आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Abhilash Khandekar Article About Sansar Chand, Divya Marathi

एका व्याघ्रभक्षकाची अखेर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय संस्कारांना किंवा आपल्या मानसिकतेला कुणाच्या निधनाबद्दल जाहीरपणे आनंद प्रदर्शित करण्याची कृती रुचत नाही; परंतु ओसामा बिन लादेन पाकिस्तानात मारला गेल्यानंतर जगभरात जसे अनेकांनी समाधान व्यक्त केले होते, तसेच संसारचंद हा वन्यजिवांचा तस्कर कॅन्सरमुळे जयपूर येथे मरण पावल्याची बातमी ऐकल्यावर माझ्यातला वन्यजीवप्रेमी कुठे तरी सुखावून गेला...

भारतातल्या वाघांचा हा एक मोठा वैरी. गेली काही वर्षे तो दिल्लीत सीबीआयच्या जेलमध्येच होता. जयपूरला न्यायालयीन खटल्यांसाठी त्याला जावं लागायचं, मात्र त्याच दरम्यान 19 मार्च 2014 रोजी त्याचं निधन झालं. एका वन्यतस्कराची अखेर झाली. संसारचंद मेला एकदाचा! आता तरी भारतातील तमाम वाघ, बिबटे आपापल्या जंगलात सुरक्षितपणे नांदू शकतील, अशी आशा मनाला उभारी देऊन गेली.
संसारचंद गिहारा हा मूळचा उत्तर प्रदेशचा. कालांतराने तो दिल्लीच्या सदर बाजार या वस्तीत राहू लागला. तो एक चलाख व्यापारी होता; परंतु वन्यजिवांची, मुख्यत्वे वाघ किंवा बिबट्यांची शिकार तो स्वत: करत नसे. जंगलात राहणारे फासेपारधी (बºहेलिया) संसारचंदसाठी काम करायचे. आंतरराष्ट्रीय तस्करीत माहीर असलेला संसारचंद भारतातून चीन, तिबेट, नेपाळ, भूतान व इंडोनेशिया अशा विविध देशांमध्ये वाघांची कातडी, नखे, शरीराचे अन्य अवयव विकायचा. तसेच बिबट्या, हत्ती, गेंडे, अस्वले असे अनेक प्राणी मारून पैसा मिळवण्याचे कामही करायचा.

लहानपणापासून अर्थात, 15-16 वर्षांचा असल्यापासून तो या अवैध धंद्यात गोवला गेला होता, आणि एक हजारपेक्षा अधिक वन्यप्राण्यांची कातडी विकल्याचा त्याच्यावर आरोप होता. एप्रिल 2005मध्ये तो दिल्ली आणि मध्य प्रदेशात केलेल्या गुन्ह्यासाठी पहिल्यांदा पकडला गेला. तेव्हा त्याच्याविरुद्ध फक्त मध्य प्रदेशातच 10 वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद होती; परंतु सीबीआयने त्याला कोठडीत टाकल्यामुळे तो मध्य प्रदश पोलिसांच्या हातात येऊच शकला नाही. परिणामी, तेथे त्याने केलेल्या गुन्ह्यांसाठी त्याला शिक्षा होऊ शकली नाही.

बाकी अनेक राज्यांमध्ये त्याच्यावर स्थानिक पोलिस, वन विभाग, केंद्रीय वन्यप्राणी ब्युरो व सीबीआय अशा चार विविध विभागांकडून गुन्हे नोंदवले गेले होते. असे एकूण 54-55 गुन्हे संसारचंदवर होते. किंबहुना, अजूनही अनेक न्यायालयांत खटले प्रलंबित आहेत. त्याला शिक्षा व्हायच्या आत कॅन्सरने त्याला आपल्या तावडीत घेतले ते कायमचेच.... जसे तो वाघांना आपल्या विळख्यात घ्यायचा...!
साठ वर्षांच्या आसपास वय असलेला संसारचंद हा मुख्यत्वे 2003-04मध्ये राजस्थानातील ‘सरिस्का’ अभयारण्य व राष्ट्रीय उद्यानातले सगळे वाघ मारल्याने प्रकाशझोतात आला. सरिस्कातील सगळे वाघ एकापाठोपाठ एक संपवण्यामागे त्याचाच हात होता, याची वन विभागाच्या अनेक अधिकार्‍यांना खात्री होती. प्रारंभी त्याने हे गुन्हे कबूल केले नव्हते; पण सीबीआयने जेव्हा चौकशीला सुरुवात केली, त्यानंतर मात्र महत्त्वाची माहिती बाहेर येण्यास सुरुवात झाली होती.

परंतु संसारचंदच्या कारवाया फक्त सरिस्कापर्यंतच मर्यादित नव्हत्या. तो एका मोठ्या गँगचा म्होरक्या होता. तोच गेली तीस वर्षे भारतीय वन्यजिवांचा मुख्य शत्रू होता. जंगलातील लहान-मोठे कर्मचारी, जंगलालगत राहणारे भटक्या जमातीचे गरीब लोक, निष्णात शिकारी व जंगल माफिया वगैरे लोकांशी त्याचे जवळचे संबंध होते. त्यांच्याकरवी तो शिकार करून घ्यायचा आणि मग शिकार केलेले प्राणी व त्यांचे अवयव बाहेरील देशांत पाठवण्याचे काम करायचा. त्याचे साटेलोटे पोलिसांशी होते, जंगल खात्याच्या कर्मचार्‍यांशी होते, किंबहुना त्याचमुळे तो हे सगळं विनासायास करू शकला.

सरिस्कातील वाघ 2004-05मध्ये संपुष्टात आले. वन्यप्रेमी मंडळींनी राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे व पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग (जे भारतीय वन्यजीव बोर्डाचे अध्यक्ष असतात) यांना धारेवर धरले. परिणामी शासन-प्रशासन खडबडून जागे झाले. राजस्थान सरकारने एक उच्चस्तरीय समिती नेमली. भारत सरकारनेही सुनीता नारायण यांच्या अध्यक्षतेखाली (माधव गाडगीळ, एच. एस. पवार सदस्य असलेला) ‘टायगर टास्क फोर्स’ बनवला. त्यानंतर समिती व टास्क फोर्सचे अहवाल आले. त्यावरून अनेक उपाययोजना आखण्यात आल्या. भारतात एकेकाळी खूप वाघ होते, मात्र त्या आकड्यांवर अजूनही वाद आहेत; परंतु भारत स्वतंत्र होण्यापूर्वीच्या काही काळात व नंतरसुद्धा 40 हजारच्या आसपास वाघ होते, असं तज्ज्ञांचं मत आहे. त्या काळात शिकारीवर बंदी नव्हती, जंगले खूप होती.

देशात लोकसंख्याही कमी होती. मनुष्य या ‘प्राण्याला’ आज दिसतो तसा लोभ नव्हता. परंतु जसजसे औद्योगिकीकरण वाढले, लोकांच्या गरजा वाढल्या, तसतशी जंगलांवर अतिक्रमणे सुरू झाली. त्यातूनच जंगल आणि वन्यजीव संरक्षणार्थ सशक्त कायदे नसल्याने अनेक ‘संसारचंद’ जन्माला येत गेले...देशात वाघांची शिकार होत आहे, त्यांना वाचवणे गरजेचे आहे, नैसर्गिक संतुलन राखणे ही सरकारची जबाबदारी आहे, हे पंतप्रधान इंदिरा गांधींच्या लक्षात आले. त्यांनी 1970मध्ये ‘प्रोजेक्ट टायगर’ (व्याघ्र प्रकल्प) सुरू केला व पाठोपाठ 1972मध्ये वन्यजीव संरक्षण कायदा झाला. सुरुवातीच्या काळात यामुळे शिकारीला थोडा आळा बसला; परंतु कालांतराने परिस्थिती खालावतच गेली. वाघांची गणना आधीच्या काळात ‘पाऊलखुणा’ पद्धतीने व्हायची. अर्थात, प्रत्येक वाघाच्या पंजांचे ठसे मोजून एका जंगलात किती वाघ असतील, याचा सर्वसाधारण अंदाज काढला जायचा.

ही पद्धत तांत्रिकदृष्ट्या अचूक नव्हती; ही पद्धत कालबाह्य ठरल्यावर ‘कॅमेरा ट्रॅप’ पद्धत रूढ झाली. या पद्धतीने केलेल्या व्याघ्रगणनेनुसार 2006मध्ये देशात जेमतेम 1441 वाघ उरले आहेत. पुन्हा प्रचंड ओरड सुरू झाली. ‘टायगर टास्क फोर्स’च्या सूचनेवरून बनलेल्या ‘वाइल्डलाइफ क्राइम ब्युरो’ने कडक पावले उचलली. अन्य अनेक उपाययोजनाही करण्यात आल्या. परिणामी आता देशातील संरक्षित तसेच इतर वनांमध्ये 1700च्या वर वाघ अस्तित्वात असल्याचे समाधानकारक चित्र दिसत आहे. परंतु याचा अर्थ असा नव्हे, की एक संसारचंद गेल्यामुळे वन्यप्राण्यांवरचे अरिष्ट संपले आहे. रणथंबोर या राजस्थानच्या राष्ट्रीय उद्यानात 2003-2005 या कालावधीत दहा आदिवासींनी 22 वाघ मारल्याची नोंद झाली. जिथे 47 वाघ होते, तिथे दोन वर्षांत ही संख्या 26 वर आली. देवीसिंह (सरपंच), पृथ्वीराज - टोपणनाव पिरथिया, केसरा असे मोकिया आदिवासी जमातीचे लोक हे वाघाच्या शिकारीचे काम करायचे. कधी बंदुकीने, तर कधी पाण्यात विष कालवून, कधी लोखंडी ट्रॅप्सचा वापर करून, ही मंडळी थोड्या पैशांसाठी वाघ मारायचे. पुढे संसारचंदच्या संपर्कात येऊन चीन, तिबेट, नेपाळ येथे वाघांची चमकदार कातडी पुरवायचे. भारताने अनेक वेळा चीन, नेपाळ या देशांना त्यांचे कायदे कडक करून अशी आयात बंद करण्यास विनवले होते; परंतु त्याचा फारसा परिणाम झाला नाही. अखेर संसारचंद गेला. आता सगळं ‘आलबेल’ होऊन जाईल, असंही नाही. कारण संसारचंद जेव्हा तुरुंगात होता तेव्हाही त्याच्या हस्तकांमार्फत वन्यप्राण्यांच्या शिकारीचे उद्योग सुरूच होते. त्यासाठी कायद्यांची कठोर अंमलबजावणी करणे अत्यावश्यक ठरणार आहे. वाघ भारतातच सुरक्षित आहेत, असे अनेक प्रगत देशांचे मत असले तरी नव्याने संसारचंद जन्मास येऊ नयेत आणि संसारचंदने उभारलेलं शिकारीचं जाळं पुन्हा कार्यरत होऊ नये, याचे सगळ्यात मोठे आव्हान व्यवस्थेला पुढील काळात पेलायचे आहे.