आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुधारणा पर्वाचे प्रतिबिंब

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘कॅफे कॉफी डे’ हा कॉफीपानाचा फॅशनेबल अड्डा आणि ‘आयपीएल’च्या झटपट क्रिकेटमध्ये काय साम्य आहे? किंवा ‘नरेगा’ आणि ‘एफडीआय’मध्ये काय साम्य असू शकेल? नॅनो आणि तनिष्क किंवा नंदन नीलेकणी आणि मायावती? जाऊ द्या... यापेक्षा जास्त कोडी नाही टाकत तुमच्यापुढे.
हे सगळे एका अत्यंत माहितीपूर्ण आणि देशातल्या अनेक मोठ्या व नामांकित तज्ज्ञांकडून लिहिलेल्या पुस्तकात वाचायला मिळते. गेल्या 20 वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था कशी बदलत गेली, बदलत्या अर्थव्यवस्थेचे कर्ते कोण होते, त्यांनी पडद्यामागे व पुढे राहून काय काय कामे केली; देशात कुठले कुठले नवे ब्रँड्स आले. (कॅफे कॉफी डे किंवा तनिष्क) ते राजकारणी व अर्थशास्त्रज्ञ कोण होते, ज्यांनी ही अर्थव्यवस्था बदलण्यात भरीव कामगिरी केली; मागील 20 वर्षांतील रिफॉर्म्स कुठले होते आणि पुढील 20 वर्षांत भारत कसा बदलत जाणार आहे... हे सगळे ज्या एकाच पुस्तकात आहे, ते म्हणजे प्रस्तुत ‘रिफॉर्म्स 2020’ हे पुस्तक होय. त्यामध्येच नरेगा व एफडीआय आहे, तसेच अजून अनेक ब्रँड्स आहेत आणि ते कसे आपल्या तोंडावर आले त्याची कहाणीही.
भारतात आर्थिक सुधारणा आणि अर्थव्यवस्थेचे उदारीकरण (किंवा जागतिकीकरण) पूर्ण होऊन दोन दशके लोटली आहेत. या दोन दशकांत या विषयावर खूप चर्वितचर्वण झाले आहे; परंतु गेल्या 20 वर्षांत आर्थिक, औद्योगिक, सामाजिक आणि राजकारण या क्षेत्रात इतक्या घडामोडी झाल्यात की, त्या लक्षात ठेवणे किंवा त्या कशा घडल्या, कोणी घडवल्या हे सगळे आणि पुढील वर्षांत विभिन्न क्षेत्रांत काय व कसे बदल होतील, हे सगळे एकाच पुस्तकात म्हणजे ही पर्वणीच नाही का?
हे पुस्तक पाच भागांत विभागलेले आहे. पहिल्या ‘चेहरे’ या भागात नरसिंह राव, मनमोहनसिंग, अटलबिहारी वाजपेयी, यशवंत सिन्हा, चिदंबरम, विजय केळकर अशा प्रभावशाली व्यक्तींबद्दल लिहिले आहे. ज्यांनी 1990-91 मध्ये सुधारणेचा श्रीगणेशा केला. यातच पुढच्या 20 वर्षांतले आर्थिक सुधारक कोण असतील, याबद्दल नामांकित लेखकांनी लिहिले आहे. नरसिंह राव यांच्यावर त्यांचे कॅबिनेट मंत्री नटवर सिंह यांनी लिहिले आहे, तर वाजपेयींवर अरुण जेटली यांनी आणि मनमोहनसिंग यांच्यावर रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर सी. रंगराजन यांनी खोलात जाऊन त्यांच्या स्वत:च्या अनुभवांना शब्दरूप दिले आहे. रंगराजन लिहितात, मनमोहनसिंगांनी रुपयाचे अवमूल्यन 1991 मध्ये केले आणि त्याचबरोबर विदेशी व्यापार, परकीय गुंतवणूक व डॉलर-रुपया दर यांचे सुसूत्रीकरण केले. डॉ. सिंग हे नरसिंह रावांचे अर्थमंत्री होते अणि तेव्हा (1991) देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली होती. नटवरसिंह आणि रंगराजन, राव आणि सिंग यांच्या विशेष प्रयत्नांना श्रेय देतात. कारण आज आमची अर्थव्यवस्था जर सुधारलेली दिसते आहे, तर त्याचा पाया या दोघांनी घातला होता.
या 20 वर्षांत सुधारणा कोणकोणत्या झाल्या? प्रस्तुत पुस्तक म्हणते, शिक्षण क्षेत्र, टॅक्स, औद्योगिक लायसन्स संपवणे, स्टॉक मार्केट, टेलिकॉम, नरेगा वगैरे क्षेत्रात मोठे बदल झालेत. भविष्यातील सुधारकांमध्ये नरेंद्र मोदींवर नितीन गडकरींनी लिहिले आहे, तर जयराम रमेश यांच्यावर सीताराम, खुर्शीद आणि मायावतींवर भाजपच्या निर्मला सीतारमण तसेच अरुण जेटलींवर प्रफुल्ल पटेल यांचे भाष्य आहे.
वर म्हटल्याप्रमाणे कॅफे कॉफी डे, नरेगा किंवा नॅनो आणि तनिष्क हे नवे ब्रँड्स देशात गेल्या काही वर्षांत चर्चेत आले असल्याने संपादकांनी त्यांना ब्रँड्स या भागात समाविष्ट केले आहे. यातच स्टार, झी टीव्ही, दिल्ली मेट्रो, बिग बाजार व नोकरी डॉट कॉमही आहेत.
दुस-या एका भागात उद्योजकांच्या विभागात रतन टाटांवर मुकेश अंबानी यांनी लिहिले आहे, तर ‘हिंदुस्तान टाइम्स’च्या मालक शोभना भारतीय यांनी आपला भाचा कुमारमंगलम बिर्लांवर लिहिले आहे. शोभना या के. के. बिर्ला यांची मुलगी आणि कुमारमंगलम यांचे स्व. वडील आदित्य बिर्ला यांची चुलतबहीण. बाकीच्या भागात तज्ज्ञांनी विविध विषय जसे की, कर प्रणालीत सुधारणा, वाढत्या पगारामुळे वाढणारी उपभोगवादी संस्कृती, वाढता मध्यमवर्ग आणि असे अनेक विषय आहेत, ज्यामुळे भारतीय समाज खुलतोय, बदलतोय, विकासाच्या मार्गावर आहे आणि जगात एक आर्थिक शक्ती म्हणून ओळखला जात आहे. विविध विषयांवर विविध दृष्टिकोनांतून बघणा-या तज्ज्ञांची मते, आर्थिक सुधारणांचा हळूहळू उलगडत गेलेला इतिहास, नवे विचार आणि तज्ज्ञांचे आराखडे हे सगळे या एकाच पुस्तकात वाचकाला वाचायला आणि त्यामुळे समाज-देश समजायला मिळते, हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
पुस्तक : रिफॉर्म्स - 2020लास्ट 20 इयर्स, नेक्स्ट 20 इयर्स
प्रकाशक : इंडियन एक्स्प्रेस / रूपा प्रकाशन
किंमत : 595 / पाने : 370
abhilash@dainikbhaskargroup.com