Home »Magazine »Rasik» Abhishek Bhosale Writes About Speech Of Dr. Ramin Jahanbegloo

गांधी, जहॉंबेगलू आणि मुल्‍यांची क्रांती...

अभिषेक भोसले | Oct 01, 2017, 00:15 AM IST

परिस्थितीचे राजकीय आणि समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून सैद्धांतिकीकरण करणारे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे राजकीय विचारवंत डॉ. रामीन जहाँबेगलू यांनी नुकतीच औरंगाबादला भेट दिली. या भेटीत त्यांचे ‘महात्मा गांधीची आजची प्रासंगिकता’ या विषयावर व्याख्यान झाले. याप्रसंगी त्यांनी पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांशी साधलेल्या संवादातील काही महत्त्वाच्या मुद्द्यांची ही मांडणी...

"हू इज रिलिव्हंट टुडे?' हा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. समाज म्हणून स्वत:ची फसवणूक करत असताना, प्रत्येक प्रश्नाकडे उथळपणे बघत असताना अन्याय, पीडितांच्या प्रश्नांची जागा कॉर्पोरेट संकल्पनांनी घेतली असताना या प्रश्नाला भिडणे वाटते तितके सोपेही नसते. अशा वेळी इराणीयन-कॅनेडियन तत्त्वज्ञ डॉ. रामीन जहाँबेगलू हे जे काही मांडू पाहत आहेत, ते अत्यंत महत्त्वाचे आहे.

२००६ मध्ये डॉ. जहाँबेगलू यांना इराण सरकारने अमेरिकचे हस्तक असल्याचे कारण देत अटक केली. चार महिने त्यांना कैदेत ठेवण्यात आले. २८ दिवस एकांतवास आणि उरलेला काळ ‘टॉर्चर’ असा त्या चार महिन्यांचा रामीन यांचा अनुभव. आंतरराष्ट्रीय पातळीवरून दबाव वाढल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. नॉम चॉम्स्कीपासून क्रिस्तोफ झानुसी यांच्यासारख्या जागतिक विचारवंत आणि कलाकारांना त्यांच्या सुटकेसाठी इराण सरकारवर दबाव टाकावा लागला. सध्या डॉ. रामीन भारतात ‘महात्मा गांधी सेंटर फॉर पीस स्टडीज’चे संचालक म्हणून काम पाहत आहेत. त्यांनी घेतलेला बंदिवासाचा अनुभव आणि जगातील राजकीय स्थितीचा, हिंसक घटनांचा अभ्यास केल्यानंतर, त्यांना त्यांचं उत्तर सापडलंय...ते म्हणताहेत- ‘गांधी इज रेलेव्हंट टुडे’. म्हणूनही आज त्यांची ओळख गांधीवादी विचारवंत अशी झाली आहे.

महात्मा गांधींची प्रासंगिकता सांगताना डॉ. रामीन यांनी ज्याप्रकारे पैलू उलगडले, ते पाहता गांधीजी हे राजकारणाच्या पुढे जाणारे आहेत. गांधीजींची सुसंगतता भूतकाळापेक्षा भविष्यात अधिक आहे. ‘राजकारण म्हणजे फक्त नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यामधील सत्तेचा संघर्ष नाही, तर राजकारण हे मूल्यांच्या क्रांतीसाठी असते.’ हे रामीन यांचे म्हणणे लक्षवेधी आहे.

आजवर राजकारणापासून फटकून असलेली पिढी परत राजकारणाकडे गांभीर्याने पाहू लागली आहे. अशा वातावरणात डॉ. रामीन मांडत असलेले मुद्दे नव्याने विचार करायला लावत आहेत. मूल्यक्रांतीचे राजकारण करायचे असल्यास ‘एल’ची त्रिसूत्री त्यांच्या मांडणीतून समोर आली आहे. ‘लिसनिंग’ म्हणजेच ऐकणे, ‘लर्निंग’ म्हणजेच शिकणे आणि ‘लीडरिंग’ म्हणजेच नेतृत्व करणे. या त्रिसूत्रीशिवाय मूल्यांची क्रांती आणि त्याचे राजकारण शक्य नाही, असे त्यांना वाटत आहे. आपण जे ऐकतोय त्यातून आपण काही शिकत नसू तर ते ऐकणे निव्वळ मूर्खपणाचं आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.

गांधींचे विचार आणि त्यातून निर्माण झालेल्या राजकारणावर भाष्य करताना डॉ. रामीन म्हणतात, आज एक गांधी नाहीयेत. आम्ही अनेक गांधी तयार केले आहेत. काँग्रेसचे गांधी वेगळे आहेत. त्यांच्या विरोधकांचे गांधी वेगळे आहेत. अण्णा हजारेंचे गांधी त्याहून वेगळे आहेत. पण गांधी फक्त उपोषणापुरते आणि राजकारणापुरते किंवा आधुनिक भारताचे जनक या ओळखीपुरते मर्यादित नाहीत, तर ते या सगळ्याच्या पुढे जाणारे आहेत. गांधीजी राजकारण आणि तत्त्व यामध्ये संवाद साधणारा दुवा आहेत. ते २१व्या शतकातील मूल्यक्रांतीचे रचनाकार आहेत. गांधीजींना राजकारणाची बहुसांस्कृतिक जाण होती. गांधीजी ‘शेअर्ड’ सार्वभौमत्वाची संकल्पना मांडतात, जी आजच्या राष्ट्रवादाच्या फोफावणाऱ्या वातावरणात महत्त्वाची आहे. सध्या अनेक देशांसाठी कळीचा मुद्दा बनलेल्या स्थलांतरितांचे प्रश्न सोडविण्यासाठी गांधीजींनी करून दिलेली बहुसांस्कृतिक जाणीव महत्त्वाची आहे. त्यामुळे समाजाला मूल्यक्रांतीसाठी संघटित करण्यासाठी गांधीजी मला महत्त्वाचे वाटतात. ‘आर्ट ऑफ ऑर्गनायझिंग सोसायटी’ ही गांधींकडून शिकण्याची सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे भविष्यात गांधीजी हे फक्त राजकारणापुरते मर्यादित राहणार नाहीत, तर ते त्यापुढे गेले आहेत. गांधी सगळ्यात चांगल्या प्रकारे कुणाला समजले असतील, ते मार्टिन ल्यूथर किंग यांना. बाकींनी गांधीजींना त्यांच्या सोयीपुरते राजकारणासाठी वापरले, असे डॉ. रामीन लक्षात आणून देतात.

वर्तमानातल्या माणसाच्या अस्तित्वाचा विचार केला, तर आपण जास्तीत जास्त प्रमाणात फक्त गुलाम बनत चाललोय, असे डॉ. रामीन जहाँबेगलू यांना वाटते. लोकशाही म्हणजे नक्की काय? आज लोकशाहीकडं कशा प्रकारे पाहायला हवं, याची वैचारिक मांडणी करताना रामीन सांगतात, ‘नागरी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करणे हाच लोकशाहीकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन असू शकतो. लोकशाही म्हणजे सरकारची हांजी हांजी करणे नव्हे, तर प्रश्न विचारणे होय. अर्थात त्यासाठी तुम्हांला किंमत मोजावी लागेल. नागरिकांच्या स्वाभिमानाशिवाय लोकशाहीचे अस्तित्व परिपूर्ण असूच शकत नाही. सद्य:स्थितीमध्ये लोकशाहीचे लोकशाहीकरण होणे गरजेचे आहे. ते झाले नाही तर लोकशाहीच संपुष्टात येईल. भारतात लोकशाहीचे महत्त्व जाणणारा आणि त्याबद्दल संवेदनशील असा समाज आहे. त्याचा भारताला मोठा इतिहास आहे. त्यामुळे भारतातून लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न जर होत असेल तर त्यात संघर्ष होणारच आहे. ’

जगातील अनेक देशात अराजकाची दृश्य-अदृश्य स्थिती असताना विचारवंतांचे काम काय? तर त्यांनी या परिस्थितीविरुद्ध आवाज उठविणे सर्वात महत्त्वाचे आहे,असे डॉ. रामीन मानतात. ते म्हणतात, तुम्हाला तुम्ही करत असलेल्या कामाबद्दल धमकविणारे लोक किंवा संघटना या स्वत: जास्त भित्र्या असतात, हा माझा जागतिक पातळीवरचा अनुभव आहे. राज्यसंस्था विचारवंत आणि पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करेल, त्यांच्या हत्या केल्या जातील. पण विचारवंत आणि पत्रकारांनी प्रश्न विचारणे आणि संघर्ष करणे महत्त्वाचे आहे. शेवटी समाजकेंद्री जीवन जगताना झालेली हत्या किंवा आलेला मृत्यू महत्त्वाचाच आहे.’

‘थॉटलेस सोसायटी’ आणि ‘डिक्लाइन ऑफ सिव्हिलायझेशन’ या दोन मूलभूत संकल्पनांवर भाष्य करणारा हा राजकीय विचारवंत माध्यमांकडे कसे पाहतोय? माणसाच्या नैसर्गिक स्मृतीचा नाश होऊन तो आता तांत्रिक स्मृतीवर अवलंबून राहतोय. वैचारिक
संकल्पनांचा विकास आणि स्मृतींचा जवळचा संबंध आहे.

जर आपण नैसर्गिक स्मृती गमावून बसत असू तर त्याचा नव्या तत्त्वज्ञान आणि मूल्यनिर्मितीवर गंभीर परिणाम होणार आहे. कदाचित नव्या मूल्यांची निर्मिती आणि अस्तित्वात असलेल्या मूल्यांचा विकास होणारच नाही, असे जहाँबेगलू यांचे माध्यमांसंदर्भातले स्पष्ट
प्रतिपादन आहे.

शेवटी, भारतातील लोकांबद्दल बोलताना ते म्हणतात, गांधीजींमुळे इथल्या लोकांना अवज्ञा (Disobedience) करण्याची शक्ती प्राप्त झाली आहे. त्यांनी वेळोवेळी सरकारविरुद्ध त्याचा अवलंबही केला आहे. लोकशाही प्रक्रियेत हे अनन्यसाधारण महत्त्वाचे आहे. त्यांचे हे म्हणणे वर्तमानालाही तितकेच लागू आहे. किंबहुना, या शक्तीचा विसर पडू न देणे हा डॉ. रामीन जहाँबेगलू यांचा ठळक संदेश आहे.

इराणी गांधीवादी
नव्या काळामध्ये नव्याने गांधीजी समजावून सांगणारा रामीन जहाँबेगलू हा विचारवंत मूळ इराणचा. इराणमध्ये लोकशाहीचे सांस्कृतिक वातावरण नाही, याची खंत त्यांच्या बोलण्या-लिखाणातून जाणवते. बहुसांस्कृतिक वैचारिक मांडणी आणि अहिंसेच्या प्रचार आणि प्रसारासाठी केलेल्या कार्यासाठी त्यांना संयुक्त राष्ट्र संघाच्या शांतता पुरस्काराने गौरविण्यात आले. नागरिकीकरण, लोकशाही, परंपरा आणि आधुनिकता, हिंसा - अहिंसा, गांधीजींचं तत्त्वज्ञान आणि असहिष्णुता या विषयांवर आजवर त्यांचे २७ ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. त्यात इराण बिटविन ट्रॅडिशन अँड मॉडर्निटी, आणि भारताच्या संदर्भात लिहिलेले इंडिया रिव्हिजिटेड, द क्लॅश ऑफ इनटॉलरन्स, द स्पिरिट ऑफ इंडिया, बियाँड व्हॉयलन्स, इंडिया अॅनालाइज्ड, द गांधीयन मुव्हमेंट, "रीडिंग गांधी इन तेहरान' ही त्यांची पुस्तके महत्त्वाची आहेत. तसेच बंदिवासातून मुक्तता झाल्यानंतर लिहिलेले टाइम विल से नथिंग : अ फिलॉसॉफर सर्व्हाइव्हज अॅन इराणीयन प्रिझन' हे पुस्तक अहिंसक मार्गाने मानवी मूल्यांचा आणि वैचारिक स्वातंत्र्याचा संघर्ष पुढे नेण्यासाठी महत्त्वाचे आहे. ‘डिसओबिडियंट इंडियन’ हे त्याचे नवे पुस्तक जानेवारी २०१८ च्या दरम्यान प्रकाशित होईल, ते अवज्ञा करणाऱ्या भारतीयांसाठी असेल.
- अभिषेक भोसले, bhosaleabhi90@gmail.com
लेखकाचा संपर्क - ९४२१३७५०८३
(लेखक औरंगाबाद येथील एमजीएम वृत्तपत्रविद्या व जनसंवाद महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय पत्रकारिता विषयाचे प्राध्यापक आहेत.)

Next Article

Recommended