Home | Magazine | Rasik | abhilash-khandekar-book-review

अमेरिकेला मिळालेल्या दहशतवादाच्या वारशाचे बोलके विश्लेषण

अभिलाष खांडेकर, संपादक (महाराष्ट्र) / दिव्य मराठी | Update - Jun 02, 2011, 02:20 PM IST

'न्यूयॉर्क टाइम्स'चे नामांकित पत्रकार डेव्हिड सँगर यांचे 'द इन्हेरिटन्स' हे ओबामांच्या कार्यपद्धतीचा सखोल वेध घेणारे पुस्तक माझ्या वाचनात आले.

 • abhilash-khandekar-book-review

  आंतरराष्ट्रीय अल कायदा या दशतवादी संघटनेचा म्होरक्या ओसामा बिन लादेन संपल्याने अमेरिकेसह सगळ्या जगाने सुटकेचा नि:श्वास टाकला. आता लादेनच्या मृत्यूनंतर अल कायदा ही संघटना दहशतवाद बंद करील आणि जगभर शांतता पसरेल, असा विश्वास शाळकरी मुलालाही वाटत नाही. मात्र तो मारला गेल्याने अमेरिका, पाकिस्तान, अरब राष्ट्रे (काही प्रमाणात भारत) आणि काही युरोपीय देशांमध्ये थोडेफार बदल घडण्याची शक्यता आहे. जानेवारी २००९मध्ये अध्यक्षपदावर निवडून आलेले बराक ओबामा यांची लोकप्रियता २०१०मध्ये ब-यापैकी घसरली होती. पण लादेनला अमेरिकी नेव्ही सील्सनी पाकिस्तानातील घरात घुसून मारले.
  त्यामुळे ओबामा लोकप्रियतेच्या मार्गावर पुन्हा अग्रेसर झाले. 'वॉशिंग्टन पोस्ट' आणि प्यू रिसर्च सेंटर यांनी मे २०११च्या दुस-या आठवड्यात केलेल्या सर्वेक्षणात अध्यक्ष ओबामांच्या लोकप्रियतेत ४७ टक्क्यांवरून ५६ टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे दिसून आले. ९/११च्या नंतर लगेच नोव्हेंबरमध्ये अमेरिकेला जाण्याचा योग आला होता. मग पुन्हा जून २०१०मध्ये तेथे जाणे झाले. याच काळात 'न्यूयॉर्क टाइम्स'चे नामांकित पत्रकार डेव्हिड सँगर यांचे 'द इन्हेरिटन्स' हे ओबामांच्या कार्यपद्धतीचा सखोल वेध घेणारे पुस्तक माझ्या वाचनात आले. यात इराण, अफगाणिस्तान, पाकिस्तान, चीन, उत्तर कोरिया आणि इजिप्त अशा मुस्लिम देशांचे अमेरिकेशी असलेले तणावग्रस्त संबंध, त्यांच्यातले काही अण्वस्त्रसज्ज देश, या सगळ्यातून शीतयुद्ध संपल्यानंतर अमेरिकेचा जगावर कमी होत जाणारा प्रभाव आणि 'नव्या' अध्यक्षांची त्यामुळे होत असलेली तडफड याचे वास्तववादी विश्लेषण आहे. डेव्हिड सँगरच्या या पुस्तकाचा गाभा खूपच विस्तृत आहे. ज्या वेळेला हे पुस्तक बाजारात आले, तेव्हा ओबामांबद्दलचे कौतुक ओसरत होते. आर्थिक संकटातून जग (आणि स्वत: अमेरिका) बाहेर येण्यासाठी धडपडत होते. ओबामा ही समस्या कशी हाताळतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले होते. ओबामांनी अमेरिकेच्या चारचाकी वाहनांच्या बाजारपेठेचे राष्ट्रीयीकरण करून टाकले. परंतु स्वत:च्या पक्षाचा दबाव असूनही बँकांचे राष्ट्रीयीकरण टाळले. इजिप्तमध्ये जाऊन 'सलाम आलेकुम' या शब्दांनी भाषण सुरू करून मुस्लिमांचे हृदय जिंकण्याचा प्रयत्नही केला. परंतु लादनेला पकडणे किंवा मारणे हेच ओबामांचे प्रमुख लक्ष्य होते. असे म्हणतात की, फ्रँकलिन रुझवेल्ट यांनी जेव्हा अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली, तेव्हा जेवढी आव्हाने त्यांच्यापुढे होती आणि जग हाताळणे जितके कठीण होते, तशीच आव्हानात्मक परिस्थिती त्यानंतर प्रथमच अमेरिकेला व पर्यायाने ओबामांना हाताळावी लागत आहे. सँगर वाचकास आठवण करून देतो की, १२ सप्टेंबर २०१० रोजी पाकिस्तानने अल कायदा आणि पाकिस्तानातील बाकी सर्व इस्लामी दहशतवाद्यांचा बीमोड करण्याची अधिकृत घोषणा केली. पाकिस्तान-तालिबान संबंध तर सगळ्या जगाला माहीत होते. मुशर्रफ तेव्हा पाकिस्तानचे राष्ट्रप्रमुख होऊन काहीच वर्षे झाली होती. त्या वेळी दहशतवाद संपविण्यासाठी अमेरिकेकडून (म्हणजे जॉर्ज बुश प्रशासनाकडून) पाकिस्तान १०० कोटी डॉलर्स घेऊन गेला; पण प्रत्यक्षात तालिबान आणि अन्य दहशतवाद्यांनाच या पैशाची मदत पोहचत राहिली. बुश यांनी तेव्हा दहशतवाद संपवण्याच्या लांब पल्ल्याच्या युद्धात पाकिस्तानला आपला जवळचा दोस्त मानले होते; पण बुश चुकले होते. बुश यांना पाकिस्तानने पूर्णपणे फसवले की बुश आणि त्यांचे सहकारी स्वत: फसले यांवरही हे पुस्तक नवा प्रकाश टाकते. ओबामांच्या एक वर्ष कार्यकालाचे एकूण आकलन, अमेरिकेने सप्टेंबर २१पासून दहशतवाद कसा हाताळला, ओबामांच्या आधी अमेरिकेची काय परिस्थिती होती, ग्वांटानामो बे छळछावणीबद्दलची बुश यांची कहाणी आणि स्वत: ओबामा यांनी निवडून आल्यावर एका वर्षात ती बंद करण्याची घोषणा कशी कागदावरच राहिली, अशा घडामोडींचे सखोल विश्लेषण करणारे हे पुस्तक बुश व ओबामांची कार्यप्रणाली समजून घेणा-यांसाठी उपयुक्त आहे.

  द इन्हेरिटन्स
  द वल्र्ड ओबामा कन्फ्रन्ट्स अँड द चॅलेंजेस टू अमेरिकन पॉवर
  लेखक : डेव्हिड बी. सॅन्गर
  हार्मनी बुक्स, न्यूयॉर्क

Trending