलं पुस्तक होतं. त्या पुस्तकातील माहिती व मोदींबद्दलचं वर्णन बहुतांशी नव्या पुस्तकांमध्ये वाचायला मिळतं. फरक आहे तो भाषेचा, लेखनशैलीचा व थोडेफार नवीन मुद्दे, जे त्या त्या लेखकाला महत्त्वाचे वाटले किंवा मोदींनी स्वत: सांगितलेले काही वेगळे स्वानुभव.

अँडी मारिनो हा ‘ए क्वाएट अमेरिकन’ या गाजलेल्या पुस्तकाचा ब्रिटिश लेखक आहे. त्याच्याशी संवाद होत असताना एका विदेशी महिलेनं अपेक्षेने लिहिलेले ई-मेल मॅरिनो यांना दाखवून मोदी म्हणतात की, वेगवेगळ्या लोकांच्या त्यांच्याकडून किती अपेक्षा आहेत, हे त्यांना अशा प्रकारच्या ई-मेलमुळे कळतं.

युके्रन या छोट्या देशातील ती महिला एका भारतीयाशी विवाह करून सध्या भारतात राहत आहे. तिच्या म्हणण्याप्रमाणे गुजरातमध्ये मोदींनी चांगली कामगिरी करून दाखवली आहे. तिच्या ई-मेलप्रमाणे 2005 मध्ये युके्रनमध्ये ज्या बदलांची गरज होती ते बदल तिथल्या देशवासीयांनी केले नाहीत. ‘ऑरेंज रिव्होल्युशन’चा तो काळ होता युके्रनमधला, परंतु युके्रनवासीयांनी ती संधी गमावली...
हे सांगत-सांगत ती मोदींना कळकळीचं आवाहन करते की, ‘तशीच संधी (भारताला बदलायची) तुम्हाला मिळत आहे. आम्हाला ते बघायचं आहे; तुमच्याशिवाय हे कोणीच करू शकत नाही. तेव्हा तुम्ही मागे पडू नका...’

पुस्तकात मोदींचं बालपण, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी नातं, लक्ष्मणराव इनामदार (वकीलसाहेब) यांचा मोदींवर प्रभाव, पहिल्यांदा मुख्यमंत्रिपद मिळाल्यानंतरची कामगिरी, गोध्रा प्रकरण, अडवाणी व संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्याकरवी गोध्रा दंगल शमवण्यासाठी लष्करी मदत मागण्याची धडपड; उर्वरित गुजरातमध्ये दंगली भडकू नयेत यासाठी केलेले प्रयत्न हे सगळं आहेच; परंतु गोध्रा घडण्यापूर्वी दिल्लीत संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे भारतीय सैन्य पाकिस्तान सीमा भागातच अधिक गरजेचं असल्यामुळे गुजरातमध्ये सैन्याच्या तुकड्या जाऊ शकल्या नव्हत्या आणि मोदी फक्त सैन्य गणवेशातील ज्युनियर सैन्याधिकारी मागत होते; जेणेकरून दंगल करणार्‍यांवर वचक बसेल, असं वर्णन पुस्तकात वाचायला मिळतं.

लेखक म्हणतो की, गोध्राच्या कलेक्टर जयंती रवी यांच्या सूचनेनुसार 27 फेबु्रवारी 2002 च्या रात्रीच ट्रेनमध्ये जळून अकाली निधन पावलेल्या लोकांचे मृतदेह अहमदाबादकडे रवाना करण्यात आले होते, जेणेकरून त्यांच्या आप्तेष्टांना अंत्यविधीचे संस्कार पूर्ण करता यावेत. 7 ऑक्टोबर 2001 रोजी केशुभार्इंच्या जागी मोदी मुख्यमंत्री बनले व नंतर पहिल्यांदा आमदार झाले ते 25 फेबु्रवारी 2002ला राजकोटहून पोटनिवडणूक जिंकल्यानंतर. अर्थात, जेव्हा गोध्रा प्रकरण घडले तेव्हा ते कोरे-करकरीत मुख्यमंत्री होते, जिंकून आलेले; परंतु ती पोटनिवडणूक त्यांना सोपी गेली नव्हती. विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांनी मोदींना मुळीच मदत केली नव्हती आणि मोदी फक्त 14,000 मतांनी जिकले. त्यांच्या आधीचे आमदार यापेक्षा मोठ्या मताधिक्याने जिंकले होते.

लेखक पुढे सांगतो की, ट्रेनमध्ये जिवंत जाळलेल्या हिंदू लोकांचे मृतदेह अहमदाबादेत जनतेला दाखवण्यासाठी कुठेही त्यांचे प्रदर्शन करण्यात आले नव्हते; परंतु अशा अफवा तेव्हा पिकवण्यात आल्या होता, ज्याच्यात काहीच तथ्य नव्हते. पुस्तकात डॉ. माया कोडनानी यांचा उल्लेख आहे की, त्यांनी पोलिसांच्या अनुपस्थितीत विश्व हिंदू परिषदेच्या काही उपद्रवी कार्यकर्त्यांना कसे चिथावले होते. कोडनानी यांना कोर्टाने नंतर जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

या पुस्तकात एका इंग्रजाच्या नजरेतून गुजरात, गोध्रा व मोदींचे दर्शन होतं. अनेक कहाण्या नव्याने वाचकांच्या समोर येतात. तशाच त्या मधू किश्वर यांच्या पुस्तकातूनसुद्धा वाचकांना नव्याने समजतात.
मधू किश्वर या कट्टर मोदीविरोधक. त्यांनी मोदींविरोधातल्या अभियानात, मोर्चांमध्ये भाग घेतला होता आणि दंगलपीडितांसाठी पैसेसुद्धा एकत्र केले. ‘मानुषी’ या त्यांच्या नियतकालिकामध्ये मोदींविरोधात खूप लिखाण केले होते. त्यांनी स्वत: पत्रकार-लेखिका म्हणून देशातील विविध दंगे जवळून पाहिले होते व त्यावर सातत्याने लिखाण केले होते.

कालांतराने त्यांनी स्वत: गुजरातचे दौरे केले, स्वत:च्या डोळ्यांनी सर्व जागा बघितल्या, दंगलपीडितांना भेटल्या, त्यांच्या कहाण्या ऐकल्या व सर्व आरोपांची फेरतपासणी केली. अख्खा गुजरात फिरून विकासकामे बघितली व अशा लोकांना भेटल्या ज्यांना त्या पूर्वी कधीच भेटलेल्या नव्हत्या. हे सगळं बघून त्यांचं हृदयपरिवर्तन झालं. मग त्यांनी खूप खोलवर जाऊन हे पुस्तक लिहिलं, ते मोदींच्या बाजूने. पुस्तकात सिने-दिग्दर्शक, पटकथा लेखक सलीम खान यांनी प्रस्तावना लिहिली आहे व त्यात ते विचारतात की, मुंबईत दंगल झाली तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते, हे कोणाला आठवते का? मीरतमध्ये दंगल झाली तेव्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कोण होते? झालेच तर, जमशेटपूरमध्ये दंगे झाले तेव्हा बिहारचे मुख्यमंत्री कोण होते? या सगळ्या दंगली गुजरातपेक्षा वेगळ्या कशा? मग फक्त मोदींच्या मागे मीडिया व तथाकथित ‘इंटलेक्चुअल्स’ का पडले आहेत इतकी वर्षे?

भारताच्या ‘एडिटर्स गिल्ड’च्या तथ्यशोधक टीमने (दिलीप पाडगावकर, आकार पटेल व बी. जी. वर्गीस) 2002मध्ये एक अहवाल सादर केला. त्यांच्याबद्दल लेखिका लिहितात की, त्यांनी गुजराती वर्तमानपत्रे ‘संदेश’ व ‘गुजरात समाचार’च्या दंगल रिपोर्टिंगला जबाबदार मानले, जे दंगल वाढण्यास कारणीभूत ठरले; परंतु त्याच टीमने टाइम्स ऑफ इंडिया व एनडीटीव्हीबद्दल काहीच न लिहून त्यांना ‘सोडून दिलं.’

या पुस्तकात पंजाबचे माजी पोलिस महासंचालक व गुजरातचे सुरक्षा सल्लागार के. पी. एस. गिल यांच्याशी केलेल्या चर्चेचा तपशील आहे. त्यात गिल म्हणतात की, नरेंद्र मोदी पहिल्या दिवसापासून जातीय दंगलींना काबूत आणण्यासाठी मेहनत घेत होते. गिल यांनी चांगले पोलिस ऑफिसर्स फील्डवर लावले व अर्थात काही अकार्यक्षम अधिकार्‍यांना बदलून टाकले. आणि यामध्ये मोदींनी कधीच हस्तक्षेप केला नाही, असे लेखिका म्हणते.

एकूण पाहता ही दोन पुस्तके-एक मोदींचं राजकीय चरित्र, तर दुसरं सगळ्या घटना-दुर्घटना यांना नव्या चश्म्यातून पाहण्याचा व देशासमोर नवे नरेंद्र मोदी उभे करण्याचा प्रयत्न दिसतो.
मोदींची सध्या चलती आहे. मोठे लेखक, छोटे लेखक त्यांच्यावर लिहीत आहेत. फरक एवढाच की, आधी त्यांच्यावर आग ओकणारे आता त्यांची कड घेऊ लागलेले दिसतात व खरा गुजरात कसा आहे, किती विकसित आहे, यावर ते भाष्य करतात व आपल्या चुकांचे परिमार्जन करण्याचा प्रयत्न प्रांजळपणे कबूल करतात.

नरेंद्र मोदी : ए पॉलिटिकल बायोग्राफी
लेखक : अँडी मारिनो
प्रकाशक :हार्पर कॉलिन्स
पाने : 310, किंमत : 599 रुपये

मोदी, मुस्लिम्स अँड मीडिया
लेखिका : मधू पूर्णिमा किश्वर
प्रकाशक : मानुषी पब्लिकेशन्स
पाने: 340, किंमत- 401 रुपये