आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झपाटून टाकणारी लक्ष्मी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लेखिका MSc in Computer Science असून लेक्चरर आहेत. कविता, ललित, कथालेखन करतात. शास्त्रीय संगीताची व पेन्सिल स्केचिंगचीही त्यांना आवड आहे. त्यांचा ‘अभिरुची रमेश ज्ञातेच्या कविता’ हा कवितासंग्रह प्रकाशित झाला आहे. 
 
मध्यंतरी, जॉर्ज बर्नाड शॉ यांच्या ‘ओव्हररूल्ड’ नाटकातलं वाक्य वाचनात आलं, “As long as I have a want, I have a reason for living. Satisfaction is death.” “जोपर्यंत जीवनात आस आहे तोवर श्वास आहे, जर आस संपली तर कदाचित श्वास पण थांबेल.” हो, पण जर मनातली ही आस, इच्छा यांची संपूर्ण आयुष्यात कधी पूर्तताच नाही झाली तर? किंवा इच्छा इतकी प्रबळ असावी की, तिने स्वतःला कायमचं उपाशी ठेवावं! आणि जर असं खरंच कुणाच्या आयुष्यात घडलं तर?
आणि प्रश्नाच्या नेमक्या या वळणावर मला चिं. त्र्यं. खानोलकर यांची ‘रात्र काळी घागर काळी’ ही कादंबरी भेटली. भेटली म्हणजे अगदी घट्ट मिठी मारून भेटावी तशी भेटली आणि या कादंबरीमधल्या लक्ष्मीनं पुरतं झपाटून टाकलं. पूर्ण कादंबरीमध्ये ती नेहमीच सगळ्यांना झपाटून टाकत आली आहे आणि सोबत तिलादेखील आलंय झपाटलेपण, तेदेखील अगदी टोकाचं. कादंबरी वाचत असताना नेहमी, ‘आता अजून काय पुढे वाढून ठेवलंय तिच्या आणि तिच्या अनुषंगाने बाकीच्यांच्या आयुष्यात’ हे सतत वाटत राहतं. एखादीला स्त्रीत्वाचे सौंदर्याच्या मापदंडातले कमालीचे वरदान लाभावे आणि तेच तिच्या नैतिक ऱ्हासाचे कारण ठरावे. आणि हे नैतिक अधःपतन होत असताना तिला आणि तिच्या आयुष्यात त्या त्या प्रसंगी आलेल्या पुरुषांना याची जरादेखील जाणीव नसावी, हे भयावह आहे. वाचताना हे पदोपदी जाणवत राहतं.
कादंबरीच्या सुरुवातीलाच तिची भेट होते. खानोलकरांनी साकारलेली लक्ष्मी विलक्षण देखणी, लावण्यवती आहे. तिला सौंदर्याचे अलौकिक वरदान प्राप्त झाले आहे आणि तिला याची जाणीव आहे. जेव्हा खानोलकर तिची आणि वाचकांची भेट घडवून देतात, तेव्हा पहिल्यांदा तिला ‘वाचतानाच’ हे लक्षात येतं.
लक्ष्मीचे वडील यज्ञेश्वरबाबा देवळात रुद्र म्हणणाऱ्या दिगंबरला बघतात आणि लक्ष्मीसाठी ठरवून टाकतात, तिला त्याबद्दल न विचारताच. तीदेखील वडिलांचा मान राखून तयार होते, कारण तिच्या वडिलांना तिच्याबद्दल असलेले वात्सल्य तिला जपायचे आहे. आईविना वडिलांनी वाढवलेली पोर आहे ही. लग्नातल्या विधींच्या वेळेस आणि पुढे लग्न होऊन घरी आल्यानंतर तिला दिगंबराच्या वागण्यात चुकलेपण जाणवू लागते. तिला त्याच्या वागण्याचा अर्थ नाही लागत. सौंदर्याची मूर्तिमंत खाण समोर असताना आपला जोडीदार आपल्याला स्पर्श करत नाही, हेच तिला अनाकलनीय वाटते. जेव्हा ती दिगंबरला याचा जाब विचारते, तेव्हा त्याच्याकडून आलेल्या उत्तराने ती हैराण होते. तो म्हणतो, “ही आग सहन होत नाही. हे असे माणसाला सहसा न प्राप्त होणारे सौंदर्य तुला प्राप्त झाले आहे. तू शुद्ध कशावरून आहेस?” हे जेव्हा ती ऐकते तेव्हा ती पूर्णतः जखमी होते, घायाळ होते, तिची भयंकर तडफड होते. ज्या अलौकिकत्वाचा तिला विलक्षण अभिमान होता, असूया होती, त्यानेच जणू तिचा घात केला होता. तिथून तिची पुढे फरफट चालू राहते, शरीरसुखाच्या बाबतीत. पुढे तिने त्याला एकदा डिवचल्यावर त्यांच्यात घडलेला पहिला आणि शेवटचा शरीरसंबंध, अर्थात तिची भूक न भागवणारा असाच आणि त्यानंतर दिगंबरचे घर सोडून जाणे. त्यानंतर मग लक्ष्मीचे आयुष्य तिच्या हातात राहात नाही. गोष्टी घडत जातात आणि प्राक्तन दर वेळी वेगवेगळ्या चेहऱ्यांनी तिच्या पुढ्यात येऊन उभे राहाते. ती तिच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येकावर जणू सूड उगवते आणि त्या प्रत्येकाला ती आयुष्यातून उठवते, अगदी शब्दशः. 
या संपूर्ण कादंबरीकडे बघता एक लक्षात येतं की, लक्ष्मी कायमच उपाशी राहिलेली आहे. लग्नाच्या अगदी सुरुवातीपासून. तिची भूक भागविण्यासाठी ती तिचं स्त्रीत्व दैहिक अर्थाने पणाला लावत आलीये कायम. तिच्या आयुष्यात जे जे कुणी पुरुष आले त्या प्रत्येकाने तिला कधी ना कधीतरी कामुक भावनेने नजरेने बघितले आहे, हे निश्चित. तिला नदी पार करायला मदत करणारा गोविंदा, दिगंबरचे काका दास्याआबा, त्यांचा मित्र अच्युत, केमळकर वकील, खटखटे, दाजी, वामन या प्रत्येकाने कधी मनातल्या मनात, कधी अप्रत्यक्ष, तर कधी प्रकटपणे तिचे स्त्रीत्व भोगू पाहिले आहे. मग ते करत असताना त्यांच्यातले नातेसंबंधदेखील पणाला लागले आहेत, किंबहुना त्या वेळी नातेसंबंधांचा मुलाहिजा नाही ठेवला गेलाय, कुणाकडूनही. लक्ष्मीच्या प्रतलात राहून विचार करायचा म्हटला तर तिलादेखील या नातेसंबंधांची फारशी चाड नाहीये. तिलासुद्धा पुरुषामधला नर दिसत आला आहे. तिला खूप चांगल्या प्रकारे माहीत आहे की, तिच्या सौंदर्याच्या विळख्यात ती भल्याभल्यांना अडकवू शकते; पण तिला कुठेतरी याचीदेखील जाणीव आहे की, तिचे सौंदर्य इतके अलौकिक किंवा जीवघेणे आहे की, अगदी तिच्या नवऱ्यापासून वामनपर्यंत, जो तिच्या मुलाच्या वयाचा आहे, चटकन कुणी तिला हात लावायला धजावत नाही. 
म्हणजे एखादे सौंदर्य इतके दाहक असावे की, त्याचा धाक वाटावा आणि हीच लक्ष्मीची शोकांतिका आहे असे वाटते. तिला जेव्हा जेव्हा वाटत आले की, आपण आपल्या शरीराचा वापर करून समोर आलेला प्रत्येक पुरुष प्राप्त करून घेऊ शकतो, तेव्हा तेव्हा तिला मिळालेले हे निसर्गाचे वरदान तिच्यासाठी अभिशाप ठरले आहे. 
लक्ष्मी पुरती कोलमडते जेव्हा तिच्या आणि दिगंबरच्या केवळ एका संबंधातून जन्माला आलेला तिचा मुलगा सदाशिव, जो तिला आई म्हणायलादेखील तयार नाही, तिच्यापासून तोंड फिरवतो. स्वतःच्या आईपेक्षा त्याच्या आईबद्दल गाव काय बोलते यावर त्याचा जास्त विश्वास आहे. ती त्यानंतर मात्र निघून जाते गावातून कायमचीच. बैलगाडीतून जात असताना तिला तिच्या आयुष्याचा सगळा प्रवास दिसतो, सरलेल्या सगळ्या कोरड्या रात्री आठवतात आणि जाणीव होते की, पाण्यावर घागर उपडीच तरंगत राहिली, वाहात राहिली, आतून कोरडीच ती पण.
ही कादंबरी झपाटून टाकते वाचणाऱ्याला. ती आपल्याभोवती कोश विणते आणि कादंबरीमधली सगळी पात्रं आपल्याला दिसत राहातात. अगदी पहिल्यांदा जेव्हा वाचली तेव्हा हीच अवस्था होती आणि आता या लेखाच्या अनुषंगाने जेव्हा परत वाचली तेव्हा पण हेच जाणवतंय. गारूड आहे हे. लक्ष्मी जात नाही डोळ्यांसमोरून. ज्या पद्धतीने खानोलकरांनी लक्ष्मी साकारली आहे तिला समजून घेतलं तिच्याबद्दल कधी कीव वाटते, कधी राग येतो. प्राक्तनावर विश्वास बसायला लागतो. बैलगाडीत बसून जातानाची लक्ष्मी दिसायला लागली की, दिग्मूढ होऊन तिच्याकडे बघत बसण्याशिवाय पर्याय नाही उरत.
 
abhiruchidnyate@gmail.com
बातम्या आणखी आहेत...