आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Abhilash Khandekar On Leadership In Government The Art Of Work

सनदी कार्यक्षमतेचा मंत्र !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जनतेची कामे कोण करतो? राजकारणी की अधिकारी वर्ग? लोकशाही व्यवस्थेत खरे तर निवडून आलेल्या नेत्यांनी जनतेच्या समस्या सोडवणे अपेक्षित असते. अनेकदा ते सोडवतातही. अनेकदा अधिकार्‍यांवर ढकलतात किंवा दोन्हींपैकी काहीच करत नाहीत. राजकारणी मंडळी हे करू धजतात आणि काहीही कामे न करता, कायदे बनवण्याची मुख्य जबाबदारीही ते अनेकदा टाळू शकतात. पुन्हा निवडूनही येऊ शकतात. परंतु कार्यपालिका म्हणजे सनदी अधिकार्‍यांच्या भूमिकेतून जनतेची सेवा करणार्‍या ‘पब्लिक सर्व्हंट’ना जनतेची कामे करावीच लागतात. त्यांना निवडणुका लढवायच्या नसल्या तरीही बहुतांश कामे ‘नियमांच्या चाकोरीत’ राहून पार पाडावीच लागतात. हे सनदी अधिकारी थेट आयएएस असोत किंवा राज्याच्या सेवेतले असोत; विविध पातळ्यांवर त्यांना ही कामे करावीच लागतात. त्यांच्याशिवाय सरकार- दिल्लीतील असो की मुंबईतील असो- चालणे केवळ अशक्य बनते.
या सनदी अधिकार्‍यांमधले बरेचसे सरळमार्गी असतात. जनतेची कामे करण्याची आंतरिक ऊर्मी त्यांच्यात असते, ते भ्रष्टाचारात बरबटलेले नसतात. परंतु असे सचोटीचे अधिकारी कमीच असतात, असे अनेकांच्या अनुभवास येते. म्हणूनच सरकार कामे करत नाही, अधिकारी संथ असतात किंवा पुढाकार घेऊन कामे करत नाहीत, हेच तक्रार नेहमी ऐकिवात येत राहते.
भारताच्या सनदी सेवेला अर्थात आयएएसला आता जवळजवळ 60 वर्षे होत आहेत. त्याआधी ती आयसीएस म्हणजेच इंडियन सिव्हिल सर्व्हिस म्हणून ओळखली जायची. आयएएस- इंडियन अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसच्याच एका मोठ्या अधिकार्‍याने लिहिलेले हे पुस्तक आहे. शासनयंत्रणेवर तसेच राजकीय हस्तक्षेपावर आजवर सेवानिवृत्त अधिकार्‍यांनी इंग्रजीमध्ये खूप काही लिहिले आहे. सनदी अधिकार्‍यांच्या भ्रष्टाचाराबद्दलसुद्धा लिहिले गेले आहे. परंतु प्रस्तुत पुस्तक सनदी कार्यक्षमतेचे 100 असे मार्ग सुचवते, जे अवलंबिल्याने सरकारी कार्यपद्धतीत प्रभावीपणे काम करणे शक्य होऊ शकते.
मदनमोहन उपाध्याय हे मध्य प्रदेशातील वरिष्ठ आयएएस अधिकारी. 1981च्या बॅचचे सदस्य. 1981मध्ये शासकीय सेवेत येण्यापूर्वी इंडियन रेल्वे ट्रॅफिक सेवेत होते. इंदूर, जबलपूर, बिलासपूर वगैरे ठिकाणी कलेक्टर व कमिशनर या पदांवर त्यांनी काम केले. सध्या कृषी विभागाचे प्रमुख म्हणून भोपाळमध्ये कार्यरत आहेत. हार्वर्डचे विद्यार्थी म्हणूनही त्यांना या सेवेत वेगळेच महत्त्व प्राप्त आहे. नोकरीत असताना सरकारी सेवा
प्रभावी बनविण्याचे 100 मंत्र त्यांनी या पुस्तकाद्वारे सामान्य जनतेला, राजकारण्यांना, पत्रकारांना व सनदी अधिकार्‍यांना देण्याचा प्रयत्न केला आहे.
अनेक अधिकारी आपल्या आस्थापनेला योग्य दिशा व नेतृत्व देत नाहीत. त्यासाठी लेखकाने उपाय सुचवले आहेत. स्वत: लेखक म्हणतो की, त्यांना नावीन्यपूर्ण ‘अ‍ॅप्रोच’ आवडतो आणि त्याच्यामुळेच जनतेचे भले होऊ शकते. या संदर्भातही पुस्तकात विविध उदाहरणे देऊन उपाध्याय यांनी दिशादर्शन केले आहे. ते म्हणतात, ‘लीडरशिप क्रायसिस’ हा सभोवताली दिसतो आणि त्याचे उत्तर ती संस्था (किंवा सरकारी विभाग) कोण ‘लीड’ करत आहे, या प्रश्नात दडलेले असते. लीडरशिपवर आजवर खूप पुस्तके लिहिली गेली आहेत. परंतु लेखकाच्या मते, ‘लीडरशिप इन गव्हर्नमेंट’ याबद्दल वेगळ्या दृष्टिकोनातून केलेले लिखाण फारसे उपलब्ध नाही. जवाहरलाल नेहरू, ऑलिव्हर होम्स, नेपोलियन बोनापार्ट, प्लेटो वगैरे राजकारणी, सामाजिक नेते, विचारवंत या सगळ्यांचे विचार, स्वत:ची कार्यपद्धती याविषयी लेखकाने या पुस्तकात विस्ताराने लिहिले आहे.
एकूण लहान-मोठी 100 प्रकरणे यात आहेत. प्रत्येक प्रकरण एका विशिष्ट विषयाला किंवा संकल्पनेला वाहिलेले आहे. त्यातून प्रशासन कसे सुधारेल याबद्दल अत्यंत सोप्या भाषेत सांगितले आहे. हे पुस्तक सरकारी कर्मचारी-अधिकार्‍यांचे प्रबोधन करणारे असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. अनेकदा वरिष्ठ अधिकारी कनिष्ठ कर्मचार्‍यांवर कामे सोपवतात. मात्र कालांतराने विसरूनही जातात. अशा वेळी जर सातत्याने ‘मॉनिटरिंग’ केले नाही, तर कार्यपद्धतीत सुधारणा शक्य नाही. त्यांनी ‘मॉनिटरिंग’वर पूर्ण एक
प्रकरणच लिहिले आहे आणि त्याचे महत्त्व समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ते म्हणतात की, व्यवस्थित यंत्रणा विकसित करणे व त्यात सातत्याने सुधारण करत परिणामकारक बनवणे, हेच कार्यक्षम अधिकार्‍याचे काम आहे.
आज देशभरात ‘गुड गव्हर्नन्स’वर चर्चा चालली आहे. बिहार मागासलेले राज्य का राहिले किंवा गुजरात प्रगत कसे झाले? यामध्ये राजकीय इच्छाशक्ती जेवढी महत्त्वाची तेवढीच ‘ब्युरोक्रसी’पण महत्त्वाची. एकूणच प्रस्तुत पुस्तक प्रशासन कार्यक्षम कसे होऊ शकते, यावर प्रभावी भाष्य करते.

लीडरशिप इन गव्हर्नमेंट
द आर्ट ऑफ वर्क
लेखक : मदनमोहन उपाध्याय
प्रकाशक : पेंटागॉन प्रेस
पाने : 243
किंमत : रु. 895
abhilash@dainikbhaskargroup.com